साध्या खिचडीची साधी बात....
आत्ता फार काही नको....साधी खिचडी कर...सोबत कांदा किंवा पापड काहीही चालेल...गेल्या रविवारी लेकाची एक परीक्षा होती. दुस-या शहरात...सकाळी सहाच्या ठोक्याला घर सोडलं होतं. मी, नवरा आणि लेक...तिघंही बाहेर...त्यामुळे तिघांचे डबे...जेवण...नाष्टा...फळं...ही सर्व तयारी करण्यासाठी पहाटे चारला उठलेले...सगळी गडबड...आदल्या दिवशीही असेच शेड्यूल...त्यामुळे रात्री नऊ वाजता घरी आल्यावर सगळं सोडून ताणून द्यावेसे वाटले...पण लेकाच्या बोलांनी पोटातल्या भुकेची जाणीव झाली. खिचडी...भुकेवरील सोप्पा पण भरगच्च असा प्रकार...भरगच्च अशासाठी की एरवी भाताला नाक मुरडणारा लेक, मुगाची खिचडी चवीनं आणि दुप्पटीनं खातो...मी ही खिचडी सतरा प्रकारची करते...दरवेळेला नवीन प्रयोग...तांदूळ फक्त कॉमन...बाकी सर्वांना रिप्लेस करुन अनेक प्रकारच्या खिचडी प्रकारांची बहार आमच्याकडे नेहमी होते. रविवारी उशीरा घरी आल्यावर बाहेरुन काहीतरी आणून पोट भरण्याचा आम्हा दोघांचाही विचार होता....पण लेकाचं मत खिचडीच्या बाजुनं पडलं...त्यामुळे थकवा बाजुला ठेऊन किचनचा ताबा घेतला...तेव्हाही असाच एक नवीन प्रकार केला....
लेकाच्या परीक्षा आणि अन्य स्पर्धांमुळे अशा दुस-या शहरातल्या वा-या तशा नेहमीच्याच ठरलेल्या...गेल्या वर्षीचा कोरोना इफेक्टमुळे या परीक्षांना विराम मिळाला होता. पण या नव्या वर्षात पुन्हा शेड्यल सुरु झाले. पहाटे घर सोडायचं आणि रात्री परतायचं...यावेळी सोबत नवरा होता...त्यामुळे डब्यांची संख्या वाढली. शिवाय बाहेर कोरोनाचं सावट. त्यामुळेही बाहेर काही खायला नको...घरातले डबेच बेस्ट....या नादात कितीतरी डबे बॅगेत भरले गेले. हे सर्व करतांना खूप हौस असते. परीक्षेची उत्सुकता...त्यातला त्यात यावर्षी बरोबर एक वर्षानंतर एवढं लांब जाता आलं याचंच अप्रुप...तिथे येणा-या काही पालकांमध्ये मैत्रिणीही होत्या....त्यामुळे त्यांना भेटण्याचा उत्साह...या सर्व नादात एका डब्यासोबत अजून सोबतीला दोन तरी डबे तयार झाले. हे सर्व करतांना कितीतरी उत्साह असतो. पण माघारी येतांना मात्र कमालीचा थकवा. एरवी मी आणि लेक परीक्षेसाठी असे बाहेर असलो की नवरा घरी बाहेरुन रेडीमेड जेवण आणत असे. घरी आल्याआल्या आयते खायला मिळाल्याचा आनंद...पण यावेळी नवराही सोबत होता...त्यामुळे अशा रेडीमेडचा आनंद नाही...शिवाय कोरोनाची भीती, त्यामुळे घरच्या जेवणाची गोडी जरा जास्तच वाढलेली.
या सर्वात भारी पडते ती खिचडी. तांदूळ आणि मुगाच्या डाळीचं साधं
मिश्रण...पण त्यातला एक घटक जरी बदलला तरी त्याची चव बदलणारी. साधं फोडणीला तेल घातलं तरी वेगळी चव आणि तूप घातलं तरी वेगळी. मग कधी फोडणी नुसती जि-यावर तर कधी सोबतीला बडीशेप...कधी फक्त काळीमिरीचा जोर तर वेळ आणि सवड असेल तर काळीमिरी, लवंग, दोन प्रकाराच्या वेलच्या, तमालपत्र आणि डालचिनी या सात आवडीच्या सुक्या मसाल्याची फोडणी...वर अजून काय काय घालायचे...खिचडी खमंग झाल्यावर मग घरच्या तुपाचे दोन-चार चमचे चढळ हाताने घालायचे...अशी गरम गरम खिडची आणि सोबतीला पोह्यांचा पापड...आणि लिंबाची फोड...हा मेनू आमचा सर्वांचाच आवडीचा. अगदी घराची साफसफाई काढली की किंवा आदल्या दिवशी मच्छीवर आडवा हात मारला की दुस-या दिवशी साधी, सरळ खिचडीस पचनासाठी...आणि चवीसाठीही बेस्ट वाटते.
