आपला डाळभात...


आपला
डाळभात

लॉकडाऊन झालं आणि नवनवीन शोध लागू लागले.  किंबहूना जे जुनं होतं...तेच पुन्हा सापडालयला लागलं.  कितीतरी काळ स्वतःला एका वेगळ्याच कोंदणात बसवण्याचा प्रयत्न केला होता.  काही समजुती करुन घेतल्या होत्या.  पण या सर्व समजुती लॉकडाऊन या एका शब्दानं बाजुला सारल्या.  काही अशा सवयी लावून घेतल्या होत्या, की ज्यांची गरजच नव्हती.  आयुष्य सोप्प आहे.  फक्त आपण वारेमाप जी अपेक्षा केली होती,  किंबहुना आपल्या शरीराला नको त्या सवयींची सवय लावली होती. त्याची खरच गरज होती का, याचा विचारही करायला हा लॉकडाऊनचा काळ मार्गदर्शक ठरला आहे.  शरीराचे चोचले पुरवण्यासाठी म्हणा ना, पण काही गैरसमज करुन ठेवले होते.   ते या दिवसात दूर झाले, हे खरचं दिलासादायक आहे.  त्यातला मुख्य गैरसमज म्हणजे डाळभाताबद्दलचा....


लॉकडाऊन जाहीर झाल्यावर अनेक गोष्टींचे मुल्य काय असते, याची जाणीव होऊ लागली.  आयुष्य कसं सहज, सोप्प वाटतं होतं.  मजा मौज...आपलं आयुष्य आपल्याच इशा-यावर चालू आहे,  आपण हवं तसं त्याला मोडू शकतो, असं वाटावं इतकं सहज...काही वाटलं तर सहज जाऊन खरेदी करायची...नाहीच जमलं तर नेट शॉपिंग करायची...ब-याचवेळा गरजेच्या वस्तू बाजुला व्हायच्या...मॉलमध्ये खरेदीला गेल्यास हवं ते घेण्याबरोबरच जे आता नकोय त्याचीही खरेदी केली जायची...खायच्या सवयी तर विचारुच नका...फिटनेसच्या नावाखाली आपल्याच मूळ खाण्याच्या सवयींना फाटा देण्यात आला.  आता एक रोग काय आला,  या सवयी किती चुकीच्या होत्या, याची जाणीव होऊ लागली आहे. 
लॉकडाऊनमुळे सर्व बंद झाले.  आता करायचं काय, हे पहिल्यांदा कळलेच नाही.  मग एक एक बातम्या येऊ लागल्या.  आता सर्व बंद होणार...हे मिळणार नाही...ते मिळणार नाही....सुदैवानं आपल्याकडे योग्य वितरण पद्धतीनं अशी वेळ नक्कीच येणार नाही.  याची खात्री होतीच.  पण मनाची अस्वस्थता शांत होईना....अशावेळी घरात बसून परिचितांना फोन करायला सुरुवात झाली.  त्यातील जवळपास शंभर टक्के लोकांनी सांगितलेली माहिती ऐकून आश्चर्य वाटले.  आणि कुठेतरी आपण आपल्या मुळासोबत किती घट्ट आहोत,  याचे कौतुकही वाटले.  जेव्हा फोनवरुन या कोरोना किंवा लॉकडाऊनबाबत बोलणं व्हायचं तेव्हा बहुतेक सर्वचजण सांगत होते,  काही नाही, आपला डाळभात आहे. खिचडी आहे,  ते खाऊन राहू शकतो आपण.  सकाळचं खिमटं केलं की पोट भरलंच.  काही काळजी नको, सर्व व्यवस्थित होईल...अनेकजणांना मी फोन केला.  तेव्हा हेच आशादायक चित्र प्रत्येकाच्या बोलण्यातून उमटलं होतं.
काही दिवसांपूर्वी जेवणात दोन प्रकारच्या भाज्या हव्यात..रात्री या प्रसिद्ध हॉटेलमध्ये जायचंय...रविवारी जेवण करायला कंटाळा येतो, म्हणून पार्सल मागवणारी मंडळी आता डाळ भात आणि खिचडीचे गोडवे गात होती.  या सर्वांत मी सुद्धा कुठेतरी होते.  एकतर डोक्यात भाताबाबत एक गैरसमज फिट्ट झाला होता तो आपसूक दूर झाला.  भात खाल्यानं म्हणे पोट वाढतं...शरीरातील फॅट्स वाढतात...पण आता हे फॅट्स कुठे विरघळून गेले आहेत कोण जाणे.  आता चपाती किंवा भाकरीसोबत चार घास भात खाल्ला जातो.  कधी खिचडीही...पण आता कुठे त्रास होत नाही.  उलट आधार वाटतो.  भात पुरवठ्याला आहे,  याचा आधार आहे. 
या डाळभाताबरोबर अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत.  लहानपणी आमच्या रेवदंडा गावात वार्डेगुरुजींच्या घरी अनेकवेळा न्याहरीला मी हजर असायचे.  न्याहरी म्हणजे नाष्टा काय असायचा तर तांदळाचे खिमट...सोबत लिंबाच्या लोणच्याची फोड....अफलातून चव...ती लिंबाची फोड अगदी शेवटपर्यंत चोखायला जी मजा यायची त्याला तोड नाही...बरं त्या खिमटामध्ये एवढी ताकद असायची की दुपारपर्यंत कधी भूक लागायची नाही.  अशीच आठवण माझ्या आजीची.  आईची आई...रु्कमीणी आजी...आमची आजी म्हणजे उंच. सडपातळ, गौर वर्णाची.  नऊवारी साडी चापूनचुपून नेसायची.  खूप लांब असलेल्या केसांचा आंबाडा.  दिसायला सुरेख...या आजीचे जेवणातला आवडता पदार्थ म्हणजे भात.   ब-याचवेळा ती भात आणि आमटी खायची...अगदी दुपारी-रात्रीच्या जेवणातही...पण ही आजी भात खाऊन कधी जाडी झाली नाही.  काही वर्ष आम्ही पेणच्या
गागोदे गावात रहायचो.  तिथे डोंगरावर आमचं घर.  आई दारातील शेगटाच्या शेंगा आणि बटाट्याचा रस्सा बनवायची...त्याच्यासोबत वाफाळता भात.  पावसाळ्यात तर आठवडा आठवडा घरात काढायला लागायचा.  अशावेळे पिढलं आणि भात...सोबत पापड...बस्स...दुसरं काही खावसं कधी वाटलंच नाही....या भातावरच तृप्तीचा ठेकर यायचा.  काही वर्षापूर्वी डॉ. स्नेहलता देशमुख यांच्याबरोबर ओळख झाली.  काही काळ एकत्र काम केल्यामुळे त्यांच्याबरोबर गप्पा मारण्याचा योगही अनेकदा आला आहे.  स्नेहलता मॅडम नेहमी सांगायच्या, जेवणात आपला भात, डाळ आणि लिंबाची फोड असली तरी पुरे...पूर्णअन्न आहे हे.  दुसरं काहीही नसलं तरी चालेल असं त्या नेहमी सांगतात...
हे सर्व आता आठवत आहे.  गेल्या महिनाभरात ज्यांना फोन केले ते सर्व याच पठडीतले होते.  आपला डाळभातच बरा.  गेल्या काही वर्षापासून या भाताला का कुणास ठाऊक अगदी कामापुरता जवळ केलं होतं.  का तर भातांनं म्हणे वजन वाढतं.  त्यात कुढे तरी शोध लागला की भातांनं शुगर वाढते...मग पुन्हा भातापासून एक हात अंतर ठेवलं.  अगदी एक घासापुरता भात...रात्री तर नकोच...वजन वाढणार...शुगर वाढणार...हे भूत डोक्यावर
बसलं.  मग भात ताटातून दूर झाला.  नाही म्हणायला, काही वेगळे पदार्थ केले तर चालू लागले.  मसालेभात, बिर्यांनी, पुलाव यांच्यासोबत मासे, चिकन, मटण असेल तर भात चालू लागला.  पण त्यानंतर किमान दोन दिवस तरी भात नकोच, हे धोरण...
एकूण काय या लाल मातीचं जे खरं सोनं होतं त्यापासूनच चार हात अंतर ठेवलं.  पण प्रत्येकाची वेळ येते.  जे मूळ आहे ते कधीच जात नाही.  असंच भाताच्या बाबतीत झालं.  आज लॉकडाऊनच्या काळात या ख-या सोन्याची किंमत समजली.  डाळभात आणि मूगडाळीची खिचडीची गोडी पुन्हा जिभेवर आली.  फक्त गोडी लागली असं नव्हे तर त्याची ख-या अर्थांनं किंमतही कळली आहे.  आता घरी नाष्ट्याला पेजही चालते...गरम गरम पेज...वर जि-या, तुपाची फोडणी....बस्स...यालाच म्हणतात...सबका टाईम आयेगा....

सई बने
डोंबिवली

---------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा




Comments