मसाला..फरसाण...झणका...
आमचा स्वभाव तिखट की जेवणातलं तिखटाचं प्रमाण जास्त ते कळत
नाही...कारण कितीही पुरेसा म्हणून वाटेल असा वर्षाचा मसाला केला तरी तो पुरेसा पडत
नाही. यावर्षीही तसंच झालं. वर्षासाठी पुरेसा केलेला मसाला जानेवारीच्या
पहिल्याच आठवड्यात संपला...जानेवारीत नवीन मिरची बाजाराच येत नाही...त्यात थोडी
थंडीही...म्हणजे ऊनालाही जोर नाही...अर्थात मसाल्याच्या मिरच्या वाळणार
नाहीत...वर्षाचा, साठवणुकीचा मसाला जे करतात त्यांना माहीत आहे की, कडक ऊन असल्याशिवाय
मसाला करता येत नाही. मिरच्या छान वाळल्या
की तो मसाला वर्षाला टिकतो. त्यामुळे
जानेवारीमध्ये मसाला संपला तरी मार्च महिन्याची वाट पहावी लागणार होती. पाकीटातला मसाला पुरेसा होत नाही...शिवाय चवीचा
फरक...मग मावशी मदतीला आली...तिनं तिच्याकडचा मसाल्याचा डबा पुढे केला...त्या
मसाल्यावर दोन महिने काढले...त्यामुळे मार्च लागला आणि लालबागचा रस्ता
पकडला...मसाल्यासाठी
दोन फे-या ठरलेल्या असतात...एक तर सामान घ्यायला...मग तो कुटायला द्यायला....या
दोन फे-यांमध्ये अवघी लालबागची फेरी...एक तर मसाला गल्ली आणि तिच्या बाजुला असलेली
चिवडा गल्ली....
मसाला गल्लीतला मुख्य काम झालं की चिवडा
गल्लीची फेरी...चिवडा गल्लीची ही फेरी मी अनेकवेळा करते...या गल्लीत नुसती एन्ट्री
मारली की तो छान चिवड्याचा झणका आपलं स्वागत करतो...ही गल्ली म्हणजे एक कोडचं आहे
माझ्यासाठी...अगदी छोटी गल्ली...हल्ली नवीन बांधकामं चालू आहेत...गेली चार-पाच
वर्ष या गल्लीचं स्वरुप अधिक आकुंचित झाल्याचं मला जाणवतं...कायम कुठलं न कुठलं
बांधकाम चालू...बरं ट्रॅफीक जाम तर कायमचं...या गाड्यातून वाट काढत आपलं चिवड्याचं
दुकान गाठायचं...घरी लेकाला या चिवडा गल्लीतून नवरतन फरसाण आवडतो...आमच्या
दोघांसाठी डायट चिवडा...उपवासाचा चिवडा...आणि अजून काय नवीन आलंय याचा शोध...या
बॅगा भरल्या की मग उगाचचा असा एक फेरफटका...बरं या भागात मसाल्याचा झणका सर्वत्र
भरलेला...दोन्हीही गल्ल्यांमध्ये मसाला कुंटण्याच्या मशीनचा आवाज येतच
असतो...फेब्रुवारी ते मे या महिन्यामध्ये हा मसाले कुटण्याचा आवाज अधिक वाढलेला
असतो. जसा आवाज वाढतो तसा मसाल्याचा गंधही
वातावरणात अधिक भरलेला असतो...नुसती फेरी मारली तरी चार-पाच जोरदार शिंका या ठरलेल्या...तो
चायनावरुन आलेला करोना या गल्लीत आला तर गुदमरुन जाईल हे नक्की...एवढा
ठसका...मसाल्याच्या कांडण मशिनींजवळ नंबरावर उभे असलेल्या महिलावर्गाची गर्दीही
बोलकी असते...कोणाचा मसाला चालू आहे...किती आहे...माझा नंबर कितवा...यावरुन
त्यांच्या मोठ्या चर्चा होत असतात...ब-याच महिला ग्रुपने येतात...नातेवाईक किंवा
सोसायटीच्या फार तर मैत्रिणी मिळूनही मसाला करण्यासाठी येतात...असे ग्रुप येथे
फिरतांन दिसून येतात. मिरच्या, अख्खा
मसाला घेऊन त्या मिरच्या साफ करायला देऊन मग भाजायला देऊन लगेच आपल्या समोर मसाला
बनवण्याचा त्यांचा आग्रह
असतो. हे सर्व
दळायला त्या कांडण मशिनीमध्ये जाईपर्यंत त्यांची दमछाक होते. मी दुस-या फेरीत गेले तेव्हाही अशा महिला गटाची
संख्या जास्त होती...ग्रुप असला की मिरच्यांचे भाव करायला मदत होते हे नक्की....
लालबागला माझी दुसरी फेरी मसाला आणण्यासाठी
झाली. मी गेले तेव्हा आणखी एका कारणासाठी
गर्दी होती...ती म्हणजे होळी...चार दिवसावर होळी आलेली...कोकणी माणसांसाठी होळी
म्हणजे जीव की प्राण...होळीला गावाला जातांना सोबत खाऊ घ्यायला म्हणून फरसाण गल्लीत
गर्दी...फरसाण..उपवासाचा चिवडा...तो कडकड्या लाडू...वेफर्स घ्यायला गर्दी...सोबत
कागदाच्या डीश, कप घ्यायलाही तेवढीच गर्दी...लालबागच्या या भागात पुजेचे सामानही
चांगले मिळते...त्यामुळे त्याचीही खरेदी जोरदार चालू होती...गावाला जातांना काहीजण
लग्नासाठी लागणारे सामानही घेत होते...लग्नात देवक ठेवतांना जे सामान लागते ते इथे
एकहाती मिळते...या वस्तू खरेदी करण्यात काहीजण मग्न होते...तर तबला, ढोलकी ची काही
दुकानंही या भागात आहेत...गावाला जातांना भजनासाठी तबला आणि पेटी दुरुस्त
करण्यासाठी...नवीन घेण्यासाठी आलेल्यांनी या दुकानात गर्दी केलेली...मसाल्यांसाठी
आलेल्या महिलांचे ग्रुप आता कांडण मशिनीमध्ये मसाला कुटायला देऊन मोकळे झाले होते...त्यांनी
आपला मोर्चा इमिटेशन दागिन्यांच्या दुकानाकडे वळवला होता...जसजसा दिवस पुढे जात
होता, तशी या बाजारातली गर्दी वाढत होती...माझ्या दोन्ही हातात पिशव्या जड झाल्या
होत्या...हव्या त्या वस्तूंची खरेदी झाली.

सई बने
डोंबिवली
-------------------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
सुंदर. उत्कृष्ट !!
ReplyDeleteKhup chhan lekh.
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDelete