ज्याचे त्याच नववर्ष...


ज्याचे
त्याच
नववर्ष...

नव्या वर्षाची सुरुवात झाली...किती उत्साह...कितीतरी धम्माल...पार्टी...आणि सुट्ट्या....एकूण काय सर्वत्र मस्ती आणि मजा...या सर्व उत्साहात आम्ही मात्र नेहमीसारखे नववर्षाचे स्वागत केले.  लेकाने परीक्षेचे कारण देत कुठेही जाण्यास नकार दिला.   मला ती हॉटेलमधली गर्दी नकोशी वाटते...तास-तासभर लाईन लावायची....नकोच...नव-याला ऑफीसमधून येण्यासाठी उशीर होणार होता.  मग काय घरीच साधासा बेत...नवीन पुस्तकांची साथ....कितीही इच्छा असली तरी दुस-या दिवशी, म्हणजे नववर्षाच्या पहिल्या दिवशी लवकर उठायचेच होते.  लेकाला सुट्टी नव्हती.  त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि आम्ही जांभया द्यायला सुरुवात केली. 
नववर्षाचा संकल्प वगैरे अनेकजण करतात.  कितीजणांचा पू्र्ण होतो ते माहीत नाही.  पण करतात हे खरे आहे.  कारण त्यापैकीच मी एक...काही वर्षापूर्वी हे खूळ डोक्यात होतं....त्यापैकी अनेक संकल्प संपले कधी हे कळलंच नाही...फक्त नशिबाने सकाळी चालण्याचा संकल्प तेवढा बाकी आहे.   त्यात माझ्या सोयीनुसार बदल होतो.  पण ही सकाळी चालण्याची सवय मात्र अंगात मुरल्यासारखी झाली आहे.  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी चालायला जायला थोडा उशीर झाला.  का...तर ती माझी एक मावशी भेटली...नात्यातली नाही....ओळखीची म्हणाल तर तशी फार ओळखही नाही...काही महिन्यांपूर्वी मी तिला पाहिलं...अगदी एक-दोन मिनीटांची भेट...तरीही का कोण जाणे तिच्याबद्दल मनात ओढ निर्माण झाली...सकाळची कामाची घाई माहीत असूनही तिच्याशी बोलण्यासाठी मी चक्क पाच ते दहा मिनीटे थांबू लागले...अचानक ती गायब झाली...तिची जागा मोकळी...मग नववर्षाच्या पहिल्या दिवशी ती भेटली...मला कोण आनंद झाला...या मावशीचे बोल परिपक्व होते....तिच्या रापलेल्या चेह-यासारखे..


