आपले
महाराज
ढोल, ताशांचा नाद...भगव्या झेंड्याचा डौल...भगवे फेटे...कपाळावर
चंद्रकोर...चेह-यावर कितीतरी अभिमान...ओठावर एकच
नाव...शिवछत्रपती...महाराज...राजे...आपले राजे...शिवाजी महाराजांची जयंती नुकतीच
झाली...त्यानिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक बघायला थांबले, आणि त्या वातावरणात
भारावून गेले...एरवी गाड्यांवरुन धूम फिरणारे कितीतरी तरुण आणि तरुणी भगव्या
फेट्यामध्ये रुबाबदार दिसत होते...कोणी ढोल वाजवत होते...कोणी झांज तर कोणी
ताशा...कोणाच्या हातात भगवा झेंडा डौलाने फडकत होता...फुलांनी सजवलेल्या ट्रकवर
महाराजांचा मोठा फोटो...त्याच्याभोवती बसलेले छोटे मावळे...दुस-या ट्रकवर
महाराजांच्या छबीमध्ये रंगलेले अन्य काही बालगोपाल...भर रस्त्यातून मिरवणूक जात
होती...अर्धा रस्ता या मिरवणुकीने व्यापलेला...तरीही वाहतुकीची कोंडी नाही..की
गाड्यांचा आवाज नाही...सगळं शिस्तबद्ध...एवढ्या वर्षातनंतरही या राजाची अशी काही
जादू आहे की त्यांच्या मिरवणुकीमध्येही कमालीची शिस्त...एकीकडे महाराजांचा
जयजयकार...बरं राजांचा महीमाच असा की मिरवणुकीत जे सहभागी झाले नव्हते तेही या
जयजयकारात सामील होत होते...अगदी बाजुला गाड्यांवरुन जाणारेही...आणि माझ्यासारखे
बाजुला राहून राजांची मिरवणूक बघणारेही...

मिरवणूक बघतांना एक म्हणाला,...तो पिक्चर आला ना तानाजीचा...म्हणून
यंदा जरा जोर आहे शिवजयंतीचा...मी सुद्धा हे बोल पुसटसे ऐकले...एका चित्रपटामुळे
शिवजयंती जोरात साजरी झाली...मला हे पटलं नाही...कदापी नाही...माझ्यासारखीच त्या
गृहस्थांसोबत असणा-यांनी नाराजी व्यक्त केली...त्या गृहस्थांच्या शेजारीच एक आजीही
मिरवणूक बघायला उभ्या होत्या...कोणी काही बोलायच्या आत त्या लगेच म्हणाल्या...एवढी
वर्ष झाली, मी मिरवणुका बघतेय महाराजांच्या जन्मउत्सवाच्या...दरवर्षी त्या उत्सहात
भर पडतेय...त्याचा आणि पिक्चरचा काय संबंध...महाराजांवर असे कितीतरी चित्रपट येऊन
गेलेत...त्या चित्रपटांना महाराजांच्या नावाचा लाभ होतो...महाराजांना
नाही...त्यांची लोकप्रियता कधीच कमी होणार नाही...त्या आजींच्या सडेतोड उत्तरावर
ते गृहस्थ चपापले...सारवासारव करु लागले...बाकीची मंडळीही बरोबर आहे, बोलली....तेवढ्यात
मिरवणुकही पुढे सरकली...काही जण मिरवणुकीबरोबर पुढे गेले...मी महाराजांची प्रतिमा
ठेवलेला ट्रक गाठला...महाराजांना नमस्कार केला...आणि घराकडे
निघाले...माझ्यापाठोपाठ त्या आजीही नमस्कार करायला गेल्या...मी हळूच त्यांच्याकडे
बघितलं...कसला ताठ लहान मुलाला, बहुधा त्यांचा नातू असावा त्यालाही नमस्कार करायला
लावला...
