प्रायव्हसी आणि शेजार


प्रायव्हसी
आणि
शेजार

दिवाळी म्हणजे ऑफरचा हंगाम...ऑनलाईन खरेदी विक्री करणा-या सर्व साईटवर जोरदार ऑफर...दुकानांमध्ये भली भक्कम सूट...एकूण काय आपल्या खिशात व्हीटॅमीन एम असेल तर खरेदीची चंगळ...नाहीतर नुसती विंडो शॉपिंग...बर हल्ली कपडे, इलेक्ट्रीकल सामान,  घरसजावटीच्या वस्तू...यावरच सूट असते असं मला वाटत होतं.  पण दिवाळीच्या निमित्ताने नवीन घर घेणा-यांनाही भरपूर सवलत देण्यात येते हे मला या दिवाळीत समजलं...पण त्याचबरोबर नवीन मार्केटींग पद्धतीमुळे मन खट्टूही झालं....

धनत्रयोदशी झाल्याच्या दुस-याच दिवशी नव-याला सुट्टी होती...आम्ही बाकी असलेली छोटी छोटी खरेदी करायची, असा बेत केला.  तितक्यात एका जवळच्या नातेवाईकानं फोन केला.  त्यांच्या मुलीला नवीन फ्लॅट घ्यायचाय.  तिचं काही महिन्यापूर्वी लग्न झालंय...दोघंही वनरुम किचनच्या फ्लॅटमध्ये रहातात.  पण भविष्याची तरतूद म्हणून आता त्यांना नवीन फ्लॅट घ्यायचा होता.  त्या नातेवाईकांना मुली आणि जावयासोबत जायला वेळ नव्हता,  म्हणून त्यांनी आम्हा दोघांना विनंती केली.  यावेळी दिवाळीची सफाई आणि फराळही वेळेआधी पूर्ण झाल्यामुळे मीसुद्धा हो म्हटलं...तसंही आम्हालाही त्यानिमित्त नवीन घरांच्या किंमती कळल्या असत्या...त्या मुलीबरोबर बोलणं झालं...दुपारी तीन वाजता गाडी येईल, तयार रहा म्हणून तिनं सांगितलं...दुपारी तीन-सव्वातीनच्या सुमारास गाडी आली....त्या मुलीची स्वतःची चारचाकी आहे.  मला वाटलं तिच गाडी असेल,  पण नंतर कळलं की ज्या भागात आम्ही फ्लॅट बघायला जाणार होतो, तो मोठा समुह आहे.  जागा थोडी लांब असल्यामुळे त्या ग्रुपकडून येणा-या प्रत्येक ग्राहकाला आणण्याची आणि जाण्याची व्यवस्था स्वतंत्र गाडीने करण्यात येतेय.  माझ्या नव-याला या घर खरेदी प्रकरणात बराच रस...त्यामुळे त्याने लगेच चर्चा सुरु केली....माझ्या कानावर घराच्या किंमती...रेरा...जीएसटी...बिल्डप एरीया असे शब्द पडत होते.  प्रामाणिकपणे सांगते,  याबाबत फार माहिती नसल्यामुळे आणि कदाचीत दुपारच्यावेळी अगदी जेवल्याबरोबर लगेच जायला निघाल्यामुळे मला फार उत्साह नव्हता...मी शांतपणे बाहेर बघत होते.  गाडी शहराबाहेर आली.  अगदी आम्ही गणपती विसर्जनाला जातो, त्यापेक्षा बरेच लांब आलो.  शहरापासून लांब आहे...गाडीत चर्चा चालू झाली...पण काही हरकत नाही...आता हाच भाग डेव्हलप होणार आहे. मेट्रोपण येतेय...दोनवर्षांनी या भागाचं रुपडं बदलून जाणार...गाडीमध्ये नवीन येणा-या योजनांची चर्चा चालू झाली....शेवटी वीस ते पंचवीस मिनीटांनी ज्या भागात मोठे गृहसंकूल उभारण्यात येणार होते तो भाग आला.  रस्त्याला लागून जागा असली तरी इमारती आतल्या भागात होत्या...त्यामुळे पुन्हा दहा मिनीटे प्रवास...एकदाचं त्या गृहसंकूलासाठी तयार करण्यात आलेलं कार्यालय आलं.  मी नजर टाकली,  आजूबाजूला अनेक एकर जमीन मोकळी होती.  दोन मोठ्या इमारतींचं काम सुरु होतं...बहुधा वीस मजल्यापर्यंतच्या इमारती असाव्यात...बाकी जमीन अद्याप तरी मोकळी होती.  त्यावर कसलेतरी बोर्ड लिहील्याचं दिसत होतं...बाकी सर्व रानच...पण ग्रुपचं कार्यालय या सर्वात देखणं...अगदी प्रवेशद्वारावर मोठा पाण्याचा फवारा....काचेचं मोठे प्रवेशद्वार उघडून आम्ही आत प्रवेश केला...आणि बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या समुहात आल्याची जाणीव मला झाली....
बाहेर जेवढं कोरडं वातावरण होतं तेवढंच उलट आतलं वातावरण...काचेचं मोठंस बुकींग ऑफीस...तात्पुरतं असलं तरी सर्व सुविधा...सुटाबुटात वावरणारी मुलं-मुली...आम्ही
आत गेल्यावर त्यापैकी एकानं आमचा ताबा घेतला...कुठून आलात...कोणी संदर्भ दिला...आदी प्राथमिक चौकशी झाली...आम्हाला एक फॉर्म भरायला दिला...त्यात कॉलम म्हणजे, किती रुमचा ब्लॉक हवा...आणि पैसे कसे देणार...आम्ही जांच्यासाठी आलो होतो...त्यांना टू बीचएके रुमची गरज होती...आणि पैसे अर्थातच बॅक लोन...हा फॉर्म मग एका दुस-या मुलाकडे गेला...त्या फॉर्मचे वर्गीकरण झाले बहुधा...मग आमच्या रुमच्या गरजेप्रमाणे एक सेल्समन आमच्याकडे आला...त्याने त्याची ओळख करुन दिली आणि रुम बघण्याचा पहिला वर्ग सुरु झाला...त्याने त्या ग्रुपबद्दल माहिती दिली...दरम्यान सर्वांसाठी कॉफी आली...त्या एक्सप्रेसो कॉफीच्या वासाने ते वातावरण भरुन गेलं.  मला तर मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये आल्यासारखं वाटत होतं...मग त्याने आम्हाला प्रोजेक्ट रुममध्ये नेलं...त्या प्रोजेक्टचं खरं रुप तिथे दिसणार होतं.  तत्पूर्वी हल्ली मोठ्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी पायांना रॅपल करतात...तसं तिथे आमच्या पायांना रॅपल करण्यात आलं...माझ्यासाठी आणखी एक नवीन गोष्ट...गम्मतच...मी त्या प्लॅस्टीक रॅपल केलेल्या हिरव्या पायांचा फोटो काढला...लेकाला दाखवण्यासाठी...अर्थात ते बघून नव-याने डोक्यावर हात मारुन घेतला, ही वेगळी गोष्ट... ते हिरव्या प्लॅस्टीकमध्ये गुंडाळलेले पाय सांभाळत आम्ही प्रोजेक्टर रुममध्ये गेलो...मग तो प्रोजेक्ट भविष्यात कसं दिसणार हे दाखवण्यात आलं...आमचं शहर कसं आहे याचे काही फोटोही दाखवण्यात आलं...आमचं शहर असं आहे..म्हणतं मी जोरात प्रश्न विचारला...नव-याला माझ्या प्रश्नातला भाव समजला...त्यानं लगेच मोठे डोळे केले....मग पुन्हा मी त्या रंगेबिरंगी दुनियेकडे पहात राहीले...दहा मिनिटाचं ते प्रेझेन्टेशन संपल्यावर आता वेळ होती ते प्रत्यक्षात ते ब्लॉक कसे दिसतील हे पहाण्याची....
या मंडळींच्या भाषेत बोलायचे तर सॅम्पल फ्लॅट...आपण घेणारा फ्लॅट कसा दिसतो त्याचा अंदाज येण्यासाठी असे काही फ्लॅट तयार करुन ठेवले असतात.  शिवाय प्रोजेक्टमध्ये काय काय सुविधा असणार हे सुद्धा त्यात दाखवले असते.   त्या सॅम्पल फ्लॅटमध्ये गेलो, तर तिथे अगदी ते मालिकांमध्ये असतात तसे छान सजवलेले रुम...आम्ही दोघी थेट स्वयंपाकघर नव्हे तर किचन मध्ये गेलो...कारण सर्वच आधुनिक...काचेचं डेकोरेशन...अगदी साध्या सुरीपासून ते चिमणीपर्यंत सर्व आधुनिक आणि साजेसं...हे असंच मिळणार का....माझा पहिला प्रश्न...तर तसं नाही, त्या सेल्समनने सांगितलं...तुम्ही तुमचा रुम कसा सजवू शकता, हे दाखवण्यासाठी आम्ही हे सर्व ठेवलं आहे, असं त्यानं सांगितलं...मग तसंच अन्य रुमचा फेरफटका...सर्व रुम छान सजवलेल्या...अगदी टॉयलेट, बाथरुमसुद्धा...हा फेरफटका झाल्यावर मग सुरु झाली अंतिम बोलणी...त्यासाठी आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये गेलो...तिथल्या गोल टेबलाभोवती आमच्यासारखीच बरीच मंडळी सेल्समनबरोबर वाटाघाटी करत बसली होती.  