दागिना-ए-चीन
फोनची रिंग दोन वेळा वाजली...माझी जेवणाची गडबड...तिस-यांदा सलग फोनची रिंग वाजली, तेव्हा हातातलं काम ठेवावच लागलं. फोन सरीताचा...काहीतरी महत्त्वाचं असणार...या वातावरणात नको ते विचार आधी येतात...हात कोरडे करेपर्यंत फोन थांबला...मग मीच तिला फोन लावला...अगदी पहिल्याच रिंगमध्ये तिने फोन उचलला...काय करत होतीस...किती वेळा फोन केला तुला...इथे मला किती टेन्शन आलंय...ओके...काय झालं..मी हळूच विचारलं...त्या आगोदरच सरीता बोलून गेली...अग मी खाली गेले होते भाजी घ्यायला...अशीच...अशीच...मी तिला उलट प्रश्न विचारला...अशीच म्हणजे कशी...अग अशीच म्हणजे तोंडाला मास्कच लावला नाही...विसरले...भाजीवाल्याचा आवाज आला, आणि मी तशीच खाली गेले...आता काय होईल...मला खूप टेन्शन आलंय...म्हणून तुला फोन केला...खरंच होईल का मला तो रोग...
सरीताचा हा टेन्शनचा फोन खूप वेळ चालला...दरम्यान माझं काम फक्त ऐकण्याचं होतं. सकाळी भाजीवाला खाली आला...त्याने भाजी घेण्यासाठी आवाज दिला. आता भाजीवाला आला हे समजताच या बाई पिशव्या घेऊन खाली धावत गेल्या. पिशव्या घेतल्या...पण मास्क विसरल्या...खाली गेल्यावर, म्हणजे भाजी घेतांना आपलं काहीतरी चुकलं याची तिला जाणीव झाली. भाजीवालाही मास्क लावून बसला होता. तर अन्य दोघंही भाजी घेण्यासाठी आले होते. सर्व मास्क लावून होते...भाजी घेण्यासाठी आलेल्या एक-दोघांकडे तिने पहाण्याचा प्रयत्न केला...त्यांच्या डोळ्यात काय हे...असले भाव...शिवाय भाजीवालाही बोलला...ताई मास्क विसरलात की काय...पुढच्यावेळी नक्की घालून या...मग भाजीवाल्याकडे भरपूर भाज्या आणि फळं असतांनाही सरीताने अगदी मोजकी खरेदी केली...आणि धावत धावत घरी आली...भाज्यांसकट थेट बाथरुममध्ये...भाज्यांनाही आंघोळ...आंघोळ वगैरे झाल्यावर गरम पाण्यानं गुळण्य...गरम पाणी प्यायलीही...पण मन काही था-यावर येईना...आपण विनामास्क फिरलो...येवढ्यानेच तिला कापरं भरलं होतं. घरी नवरा, सासू, मुलांनीही समजावलं...काही होणार नाही...पण तिचं काही समाधान होत नव्हतं...शेवटी थेट डॉक्टरांना फोन करायला निघाली...मग मध्येच नव-यानं माझं नाव सुचवलं...आधी बोल मग डॉक्टरांचं काय ते बघू...म्हणून मला फोन केला...त्यात मी तीनवेळा फोन उचलला नाही...म्हणजे तिचं खूपच टेन्शन वाढलं असणार...
मला सरीताचं बोलणं ऐकतांना थोडं हसूही येत होतं. या कोरोनामुळे काय काय बघायला लागणार आहे कोण
जाणे...पण हे असे किस्से तर नेहमी होत रहाणार बहुधा...अगदी दोन दिवसांपूर्वी खाली
कचरा टाकण्यासाठी नवरा गेला होता. जातांना
तोही मास्क घालायला विसरला...मी त्याला परत बोलवून मास्क घालायला दिला. कच-याचा डस्टबीन आमच्या सोसायटीच्या गेटला
लागूनच...तिथे फक्त कचरा टाकायचा आणि परत यायचं...पण हा मास्क जणू आपला सखा-सोबती
झाल्याप्रमाणे प्रत्येकवेळी हवाच...नव-यानं मी दिलेला मास्क लावतांना डोक्यावर हात
मारुन घेतला होता...एवढ्यानं काहीही होत नाही...असं पुटपुटतं तो पुन्हा बाहेर पडला
होता...पण या आजाराची भीती अशी मनात बसली की, सर्व साधनांशिवाय घराबाहेर पडलं की आपण
आजारीच झालोय अशी भावना मनामध्ये येते.
सरीताही तशीच होती...मला ती फोनमधून चार वेळा विचारत
होती...डॉक्टरांना फोन करु का...सासूबाईंना सांगितलंय जेवणाचं तुम्हीच बघा...मी
जाणार नाही स्वयंपाकघरात...उगीचच बाकीच्यांना माझ्यामुळे त्रास नको...तुला काय
वाटतं...असं म्हणून तिनं मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. सरीताला कसं समजवू, याचा विचार करु लागले. आज कितीतरी महिला घराबाहेर कामासाठी पडत आहेत. आपल्या डॉक्टर, नर्स, बॅंक कर्मचारी...फार काय
त्या डीमार्ट किंवा इतर किराणा सामानांच्या दुकानातून आपण सामान मागवतो तिथंही अशा
अनेक महिला कर्मचारी काम करतातच ना...प्रत्येकालाच घरात बसून कसं चालेल...सरीताला
समजवायला खूप वेळ लागला...तिला कॉफी टाईम ऑन फोन करुया का...असं विचारलं...ती
सुद्धा हो म्हणाली...बहुधा तिचा नवरा फोनला लागूनच होता...कॉफी शब्द ऐकून तो हुश्श
करत उठला...आणि कॉफी बनवायला लागला...आमच्याकडे प्रश्नच नव्हता...माझी मीच करुन
घेतली...तोपर्यंत तिच्या हातातही कॉफीचा मग आला होता...दोघीही निवांत गप्पा मारत
बसलो...
कोरोना आहे...भीतीदायक वातावरण आहे...काळजी घ्यायला लागलणार...पण
त्यासाठी आपण किती दिवस घरात बसून रहाणार हाही प्रश्नच आहे की...आज अनेक उद्योग
एकमेकांवर अवलंबून आहेत. सर्वच घरात बसले
तर कोरोनाच्या चैनचं काय होईल ते होईल, पण उत्पन्नांची चैनही तुटेलच की...शिवाय हा
रोग आहे काळजी घेण्यासारखा...आपले नेहमीचे स्वच्छतेचे नियम त्यासाठी उपयोगी
आहेत. पॅनिक न होता त्याला सामोरे गेले
पाहिजे...अशी पॅनिक अवस्था जर आपल्यासाठी राबणा-या नर्स आणि डॉक्टरांची झाली तर
सर्व ठप्पच होईल की...थोड्यावेळानं सरीता ओके झाली. मनातली भीती दूर झाली...मध्येच सहज विचारलं
घरात काय करतेस...मग समजलं सकाळी जवळजवळ तास दीडतास व्यायाम...कारण तो आता काळजी
पोटी करायलाच हवा...मग नाष्टा...जेवणाची तयारी...सासूबाई जेवणाचं बघतात...मग या
बाई साफसफाईच्या मागे लागलेल्या असतात...सगळं घर अगदी टॉयलेट-बाथरुमही दिवसातून
दोन वेळा धुतले जातात...दरवाजे-खिडक्याही अशाच स्वच्छ केल्या जातात...मग युट्यूबचे
व्हिडीओ बघून घरगुती काढे...आणि ब-याच काही उपाययोजना...अरे देवा हे आहेच
का...अर्थात मी मनात म्हटलं...
सरीताचा भरतकामामध्ये छान आहे...अगदी जुने आणि बारीक, किचकट वाटतील
असे टाकेही या बाई सुरेख विणतात....आणि त्यापासून छान डिझाईन तयार करतात...मी
सुद्धा काही महिन्यांपूर्वी तिच्याकड़ून भरतकाम शिकण्याचा प्रयत्न केला होता...आता
काही भरतकाम करायला सुरुवात केली आहेस का विचारलं...तर म्हणाली...कुठे करणार...या
सर्वांत वेळ कुठे मिळतोय...सारखी स्वच्छता आणि घर आवरणं यातचं वेळ चाललाय...मी
इकडे डोक्यावर हात मारून घेतला...मग तिला ही थोडी स्वच्छता कमी करायला
सांगितली...आणि स्वतःच्या आवडत्या छंदाला वेळ द्यायला सांगितला...शिवाय तिच्या सासूबाई
सुग्रण...त्यांच्याबरोबर गप्पा मारुन त्यांच्या जुन्या, खास रेसिपी लिहून काढायला
सांगितले...यातून वयोवृद्ध सासूबाईही थोड्या मोकळ्या होऊ शकणार
होत्या...त्यासुद्धा या लॉकडाऊनमुळे घरात अडकल्या होत्या...ही आयडीया सरीताला खूप
आवडली...मस्तच ग...आता खूप काम मिळालं....डोक्यातले विचार कमी झाले...चल मी कामाला
लागते...थॅक्यू...म्हणत तिने फोन बंद केला...
मी फोन करत थोडावेळ बघत बसले...समोर लेक उभा...कारण सरीताला
समजवण्याच्या वेळात माझे जेवण करायचे राहीले होते...मी कामाला लागले...जेवण झाल्यावर दुपारची आवराआवर करायला घेतली...पुन्हा सरीताचा फोन...आता काय झालं...पण तिचा आवाज चांगलाच आनंदी होता...सासूबाईंच्या रेसिपींची आयडीया कामी आली होती. सासूबाईंकडे रेसिपींचा खजिना होता. आता सरीता त्या लिहून काढणार होती. अगदी सहज सोप्या होतील अशा रेसिपी होत्या...शिवाय त्यात औषधी गुणधर्मही असणा-या रेसिपी होत्या...सरीताच्या मुलीनं त्या दोघींना रेसिपी करुन त्या युट्यूबवर शेअर करायची सूचना केली. दोघीही सासू-सूना खूष झाल्या...सकाळची सरीता आता पार बदलली...तिने स्वतः एक यादी केली होती. जवळच्या दुकानदाराला ती यादी वॉटस्अपक केली होती...त्यानं सकाळी सात वाजता सामान घ्यायला बोलावलं होतं...तेव्हाच भाजी आणि फळंही आणणार होती...तो चीननं दिलेला दागिना घेऊन जाईन हो आठवणीनं...काळजी करु नकोस...असं मलाच समजावलं...मला हसू आलं...काय परफेक्ट म्हणाली ती चीननं दिलेला दागिना...एखाद्या दागिन्यासारखंच आता या मास्कची काळजी घ्यावी लागणार होती...हा कोरोना आपल्या आयुष्याला थांबवू शकत नाही...फक्त थोडी हिंम्मत हवी
आणि थोडा विश्वास...ही वेळही जाईल...सरीतानं मलाही हा धडा दिला होता...
सई बने
डोंबिवली
---------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
हो अगदी खरं आहे आता अपल्याला याच्या बरोबर जगायची सवय करायला लागणार आहे.या काळात मुलांना ही सर्व सवयी आत्मसात करायला शिकवायला पाहिजे.किती वेळ प्रत्येकजण घरी बसून राहू शकतो.त्याचबरोबर जी व्यक्ती posivive येते तिला आणि त्याच्या कुटुंबाला ही मानसिक आधारही देणे खूप गरजेचे आहे.आपण काळजी घेतोय पण तो कधीही कोणालाही होऊ शकतोय.एकमेकांना धीर देतच यावर मात करू शकतो.बाकी आपले आयुर्वेदिक काढे,गरम पाणी ,गुळण्या याने मात्र नक्कीच फायदा होतोय.
ReplyDeleteहो, हा चांगला मुद्दा आहे. आज परिस्थिती अशी आहे की आपल्या आसपास कोरोना पॉझिटीव्ह निघाला की त्याच्यासाठी सर्व दरवाजे बंद होत आहेत...पण तो काही स्वतःहून पॉझिटीव्ह झाला नाही....यापुढे अशा रुग्णांना औषधांबरोबरच मानसिक आधार देणेही गरजेचे रहाणार आहे.
DeleteKhup chhan
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteआता ह्याच दागिन्या सोबत जगायचय अशी मनस्थिति करावी लागेल...
ReplyDeleteराहिला प्रश्न भीतिचा तो जो पर्यन्त लस निर्माण होत नाय तो पर्यंतच भीती..
अन आपली सरसामान्य मानसिकता थोड़े दिवस कुठलाही विषय असो थोड़े दिवस कुरवाळायचा आणि मग विसरून जायचा..
हे अस्सच होईल..
पहा!!
ती लस लवकर येवो हिच प्रार्थना आहे...मात्र लस आल्यावर जे सर्वसामान्य या रोगाला बळी पडत आहेत, त्यांना तिचा लाभ मिळायला हवा...नाहीतर आता कुठेच नसलेले राजकारणी तिथे मात्र पुढे यायला नको...
DeleteThat's very true, now we should learn to live with corona
ReplyDeleteहो, कोरोनासोबत काही महिने, वर्ष रहायला हवे...हे प्रथम स्विकारले पाहिजे...
Deleteकोरोनाच्या पार्श्वभूमीवरील अतिशय सुंदर प्रासंगिक लेख ! मानवी मनाच्या चंचलतेच उत्कृष्ट चित्रण या लेखात आपण केलंय. मानवी स्वभावाचे हे कंगोरे रंजकतेने दर्शवत असतानाच,हा लेख प्राप्त परिस्थितीत धीराने वागायची,गडबडून न जाण्याची दिशाही दाखवतो.
ReplyDeleteलेख खूप आवडला. - विनायक जाधव
धन्यवाद विनायकजी....नक्कीच सध्या परिस्थितीत धीराने वागणं गरजेचे आहे...
Delete