ताईचं राजकारण

ताईचं राजकारण

काही कामानिमित्त अंजलीला, माझ्या मैत्रिणीला फोन केला होता.  कामाचं बोलणं झालं.  गप्पाही झाल्या.  मुलांची चौकशी झाली. अंजलीच्या सासुबाई उज्ज्वलाताईंही ओळखीच्या...त्यांचीही चौकशी केली.  त्यांची पूजा चालू होती...आम्ही गप्पा आवरायला घेतल्या तेवढ्यात अंजली म्हणाली, आईंना बोलायचंय तुझ्याबरोबर...थांब जरा...मग त्यांची पूजा होईपर्यंत असंच इकडच्या तिकडच्या चौकश्या झाल्या...अगदी दोन मिनीटात उज्ज्वलाताई फोनवर आल्या...काय...कसं काय...पुन्हा सरु...देवाजवळ एवढं काय मागितलंत ते सांगा आधी...मी विचारलं...कोरोनाला घालवा असं सांगितलंत की नाही...त्यावर उज्ज्वलाताई म्हणाल्या,  नाही ग...मी काही त्यातलं नाही मागितलं...त्या कोरोनासाठी आपली डॉक्टर मंडळी आहेत...मग एवढा वेळ पुजा करुन देवाकडे काय मागितलं नाही...कम्माल आहे...असं मी गम्मतीत म्हटल्यावर त्या म्हणाल्या, मागितलं तर...मला पुढच्या जन्मी राजकारणी कर, असं सांगितलंय...राजकारणी...मी आवाक झाले...

उज्ज्वलाताई आणि माझी खूप आधीपासूनची ओळख...अंजलीच्याही आधी

आम्ही दोघी मैत्रिणी होतो.  वयाचा अडसर आमच्या मैत्रीमध्ये कधी आला नाही.  नंतर अंजली त्यांच्या घरची सून झाली.  आमच्या दोघींचीही थोडीफार ओळख होती.  उज्जलाताईंची सून म्हणून मग ती ओळख अधिक छान झाली.  काही वर्षांनी त्यांनी आमचं शहर सोडलं.  त्यांच्या मुलाची पुण्यात बदली झाली.  आता तिथेच रहावं लागणार होतं...म्हणून त्यांनी इथलं घर विकून पुण्यात घर घेतलं...तिथे गेल्यावर उज्ज्वलाताई अधिक अॅक्टीव्ह झाल्या.  समवयीन महिलांचा ग्रप तयार झाला.  सात मैत्रीणी...म्हणून साथी नाव ठेवलं.   लोणची-पापड-खाखरा यात त्यांचा हात सरस...तसंच त्यांच्या नव्या मैत्रिणीही होत्या...या महिलांनी मग छोटासा कारखानाच सुरु केला....चार बायका कामाला ठेवल्या...विशेष म्हणजे या महिलांच्या मुलांनी आणि सुनांनीही आपापल्या आईंचं कौतुक करत काही कायदेशीर बाबी पूर्ण केल्या.  कर्ज मिळवून देणं...मशीनची खरेदी...अकाऊटच्या नोंदी...अश्या गोष्टींमध्ये मुलांची आणि सुनांचीही मदत मोलाची झाली.  पुढे ही उत्पादनं प्रदर्शनात विकण्यासाठी स्टॉल लावण्यात आले.  ते सांभाळण्यासाठी सर्वांच्या सूना आणि नातवंड हौशेनं पुढे यायची...एकूण काय उज्ज्वलाताईं जोरात होत्या...मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यासाठी त्यांनी मोठी तयारी केली होती.  कारण लोणची आणि पापड यांच्यासाठी हे तीन महिने महत्त्वाचे.  अधिकचे सामान, पॅकींग, ऑर्डर अशी काही ना काही त्यांची तयारी चालू होती...पण कोरोनामुळे या सर्वांवर स्टॉप लागला.  त्यांच्याकडे काही माल तयार होता.  तो माल त्यांनी वॉटस्अपच्या माध्यमातून विक्रीस काढला.  त्यांच्याकडे काम करणा-या काही महिलांनी घरपोच सामान पोहचविण्याची जबाबदारी स्विकारली.  या सात जणी रहात होत्या त्या सोसायट्यांमध्येही या पापड-लोणच्याची विक्री झाली.  यातून आलेले पैसे त्यांनी त्यांच्याकडे कामाला असणा-या महिलांना वाटून टाकले.  ज्या जागेत कारखाना उभा होता, त्या जागेचं भाडं या सर्वांनी स्वतःच्या पैशातून भरलं...

आज ना उद्या हा रोग जाईल, आणि पुन्हा आपलं काम सुरु होईल, याची पक्की खात्री उज्ज्वलाताईंना आहे.  आता घरी बसल्यावरही त्या काही ना काही कामात स्वतःला  व्यग्र ठेवून आहेत.  आपल्या छोटेखानी उद्योगात पुढे काय करायचं तेही त्यांनी ठरवलं आहे.  सुदैवाने त्यांना मिळालेल्या सात मैत्रिणीही त्यांच्यासारख्याच...रडत, कु़डत न बसता पुढचा विचार करणा-या...वयापेक्षा थोडे आधुनिक विचार आहेत असं वाटणा-यांपैकी हा ग्रुप...देवापुढे तासनतास बसून पुजा करण्यापेक्षा या सर्वजणी कुठल्याही कामात मग्न असतात...मग अशावेळी अचानक काय व्हावे आणि उज्ज्वलाताई पुजेला लागाव्या...आणि त्यात भर म्हणून त्यांनी देवाकडे चक्क राजकरणी कर म्हणून मागणं मागावं...मला काही कळेना...

झालं काय एकदम राजकारणात उतरायला...आणि पुढचा जन्म कशाला...तुम्ही आताही ठरवलंत कर निवडणुकीत उभ्या राहू शकता...आणि विजयीही होऊ शकता...मी अगदी विश्वासाने सांगितलं...तेव्हा त्या म्हणाल्या नको ग बाई, आता निवडणुका कधी होणार आणि मी लढणार कधी...त्यापेक्षा पुढच्या जन्मी अगदी तरुण वयापासूनच सुरुवात करेन मी राजकारणाला...मला हसायला आलं...त्या तसचं बोलत होत्या...कारण राजकारण हा विषय इतका खोलाचा...की त्याबद्दल बोललेलंच न बरं...आणि उज्ज्वलाताई चक्क त्या खोलात पोहण्याच्या बाता करत होत्या...नक्की झालंय काय ते तर सांगा...मग गेल्या आठवड्यापासून त्यांची आणि त्याच्या मैत्रिणींची चाललेली पळापळ त्यांनी सांगितली...त्यांच्या कारखान्यात चार बायका कामाला होत्या... त्यातल्या एका महिलेला काही दिवसांपासून ताप येत होता.  ती ज्या चाळीत रहात होती, तिथे काही जणांना कोरोनाची लागण झाली होती.  त्यामुळे या महिलेला ताप येत असल्यामुळे तिच्या नव-याला धास्ती वाटायला लागली. 

पहिल्यांदा घरची औषधं दिली गेली.  मग दुस-या दिवशी ताप वाढल्यानं नवरा तिला सरकारी दवाखान्यात घेऊन गेला.  पहिल्या दवाखान्यात चार तास चालेल अशी रांग...मग दुस-या दवाखान्यात नेण्यात आलं...तिथंही तशीच परिस्थिती...शेवटी कंटाळून ती दोघं त्या रांगेत उभी राहीली...नंबर आला.  तपासणी झाली...त्या महिलेला कोरोनाच लक्षणं होती...त्यामुळे तिच्या नव-याचीही तपासणी करण्यात आली...मात्र त्याचा रिपोर्ट ओके आला...घरात कोण आहे याची चौकशी झाली.  नशीबानं या लॉकडाऊनच्या काळात दोन्ही मुलांना त्यांनी गावाला, साता-याला आजीकडे पाठवून दिले होते...महिना झाला होता त्यांना...त्यामुळे त्यांना भीती नव्हती...मग या महिलेला दवाखान्यात ठेवणार म्हणून सांगितले...तिथे बेड उपलब्ध नव्हता...तिचा ताईंवर भरवसा...म्हणजे उज्ज्वलाताई आणि त्यांच्या मैत्रिंणीवर.  त्यांच्यापैकी एकीला तिच्या नव-यानं फोन करुन परिस्थिती सांगितली...आणि बेड मिळेल असं हॉस्पिटल शोधा म्हणून विनंती केली. 

मग या सात जणी,  त्यांची मुलं, सुना कामाला लागल्या...शेवटी सकाळी सुरु झालेला बेडचा शोध सायंकाळी संपला...एका तात्पुरत्या स्वरुपाच्या हॉस्पिटलमध्ये या महिलेचा नंबर लागला...तोपर्यंत तिला एकदा ताप आला आणि गेलाही...पोटात अन्नाचा कण नव्हता...म्हणून चाळीतल्याच एका कुटुंबानं डबा पाठवून दिला.  ते अन्न कसबसं खाऊन ती त्या दवाखान्यात गेली.  तिथंल वातावण बघून ताप परवडला पण दवाखाना नको असं झालं होतं...पण नाईलाज होता.  नवरा तिला सोडून घरी परतला...सायंकाळी दाखल झालेल्या या महिलेची दुस-या दिवशी तपासणी झाली...कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह पण लक्षणं तिव्र नव्हती...तापाची गोळी देण्यात येत होती...दुस-या दिवशी नवरा जेवण घेऊन आला होता...त्यांनं ते लांबूनच दिलं...दोन वेळच्या भाक-या आणि चटणी पाठवली होती शेजारच्यांनी...हॉस्पिटलमध्येही काही खायला देत होते...गरम पाणी...चहा मिळाला...पण वातारवण एवढं भीतीदायक की ही बाई अर्धमेलीच झाली होती...शेवटी आठवड्यानं तिला सोडण्यात आलं...प्रचंड थकवा आणि मानसिक ताण घेऊन ती घरी आली. 

घरी आल्यावर तिनं दुस-या दिवशी तिच्या ताईला म्हणजे उज्ज्वला ताईंना आपला अनुभव सांगितला...बेडसाठी वाट बघणं...शेजारच्या रुग्णाचं विव्हळणं...काय काय अनुभवातून या महिलेला जावं लागलं होतं...ते ऐकतांना उज्ज्वलाताई हादरल्या होत्या...आणि तेवढ्चाय चिडल्याही होत्या...त्यांनी त्या महिलेला विश्वास दिला...तिच्या घरी या सगळ्या मैत्रिणींनी काही पैसे आणि खाण्याचे पदार्थ पाठवून दिले होते.   तिला आराम करण्याचा सल्ला दिला...आणि लवकरच आपला कारखाना सुरु झाला की तुझं काम सुरु होईल...सगळं सुरळीत होईल...असा विश्वास दिला...या महिलेच्या अनुभवानं उज्ज्वलाताई संतापल्या होत्या...त्याचं म्हणणं आपण सर्वजण सर्व कर वेळेवर भरतो...त्यापैकी काही सुविधांचा तर कधी लाभही घेत नाही.  पण करात कधी कुचराई करत नाही...मग हव्या तेव्हा आपल्याला त्या सुविधा का मिळत नाहीत....त्यातच त्यांनी एका  नेत्याची मुलाखत पाहिली होती...त्यांना कोरोना झाला तर सर्व डॉक्टर त्यांच्यासाठी धावले होते...मोठ्या खाजगी दवाखान्यात त्यांच्यासाठी बेड राखीव ठेवण्यात आला होता...राज्यातील मोठे नेते त्यांच्यासाठी म्हणे रोज डॉक्टरांबरोबर तास-तास बोलायचे...ताईंचा पारा याच मुलाखतींनं वाढला होता...राजकारण्यांसाठी खाजगी रुग्णालय का...त्यांनी खरतर सरकारी रुग्णालयात दाखल व्हायला पाहिजे...आपण काय सुविधा पुरवतो  आणि त्याचा जनतेला कसा आणि कितपत लाभ होतो, हे पहाण्यासाठी यासारखी चांगली दुसरी संधी नाही...यावर उज्ज्वलाताई ठाम होत्या...त्यांनी मलाही माझं म्हणणं विचारलं...यावर काय बोलणार...काहीतरी थातूरमातूर बोलून मी त्यांची समजूत काढली...फोन ठेवला...चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं फोन चालू होता...

काही दिवसांपूर्वी मीसुद्धा आजारी पडलेल्या राजकीय नेत्यांच्या मुलाखती बघितल्या होत्या...त्यांचा आजार फाईव्हस्टार होता जणू...आणि सामान्यांचा...सामान्यांचा साथीचा....हे सुधारण्यासाठी प्रत्येकजण राजकारणी झालं तर...हा विचार मनात आला...आणि नकोसं झालं...त्या खोलाच्या विहिरीत किती जणांनी डुंबायचं...आणि किती जणांनी बाहेर उभं राहून नुसतं त्या पाण्याकडे आशेनं बघायचं हा प्रत्येकाचा प्रश्न...पण या कोरोनामुळे असले प्रश्न लोकांना पडाला लागलेत हेही काही कमी नाही एवढंच...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Comments

  1. लोकांना प्रश्न पडतात पण ते बोलण्याच, मांडण्याच धाडस त्यांच्यात नाहीय.त्यामुळे मरू देत मला काय करायचंय ? किंवा कशाला या भानगडीत पडा ? अशी उदासीन वृत्ती त्यांच्यात भिनली आहे.ही उदासीन वृती म्हणजे एक प्रकारे मानसिक गुलामीच नव्हे काय ? त्यामुळे प्रश्न पडायला लागलेत हे सुचिन्ह असलं तरी ते योग्य ठिकाणी,योग्य प्रकारे ठामपणे मांडण्याचही धाडस लोकांत यायला हवं.
    उज्वलाताईंच्या विचारसरणी सारख्या विचार, मते असणाऱ्या व्यकतींची समाजात वाढ होण्याची आवश्यकता आहे. कोरोना आजारासंदर्भात निर्माण झालेली परीस्थिती ही अपरिहार्य आहे. आरोग्य, शिक्षण आपल्या देशात कधीच प्राधान्य क्रमवार नव्हते !अनेक विकसित देशात आरोग्य, शिक्षण यावर सर्वात जास्त खर्च केला जातो. तेवढं महत्व आपल्या देशात अजून दिल जात नाही ही शोकांतिका आहे.कोरोना सारख्या आपत्तीत त्याचे परिणाम आपण भोगतो आहोतच.
    उज्वलाताई राजकारणात जेंव्हा जातील तेंव्हा त्यांनी राजकारण हे त्यांच्या विचारांसारखे बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर असलेल्या राजकारणामुळे ताईंचे विचार बदलून राजकारण्यांसारखे झाले तर मात्र कठीण आहे !.....😊
    असो,लेख हलका फुलका, मनोरंजकतेने विचाराला गती देणारा !!

    ReplyDelete
  2. लेख छान आहे. विचार ठामपणे मांडले आहेत. असेच चांगले लेखन चालू ठेवा.

    ReplyDelete
  3. खूप छान लेख आहे

    ReplyDelete
  4. ������

    ReplyDelete

Post a Comment