ते येता घरा...

   ते येता घरा......


कोरोना...कोविड 19...सध्या या रोगाशिवाय दुसरं काही नाही असं झालं आहे.  जणू आपल्या जीवनाचा हा रोग अविभाज्य भाग झाला आहे.  जेवढं यापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतो, तेवढंच तो मात्र आपल्या जवळ येत आहे.  या रोगाची दहशत एवढी की साधी तपासणी करायला कोणी घरी आले तरी कापरं भरतंय...

मंगळवार होता बहुधा गेल्या आठवड्याचा...नव-याची काही औषधं संपली होती...भाजलं, कापलं किंवा दुखलं तर त्याला लावण्यासाठी लागणा-या औषधांच्या डब्याही खाली झालेल्या...शिवाय आठवड्यातून एकदाच बाहेर जायचं म्हणून आवश्यक सामानांची यादी घेऊन नवरा सकाळी आठ वाजता बाहेर पडला.  त्याला जिथून औषधं मिळणार होती, त्यांनी नऊ वाजता बोलवलं होतं.  त्याआगोदर बाकीची काम पूर्ण करणार, आणि मग औषधांसाठी सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळत लाईन लावणार होता...म्हणजे किमान एक-दीड तास तरी तो बाहेर रहाणार होता.  पण सकाळी आठ वाजता गेलेला नवरा दहा वाजून गेले तरी आला नाही...मग माझी घालमेल सुरु झाली.  फोन कर आणि शांत रहा...हा सल्ला अर्थातच माझ्या लेकाचा...कूल..कूल काय ते म्हणतात तसा त्याचा स्वभाव...त्यामुळे सल्लाही तसाच...शांत रहा...काम झालं की बाबा येणार...पण मला धीर कशाला...हातात पुस्तक घेऊन खिडकीत जाऊन बसले...साडेदहा वाजलेले...मध्ये मध्ये एखादं दुसरी गाडी जात होती...बाकी रस्ता रिकामा...तितक्यात एका मोठ्या गाडीचा आवाज झाला...एक बाईक जोरात गेली...त्यापाठोपाठ अॅम्ब्युलन्स...बापरे अॅम्ब्युलन्स बघितली आणि दरदरून घाम फुटला...नक्कीच आमच्या भागात कोणीतरी आजारी झाले...काही सुचेना...तितक्यात मागोमाग लहान मुलांना शाळेत नेण्यासाठी जी गाडी वापरली जाते, ती व्हॅन गेली.  त्यात निळ्यारंगाचे पूर्ण पिपिटी कीट घातलेली मंडळी बसली होती.  गाडी अगदी भरली होती...मला अजूनच काळजी वाटायला लागली...नक्कीच काहीतरी झाले होते...साधारण अर्धा तासांनी ती अॅम्ब्युलन्स परत गेली.  कोणीतरी त्यात बसले होते.  अजूनच काळजी वाटायला लागली.  त्यातून ते पिपिटी कीट घातलेली काही मंडळी समोरच्या बिल्डींगमध्ये जातांना पाहिली...अजून काय हवंय...एवढी काळजी वाटायला लागली की विचारु नका.

त्याच काळजीत असतांना नवरा परत आला....त्याला बघून थोडा धिर आला.  कोरोनामुळे आलेले सोपस्कार करायला सुरुवात झाले.  सॅनेटायझरचा मारा...मग तो गरम पाण्याने अंघोळ करायला गेला.  अंघोळ झाल्यावर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या...एवढं सगळं होईपर्यंत मी अगदी काकुळतीला आले होते...त्याला एवढा उशीर का झाला हे विचारायचे होते...शिवाय मी पाहिलेल्या अॅम्ब्युलन्सचेही त्याला सांगायचे होते.  माझी अवस्था बघून शेवटी लेक म्हणाला, बाबा आधी हिच्याबरोबर बोला...अर्थात त्याचं आधी ऐकलं...बरीच कामं असल्यानं गाडी घेऊन गेला होता, पण गाडीत पेट्रोल