हे दृष्य बहून खरच बरं वाटलं...आपले महाराज आहेतच असे...मनात विचार
चालू झाला, आमच्या राजाच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसावर एक चित्रपट होऊ
शकेल...तानाजी महान होतेच...पण राजांचा प्रत्येक मावळा लाखमोलाचा होता...अशी
लाखमोलाची माणसं ज्यांनी एका विचारात बांधली, तो आमचा राजा एका चित्रपटामुळे
लोकप्रिय कसा होईल...उलट एवढ्या वर्षानंतरही प्रसिद्ध होण्यासाठी राजांचा आधार
अनेकांना घ्यावा लागतोय...
महाराज...राजे...शिवबा...काय असेल या शब्दात सामर्थ्य...आज आपला हा राजा जाऊन कित्येक वर्ष लोटली...राजे गेले ते फक्त देहाने...विचाराने...त्यांनी गाजवलेल्या शौर्यांनी राजे इथे, आपल्या सोबतच आहेत...अगदी आसपास म्हटलं तरी चालेल...काल-परवा त्यांची तारखेनुसार
करण्यात येणारी जयंती साजरी झाली. आता आणखी एक जयंती राजांची साजरी होईल...राजांचे
या महाराष्ट्रावर एवढे उपकार आहेत, की दरदिवसाला त्यांचा जयंती उत्सव साजरा केला
तरी ते उपकार फिटणार नाहीत...इथे या भूमीत आपल्या मागील अनेक पिढ्यांचं आणि
त्यायोगे आपलंही अस्तित्व टिकलंय ते या
एका राजामुळं...शिवाजी महाराज...य़ा एका नावातच एवढी मोठी शक्ती आहे की पुढच्याही
अनेक पिढ्या नुसतं महाराज म्हटलं तरी छाती फुगवून अभिमानानं उभ्या राहतील...या अशा
युगपुरुषाला प्रसिद्धीसाठी कुणाच्याही आधाराची गरज नाही...उलट आपल्याला महाराजांची
गरज आहे...आज कित्येक जणांचे भरण पोषण (खरंतर याला दुकान हाच शब्द योग्य
वाटतो...असो) शिवाजी महाराज या नावामुळे चालतेय...
महाराजांवरील
पुस्तके, त्यांचे चरित्र कितीतरी वेळा वाचलंय...प्रत्येकवेळी महाराजांच्या एका नव्या
पैलूचा परियच झाला. आमचा शाळेचा ग्रुप
गेटटूगेदरचं निमित्त करुन रायगडवर गेला, तेव्हाही महाराजांचा नव्यानं परिचय
झाला. त्यांच्या जीवनाकडे पाहिलं की प्रश्न पडतो, हा माणूस नेमका कोण होता...ते उत्तम योद्धे
होतेच...पण ते उत्तम शेतकरी होते...ते उत्तम वास्तुकार होते...वातावरणाची त्यांना
उत्तम जाण होती...आपल्या राज्याची काय या देशाची भौगोलीक स्थिती त्यांना ज्ञात
होती. माणसांना ओळखण्याची कला
त्यांच्याकडे होती....आपल्या देशात जेव्हा इंग्रज आले
तेव्हा महाराजांनीच प्रथम
त्यांच्यापासूनचा धोका ओळखला होता..महाराज हे सर्वव्यापी होते...त्यांच्या
जीवनातील प्रत्येक दिवस हा आर्श्चयकारक होता...सर्वसामान्यांना आवाक्याच्या बाहेर
वाटावा असाच होता...सुरतेची लूट, आगऱ्याहून
सुटका यासारख्या घटनांवर तर त्या बाहुबली चित्रपटासारखे भाग एक, भाग दोन असे
कितीतरी भाग होतील...स्वराज्याचे पहिले तोरण, म्हणजेच तोरणा गड सर केला ती मोहीम, जावळीची मोहीम,
कपटी अफजलखानाचा वध, प्रतापगडाची लढाई, सिद्दी जौहारचे आक्रमण, पावनखिंडीतली लढाई,
पुरंदरचा तह अशा कितीतरी घटना आहेत की ज्यांच्यावर दर्जेदार चित्रपट येऊ
शकतात...अर्थात राजांवर आत्तापर्यंत अनेक चित्रपट आलेही आहेत...पण यापुढेही कितीही
आले तरी ते तसेच लोकप्रिय होतील यात शंकाच नाही...
