चक्रव्यूहाचे शिलेदार...
दुपारची कामं आटोपता आटोपता चार वाजून गेले...रात्री लेकाला अभ्यास करतांना सोबत म्हणून झोपायला दोन तरी होतात...दिवसभर सगळ्या कामांची एक रांग लागलेली...त्यामुळे सायंकाळचे पाच वाजल्यावर डोळे मिटायला लागले....शेवटी अगदी पंधरा मिनिटाचा गजर लावून डोळे मिटले...पाच मिनिटातच फोन वाजला...लेकाच्या मैत्रिणीचा होता...तो फोनवर बोलला...आणि गप्प जवळ येऊन उभा राहीला...डोळे कसेबसे उघडून त्याला बघितलं...चेहरा पडला होता...त्याच्या कोणा मैत्रिणीचे वडील वारले....गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाबरोबर त्यांचा लढा चालू होता. किंबहुना त्यांच्या सगळ्या कुटुंबाचाच....दोन दिवसांपूर्वीच आई-मुलगी कोरोनामुक्त झाल्या...पण आज वडील सोडून गेले...काय बोलणार...डोळ्यांवरची झोप खाडकन उडाली...मन सुन्न झालं...वास्तविक ना त्यांना कधी पाहिलं होतं ना त्यांच्याबरोबर बोलणं झालं होतं. तरीही परिवारातील कोणी गेलीय याची जाणीव झाली. गेल्या काही दिवसांपासून अशाच बातम्या सतत कानावर येत आहेत. कोणी मुद्दामहून त्या कोरोनाच्या कचाट्यात जात नाहीत. नोकरी-धंदा केल्याशिवाय सामान्यांना पर्याय नाही. पोट भरण्याच्या विवंचनेत जगण्याची लढाई...अशा विचित्र कैचीत आपण सर्व सापडलो आहोत...
या बातमीनंतर सगळी संध्याकाळ नको नको त्या काळजीत गेली. कुटुंबातीलही काही जण कोरोनाच्या विळख्यात आहेत. त्यांना फोन झाले. रात्री उशीरा त्या मुलीबरोबर बोलले. आठ दिवसांपूर्वी हसतं खेळतं असलेलं कुटुंब एका रोगानं पार उद्धवस्त झालेलं. यातही तिला तिच्या परीक्षेची काळजी होती. बारावीचं वर्ष. गेली दोन वर्ष ती स्पर्धापरीक्षांची तयारी करीत आहे. आता या अचानक बसलेल्या धक्यातून कशी सावरणार याची काळजी पुन्हा लागली...
आत्ता परिस्थिती अशी आहे की, अनेकांना घराबाहेर पडल्याशिवाय गत्यंतर
नाही. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, मात्र
लॉकडाऊनच्या नावाखाली घरी रहावं लागतंय....म्हणून ते चिंतेत. तर घरी बसून काम करणारे वेगळ्या चिंतेत...घरीच
काम...व्वा...मस्त...अशा प्रतिक्रीया आल्यावर हसावं की रडावं कळत नाही...कारण
सकाळी सात वाजता वर्क फ्रॉम होम वाल्यांकडे फोन सुरु होतात ते रात्री अपरात्री
केव्हाही सुरु असतात...घरात असूनसुद्धा जेवायलाही वेळेवर उठता येत नाही अशी
परिस्थिती आहे. पण त्याबद्दल कोणाकडे
तक्रारही करता येत नाही. कारण नोकरीचा आणि
त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा प्रश्न आहे.
यामुळे शारीरिक आणि मानसिक दुखणीही मागे लागली आहेत....ही आमची...आपल्या
सर्वांची...सर्वसामान्यांची कुचंबणा आहे.
नेत्यांची कुचंबणा वेगळी आहे.
चूकून बातम्या बघितल्या की ती लक्षात येते. त्यांना करोना पेक्षा करोडोची चिंता आहे.
तेच तेच विचार नको म्हणून टिव्ही लावला....बातम्या चालू होत्या....एका
पक्षाचा मेळावा होता....दोनच दिवसांपूर्वी कोणतेही सामाजिक, राजकीय, धार्मिक सोहळे करु नका म्हणून सांगणारा नेता
भाषण देत होता...स्टेजवर चिक्कार गर्दी....आणि समोर कायकर्त्यांचीही तेवढीच
गर्दी....बहुधा या राजकीय नेत्यांचं आणि त्या कोरोनाचं साटलोटं असणार...त्यामुळेच
एवढ्या गर्दीतही तो कोरोना येण्याची हिम्मत करत नव्हता...बातम्यांचं दुसरं चॅनेल
लावलं. तिथे कोविड झाल्यावर देण्यात
येणारं इंजेक्शन घेण्यासाठी केवढीतरी रांग लागली होती. त्या चॅनेलच्या पत्रकारानं त्यातल्या एका
माणसाला विचारलं, एवढी गर्दी कशाला केली
आहे. तेव्हा तो हसत म्हणाला, उगाचच...मला हौस आहे. गर्दीत जायची....इथे माझी बायको, आई-वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. मुलांना एकटं घरी सोडून आणि नोकरीला आठ दिवस
खाडा करून या इंजेक्शनसाठी रांग लावतोय...काय होईल ते माहीत नाही....आणि वर
विचारता एवढी गर्दी कशाला केलीत...सरकारी नोंद वहीत इंजेक्शनची किंमत आहे,
त्याच्या दुप्पट पैसे देऊन घेतोय...सर्व घेत आहेत. आमच्या भागात संचारबंदी
आहे. पण संचारबंदी महत्त्वाची की बायको,
आई-वडीलांचा जीव...हताश होऊन तो माणूस त्या वार्ताहराला विचारत होतो....मनाचा
विरंगुळा होईल म्हणून लावलेला टिव्ही पुन्हा बंद केला. पुन्हा तेच तेच नकोसे विचार...काय होईल आणि कसं
होईल...