कितीतरी गर्दी...मोठा सेल लागल्यावर जशी गर्दी होते तशीच...आम्हालाही एक गोल टेबल मिळाले...पुन्हा छोट्या पाण्याच्या बाटल्या आणि कॉफी आली...मग सुरु झाली बोलणी...त्या सेल्समनने आम्हाला इमारतींचा प्लॅन दाखवला...ठराविक मजल्यांपर्यंत किंमत वेगळी...उंचीवर घ्यायचा असेल तर वेगळी किंमत...शिवाय गार्डन फेसींग असेल तरीही किंमत वेगळी...मग एवढं करुन गार्डन फेसींग फ्लॅट घ्यायला काय हरकत आहे, अशी आमची चर्चा झाली...आणि फार उंच नको...अगदी पाचव्या सहाव्या
मजल्यापर्यंत बस्स...आमचं ठरलं...सेल्समनने हुश्श करत मग त्या प्रत्येक मजल्यासाठी असणारा प्लॅन पुढे केला...प्रत्येक रुमसाठी बाहेर स्वतंत्र जागा होती...पॅसेजमध्ये एवढी जागा कशाला वाया घालवली, असा बाळबोध प्रश्न मी केला...तर म्हणाला मॅडम, आजकाल सर्वांना प्रायव्हसी हवी असते...इथे शेजारच्यांचा त्रास नाही...अगदी किचनमधून सुद्धा तुम्हाला कोणी पाहू शकत नाही...कोणीही तुम्हाला डीस्टर्ब करु शकत नाही...अरे बापरे शेजारी त्रास कधी देतात...माझ्या मनात विचार आला...पण तो मात्र या प्रायव्हसीचा मुद्दा मोठा करुन सांगत होता.  प्रत्येक रुमला स्वतंत्र जागा...आपण आपले राजे असल्यासारखं वाटत होतं...
मला हे खटकलं...शेजारच्यांचा त्रास कशाला...आमच्याकडे तर एक दिवस शेजारच्या काकूंबरोबर बोललं नाही तर काहीतरी चुकल्यासारखं होतं...अगदी मासे आणायला जातांना सुद्धा त्यांची हक्कांनी बेल वाजवायची...मला आठवलं, दोन वर्षापूर्वी मला डेंग्यू झाला होता...तेव्हा मी आठवडाभर हॉस्पिटलमध्ये...या काळात माझ्या घरचा ताबा शेजारच्यांनी घेतला होता...अगदी जेवणाला बाई ठेवण्यापासून ते तिला घरातील सर्व डबे दाखवण्यापर्यंत सर्व काम त्यांनी चोख केलं होतं...शिवाय लेकाला आणि नव-याला धीर दिला होता...मी घरी आल्यावर वेगवेगळे पदार्थ करुन मला खाऊ घातले...या गोष्टी छोट्या वाटतात..पण त्यांनी केवढा आधार मिळतो हे कधीच शब्दात सांगता येणार नाही...आणि हे लोकं म्हणतात की शेजा-यांपासून प्रायव्हसी हवी....त्या सेल्समनचा ताबा माझ्या नव-यानं घेतला होता...घराचे प्रवेशद्वार...त्याची दिशा...यावर चर्चा चालू झाली...पण माझे मन उडाले...एकतर गर्दी मी होती...त्यात संध्याकाळचे सात वाजले होते...घरी लेकाला एकटाच सोडून आलेले...या सर्वांत डोकं प्रचंड दुखायला लागलं...शिवाय परत जायची काळजी लागली...शेवटी आम्ही आठवड्यात निर्णय घेतो....असं ठरलं...त्या सेल्समनने चेकचे डीटेल लिहून दिले आणि आमच्यासाठी गाडी मागवली...घरी परत येतांना गाडीत त्या प्रोजेक्टची चर्चा सुरु होती...मलाही विचारलं...पण मला काही समजेना...मी नुसतंच छान म्हटलं...घरी यायला रात्रीचे आठ वाजले...लेकरु चांगलंच वैतागलं होतं...दोनवेळा कोण येऊनही गेलं होतं...त्यांनी तेव्हा शेजारच्या काकूंची बेल वाजवून त्यांना मदतीला बोलावलं...मला हायसं वाटलं...शेजारच्यांपासूनची प्रायव्हसी मला नको होती...त्यांची साथ, सोबत आणि आधार मला खूप मोठा, मोलाचा आहे याची पुन्हा जाणीव झाली...


सई बने
डोंबिवली
-------------------------------------------------------------------------------------------------------------


ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


Comments