कोरोना...काळजी आणि लाचारी....

  कोरोना...काळजी आणि लाचारी....


शट्ट....पुन्हा लॉकडाऊन होणार की काय...ट्रेनमध्ये माझ्या समोर बसलेल्या तरुणीनं असं काही बोलून वैतागून मोबाईल बंद केला.  कानात लावलेला हेडफोन काढून गप्पचूप बॅगेमध्ये भरुन ठेवला.  तिच्यासोबत असलेल्या आणखी दोन मैत्रिणी ती काय करते आहे ते बघत होत्या...काय ग..काय झालं...लॉकडाऊन जाहीर केलं का...सोबतच्या दोघींनीही तिला दबकतच विचारलं...लॉकडाऊन हा शब्दच एवढा भीतीदायक झाला आहे की,  डब्यातील बहुधा अर्ध्याअधिक महिला त्या तरुणीकडे बघू लागल्या....ती तिच्याच धुंदीत होती.  नाही ग...बातम्या ऐकत होते...आता कोणीतरी नेत्यांनी सांगितलं...बंधनं पाळा नाहीतर सर्व बंद करु...सर्व बंद करु...हे काय...आम्हाला धमकी देतात की काय....आत्ता कुठे सर्व ठिक होत आलं होतं...आपण सगळे नियम पाळतोय...बाहेर पडलोय ते परीक्षा म्हणून...खरंतर या राजकीय नेत्यांनाच जरा आवरायला हवं...त्यांच्या सभांनी कोरोना वाढत नाही वाटतं...आता प्रमाण वाढलं तर सांगतात लोकांनी नियम नाही पाळले...आणि यांनी कुठले नियम पाळले...आत्ता परत लॉकडाऊन झालं तर काय करायचं ग...जवळपास एका दमात ती मुलगी बोलत होती...आपल्या मैत्रिणींना एक हताश करणारा प्रश्न विचारुन ती गप्प बसली.  पण त्यातली एक मैत्रिण शांत होती...मी बोलले ना...बातम्या ऐकू नकोस...शांत रहा...डोळे बंद कर आणि झोप...आपलं स्टेशन  यायला अजून तासभर आहे.  तिचा हा सल्ला या अस्वस्थ झालेल्या मैत्रिणीनं निमूट ऐकला...आपल्या बॅगवर डोक टेकवून ती झोपण्याचा प्रयत्न करु लागली.  तिच्या सोबत असलेल्या दोघींनीही आपल्या या मैत्रिणी सारखेच डोळे बंद केले...या तिघी झोपी गेल्या पण पुन्हा लॉकडाऊन या शब्दांनी अवघा रेल्वेचा डबा मात्र जागा झाला. 


गेल्या रविवारी पुन्हा ट्रेनचा प्रवास झाला.  दरवर्षीचा मसाला लालबागला होतो...कोरोना येवो की काय...घरी जेवण तर लागणारच...आणि त्यात मसाला हा पाहिजेच...गेल्यावर्षी मार्च महिन्यात मसाला केला होता...आमच्या घरात हा मसाला करणं म्हणजे मोठा सोहळा असतो...पण यावर्षी ही सर्व हौस गुंडाळून ठेवली.  लालबागच्या आमच्या वालावलकर मसालावाल्यांना फोनवरुनच ऑर्डर दिली.  मागच्यावर्षीची यादी वॉट्सअप केली.  आठवड्यानंतर त्यांचा फोन आला,  मसाला तयार आहे. हो ना हो करत रविवार मोकळा मिळाला.  रेल्वेच्या ठराविक वेळा आणि त्यात मेगाब्लॉक...गाड्यांना थोडीबहुत गर्दी होती...पण सर्वजणी काळजीपूर्वक मास्कमध्ये आणि स्वतःला दुस-यांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करीत होत्या.  त्यापैकीच मी सुद्धा एक...ठरवलेल्या वेळेपेक्षा एक तास उशीरा मी लालबागला पोहचले...अगदी दुपारी एकच्या ठोक्याला.  मसालेगल्लीत नेहमीची चहलपहल...पण सर्वजण मास्क घालून...वालावलकरांकडे गेले तर तिथे गर्दी...नंबर लागलेले...पण आमचा गेल्या चौदा वर्षाचा वशीला...त्यामुळे थेट दुकानात पंख्यासमोर जागा मिळाली.  चहा पाण्याची चौकशी झाली...हे करता करता माझ्यासमोर मसाल्याचं वजन करुन दाखवलं...मी नेहमीच्या मसाल्यासोबत अन्य काही मसाले...काजू असं घेऊन बील केलं...अगदी मोजून दहा मिनिटं...बाकी काय ठीक ना...फोनवर बोलूया...आता नको...म्हणत अकराव्या मिनीटाला दुकानाच्या बाहेर पडलेही...एरवी लालबागला गेलं की बाजारात फिरण्यातच जास्त वेळ जातो.  मग वालावलकरांबरोबर गप्पा... इथला भाजीबाजारही मोठा आहे...तिथेही फेरफटका होतो.  ओले काजू,  भाजीचा फणस,  केळफूल या कोकणी जेवणातील अमूल्य भाज्या इथे मिळतात...रविवारीही एक-दोन विक्रेत्यांकडे केळफूल होते.  पण कुठेही थांबू नकोस, ही नवरोबाची तंबी आणि लेकाचा प्रेमाचा आग्रह कानात घुमत होता.  ट्रेनचंही वेळापत्रक विस्कळीत...त्यामुळे या सर्वांकडे बघत...पुढच्या वर्षी नक्की म्हणत पाच किलो मसाल्यासह ट्रेन पकडायला धावले. 

रविवार दुपारची ट्रेन...तरीही ब-यापैकी खाली...मला अगदी विंडो सिट


मिळाली.  त्यामुळे मसाल्याची पिशवी मांडीवर घेऊन बसले.  थोड्याच वेळात दादर स्टेशन आलं आणि गर्दीही...त्याच गर्दीत त्या तीन मुली होत्या.  माझ्या समोरची सीट खाली होती.  ती त्या तिघींनाही मिळाली.  बसल्यावर त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.  एकीनं हेडफोन कानाला लावले...नेमक्या तिनं बातम्या ऐकल्या...आणि नकोशी अस्वस्थता ओढवून घेतली.  सकाळी आठ वाजता या मुली बदलापूरहून निघाल्या होत्या.  कसलीशी परीक्षा होती.  सकाळी लवकर उठून तयारी केलेली.  त्यात रात्रभर केलेल्या अभ्यासाचा ताण.  आता परीक्षा चांगली गेली असली तरी कोरोनाच्या वाढत्या प्रभावानं त्याचा निकाल कधी लागले...पुढे काय होईल...हे प्रश्न अधांतरीत होते.  त्यात या मुलीनं लॉकडाऊन हा शब्द ऐकला आणि तिचा सगळा मूड गेला...काही वेळानं या तीनही मुली शांत झोपल्या...पण आजूबाजूच्या महिलांमध्ये चर्चा वाढली.  लॉकडाऊन केलं का....की करणार...उद्या सोमवार आहे,  सोमवारपासून करतील...पेशंट वाढलेत...मग काय ट्रेन बंद होणार का...अरे देवा पुन्हा पूर्वीसारखे हाल होणार प्रवासाचे...आम्हाला तर नोकरी करावीच लागेल...घर कसं चालणार...असे एका मागोमाग एक सूर निघू लागले.  ट्रेनमध्ये एक संत्रा विक्रेती महिलाही होती.  तिनंही कुजबूज ऐकली...पेशंट बढा तो ट्रेन बंद होगा क्या...अरे वापस बंद मत करो...हम क्या खायेगा...म्हणत तिनंही सूर लावला...गरज आहे म्हणून बाहेर पडतो ना...अहो बोगद्यात घुसमटतं...पण हा मास्क काही खाली घेत नाही...एव्हाना मुंब्रा पार झालं होतं...एक महिला तिचं दुःख सांगत होती...घरातून निघतांना पाण्याची बाटली...डबा आणि हे सॅनेटायझर सर्व घेऊन बाहेर पडतो.  हा मास्क काही केल्या खाली घेत नाही.  कसा घेणार...काही झालं तर घरी कसं होणार ही चिंता आम्हालाही आहे.  हे मंत्री लोकं काय फक्त धमकी देतात...हे करु नका नाही तर लॉकडाऊन करु...अरे सोप्प असतं का नुसतं घरी राहून काम करणं...गेलं वर्षभर आम्ही कामाव्यतिरिक्त कुठे गेलो नाही...फिरायला तर नाहीच नाही आणि पाहुणे बिहुणेही नाही...दुस-या महिलेनंही तिच्या स्वरात स्वर लावला....डब्यात नकोसे वातावरण तयार झाले होते.  एव्हाना माझं स्टेशन जवळ आलं.  मी जवळ घेतलेली मसाल्याची पिशवी अधिक घट्ट पकडली.  या चर्चेनं मी सुद्धा अस्वस्थ झाले होते.  लेक बारावीला.  त्याच्या बोर्डाच्या परीक्षा कधी होणार...त्यांचा निकाल कधी लागणार ही चिंता मनात आली.  मग लक्षात आलं,  या आठवड्यातही एक महत्त्वाची परीक्षा आहे.  तिही दुस-या

शहरात...लॉकडाऊन जाहीर झालं तर जायचं कसं...बायरोड जायचं म्हटलं तर परीक्षेच्या आधी चार तास तरी निघायला हवं...बरं गाडंयांना परवानगी असणार का...नको नको त्या शंका मनात यायला लागल्या...मी त्या मुलींकडे पाहिलं.  तिघीही शांतपणे झोपल्या होत्या...आपण काय हलचल निर्माण केलीय यांची त्यांना कल्पनाही नव्हती...

तीनच्या सुमारास घरी परत आले.  घरी लेकाचं आणि नव-याचं जेवण नुकतच झालं होतं.  मी घरी गेल्यावर लगेच चौकशी सुरु...गर्दी होती का...फार थांबली नाहीस ना दुकानात...ट्रेनमध्ये काय अवस्था...हे बघ पेशन्ट वाढताहेत...दोघंही जेवता जेवता बातम्या बघून चांगलेच भांबावले होते...मी सोबत आणलेले सामान काढून बाजूला ठेवले...एक मंत्री महाशय बातम्यांमध्ये सांगत होते, लोकांनी काळजी घेतली नाही...अशीच बेपर्वाई राहीली तर पुन्हा लॉकडाऊन लागणार...मला आठवलं काल हेच महाशय एका सभेमध्ये भाषण देत होते...स्टेजसमोर काय पण स्टेजवरही चांगलीच गर्दी होती...अर्थात तिथे मास्कचा तुटवडा होता...बहुधा अशा राजकीय सभांना तो कोरोनाही टाळत असावा...


कोरोना पुन्हा डोकं वर काढू पाहतोय...पण यात सर्व जनतेचीच चूक आहे का...नक्कीच नाही...सर्वसामान्य जनता ही सरळ मार्गी...एकाकडून मत मागून...दुस-याच्या मांडीवर बसायचं...तिस-याच्या ताटात जेवायचं...आणि चौथ्याच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारायच्या असली लवचिकता या सर्वसामान्य गटात नसते.  मी आणि माझ्यासारखे बहुतांशी जण याच गटातले.  कोरोना आल्यावर सरकारनं ज्या प्रारंभीक सूचना दिल्या त्याच अद्यापही पाळतोय...काही मंडळी मात्र कोरोना गेल्यागत वागली...त्यात राजकीय पक्ष होतेच की...त्यांचेही मेळावे, सभा झाल्या...यामुळेही कोरोनाला चालना मिळाली असेल ना....मग ही जबाबदारीही त्यांनी घ्यायला नको का...पण नाही...हे खापर सामान्यांवर फोडण्यात आलंय...लेकांनं दुसरं चॅनेल लावलं...त्यावर दुसरे महाशय सांगत होते...लोकं कशीही वागतात...त्यामुळे कोरोना वाढलाय...काय म्हणणार यांना...वैतागून मी त्याला टीव्ही बंद करायला सांगितला...अभ्यासाला बस...आपल्याला मेहनत करावी लागेल...आपलं कोण वर ओळखीचं नाही...चांगल्या कॉलेजात अॅडमिशन द्यायला...त्यांना सोड...नकळत राग...अस्वस्थता लेकावर निघाली...त्यानं टिव्ही बंद केला...मला शांत हो म्हणत अभ्यासाला गेला...

अंघोळ केली...डोकं थोडं शांत झालं...बाहेर ताट वाढलं होतं...टिव्ही चालू होता...गाण्याचं चॅनेल चालू होतं...गेल्यावर्षी जेव्हा कोरोना आला तेव्हा बातम्या बघून असाच राग यायचा...वैताग यायचा...अस्वस्थता वाढायची...त्यावर उपाय म्हणून आम्ही ठराविक वेळीच बातम्या बघायचो...आणि बाकीच्या वेळी टिव्ही लावला तर गाण्यांचे चॅनेल किंवा कार्टून चॅनेल...हे नियम न बोलता ठरले...याचा खूप फायदा झाला...त्यादिवशी ताटावर बसतांनापण जाणवलं...आपली काळजी आपणच घ्यायला हवी...टिव्हीवर जनतेला धमकी देणारी ही मंडळी या रोगांनी ग्रासली तर फाईव्हस्टार हॉस्पिटलचे दवाखाने त्यांच्यासाठी सदैव उघडे असणार...आपल्याला साधा सर्दी खोकला झाला तरी डॉक्टरांकडे तासभर रांग लावावी लागणार...आपल्याकडे लवचीकता नाही...पण नकळत लाचारी आली आहे का...काय माहित...त्यापेक्षा आपण भले की आपले नियम भले....हेच सूत्र पाळायचे...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. आदरणीय सई जी अपन छान लिहले
    करोना-- लॉकडाउन--परीक्षा--परत रदद् परीक्षा-- परत रिव्हिजन-- परत-परत-परत----तेच तेच... भीति वाटायला लागली होती, झोप उडाली होती कसे होईल मुलाचं सर्वांची मनस्थिती सांभाळत स्वता डिप्रेशन मध्ये कधी गेलो हेच कळले नाही.
    कुणी करोना लोकडाऊन चर्चा जरी करायला लागला तरी तो साता जन्माचा दुष्मन वाटायला लागला होता.
    कुणास ठाऊक ,,,,,, चमत्कार झाला वर्षभराचा ह्या तारीख पे तारीख च्या चक्कर मध्ये ते.... चार.... दिवस अस्से जादू सारखे आले आणि झाल्ल ह्हो...
    मुलाचं ऍडमिशन ते पण भारतातील सर्वात मोठ्ठ गव्हरमेंटं इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये !!!!!
    सुटलो एकदाचा....
    मात्र ह्यात दोन जिवलग मित्रांनी मला जे सांभाळले जे नेहमी धीर द्यायचे समजावयाचे त्यांचे आभार मानतो मी.
    धन्यवाद
    दादा पाटील

    ReplyDelete

Post a Comment