स्व
हौस म्हणा की खोड
म्हणा...छंद किंवा आपल्या वाटण्या-या माणसांना जोडण्याची धडपड या सर्वांतून एक
वेगळा अनुभव आला. माझ्या रोजच्या मॉर्निंग
वॉकमऴे अनेक चेहरे, आणि त्यामागची माणसही परिचयाची झाली आहेत. गेल्या सहा वर्षापासून रोज सकाळी होणारी पायपीट
अनेक ओळखी करुन गेली आहे. अशाच एका ओळखीचे
रुपांतर चांगल्या परियात झाले आहे. या
काकू रोज सकाळी सहा वाजता चालायला येतात.
अगदीच थंडी किंवा आता जोरदार पाऊस असला तर त्यांची दांडी असते. एरवी त्या रोज येणार म्हणजे येणारच. मी साधारण साडेसहाच्या सुमारास चालायला सुरुवात
करेपर्यंत त्यांच्या ब-याच फे-या मारुन झालेल्या असतात. पहिल्यांदा आमची तोंड ओळख झाली. नंतर हलकेच बोलायला सुरुवात...नमस्कार...काल का
नव्हतात...वगैरे अशी बोलणी होत होती. नंतर
त्या माझ्या फे-या होईपर्यंत थांबू लागल्या...अगदी पाच मिनिटाच्या गप्पा या
ठरलेल्या...
गेल्या पाच वर्षात आमची ही ओळख आता कुटुंबापर्यंत गेली आहे. त्या आमच्या घरी हक्काने येतात. मीही त्यांच्या घरी पुजा, गणपती, हळदीकुंकू,
किंवा सहजही जातेच. त्यांच्या मुलाच्या
साखरपुड्याला, लग्नाला आवर्जुन गेले होते. लग्नानंतर त्यांचा मुलगा काही दिवसातच परदेशात
रहायला गेला. त्यानिमित्त त्यांनी छोटे
गेटटूगेदर ठेवले होते, त्यालाही मला आवर्जुन बोलावले. परदेशात मुलगा आणि सून आपल्या संसारात
रमले. इकडे हे काका-काकू आपल्या
व्यापात. काका अजूनही नोकरी करत
आहेत. काकू जवळच्या एका आश्रमात मुलांना
मराठी आणि संस्कृत शिकवायला जातात. मध्ये
सुनेच्या बाळांतपणाच्या निमित्ताने परदेशात चांगल्या चार महिने राहिल्याही...पुन्हा
आल्यावर आमचा वॉक सुरु....घरी येणंजाणंही सुरु झालं....अगदी सकाळी चालतांना भेट
झाली असेल तरीही.....गेल्या आठवड्यात अशाच भेटल्या तेव्हा भलत्य़ा खूष होत्या...त्यांचा
मुलगा, सून आणि ला़डका नातू रहायला येणार होते.
मुलगा आठवडयाने परत जाणार असला तरी सून आणि नातू चार महिने इथेच रहाणार
होते. नातवाचा पहिला वाढदिवस इथे आपल्या
माणसात साजरा व्हावा अशी काकूंची इच्छा होती.
मुलाने आणि सुनेलाही ते पटले.
त्यामुळे आता काकूंची चंगळ झाली होती.
सकाळी त्या फे-या मारत होत्या, पण खूप घाईत होत्या. नंतर कळलं
सून आणि नातूही सोबत आले आहेत, मॉर्निंग वॉकला...शेजारीच असलेल्या
गार्डनमध्ये ती दोघं बसली होती. काकू मला
बोलवायला आल्या. काकूंचा आठ महिन्याचा
नातू खूप गोड....थोडा चालायलाही लागलेला.
त्याला सांभाळतांना त्यांच्या सुनेची तारांबळ होत होती. सुनेबरोबर हाय, हॅल्लो झालं...नातवानं लगेच
आजीकडे बोट दाखवलं...त्यामुळे काकू त्याला उचलून चालायला गेल्या...मी सुनेबरोबर बोलत
थांबले. ती गार्डनमध्ये येतांनाही मोठं
बास्केट घेऊन आली होती. सहज म्हणून हे
काय, विचारलं. तर म्हणाली की, इकडे डास खूप असतात, इन्फेकशन नको म्हणून तिकडूनच औषधं आणलीत. शिवाय पाण्याच्या बाटल्या, पेला....क्लिनींग
पेपर...त्याला इथल्या फूडची सवय नाही...त्यामुळं मध्येच काही लागलं तर इथलं काही
नको, म्हणून सर्व सोबत ठेवते...मला हे इथलं...तिथलं लगेच कळलं नाही...नंतर कळलं
इथलं म्हणजे आपल्या देशातलं...भारतातलं...आणि तिथलं म्हणजे परदेशातलं. म्हणजे या छोट्या बाळासाठी त्याच्या आईनं
खाण्याचे डबेही परदेशातून आणले होते....देवा...अर्थात मी मनातच म्हटलं...मध्येच
उत्साहानं नातवाला फिरवणा-या काकूंकडे बघितलं.
त्या या छोट्याला बागेतल्या झाडावरची फुलं दाखवत होत्या...नंतर बहुधा ही
सूनबाई त्याला तिथल्या क्रीमनं अंघोळ घालणार...असो...हेही मनातच...सुनबाई बोलतं
होती. इथल्या वातावरणाची सवय नाही. तिथे कसं सर्व छान असतं. इथे इन्फेकशन लगेच होतं. खूप घाण असते ना...तिथे सर्व स्वच्छ असतं...कुठेही
कचरा नाही...लहान मुलांची खूप काळजी घेतात...वगैरे वगैरे....तिथलं पुराण चालू
झालं. मी नुसतं हं...हं...करत होते. खरं तर काकूंच्या सुनेचं सगळं बालपण आणि नंतर
शिक्षण इथेच
झालं....चार-पाच वर्ष तिथे म्हणजे परदेशात काय राहीली, लगेच इथल्या व्यवस्थेला
नावं ठेवायला लागली...सगळ्या वस्तूंची तुलना चालू होती. जणू काका-काकूंवर इथे येऊन खूप उपकार केलेत अशी
बोलणी चालू होती.
खरं तर ती काकूंची सून होती, आणि त्यात अगदी चार महिन्यांची पाहुणी होती,
म्हणून तिची ही
कौतुक गाथा मी ऐकत होते.
पण पाच-दहा मिनीटातच कंटाळा आला.
वास्तविक रागच आला होता. आणि आपण
तिला उलट बोलू शकत नाही याची खंत वाटत होती.
मी घाईत आहे, असं सांगून निघालेच. पण काकू ऐकेनात. दुपारी वेळ काढ, आणि येच असा आग्रह करु
लागल्या. सुनेनं परदेशातून आणलेल्या वस्तू
त्यांना दाखवायच्या होत्या...मी हो म्हणून तिथून निसटले. पण सकाळभरात काकूंचे दोन फोन येऊन गेले. नाईलाजाने दुपारी आटपून त्यांच्या घरी
निघाले. आपल्याकडे मोकळ्या हाताने भेटायला
जात नाहीत. पण सकाळी झालेली त्यांच्या
सुनेची भेट आणि तिचं परदेश प्रेम पहाता काय न्यावं हा प्रश्नच पडला. सुनेनं इथलं-इथलं करत नावं ठेवलं तर...मग घरी
साजूक तुपात बनवलेले डींक आणि सुक्यामेव्याचे मोजून चार लाडू डब्यात भरले आणि
निघाले.
काकू आमच्या घरापासून अगदी पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर
रहातात. त्यामुळे चालतं त्यांची बिल्डींग
गाठली. चार माळ्याची बिल्डींग. काकू चौथ्या माळ्यावर. त्यांच्या माळ्यावर अवघे दोन ब्लॉक...त्यामुळे
समोरची जागा अगदी प्रशस्त. शिवाय त्यांनी
इंटेरीअरचं कामही छान केलेलं...छानशी सजावट...चार माळे चढून गेलं आणि कितीही दम
लागला तरी काकूंच्या घराचं प्रवेशद्वार पाहिलं की सगळा दम पळून जायचा....पण
त्यादिवशी तसे झाले नाही....तिसरा मजला पार केला आणि चौथा चढायला सुरुवात
केली. एरवी काकूंच्या दरवाज्यासमोरील छोट्या
छोट्या सजावटी झाडांच्या कुंड्यांकडे लक्ष जायचं....तेव्हाही त्या कुंड्या होत्याच,
त्यासोबत मोठ्या प्लॅस्टीकच्या निळ्या रंगाच्या बॅगा ठेवल्या होत्या. त्यात काकूंच्या नातवाचे डायपर टाकलेले
होते....अगदी तसेच...वापरलेले....तो दर्प नाका पासून दूर सारत मी बेल वाजवली. काकू दार उघडायला आल्या आणि नेमकं मला
बघितलं...माझी अवस्था बघून त्याही अवघडल्या...अजून कचरेवाला आला नाही म्हणत
त्यांनी वेळ मारली...

फक्त व्यवस्थेला नावं ठेवणं सोप्प असतं...पण ही
व्यवस्था सुरळीत होण्यासाठी आपण काय करतोय हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला
तरी खूप झालं. आपल्याकडे स्वच्छतेबाबत नियम कडक नाहीत, पण आहेत ते पाळायचेच नाहीत
असं नाही. त्या नियमांचे पन्नास टक्के जरी
पालन झाले तरी असे परकीय पाहुणे नाव ठेवायला धजावणार नाहीत हे नक्की....
सई बने
डोंबिवली
------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan
ReplyDelete