नववर्षाची पहिली सकाळ...आमच्या शेजराचे ओपन जीम तसे ओस पडले होते...फार गर्दी नव्हती....मी लेकाला घेऊन सकाळी साडेसहाच्या सुमारास निघाले...काही नेहमीचे चेहरे मॉर्निंग वॉक करत होते...थंडी चांगलीच...त्यामुळे मी सुद्धा चेहरा झाकून...स्वेटर घालून गाडी चालवत होते...पहिल्या दिवशी हल्ली सगळ्यांना सुट्टी असते की काय....कारण सगळा रस्ता ओस पडल्यासारखा होता...एक-दोन रिक्शा वगळता...संपूर्ण रस्ता खाली...त्यामुळे थंडी असूनही ब-यापैकी गाडी पळवल्याचा आनंद मिळवता आला...स्टेशन गाठलं...आणि माझी नजर तिच्याकडे गेली...आळूची पानं विकणारी ती मावशी आली होती....येवढ्या थंडीत...लेकानंही तिला बघितलं...आता काय हिच्याबरोबर गप्पा मारणार का...म्हणत तो हसत त्याची गाडी पकडण्यासाठी निघून गेला...मी गाडी वळवली आणि त्याच्यासमोर लावली...ब-यापैकी थंडी होती...ती मात्र तशीच होती....अंगाभोवती एक साधा कपडा गुंडाळून घेतला होता...पार वांगणीच्या पुढे कुठेतरी तरी तिची वाडी होती.  कातकरी महिला घालतात तशी साडी...वय साधारण साठीच्या आसपास असणार....साधारण दिवाळी झाल्यावर ती रोज मला भेटायला लागली होती.  अगदी सहा-साडेसहाच्या सुमारास आळूच्या पानाची टोपली घेऊन ती स्टेशनसमोर विकायला बसायची...एवढ्या सक्काळी आळूची पानं कोण घेणार...असं म्हणत मी काही दिवस तिच्या समोरच गाडी वळवून जायचे...नंतर मात्र तिच्याशी बोलावंसं वाटलं...मग कुठून येते...कशी येते ही चौकशी झाली...ओळख वाढली...अगदी दोन-चार मिनीटाच्या गप्पा...मी तिच्यासाठी मिठाईचा पुडा आणला तर तिला कोण आनंद झाला...फार नाही पण साधी मिठाई होती...तिने ती राखून ठेवली...घरी गेल्यावर नातवाला, मुलाला खायला दिली...दुस-या दिवशी मला कितीतरी कौतुकानं सांगत होती...नातू खूप खूष झाला...मी छान
म्हटलं...मग माझ्या हातात तिनं आळूच्या पानांची जुडी ठेवली...घे की...चांगली हायत...खाजरी नाय...ताजी हायत...मी आणि लेक पहाटं चारच्या आधी जातो रानावर आणि कापतो....पयली ट्रेन पकडून मग येतं मी....ती मला तिच्या  साध्याश्या भाषेत सांगत होती...मला ती सांगत असतांना आठवलं मी सकाळी चारला उठते लेकाचा...नव-याचा डबा करते...हे मी किती ठसक्यास सांगत असते...पण या मावशीची गोष्ट वेगळीच...ती सगळं करत होती कारण या पानांवरच तिचं घर चालत होतं...यातून काही थोडे जे पैसे मिळणार होते, त्यावर तिचा दिवस जात होता...तिच्या घरातील प्रत्येक व्यक्ती असेच काहीबाही काम करत होता...हे नंतर तिच्या बोलण्यातून समजले...मी आळूची पानं घेतली...आणि तिला बळेबळे पैसे दिले...
त्यानंतर काही दिवस तिची दांडी होती...ती जागा खाली असायची...एव्हाना मी निघतांना तिच्यासाठी चपाती आणि भाजी गुंडाळून आणायला सुरुवात केली होती...निघतांना तो रोल लेकाच्या हातात द्यायचे...मग तिच्यासमोर गाडी थांबवलून लेक तिच्या हातात तो रोल देणार आणि पळणार...आणि मी मग त्या मावशीबरोबर बोलणार...हे नेहमीचे झाले होते...पण ती जागा खाली दिसली की, लेकही चिडवायचा...तुझ्या मावशीची आज सुट्टी आहे...मग तसाच चपातीचा रोल घेऊन मी परत यायचे....मग चार-पाच दिवसांनंतर अचानक दिसली...थोडी थकलेली होती...विचारलं तर म्हणाली ताप आला होता...दोन दिवस घरात...तशीच उपाशी होती...माझ्या मनात कालवाकालव झाली...आज चपातीपण आणली नाही म्हणून मलाच बोल लावले...ती पानं विकायला बसली त्याच्या मागेच वडापावचं दुकान चालू झालं होतं...गरमगरम वडापावचा वास दरवळत होता...तिला वडापाव खातेस का म्हणून विचारलं तर नको म्हणाली....मी त्या नको कडे दुर्लक्ष करत दोन वडापाव घेतले आणि तिच्या हातात दिले...मला तिच्या चेह-याकडे बघवलं नाही...ती हलकेसं म्हणाली आता येणार नाय...मी बरं म्हटलं...जेव्हा येशील तेव्हा भेटू...काळजी घे...म्हणत गाडी चालू करुन निघाले...का कोणास ठाऊक तिच्याबरोबर जोडले गेले...
आज त्यादिवसानंतर ती पहिल्यांदा दिसली...गाडीचा लाईट तिच्यावर पडला...तसं माझा चेहरा झाकलेला असला तरी ओळखीचे हसली...कशी आहेस ग...म्हणत मी तिला हाक मारली...बरी हाय...तुमी कशा आहात...म्हणत माझ्यापुढे आळूची पानं केली...मला ठाऊक होतं...तुमी येणार...आज कर आळू म्हणत माझ्यापुढे ताजी पानी धरली...मी आजूबाजूला बघितलं तर सगळी दुकानं बंद...वडापावचं दुकानही बंद...तिला वाचारलं एवढ्या सकाळी कशाला आलीस...थंडी लागत नाही का...आज नवीन वर्ष आहे...एवढ्या लवकर कोण नाही येणार...यावर तिनं फक्त मान हलवली...मला काय ठाव...आज आले...ती म्हणाली...आज तिला आळूची पानं ब-यापैकी मिळाली म्हणून विकायला आली होती...हे नवीन वर्ष क काय तिच्या रोजच्या डायरीत नव्हतेच बहुधा...मी डोक्यावर हात मारला...तिला पैसे पुढे केले तर नको म्हणाली...पण तिचा हात ओढून हातात पैसे ठेवले...आजूबाजूनं काही लोक जात होते...माझं आणि तोचं बोलण ऐकण्यापेक्षा बघत होते...मी ती आळूची पानं घेतली आणि तिला टाटा करुन निघाले...पुढे कोप-यावर एक दुकान चालू झालं होतं...तिथून एक टोस्टचं पाकीट आणि बिस्कीटाचा पुडा घेतला...परत तिच्याकडे आले...तिच्या हातात दिला...कशाला आणलास...म्हणून तिनं विचारलं...मी म्हटलं राहू दे...तुझ्या नातवाला...आज नवीन वर्ष सुरु झालं ना...त्याला भेट...उद्या येणार आहेस
का...बुट आहेत माझ्याकडे छोट्या साईजचे...स्वेटरही आहे...आणते नातवाला तुझ्या...यावर ती हसली...पानं मिळाली तर येईन...स्वेटर चालेल...पण बूट नको...आम्ही कधी घातलेच नाहीत...जंगलात चालता येत नाही बुटानं...माझ्या मनात चर झालं...नववर्षाची काय थोडी जी धुंदी होती, ती तिच्या एका वाक्यानं उतरली...मी हळूच तिच्या पायकडे पाहिलं...कितीतरी भेगा होत्या...रापलेल्या पायांवर तेवढ्याच खोल भेगा...आता थंडीत या भेगाळलेल्या पायांनी ही मावशी डोंगरावर कशी चालत असेल...साधं कल्पनेनं माझ्या अंगावर काटा आला...मी बरं म्हणून तिचा निरोप घेतला...
घरी आले...गाडी लावून चालायला निघाले...आमच्या शेजारी असलेल्या बागेच्या बाजुलाच बियरच्या काही बाटल्या पडल्या होत्या...वेफर्सची खाली पाकीटं पडलेली होती...चालतांनाही काहीजण थर्टीफस्ट कसं साजरं केलं होतं याच्या रंजकदार गप्पा मारत होते...मला राहून राहून ती मावशी आठवत होती...आणि तिला होत नसलेल्या भेगाळलेल्या पायांच्या वेदना मला होत होत्या....


सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


Comments