माणसाच्या जातीचे रंग...
आपली जात कुठली....हा प्रश्न विचारला तर त्याला दोनच ऑप्शन असू
शकतात...एक म्हणजे जी माणसं परिस्थितीत भरडली जात आहेत त्यांची आणि दुसरी म्हणजे जे
भरडले जात आहेत, त्यांच्या जीवावर चैन करणा-या माणसांची....खरं म्हणजे मंडळी हे
वाक्य तुम्हाला टोकाचं वाटेल...खटकेलही...मात्र गेल्या आठवड्यात आलेल्या
अनुभवावरुन मन विषण्ण झालंय...सध्या कोरोनामुळे एका अदृष्य भीतीचे वादळ
प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. काही मंडळी
ही भीती दूर सारुन समाजाला सावरायला पुढे आहेत.
तर काही समाज वगैरे राहू दे....आपल्याच विश्वात रममाण आहेत...गेल्या
आठवड्यात लिहिलेल्या ब्लॉगवरुन काही मैत्रिंणींनी थेट फोन करुन संवाद साधला. त्यातील काही पोलीसांच्या बायका...त्यांचे
सध्याचे अनुभव त्यांनी शेअर केले. त्यात
एका ग्रुपवर शेअर झालेला ब्लॉग वाचून एका हवालदाराच्या पत्नीने फोन केला...आणि
त्यानंतर दुस-या शहरात रहाणा-या मैत्रिणीनंही फोन केला...दोघीही महिला...पण
विचारसणीमध्ये कितीतरी फरक...एकीच्या बोलांनी अंगावर काटा आला...तर दुसरीने
डोक्याला ताप दिला....
गेल्या सोमवारी रात्री आठच्या सुमारास एक फोन आला...नाव नव्हतं...फोन
उचलला तेव्हा माझं नाव घेऊन, तुम्हीच बोलतांय ना....म्हणून एक महिला विचारत
होती..मी हो म्हटलं...आपण कोण, म्हणून विचारलं...तिने नाव सांगितलं...माझ्या
परिचयाचं नव्हतं...म्हणून मी ओळखलं नाही...काही काम आहे का...म्हणून विचारलं...तेव्हा
तिनं पुन्हा नाव सांगितलं...कविता...माझा गेल्या आठवड्यातला ब्लॉग वाचून फोन केला
म्हणाली...कोणाकडून तरी नंबर घेतला होता...तुम्ही छान लिहीलंत म्हणून तिने
सांगितल्यावर मी छान...धन्यवाद म्हणाले...अजूनही मला उलगडा होत नव्हता...फोन
कशासाठी केलाय...मला परत प्रश्न पडला...तिला बहुधा फोनवरुन माझ्या मनातला प्रश्न
समजला...ती म्हणाली ताई, माझा नवरा पोलीसात आहे...हवालदार...तुमचं वाचलं आणि बोलावसं
वाटलं...म्हणून फोन मिळवला...बोलू का...वेळ आहे तुम्हाला...या कविताला मी कधीही
पाहिलं नव्हतं...बोलणं हे आता पहिल्यांदाच...पण तिला नाही म्हणू शकले नाही...बोला
ना...म्हणून तिला सांगितलं...मग ती बोलत राहीली. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ बोलत होती...मी फक्त
ऐकत होते...आणि अंगावर येणा-या काट्यांकडे बघत डोळ्यातून पाणी काढत होते...कविताचा
नवरा हवालदार...तिला दोन मुलं...एक पाचवीत आणि दुसरा सातवीला...मार्चपर्यंत सगळं
ठिक होतं...मुलं परीक्षांच्या अभ्यासाला लागली होती...पेपर झाले की त्यांना गावाला
घेऊन जायचे होते...मग दोन महिने सुट्टी...पण होळी नंतर चित्र पलटलं...तो कोरोना
आला...हवालदार असेलेल्या कविताच्या नव-याची ड्युटी लागली...सुट्टी नाही...आता सकाळी
कधी सात तर कधी आठलाच नवरा घर सोडतो...घरी यायला कधी रात्रीचे दहा वाजून जातात.
पहिल्यांदा डबा न्यायचा...पण नंतर नको म्हणाला...का तर दिवसभर बाहेर उन्हात
उभा...सोबत डबा...भाजी कशीही केली तरी आंबायची...सोबतच्या चपात्यांनाही

तसाच वास
येतो म्हणून त्याही तशाच.
दोन दिवस डबा
परत आणला...तो धुतांना कविताच्या जीवाचं पाणी झालं.
नवरा उपाशी होता...आपण घरात पंचपक्वान्न् खाल्ल
नाही पण काहीतरी खाल्लच ना, या विचारानं तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.
पोलीसांना या रोगाची लागण झाल्याची बातमी यायला
लागली, आणि तिच्या घरात कर्फ्यु लागल्यासारखं वातावरण झालं...पूर्वी मुलं
टिव्हीच्या रिमोटवरुन भांडण करायची...पण आता त्याला हातही लावत नाहीत..टिव्हीच
लावत नाहीत...न सांगता ती अभ्यासाला लागली.
घरात टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता असते.
नवरा सकाळीच चपाती भाजी किंवा भाकरी खाऊन
जातो...त्याला सोबत चिवडा देते...नव-याचं जेवण करतांनाच ती मुलांचं आणि तिचंही
जेवण करुन ठेवते...मग त्या स्वयंपाकघरात जात नाही...साधी उसळ किंवा बटाट्याचा
रस्सा असाच बेत आहे, कितीतरी दिवस...गोडधोड बंद झालंय...पण मुलांची तक्रार नाही...दुपारी
नव-याचा फोन आला की ही मंडळी जेवण करुन घेतात.
नवरा रात्री घरी आला की थेट बाथरुममध्ये जातो...मग कविता गरम गरम भाकरी
करायला घेते...कविता बोलत होती, एक पोरंग पाय गरम पाण्यात ठेवण्यासाठीचं पाणी तयार
करतो, तर दुसरा आता ते काय गुळण्या करायला सांगितल्या आहेत ना, त्याची तयारी करतो...ताई
कित्येक दिवस घरात शांतता आहे.
पोरांवर
त्या कोरोनानं काय जादू केलीय, कोण जाणे. अजिबात भांडत नाहीत.
आधी नुसती एकमेकांचा जीव घ्यायला उठायची...मग
नवर घरी आला की मी त्यांची तक्रार करायचे...आता त्याला काय सांगू...बरं त्याला
काही विचारलं तर तो दिवसभर उन्हात उभा....काही दिवसांपूर्वी त्यांच्यासह उभ्या
असलेल्या काही हवालदारांवर कोणा मुलांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला म्हणे...आता
त्या दारु विकत घेणा-यांनी वात आणलाय...मग काय बोलयचं...या आठवणी त्याला यायला नको
म्हणून पोरांनी न केलेल्या खोड्या त्याला रंगवून सांगते...तोही नुसतं हुं हुं
करतो.
पोरांना डोळे मोठे करुन
विचारतो...का रे...पण त्याच्या आवाजात तो पूर्वीचा दरारा नसतोच...डोळे अर्धे
पेंगुळलेले असतात...पोरंही आई खोटं बोलतेय हे सांगत नाहीत...हा समजुतदारपणा कुठून
आला कोणास ठाऊक...चूळ भरली की लगेच अंथरुण गाठतो...मग पोरं थोडं तेल लावून पाय
चेपून देतात...हे पण न सांगता...तो पोरांबरोबर बोलायला जातो...पण जिभ जड
होते...लगेच घोरायला लागतो...त्याच्या या घोरण्याचा आम्हाला पूर्वी त्रास
व्हायचा....आम्ही त्याला हसायचो...आता हे घोरणंच ऐकत बसतो...ताई...ताई...फोनवर
शांतता...मला काय बोलावं ते सुचत नव्हतं...डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं...मी
तिला नुसतंच ऐकतेय...असं म्हणाले...ती पुन्हा म्हणाली ताई, चला आता तुम्हालापण
जेवायचं असेल ना...मी तिला सहज विचारलं तुमचंही जेवण होईल ना आता...तर म्हणाली
नाही हो...अजून एक-दीड तास आहे...नवरा यायला...आता थोडा वेळ आहे तर त्या देवाला
हलवून बघते...थोडावेळ देवाचं नाव घेत बसते..दुसरं करु काय...पुन्हा फोनवर
शांतता...कविता बहुधा माझ्या बोलण्याची वाट पहात होती...मला काही सुचतच
नव्हतं...पण विचारलं,
कविता, दिवसभर तू
काय करतेस...ती हसली, म्हणाली, ताई पहिल्यांदा टिव्ही, फेसबूक वापराचये...वेळ
जायचा...पण आता ते बंद केलंय...आता जुन्या साड्यांची गोधडी घेतलीय करायला...मी
एकीकडे गोधडी शिवते...दुसरीकडे पोरं अभ्यास करतात.