लहान असतांना
महाराजांच्या जीवनावरील चित्रपट बघितला की काय स्फुरण चढायचं...तेव्हा वयाचं बंधन
नव्हतं...घराच्या अंगणामध्ये मग लढाई लढाईचा खेळ रंगायचा...ब-याचवेळा आळूच्या
पानांचे देढ मग तलवारी व्हायच्या...या ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटांमधून राजांचे मावळे
परिचयाचे झाले. कान्होजी जेधे, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर, बाजी पासलकर, जीवा महाला, तानाजी मालुसरे,
हंबीरराव मोहीते, प्रतापराव गुजर असे एक ना दोन कितीतरी वीर...मग इतिहासाच्या
पुस्तकांमध्ये या सर्वांचा आणखी परिचय झाला...तेव्हा या पुस्तकांमधील चित्र हा तेवढाच
आधार होता...पुढे या सर्वांचीच ओढ लागली...महारांजांनी भारावून टाकले...मग मिळेल
तशी, मिळेल तिथे या विरांची पुस्तके वाचली...महाराजांनी या सर्वांना एका माळेत
गुंफलं होतं...या माळेचं ध्येय एकच होतं स्वराज्य...आता रस्त्यातून चालतांना
जाणवलं अजूनही महाराज आपल्या सर्वांना याच माळेत गुंफण्याचे काम करत आहेत...मगाशी
भेटलेल्या त्या आजीही याच माळेत होत्या की...
बघा ना येवढ्या वर्षानंतर महाराज आताही
तरुणांना एकत्र आणण्याचे काम करीत आहेत...राजांची मिरवणूक बघितल्यावर जाणवलं की
कशासाठी हे एकत्र आलेत...एरवी आमच्या फडकेरोडवर नववर्ष साजरं करतांना गोंधळ
घालणा-या तरुणांबाबत नाराजी व्यक्त होते...मात्र या मिरवणुकीतही अनेक तरुण
होते...त्यांच्यात कसला जोश होता...उर्जा होती...नवीन करण्याची उमेद होती...हे
सर्व त्या एका जादूगारामुळं...छत्रपती शिवाजी महाराज...बस्स...
याच विचारात घरी पोहचले...जेव्हा मला महाराज समजायला लागले,
तेव्हापासून मी त्यांना देवाचा दर्जा दिला आहे...कोणी काहीही बोलो...महाराजांनी
केलेलं कार्य बघता हे सामान्य मनुष्याचं काम नाहीच मुळी...देव असेच
असतात...असामान्य...त्यामुळे या माझ्या देवाचा जन्मउत्सव साजरा करतांना मी घरी
गोडाधोडाचा नैवेद्य करते...त्यादिवशीही होता...घरी आल्यावर भाकरी केली...झुणका आणि
शिरा तयार झाला...तितक्यात लेक आला...त्यादिवशी तो मुद्दाम लवकर येणार होता... त्याला
महाराजांना नैवेद्य दाखवायचा होता...मी ताट भरलं...त्यांनी ते देवासमोर ठेवलं...राजांच्या
नावांचा जयजयकार झाला. माझ्या चेह-यावर
समाधान होतं...डोळ्यात अश्रू...महाराजांचा नेमका जन्म कधी झाला हा प्रश्न मध्यंतरी
लेकानं विचारला होता...मी त्याला तेव्हा समजवलं होतं...राजे कधी जन्मले याचा खल
करण्यापेक्षा
त्यांनी किती महान कार्य केलंय याचा विचार केला पाहिजे...ते नसते तर याचा विचार
कर...आपोआप नतमस्तक होशील...आता त्याला महाराजांपुढे नतमस्तक होतांना जाणवलं रोज
जरी आपल्या राजाची जयंती साजरी झाली तरी पुढची पिढी अशीच नतमस्तक होईल...
सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खुप सुंदर लेख.
ReplyDelete