खरंतर आता कोरोनापेक्षा लोकांना आर्थिक प्रश्न जास्त त्रस्त करीत
आहे. पहिल्यांदा कोरोनाची साथ आली तेव्हा
कसली कसली हौस करुन घेतली होती. सोशलमिडीयावर
चॅलेंजचे दिवस होते. डाल्गोना कॉफी...जिलेबी...भात...पापड...कसले
कसले प्रकार चालू होते. तेव्हा हे वातावरण
कधी न कधी निवळेल असेच वाटत होते. पण आता
ही कोरोनाची सावली अधिक गडद झाली. त्याचे
नियोजन करायला हवे त्यांना याचा अंदाजच आला नाही.
ते आपल्यात मशगूल राहीले. परिणाम
मात्र सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे.
आता प्रत्येक घरात कोरोनाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. आणि जे नियोजनात फसले ते मात्र सरकारी
दवाखान्यांपेक्षा फाईव्ह स्टार हॉस्पिटलमधून उपचाराला प्राधान्य देत आहेत. हे सर्व विचार मनात चालू असतांना दुस-या
शहरातून एका मित्राचा फोन आला....लस घेतलीस का....मी घेतली...घरातल्या सर्वांनी घेतली. मी छान म्हटलं...कसा नंबर लागला याची चौकशी
केली. तेव्हा समजलं त्याचा कोणीतरी राजकीय
पक्षाचा कार्यकर्ता मित्र होता.
त्याच्यामार्फत त्यानं लस मिळवली.
एवढं करुन मलाही सल्ला दिला, तू
सुद्धा ओळख काढ, कोणातरी नेत्याला सांग
आणि लस घे...मी त्याला धन्यवाद म्हणून फोन ठेवला.
या सर्वात हेच काय ते ऐकायचे बाकी राहीले होते.
या सर्व विचारांना शांत करण्यासाठी वर्षापूर्वी केलेला एक उपाय पुन्हा केला.
टिव्ही बंद...सोशल मिडीया थोडा दूर...जुन्या कोळी गाण्यांची एक क्लिप मिळाली. ती गाणी ऐकत रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु झाली. जेवतांनाही टिव्हीच्या बातम्यांपासून अंतर ठेवलं. इथे शिनचॅन मदतीला आला. थोडावेळ गप्पा मारल्यावर पुन्हा कामाला सुरुवात. लेक अभ्यासाला बसला. नवरा वर्क फ्रॉम होम...सर्वत्र सामसूम...पण रात्री बारा वाजता फटाके फोडल्याचा आवाज यायला लागला. ऐवढ्या रात्री फटाके, ही लोकं काय डोक्यावर पडली आहेत का काय माहीत....एवढ्या रात्री मुळात फटाके फोडून काय मिळतं...आणि तेही या दिवसातं....ही आतिषबाजी काही मिनीटं चालू होती. पुन्हा सर्व व्यवस्थेबाबत विचार सुरु झाले. कामातून लक्ष उडतंय की काय...पण मग लक्षात आलं ही चिडचिड करुन काहीही होणार नाही. उलट आपल्याच कुटुंबाला त्रास होणार...
दुस-या दिवशी वॉटसअपच्या माध्यमातून कळलं, कोणा नेत्याच्या मुलीचं
लग्न होतं. कोरोनाचे सगळे नियम धाब्यावर
बसवून लग्न झालं. मस्त
गर्दी...खाण्यापिण्याची चंगळ...सगळं झाल्यावर त्यांनी नियम मोडला म्हणून पाच
हजारांचा दंड लावण्यात आला. अर्थात त्या
नंतर या मंडळींनी पंचवीस हजारांच्या फटाक्यांची आतिषबाजी केली. गेला खड्यात कोरोना आणि त्याचे नियम...इथे फक्त
आम्ही आणि आमचे नियम...या न्यायानं...
ही पोस्ट वाचल्यावर पुन्हा मनाचा त्रागा सुरु झाला. कोणाचाही विचार करु नका...मनमौजी वागा...मजा करा...पण निदान त्या कोव्हीड सेंटरमध्ये राबणा-या आरोग्यादूतांचा तरी विचार करा. आपल्या सोयीसाठी आणि सुरेक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून रस्त्यावर उभ्या असणा-या पोलीसांचा तरी विचार करा....हे असं काही ऐकलं, बघितलं की एक हमखास विचार मनात येतो, त्या नायक चित्रपटासारखं एक दिवसासाठी तरी पद मिळावं...आणि या असल्या माजो-यांना चांगल्या चाबकानं फोडून काढावं...मग सरळ त्यांची रवानगी कोव्हीड सेंटरमध्ये मदतनीस म्हणून करावी....कारण कोरोना एक चक्रव्यूहासारखा आहे. सतत फिरत रहाणार...चकवत रहाणार....आणि ही अशी मंडळी त्या चक्रव्यूहाचे शिलेदार म्हणून काम करणार....त्यामुळे कोरोनाला हरवण्यापेक्षा या त्याच्या शिलेदारांना पहिलं ताब्यात घेतलं तर तो रोगही ताब्यात येईल....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDelete