बाईमाणूस...जात...पक्ष आणि बरच काही...
काय, तुला काही चॉईस आहे की नाही...कोणाला पण लाईक करतेस...कमेंट करतेस....काय गाणं आहे त्या बाईचं...काय गाते ती...त्याला कशाला लाईक करतेस...फोनवर कोणा एका महिलेबद्दल सांगतांना या स्वतःला जाणत्या म्हणणा-याची जीभ चांगलीच सुटली होती. ही व्यक्ती आमच्या परिचितांपैकी...सोशल मिडीयावर नको तेवढी अॅक्टीव्ह...सगळ्यातलं आपल्याला कळतं...या पठडीतले काही जण असतात...शिक्षण म्हणजे कशीबशी बारावी केलेली...पण सोशल मिडीयावरची बुद्धी सर्वव्यापी...कुठलाही निर्णय जाहीर झाला की तो कसा चूक आहे, हे सांगण्यात यांचा पहिला नंबर. काही महिन्यांपूर्वी, जेव्हा टीकटॉक चालू होते तेव्हाच मी यांना माझ्या सोशल मिडीयावर ब्लॉक केले. मनोरंजनाच्या नावाखाली कुठलेही व्हिडीओ टाकून त्यावर तेवढ्याच महानतेची अशी स्लोगन असायची...ही व्यक्ती सुधारण्यातली नाही...हे जाणून मी त्यांना ब्लॉक केले. तरी या सोशल किड्यानं कुठूनतरी मी लाईक केलेल्या गाण्याला शोधून काढले. आणि त्या गाणा-या महिलेला आणि मला नावं ठेवण्यात धन्यता मानण्यात येत होती...किती ऐकणार...मी सुद्धा वैतागले...समोरच्याला थांबवत म्हटलं...अरे मी लाईक केल...तू डिस्लाईक कर ना...ती गाते कशी हे तुला काय करायचंय...तुझ्याकडून पैसे घेते का ती या सेटअपचे...तिच्या कपड्यांचे पैसे भरण्याइतपत तरी तुला पगार मिळतो का...तसं असलं तर बोलं...तू काय तुझा बापपण तिच्या या सेटअपचा खर्च करु शकणार नाही...ती तिचा खर्च करते...गाण गायील नाहीतर काहीही करेल...तुला कशाला खाज येतेय...कधी कधी नको तेवढं स्पष्ट बोललं जातं...तसंच हे बोलणं झालं...आता समोरचाही तपतप करायला लागला...बहुधा मी जास्तच तिखट बोलले...थेट बापच निघाला...पण ते एक अर्थानं बरं झालं...स्वतःला सद्गृहस्थ म्हणणा-यानं फोन ठेवला...मी हुश्श केलं...महिलांबरोबर बोलतांना...त्यांना आदर देतांना त्यांची
जात...पक्ष...ही दोन विशेषणं सध्या लावली जातात. आपल्या जातीतील नाही...आपल्या पक्षातील नाही...मग बिंधास्त तिला काहीही बोला...नाव ठेवा...वेळप्रसंगी अश्लिल टिप्पणी करा...काहीही फरक पडत नाही. विशेष म्हणजे, हिच मंडळी सोशल मिडीयावर चांगलीच अॅक्टीव्ह असतात...कुठलाही दिवस असो...त्याबद्दल लगेच कमेंट...शुभेच्छा असताताच...अगदी महिला दिनाच्याही शुभेच्छा देतात...हे करतांना आपण आपल्या काही पोस्टमध्ये महिलांबाबत अनादर व्यक्त केला आहे. हे हेतूपूरस्पररित्या विसरण्यात आलेले असते, हे सांगणे नकोच...
आजकाल असा अनुभव नित्याचाच झालेला.
हे सांगण्याचं कारण म्हणजे आता दोन दिवसांत महिला दिन येणार आहे. तेव्हा महिला दिनाच्या पोस्ट शेअर करण्याची
सर्वांचीच चढाओढ असेल...कोरोना आहे म्हणून नाहीतर महिलांसाठी किती कार्यक्रम ठेऊन
अनेकांनी आपल्या समाजसेवेत भर घातली असती.
पण प्रश्न असा की किती जण मनापासून महिला दिन साजरा करतात...महिलांना
खुल्या दिलानं शुभेच्छा देतात...एरवी त्यांच्या दृष्टीनं महिला दीनच असतात...