अलिकडे डायट नावाचा शब्द नव-याच्या ताटात आला. या शब्दाला तांदळाचा तिटकारा...एरवी वाफळता भात चांगला ओरपून खायची सवय. आंबटवरण, मच्छिचं किंवा टोमॅटोचं सार केलं की आठवणीनं दुप्पटीनं भात लावायचा...हे गणित ठरलेलं. पण हा डायट नावाचा शब्द आला तेव्हा तांदळाच्या वापराला थोडा अटकाव झाला. बरं नुसता भात ठिक आहे, पण मग खिचडीचं काय...हा प्रश्नच होता. तांदूळाशिवाय खिचडी काय कामाची...मग यावर तांदूळ आणि डाळींचं प्रमाण बदलून बघितलं...तांदूळ दोन चमचे तर डाळ चार...शिवाय मुगाच्या डाळीबरोबर अन्य डाळीही त्यात सामिल झाल्या. पंचम
डाळ प्लस तांदूळ असं भन्नाट कॉम्बिनेशन झालं. एकदा हे कॉम्बिनेशन पसंत पडल्यावर मग त्यात बेसुमार भाज्याही पडल्या...मटार, गाजर, फ्लॉवर, ब्रोकली यांच्यासोबतीनं मेथी आणि पालक या भाज्याही त्यात आल्या. एरवी पालेभाजी म्हटल्यावर नाराज होणारा लेक खिचडीतल्या पालेभाजीबद्दल मात्र चकार बोलत नाही. एकदा त्याला विचारलं तर म्हणाला, वेगळी असेल तर ती डोळ्यासमोर असते...आणि खिचडीत तिची चवच भन्नाट लागते...किंवा तिच्यामुळे खिचडी भन्नाट लागते...त्याचाच होकार मिळाल्यामुळे आमच्याकडे दरवेळा खिचडी म्हणजे नवा प्रयोग ठरला. आणि आत्तापर्यंत तरी प्रत्येकवेळा हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
अर्थात खिचडीसोबत काय असावं याची समीकरणं मात्र बदलत गेली. लहान असतांना लेक खिचडीसोबत तळलेला पापड खायचा...तो कुठलाही दिला तरी चालत असे. पापड कुठला हे त्याला तेव्हा समजत नव्हते. त्यामुळे उडदाच्या पापडावर भागले जायचे. नंतर पापडाचीही चव कळू लागली. आणि खिचडीबरोबर पोह्याचा तिखट पापट चवदार लागतो याच शोध त्याला लागला. मग खिचडी आणि पोह्यांचा पापड हे नक्की झालं. पुढे पुढे त्यातही आणखी चवीनुसार बदल झाले. मग सोबतीला कांदा आला...त्यावर तिखट आणि मिठ...मग मिरच्यांची सवय लागली. एखादी तरी मिरची तळ ना...छान चव येईल...म्हणून मुलाचा तिखट मिरचीसाठी प्रेमळ आग्रह....मग त्या पिवळ्या खिचडीसोबत हिरवी तळलेली मिरची ताटात आली. मध्येच एकदा श्रावणात व्हेज सुरमई म्हणजेच सुरणाच्या कापा केल्या होत्या. या सुरणाच्या कापा आणि खिचडी छान लागते याची जाणीव लेकाला झाली. त्यामुळे आत्ता आत्ता जेव्हा खिचडीची फरमाईश होते, तेव्हा तो हे सर्व ऑप्शन तपासून पहातो...मिरची आहे, सुरण आहे....पापड कुठला आहे...आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आईचा मूड कसा आहे...हे सर्व तपासून पाहिल्यावर मग अपेक्षित अशी ऑर्डर पास करतो...रविवारीही तसंच झालं. आई आपल्यासोबत दिवसभर आहे....थकलेली आहे...हे जाणूनच त्यानं सांगितलं....साधीशी खिचडी कर...सोबत पापड बस्स…
परीक्षेचा ताण...प्रवासाची दगदग...थकलेलं शरीर....हे सर्व विसरायला
लावणारी वाफळती खिचडी तयार झाली...तशीच कढई समोर ठेऊन ताट वाढलं...पापड होताच...पण
नव-यानं पुढाकार घेऊन कांदा आणि लिंबाचीही भर घातली...मग न बोलता तिघांनी ताव
मारला...कढई खाली झाली...मन मात्र शांत झालं...सर्व ताण, थकवा भरल्या पोटात सामील
झाला...समाधानाचा ढेकर...मग जाणीव होते...या साध्या, सोप्या खिचडीत फोडणीबरोबरच या
समाधानाचीही पेरणी केलेली असते...तेच नंतर आपल्यात सामावून जातं...आणि पोट...मन
शांत करुन जातं....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteMast
ReplyDelete