शाळा आली घरी...

 

शाळा

आली

घरी...



तणतण करणे म्हणजे काय...गेल्या काही दिवसात या शब्दाचा अर्थ चांगला समजायला लागला आहे.  कारण असे तणतण करणारे...म्हणजेच वैतागणारे...संताप व्यक्त करणारे फोन सध्या वाढले आहेत.  त्यापैकी अनेक फोन हे मोबाईलवर चाललेल्या शिक्षण पद्धतीबाबत आहेत.  गुरुवारी तर एक मैत्रीण अर्धा तासाहून जास्त शिक्षण पद्धतीमधील या नव्या प्रवाहाबाबत बोलत होती.  दोन मुलं. कोरोनामुळं शाळेला टाळं लागल्यानं घरात मोबाईलवर शाळा-शाळा खेळायची वेळ तिच्यावर आली आहे.  एरवी मुलांना शाळेत पाठवलं की काम व्हायचं...पण आता मुलांसोबत या शाळेला बसावं लागतंय...त्यात लॉकडाऊनमुळं सर्व मंडळी घरात...कामवाल्या मावशीला सुट्टी...या सर्व चक्रव्युहात सापडलेल्या महिलेला अजून एक काम लागू झालं...त्यामुळं ही तणतण...

एरवी जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्याला सुरु होणा-या शाळा आता जुलै महिन्यातही सुरु होण्याची चिन्ह दिसत नाहीत.  कोरोनाच्या आक्रमणाचा फटका सर्वांनाच बसला आहे.  शिक्षण व्यवस्थेलाही याचा फटका बसला आहे.  एक वर्ष कसं भरुन निघणार याची काळजी विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे.  यासाठी एक पर्याय आला आहे, तो ऑनलाईन शिक्षणाचा.  विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत तर शाळा घरात येऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देईल ही या मागची कल्पना.  आपल्यासमोर मुलं शिकतील ही सुखाची भावना असली तरी आता त्यामागच्या अडचणी समजू लागल्या आहेत.  एरवी शाळेत तुला शिक्षक काही शिकवतात की नाही हे बोलणे सोप्पं....आत्ता त्या शिकवण्यामागचे खरे कष्ट पालकांना दिसत आहेत. 

गुरुवारी फोन आलेल्या या मैत्रिणीचा या सर्वांतून आलेला वैताग व्यक्त होत होता.  आधीच कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये नाना अडचणींचा तोंड द्यावे लागत आहे.  घरात कधी चोवीस तास स्वतःला कैद करुन घ्यावे लागेल अशी कल्पनाही नव्हती.  आपल्या आरोग्यासाठी केलेल्या या कैदेमुळे अनेक प्रश्न समोर आले आहेत.  त्यातला मुख्य प्रश्न म्हणजे मुलांना व्यस्त कसे ठेवावे, हा आहे.  मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मुलं घरात बंद आहेत.  पहिले काही दिवस मोबाईल, टीव्ही, थोडफार वाचन, घरात बैठे खेळ यात मुलांनी आपला वेळ घालवला.  पहिल्यांदा शाळेला सुट्टी म्हणून छान वाटलेली भावना आता लोप पावली आहे.  आता मुलांचा ठराविक वेळ अभ्यासात जायला हवा यासाठी पालकही आग्रही झाले आहेत.  शाळा सुरु होणार नसल्यातरी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय आला आणि पालकांना विशेषतः आईला आणखी एक काम करावे लागत आहे.

ज्या मैत्रिणीचा फोन आला होता.  तिला दोन मुलं...मोठा मुलगा पाचवीला तर

लहान मुलगी दुसरीला.  पंधरा तारखेपासून या  दोघांचेही ऑनलाईन वर्ग चालू झाले आहेत.  शाळेनं पुस्तकं पाठवून दिली.  वॉटस्अपच्या माध्यमातून वेळापत्रक आलं आहे.  आता दोन मुलांचे नियमीत वर्ग चालू झाल्याने या मैत्रिणीची खरी कसोटी लागत आहे.  लॉकडाऊनमुळे तिचा नवरा घरातून काम करतो.  सकाळी ऩऊ ते सायंकाळी पाच...अर्थात त्यानंतरही कितीही वेळ त्याला लॅपटॉपसमोर बसावे लागते.  त्यामुळे त्यांचा नाष्टा....वेळवर जेवणाची तयारी ही तयारी होतीच..या वेळेत मुलांना नाष्टा दिला की ते काही खेळण्यात, टीव्हीमध्ये किंवा अभ्यासात आपला वेळ घालवायची.  त्या वेळेत ही मैत्रीण घरातील बाकीची कामं करत असे.  घराची साफसफाई, भांडी,  कपडे या कामांची वेळ...मग दुपारचे जेवण...पुन्हा भांडी...मग मुलांना थोडावेळ जवळ बसवून अभ्यास घेणे...दुपारचा आराम मग पुन्हा संध्याकळचा काही खाऊ...जमला तर अभ्यास आणि रात्रीचे जेवण...या सर्व वेळापत्रकात मैत्रिणीची धावपण होत आहे.  सहाजीकच आहे.  असाच काहीसा प्रकार आत्ता बहुतांशी घरात आहे.  त्यात मदतीला कामाला येणा-या मावश्यांनाही सुट्टी दिल्याने सर्व ओझं गृहिणीवर पडलं आहे.  त्यात आता दोन्ही मुलांचे घरबसल्या शाळेचे तास सुरु झाले आहेत.  त्यामुळे हिच्या अंगावर नवीन काम आलं आहे.  मोठा मुलगा स्मार्टफोन वापरु शकतो.  पण लहान मुलीबरोबर मात्र तिला बसावं लागतं.  यात किमान तीन तास तरी जातात.  कामाचं सर्व शेड्यूल पुन्हा विस्कळीत झालं आहे.  त्याचे परिणाम आता चिडचिडीच्या स्वरुपात व्यक्त होत आहेत.

खरंतर हे शेड्यूल सर्व घरात असंच चालू आहे.  ज्या मैत्रिणी घरातून ऑफीसच काम करत आहेत, त्यांची तर होणारी तारांबळ विचारु नका एवढी चालली आहे.  त्यात फोन, लॅपटॉप यांची मागणी कधी नव्हे ती वाढली आहे.  मुलांनाही अभ्यास...त्यामुळे ती हक्कानं फोन वापरत आहेत.  वडील लॅपटॉपवर....आई जे मिळेल त्यावर आपली कामं करीत आहे, हे दृष्य शहरातील बहुतांश घरात सध्या दिसत आहे.  यावर उपाय काय असं माझ्या मैत्रिणीनं शेवटी विचारलं होतं.  ती वैतागून म्हणाली होती, किती ग दगदग होतेय.  एरवी मुलं शाळेत गेली की चार-पाच तासांचा आराम असायचा.  नवराही ऑफीसला...त्यामुळे घरचं निवांत आवरता यायचं...आता तर हा निवांतपणा कुठल्याकुठे हरवला आहे.   सर्व घरात आहेत.  डबा द्यायची भानगड नाही तरीही मला पहाटे पाचला उठावे लागत आहे.  तेव्हा मी तिला हसून विचारले...नक्की त्रास कशाचा होतोय...सकाळी उठायचा की मुलं घरीच शाळा शिकत आहेत याचा...अर्थात या प्रश्नाचे उत्तर काहीही असो, पण त्याचे उत्तर प्रत्येकाला आपल्या परीने या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागणार आहे.

मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु झाला तेव्हा किती पॅनिकनेस होता.  एक अनाहुत भीती सर्वांना वाटत होती.  आताही आहे.  पण त्यातही सर्वांनी आपापल्या परीनं मॅनेज केलं आहे.  या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही.  हे कुठेतरी आपण मान्य केलं.  तसंच या बदलत्या शिक्षण प्रवाहाबद्दल आहे.  पहिले काही दिवस नक्कीच त्रास होणार.  मुलांना अभ्यासात मदत करावी लागेल.  शिक्षक शिकवतांना पालकांनाही सोबत बसावे लागेल.  शिवाय नंतर घरच्या घरी अभ्यासही अधिक असेल, त्याची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे.  इंटरनेट, लाईट या समस्या आहेतच.  पण या काही कायमस्वरुपी समस्या नाही.  किंबहुना मोबाईल शिक्षण हा सुद्धा कायमस्वरुपी उपाय नाही.  काही महिन्यांनी शाळा नियमीत सुरु झाल्या की, मुलं पूर्वीच्याच उत्साहानं शाळेत जातील.  पण आता काही महिने ही जबाबदारी शाळा, शिक्षकांबरोबर पालकांनाही घ्यावी लागणार आहे.  लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर त्याचे चांगले फायदे समोर आले.  कुटुंबासोबत वेळ देता आला.  सर्व मंडळी घरात एकत्र जेवायला बसू लागली.  घरचं जेवण अधिक प्रिय वाटू लागलं.  आरोग्यासाठी अनेकांनी व्यायाम, योगा सरु केला.  हे असे अनेक फायदे लॉकडाऊननंतर पुढे आले.  तसंच या ऑनलाईन शिक्षणाबाबत होणार आहे.  सुरुवातीला काही दिवस कंटाळवाणे वाटेल.  पण नंतर या शिक्षण पद्धतीचा फायदाही समोर येणार आहे.  पहिला आणि महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे, आपल्या मुलांचे शिक्षक कसे शिकवतात हे प्रत्यक्ष बघता येणार आहेत.  एरवी शाळा नियमीत असतांना मुलांना शिक्षक काय शिकवतात, याचा शोध पालकमंडळी वह्या-पुस्तकांच्या करीत असतात.  पण आता याच पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षकांना ऐकता येणार आहे.  आपल्या मुलांना विषय कितपत समजतो...तो शिक्षकांना कसा प्रतिसाद देतो, हे ही पहाता येणार आहे.  मान्य आहे, त्यासाठी थोडीफार धावपळ होईल...पण यात आपण एकटेच नाही.  जे सर्वांचे होत आहे, तेच माझेही होईल, ही भावना मनात ठेवली तर थोडा आराम पडेल.

लॉकडाऊनच्या सुरुवातीला आमच्याकडेही अशीच कोंडी झाली होती.  त्यात लॅपटॉपही एक...मग बहिणी-भावाकडून अधिकचा लॅपटॉप आणला...लेकांनं मोबाईल लेक्चरच्या नावानं अडकून ठेवला...मग फोन दिवसा वापरायचे कमी केले.  त्याच्या वेळेनुसार पुन्हा माझे शेड्युल लावले.  अर्थात सकाळी पाचला उठणे हा भाग कुठल्याही शेड्युलचा अविभाज्य भाग...पण त्यातून झालेला एक फायदा आता लक्षात यायला लागला आहे, तो म्हणजे, दुपारी एक आणि रात्री नऊ वाजता जेवण व्हायला लागले.  तेही कधी नव्हे ते एकत्र...

हा रोग कशानं जातो हे माहित नाही.  कधी जाईल याचंही उत्तर नाही.  पण त्याच्यावर मात करता येईल का...या प्रश्नाचं उत्तर नक्की आहे....आणि ते हो असंच आहे.  आज प्रत्येक विभागात बदल करावा लागला आहे.  हा बदल सुरुवातीला त्रासदायक वाटत असला तरी त्याचा नंतर होणारा फायदा समोर आला आहे.  या बदललेल्या शिक्षण पद्धतीचंही तसंच आहे.  मैत्रिणींनो थोडी कळ काढा...काही दिवसातचं शिक्षक आपल्या पाल्यांसाठी किती मेहनत घेत आहेत, हे समजेल...त्यातून शिक्षक-पालक सुसंवाद वाढीस लागेल....

सई बने

डोंबिवली

----------------------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 



Comments

Post a Comment