नाही.  जवळच्या पेट्रोल पंपावर फक्त सरकारी कामांसाठीच्या गाड्यांमध्येच पेट्रोल देत होते.  त्यामुळे आणखी थोडं दूर असलेल्या पेट्रोल पंपावर जावं लागलं...तिथेही रांग...ते सोशल डिस्टसिंग...मग औषधांची रांग...तिथेही ते सोशल...मग यादीतील बाकीच्या वस्तू...शिवाय काही रस्ते बंद...मग तिथून मार्ग काढून घरात...त्यामुळे ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ त्याला लागला...मग माझं सुरु झालं...त्या अॅम्ब्युलन्सचे सांगितले...एव्हाना वॉट्सअपवर मेसेजचं जाळं पसरलं होतं...आमच्यापेक्षा खूप पुढे असणा-या भागात एका वयोवृद्धाचे निधन झाले होते.  किडनीचा आजार होता...आता त्यांच्या कुटुंबियांनाही तपासणीसाठी नेले होते...आमच्या भागातून अॅम्ब्युलन्स गेली कारण काही रस्ते बंद होते...नव-याने मेसेज दाखवले...मी थोडी शांत झाले.  पण त्या तपासणीसाठी आलेल्यांचं बाकी होतं.  तितक्यात बेल वाजली.  आजकाल घरची बेल क्वचित वाजते.  पुन्हा काळजी वाटली.  दरवाजा उघडला तर समोर ती पिपिटी किट घातलेली माणसं उभी होती...हातात वही पेन...पहिल्यांदा खूप भीती वाटली.  त्यांनी साधारण माहिती विचारली.  घरात किती माणसं...वय काय...कोणी आजारी आहे का...कोणी बाहेरुन आलं आहे का...ते सोबतच्या पेपरवर टीकमार्क करत होते.  दुपारचे बारा वाजले होते...पहिल्यांदा ही मंडळी कधी जातायेत असं झालं होतं..पण निघाल्यावर कळलं हे सर्व ते आपल्यासाठीच करत आहेत.  त्यांनाही त्यांचं घर, कुटुंब आहेच की.  पण ड्युटी आणि कर्तव्य यात ते बांधले गेले होते.  माझं मलाच वाईट वाटलं...काळजी केली पाहिजे असं नाही तर काळजी घेतली पाहिजे.  त्यामध्ये या आरोग्य कर्मचा-यांची पहिल्यांदा काळजी घेतली पाहिजे हे होतं.  ही मंडळी सर्व विचारुन वळल्यावर त्यांना पाणी देऊ का विचारलं...त्यातला एक जण हसला...ओ, हे सर्व घालून पाणी कसं पिणार....राहू दे...धन्यवाद म्हणाला आणि दुस-या घराकडे वळला...


थोड्यावेळानं बिल्डींगमधल्या मैत्रिणीचा फोन आला.  भावना...आमच्या बिल्डींगच्या सातव्या मजल्यावर तिचं घर....त्यामुळे सहज सर्व परिसरातील तिला दिसतं....ती सांगत होती, तपासणीसाठी आलेली माणसं खाली वाण्याच्या दुकानासमोर पाणी पित उभी होती...तिथेच थोडा वेळ आराम करुन पुन्हा दुस-या इमारतीकडे गेली...तर आणखीही काही महिला अशाच तपासणीसाठी फिरत होत्या...दुपारच्या वेळी समोरच्या गार्डनच्या बाजुला असलेल्या बाकड्यावर आराम करण्यासाठी बसल्या....आणि पु्न्हा आपल्या कामासाठी निघाल्या...त्यांना पाहून ती सुद्धा काहीशी अस्वस्थ झाली होती...ही सर्व मंडळी आपल्यासाठी उन्हातान्हात फिरत होती...हे जाणून तिलाही अस्वस्थ वाटत होतं...थोडा वेळ आम्ही दोघीं बोलत बसलो...त्यामुळे का होईना मनातून दोघीही शांत झालो....

नवरा सांगत होता, बाहेर बाजारात खूप गर्दी...जणू कोरोना नाहीच आहे. अशी गर्दी...काही मुलं गाडीवरुन नेहमीसारखी फिरत होती...काही काळजी नाही...तो हसत म्हणाला...तूच काळजी करत घरी बसली आहेस...मी काय बोलणार...डोक्यावर हात मारला...टीव्ही लावला तर त्यावर राजकारण भरात आलेलं...कोणाला तिकीट मिळालं...कोणाला मिळालं नाही...प्रत्येकाची आपापली भूमिका...इथे रुग्णांची संख्या भराभर वाढत आहे,  त्याचं काहीही नाही...बातम्या बघूनच वैताग आला...जणू पहिल्या नंबरसाठीच सर्व प्रयत्न चाललेले...

कोणीही कायमचा रहात नसतो...तसाच हा रोगही आहे...तो नक्की जाणार आहे.  पण त्यासाठी जी मंडळी प्रयत्न करीत आहेत, त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.  कालपरवा परिचारिका दिन साजरा झाला.  तेव्हा सोशल मिडीयावर परिचारिकांना शुभेच्छा देण्याची जणू स्पर्धाच लागली होती.  हा दिवस आज साजरा झाला नाही.  गेल्या अनेक वर्षापासून साजरा होतोय...पण दुर्दैवानं आपल्याला आज त्याचं महत्त्व समजलं.  हा रोग गेल्यावर त्याचं श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे येतील...राजकीय व्यक्तींची तर चढाओढ  लागेल...पण या चढाओढीत कुठलंही श्रेय घेण्यासाठी पुढे येणार नाहीत ते हे आरोग्य कर्मचारी....कारण ही मंडळी आपलं काम म्हणून रुग्णांची सेवा करीत नाहीत, तर आत्मियतेतून रुग्ण सेवा करतात....जसं पोलीसांचा गणवेश अंगावर घातला की शानदार वाटतं...तसाच या आरोग्य सेवकांचा गणवेश असतो...फक्त त्यांचा मान कायम ठेवावा हिच अपेक्षा आहे. 


सई बने

डोंबिवली

----------------------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 


Comments

  1. , संवेदनशील ब्लोग..

    ReplyDelete
  2. वाट बघताना काय टेन्शन असेल नाही . . .असो पण शेवटच्या ओळीशी सहमत . . .
    ". . .फक्त त्यांचा मान कायम ठेवावा हिच अपेक्षा आहे."🙏
    ✍️👌👍💐

    ReplyDelete

Post a Comment