एरवी महिला दिन मला काही फारसा पटत नाही. माझ्या मते सर्वच दिवस हे महिलांचे आहेत. फक्त एक दिवस त्यांना मखरात बसवून महिलांना आदर देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांच्या कतृत्वाला कायम आदर मिळाला पाहिजे. आज या 6जी च्या प्रगत युगात ही गोष्ट सांगतांनाही वाईट वाटतं. कधीही बातम्या लावा...महिलांवरील अत्याचाराच्या बातम्यांनी त्या भरलेल्या असतात. दूरदर्शनवर पहिल्यांदा बातम्यांनंतर हरवले आहेत असे विशेष बातमीपत्र असायचे. सध्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या इतक्या येतात की, यासंदर्भातही असेच बातमीपत्र चालवयची वेळ आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येकजण आपल्या विचाराप्रमाणे या गोष्टींचे विश्लेषण करतो. कोणा एका तरुणीनं आत्महत्या केली...त्याचं विश्लेषण मग सोशल मिडीयावर चालू झालं. सध्या सोशल मिडीयावर विश्लेषण करण्यात मास्टरेट केलेल्यांची फौज आहे. प्रत्येकाची सामाजिक आणि राजकीय विचारसरणी वेगळी. आणि विश्लेषण करतांना या त्यांच्या विचारांचा प्रभाव असणारच....मग कोणाला त्या तरुणीच्या चारित्र्यावरच संशय असणार...तर दुसरा आणखी काही बोलणार...मेल्यावरही नरकयातना असतात हे ऐकलं होतं...हा त्यातलाच एक प्रकार वाटतो मला....
सोशल मिडीया जेवढं व्यापक झालं आहे, तेवढीच महिलांवर होणा-या कमेंटची व्याप्ती वाढली आहे. दुर्दैवानं यात महिलांचा सहभागही मोठा आहे. मध्यंतरी गटारीला माझ्या वॉटसअपवरील एका ग्रुपवर गटारी आणि दारु या विषयावर मेसेज येत होते. पाठवणारी महिलाच होती. मी त्या मेसेजला रिप्लाय करण्यापेक्षा संबंधित महिलेला फोन करुन विचारले...अग बाई, तु महिलाच आहेस ना मग हे महिलांना कमीपणा देणारे मेसेज कशाला
टाकतेस...पहिल्यांदा या महिलेला मी काय बोलतेय हे समजले नाही. नंतर तिला समजवून सांगितल्यावर कळलं की तिनं हा मेसेज वाचलाच नव्हता...फॉरवर्ड करण्यात आला होता मेसेज... आणि आता समजल्यावर त्यात तिला काही विशेष वेगळं वाटलं नाही...तू फारच गोष्टी मनावर घेतेस...नुसतं फॉरवर्ड केलं...त्यात काय वाईट...ही वाक्य माझ्यावर मारुन तिनं फोन बंद केला. बहुधा याचवेळेपासून मी समोरच्याला फॉरवर्ड किंवा लाईक, मसेज या प्रक्रीयेबाबत समजावणं सोडून दिलं.
वर्षातले तीनशे चौसष्ठ दिवस महिलांवर जात, नातं आणि आता त्यांची राजकीय आणि सामाजिक विचारधारा पाहून टिका करणारे मला हॅलोविन फेस्टिव्हल साजरे करणारे वाटतात....आपल्या संस्कृतीतील भजन, प्रवचन, किर्तन याला टाळ कुंटणारे म्हणत परदेशात साजरा होणारा हॅलोविन साजरा करणारे...हॅलोविन म्हणजे काय, हे त्यापैकी अर्ध्याअधिक लोकांना माहितही नसते...तसेच सोशल मिडीयावर एखाद्या पोस्टला लाईक करणारे किंवा त्यावर कमेंट करणारे असतात. त्या फोटोमध्ये किंवा संदेशामध्ये नेमकं काय आहे. ती पोस्ट ज्यानं टाकली आहे, त्याचा त्यामागचा नेमका हेतू काय आहे, हे न जाणता फक्त फॉलो करणारे. मात्र या सर्वात बळी जातो तो महिलांचाच...तिला या विशिष्ट विचारसरणीत बसवण्यात येते. त्यात विचारसरणीत जर ती महिला नसेल तर मग महिलाविषयक असलेल्या नियमांपासून ती आपसूक वेगळी होते. तिच्याविषयक मग काहीही बोललं...लिहिलं तरी ती मोठी गोष्ट होते...हे करणा-यांचा विरोधही करु शकत नाही. कारण जो याला विरोध करेल तोही या टिकाकारांच्या मा-यात भरडला जातो...दुर्दैवानं हे सर्वजण आता महिला
दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी सरसावलेले असणार...
न जाणो ही माणसं कुठल्या मातीची असतात...ती ना त्याच्या मातेची असतात
न त्यांच्या मातीची...कारण या दोघीही स्त्रीयाच आहेत...आईची तर सर्वच मुलं लाडकी
असतात...आणि मातीही तशीच...ती कुठलाही भेदभाव न करता सर्वांना सामावून घेते...ही
साधी गोष्ट या सोशल मिडीयावर महिलांवर विचारसरणी बघून टिका करण्या-यांनी लक्षात
घेतली तरी येणारा महिला दिन साजरा होईल...नाहीतर एक दिवस दिन आणि बाकीचे दिवस दीन
आहेतच...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
वास्तव सांगणारं लिहिलं आहे. प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे.
ReplyDeleteधन्यवाद...प्रत्येकानं हा विचार केला तर नक्कीच महिला दिन चांगला साजरा होईल..
Deleteखूप छान लिहिलं आहे, मुळात वास्तविक चित्र रेखाटले आहे.
ReplyDeleteधन्यवाद प्रिया....
Deleteसई ताई, वास्तविकता नेमकेपणाने मांडलीत.
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteखूप छान वाटले
ReplyDeleteधन्यवाद....
Delete