ताई, खूप त्रास होतो हो मनाला...आमची काय चूक...लोकं
अजिबात ऐकत नाहीत...मंत्री घरात एसीत बसून निर्णय घेतात...मग माझ्या नव-यासारखी
लोकं...रस्त्यावर उतरतात...त्या निर्णयाची अंमलबजावणी करायला...आता या मे
महिन्याच्या उन्हात रस्त्यात उभं रहायचं..आठ आठ तास...येड्यागबाळ्याचं काम नव्हे
ते...पण उगाच रस्त्यात फिरणा-यांना हे कधी कळणार काय माहित...गावाकडून रोज सासू,
आई फोन करते...नव-याची चौकशी होते...काळजी घ्या असं सांगतात...त्यांना काय
सांगणार...कशी काळजी घेणार...कविताच्या प्रश्नांनी मला निशब्द केले होते...शेवटी
तिच थांबली...ताई, चला थोडावेळ पूजा करते...सॉरी हं तुम्हाला त्रास दिला...मी नाही
म्हटलं...आणि आपण पुन्हा बोलूया...असं म्हटलं...तिलाही ते आवडलं...चालेल, म्हणून
तिनं फोन ठेवला...मी मात्र तशीच काही वेळ फोनच्या स्क्रीनकडे बघत होते.
मग तिचा नंबर, कविता हवालदार म्हणून सेव्ह
केला...
एव्हाना रात्रीचे नऊ वाजून गेले होते. मी शांत होते, लेकाला समजले बहुधा...फोनवर
काहीतरी झालंय...पण त्याचीही भूकेची वेळ...मी उठून भाकरी टाकायला घेतली...पुन्हा
फोन...परत कविता आहे का म्हणून बघितलं...तर दुस-या शहरातल्या मैत्रिणीचा फोन
होता...लेकाला फोन घेऊन दहा मिनिटांनी फोन करेन असा निरोप द्यायला सांगितलं...नव-याला
आणि लेकाला भाकरी वाढेपर्यंत पुन्हा तोच फोन...काहीतरी महत्त्वाचं काम असेल,
म्हणून दोघांना जेवायला सांगून मी त्या मैत्रिणीबरोबर बोलायला गेले. कशी आहेस ग...गडबडीत होतीस का...म्हणत
मैत्रिंणीने सुरुवात केली. आवाजात खूप
उत्साह...काहीतरी चांगली गोष्ट शेअर करायची होती बहुधा...मी म्हटलं नाही
ग...जेवणाची तयारी...तुझं काय...असं म्हणून सर्व सूत्र तिच्याकडे दिली...ती जणू
त्याचीच वाट पहात होती...अग आज आमच्याकडे पार्टीच आहे...सकाळीच नव-यांनी मासे
आणलेत...आमच्याकडे होमडिलिव्हरी मिळतेय...किलोभर मिळतात...पण जाऊदे...मुलं
खातात...कोलंबी, सुरमई, पापलेट आणि चिकन पण मागवलंय...मस्त झालंय जेवण ब-याच
दिवसांनी. ती बिर्यांनी माहित आहे का
तुला...खूप मस्त असते...स्टॅन्डर्ड आहे...ती पण आमच्याकडे मिळते पार्सल म्हणून...यांनी
तीपण मागवलीय...काय विचारु नकोस...मला म्हणाले, तू पण जरा आराम कर....आज नुसतं
घरभर वास दरवळतोय...बरं तुझं काय...तुमच्याकडे मिळतं का सर्व...की लॉकडाऊनने सर्व
बंद...पार्सल मिळायला काही हरकत नाही ना...तिच्या या प्रश्नांमध्ये मी काय बोलावं
याचा विचार करत होते, खरतर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मी घरात अगदी साधं जेवण
करतेय...भाजी भाकरी, चपाती किंवा खिचडी...आसपास काय चाललंय याचं भान प्रत्येकानं
ठेवलं पाहिजे, याचा एक भाग म्हणून आणि दुसरं म्हणजे या काळात साधं जेवण आरोग्यासाठीही
हितकारक आहे म्हणूनही...नशीबानं लेकानंही सामीश जेवणाचा आग्रह केला नव्हता...पण या
मैत्रिणीबरोबर बोलतांना माझ्या मनात आधी फोन केलेली कविता डोकवायला लागली होती...अस्वस्थ

वाटायला लागलं....पण या बाई फोन ठेवायचं नाव घेईनात...मी म्हटलं...चल, म्हणजे आता
तुला जेवणाची घाई असेल ना...बस्स हा प्रश्न मी कधी विचारतेय याचीच बहुधा ती वाट
पहात होती....नाही ग...मुलं टिव्ही बघत चिकन लेग खात आहेत...आणि हे आत
बसलेत...त्यांचा प्रोग्रॅम झाला की जेवणार...प्रोग्रॅम...कसला प्रोग्रॅम...मी तिला
परत प्रश्न विचारला...अग आजपासून वाईन शॉप उघडली ना...हे त्यांचा ब्रॅन्ड घेऊन
आलेत आज...घरात महिनाभर बसून कंटाळलेत ग ते...तसं आमच्याकडे स्टॉक असतो...पण
लॉकडाऊन झाल्यावर यांचे काही मित्र तो स्टॉक घेऊन गेले.
आता याच मित्राच्या ओळखीचा वाईनवाला
आहे...त्यांनी मिळवून दिला यांचा ब्रॅन्ड...नाहीतर गर्दी काय होतीस हे पाहीलंस का
टिव्हीवर...मी कशाला बघू ती गर्दी...मला अती झालं होतं...त्या ब्रॅन्डच्या नावात
मला काडीचा रस नव्हता...तिचं सुरु होतं...पण मी बळेबळेच फोन ठेवला...या नंबरकडे
अजिबात बघावसं वाटलं नाही...उलट आता कविता आणि या मैत्रिणीच्या तुलनेत कविताच उजवी
वाटली...परिस्थिती आज कठीण आहे...पण ती यावर नक्की मात करेल असा विश्वास वाटला...
मनात आलं, किती विरोधाभास....हा रोग कोणी आणला...आणि कोणी पसरवला...कॉरंटाईन
असलेली खूप सारी मंडळी, मला काय होणार...या गुर्मीत बाहेर फिरली....या त्यांच्या
गुर्मीनं अनेकांना रोगाचे दान दिले...जे त्यांना नकोच होते. यातून निर्माण झालेली चैन तोडण्यासाठी डॉक्टर,
नर्स, आरोग्य कर्मचारी, संपूर्ण प्रशासन कामाला लागलं...नवीन कायदे लावले
गेले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी
अहोरात्र पोलीस ड्युटी करु लागले...ही मंडळी जणू सुपरमॅन, स्पायडरमॅन
आहेत...त्यांना काहीच होणार नाही...अशी आपली समजूत...पण तीही माणसंच आहेत की....मध्यंतरी
सोशल मिडीयावर एक पोस्ट फिरत होती...पासपोर्ट वाल्यांनी रेशनकार्डावर अवलंबून
असलेल्यांचं आयुष्य बुडवून टाकलंय...किती वास्तव आहे यात...चैन नक्की करावी...पण
आपल्यामुळे कोणाच्या मनाला यातना होणार नाहीत ना याची घ्यायला हवी...कारण कोरोना
हा शारीरिक आजार आहे, पण त्यापेक्षा अधिक तो मानसिक आजार आहे....
आपली झेप फेसबुकवर, वॉटस्अपवर आलेले नर्स डॉक्टर यांचे व्हिडोओ इथून
तिथे पाठवण्यापर्यंत मर्यादीत ठेवणार का...माणसाच्या जातीचे हे रंग बघितले की जीव
तुटतो...
सई बने
डोंबिवली
---------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDelete