लाल मातीचे आपले कोकण....

 

  लाल मातीचे आपले कोकण....


26 जुलै 2005 हा दिवस कोणीही मुंबईकर विसरु शकणार नाही...तेव्हाचीच एक आठवण...पाळणाघरात ठेवलेल्या माझ्या लेकाला घेऊन मी कसंतरी घर गाठलं.  नवरा मात्र येऊ शकला नाही.  एका नातेवाईकांकडे त्याला रहावे लागले.  घरी लेक आणि मी दोघंच...धो धो पाऊस...रात्री आठनंतर लाईटही गेले.  अगदी साधी खिचडी पोटात ढकलली आणि झोपायचा प्रयत्न करु लागले.  रात्री अकराच्या सुमारास दरवाजा जोरजारात वाजू लागला.  एवढ्या रात्री कोण म्हणून पहिला प्रश्न पडला.  लहानगा लेकही त्या आवाजानं उठला आणि रडायला लागला.  बाहेरुन ओळखीचा आवाज आला.  सोसायटीमधील मंडळींचा आवाज होता.  मेणबत्तीच्या उजेडात दरवाजा उघडला.  तेव्हा शेजारी उभे होते.  कोणीतरी अडकलेले पाहुणे आले होते,  ते नक्की ओळखीचे आहेत का ते विचारण्यासाठी शेजारीही सोबत आले होते.  माझी ओळख पटली.  आमच्या गावाकडचे पाहुणे होते.  पावसात अडकले होते, त्यामुळे पाऊस थांबेपर्यंत निवारा म्हणून आमचं घर शोधत आले होते.  घरात मी आणि लेक पाहून त्यांनी आधी टाळाटाळ केली...राहूदे, पुढे दुसरे नातेवाईक आहेत, त्यांच्याकडे जातो म्हणून कारण दिलं.  पण मी थोडा आग्रह केला.  बाहेर पाऊस मी म्हणत होता,  लाईटही नाहीत, वर आम्ही ज्या भागात रहात होतो, तेथेही गुढगाभर पाणी साठलं होतं.  त्यामुळे पाहुण्यांना आग्रहानं घरात घेतलं. 


एक जोडप आणि दोन अन्य नातेवाईक.  चौघंही सकाळी अकराला निघाले होते.  गावाला जायची बस त्यांना मिळाली पण थोड्या अंतरावर जाऊन ही बस बंद पडली.  पुढे पावसाचा जोर वाढला आणि सर्वच बंद झालं.  सकाळी अकरापासून ही मंडळी गावाला जाण्यासाठी सर्व प्रयत्न करुन थकली होती.  संध्याकाळी कुठेतरी चहा-वडापाव खाऊन भूक भागवली.  पण रात्र झाली तेव्हा मात्र काळजीनं त्यांना गाठलं.  सोबत एक महिलाही होती.  शेवटी जवळपासचे नातेवाईक शोधायला सुरुवात केली त्यात आमचा नंबर लागला.  रात्री अकरा वाजता आमच्या घरात ही चौघं आली तेव्हा कमालीची ओशाळली होती.  आपण कोणाला तरी त्रास देतोय, ही भावना जास्त होती.  चौघंही सकाळपासून उपाशीच होते.  मी त्यांना फ्रेश व्हायला सांगून जेवणाच्या तयारीला लागले.  तेव्हा, आम्हाला आता काही नको...साधा चहा करा गरम गरम बरं वाटेल.  म्हणून त्यांनी पहिलं सांगितलं...पण त्यांचे थकलेले चेहरे वेगळचं सांगत होते.  मी जेवणाची तयारी सुरु केली.  ते बघून शेवटी ती बाई म्हणाली,  ताई,  फार नको, भात आणि कुळदाची पिढी करा चालेल आम्हाला.  या सर्वात लेकानं भोकाड पसरलं होतं.  त्यामुळे माझीही तारांबळ उडाली.  मग मी सुद्धा त्या पाहुण्या महिलेचा सल्ला मानला.  भाताचा कुकर लावला आणि कुळदाची पिठी केली.  सोबत पापड तळले आणि चटणीचा डबा.  चार पदार्थ आणि चार ताटं त्या पाहुण्यांसमोर ठेऊन वाढून घेण्याची विनंती केली.  लेकाला शांत करण्याचा मागे मी लागेल.  ते करता करता त्या पाहुण्यांच्या जेवणाकडे बघत होते.  पिठलं भात असाच तो मेनू.  पण त्या चौघांनी सर्व भात आणि पिठलं संपवलं होतं.  तृप्तीचा ढेकर देत मला शंभरवेळा धन्यवाद दिले.  ताई तुला खूप त्रास दिला म्हणत माफी मागितली.  मी नाही नाही म्हटलं तरी भांडी आवरली.  दुस-या दिवशी आमच्या भागातलं सर्व ठप्प झालं होतं.  पण एक दुकान चालू होतं.  एव्हाना लेक त्यांच्याकडे रुळला.  म्हणून मी खाली जाऊन पाहुण्यांसाठी ब्रेड आणि अंडी आणली.  नाष्ट्याच्या तयारीला लागले.  तेव्हाही मला त्यांनी थांबवलं.  मी कांदे पोहे करते म्हणाले,  तर ताई ब्रेड नको की कांदा पोहे नको...तू साधा चहा कर आणि कोरडे पोहे दे डीशभर.  आम्हाला सवय आहे चहा पोह्यांची...पाहुण्यांनी नाष्टा चहा पोह्यांचा केला.  आता दुपारच्या जेवणाला मी लागले.  तेव्हा मात्र त्यांची चुळबूळ चालू झाली.  आता आम्ही जातो.  जेवण नको म्हणून सांगू लागले.  मी सांगितलं जेवण करा आणि मग परिस्थिती बघून निघा.  पण त्यांना चैन पडत नव्हती.  शेवटी काही चपात्या केल्या सोबत चटणी बांधली आणि त्यांना दिली.

  निघतांना या चौघांनीही खूप आभार मानले.  ही मंडळी कसंतरी करुन आपल्या गावी पोहचली.  तिथे पोहचल्यावर चार दिवसांनी त्यांचा फोन आला.  तोपर्यंत नवराही घरी आला होता.  नव-याला फोन करुन माझं खूप कौतुक केलं. आभार मानले...वरुन गावी आल्यावर त्यांच्या घरी चार दिवस येण्याचं आग्रहाचं आमंत्रण दिलं.  ही घटना साधी होती.  पण या कुटुंबानी आजपर्यंत त्या रात्रीच्या पाहुणचाराची आठवण ठेवली आहे.  त्यानंतर दरवर्षी त्यांच्याकडून आम्हाला न चुकता आंबे, गावचा लाल तांदूळ,  फणसाचे सुके गरे, कोकमं, आंब्याच्या पोळ्या, अळूची पानं, काजू गर असं सर्व येत राहीलं आहे.  काय दिलं होतं मी तेव्हा त्या पाहुण्यांना भात-कुळदाची पिठी आणि चहा-पोहे...अगदी साधंसं...पण या मंडळींनी त्याची अजूनही आठवण ठेवली आहे.  आम्हाला आमच्या अडचणीच्या वेळेत तुम्ही साथ दिलीत म्हणून आजही ते दादा-वहिनी आठवण काढतात.   एकदा गावी गेल्यावर या कुटुंबाच्या घरी जाणं झालं होतं.  तेव्हा आमच्या घरी ओशाळल्यासारखे आलेल्या या पाहुण्यांनी यजमान बनून आमचा एवढा पाहुणचार केला की त्यांच्या मोठेपणापुढे डोळे पाणावले.  शिवाय निघतांना काजू, आंबे, तांदळाचं पिठ, नाचणी यांची भेट...

हे सर्व सांगण्याचं कारण की, कोकणी माणूस हा असाच असतो.  त्याची काही फार अपेक्षाच नसते.  पिठलं भात खाऊन आनंदात रहाणारी ही माणसं, आपल्याकडे आलेल्या पै पाहुण्याचा अगदी तृप्तीचा ढेकर देईपर्यंत पाहुणचार करतात.  शिवाय निघतांना आपल्याकडे साठवणीत असलेले पदार्थ या पाहुण्यांच्या हातावर ठेवणारच.  कुणालाही मोकळ्या हातांनं जाऊ न देणारा हा माणूस आता कालपरवा झालेल्या पावसाच्या मा-यानं पार उद्ध्वस्त झाला आहे.  एरवी लाल माती ही कोकणाची शान.  पण ही मातीच आता कोकणी माणसाचा काळ बनू पहात आहे.  या मातीच्या ठिगा-याखाली कित्येक माणसं गाडली गेली आणि जी वाचली ती आमचं काय चुकलं या विवंचनेमुळे खचली आहेत.  आमच्या कोकणात कसलीही कमी नाही.  निसर्गाचं पुरेपूर वरदान.  आंबा, काजू, फणस, नारळ, सुपारी या श्रीमंत फळांनी सजलेल्या बागा,  फेसाळता समुद्र किनारा,  फुलांनी बहरलेले मांडव,  चि-याची सुंदर घरं...असं वर्णन कमी पडेल हे कोकणचे सौदर्य.  या सौदर्यांखाली दबलेल्या समस्याही


आहेत.  अनेक वर्ष या समस्यांना घेऊन हा कोकणी माणूस वाट काढतोय.  आम्ही कधी भाव मिळत नाही म्हणून आंबा फेकत नाही, रस्तावर येऊन टायर जाळत नाही...नारळी पोफळीच्या बागा वादळांनी उद्ध्वस्त केल्यावर मोबदल्यासाठी आंदोलन करीत नाही.  आमच्या पारंपारिक शेतमालाला बाजारात भाव मिळत नाही.  त्यामुळे लाल तांदूळ, नाचणी सारखी पोषक पिकं आता कमी झाली.  पण याबद्दल ना आमची तक्रार ना कोणते आंदोलन.  काजू, आंबा सारखी फळं इथे होतात.  पण त्याच्या संकलनाच्या आधुनिक फॅक्टरी मात्र नाममात्र आल्या...तरीही आम्ही शांत...कोकणाचं कॅलिफोर्निया होणार होतं म्हणे...पण ती घोषणा कधी झाली आणि कधी हवेत विरली हे कोणालाच कळलं नाही.  कोकणी माणूस तर असल्या घोषणात कधीच रमला नाही.  मी भला की माझं काम भलं....म्हणत हा आपला उभा...आपल्याच विश्वात रमलेला.  अगदी काही महिन्यापूर्वी झालेल्या निसर्ग वादळानं या माणसाची वाट लावली.  नारळी पोफळीच्या बागा पार झोपल्या.  सरकारी पातळीवर धावाधाव झाली.  मोठ्या पॅकेजची घोषणा झाली.  पण वाट्याला किती आले ते या बागायतदारांनाच माहित.  तेव्हा काही ठिकाणी लाईटच महिन्यांनी आले, मग मदत कधी आणि कशी मिळाली असेल, याची चौकशी नकोच.  वादळांनी एवढं नुकसान झालं की कामाला कोणी माणूस ठेवणंही परवडेना, म्हणून अनेकांनी स्वतः हातात कोयता घेऊन आपल्या बागांची साफसफाई केली.  पण हे सर्व करतांना ना कोणते आंदोलन ना सरकार विरुद्ध घोषणा...कमालीचा संयम आणि त्या लालमातीसारखी चिकट वृत्ती....

पण या वेळेला काही आक्रीतच घडलंय...लाल मातीच्या स्वभावाचा हा माणूस सावरुन सावरुन तरी किती सावरणार...पावसानं त्याला पार धूपून नेलं आहे.  त्याची ती मायमाऊली लाल मातीच त्याच्या जीवावर उठली...काही ठिकाणी ही लाल माती आभाळासारखी कोसळली तर काही ठिकाणची पार धूपून गेलीय.  आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना भरभरुन देणारा हा माणूस आता मोकळ्या


हाताचा झालाय.  भविष्याची काय पण आज आणि उद्याला काय खायचं ही कधी न येणारी विवंचना त्याला सतावतेय.  आता या मंडळींना ख-या मदतीची आशा आहे.  पावसानं धन-धान्य धूवून नेलंय...अनेकांच्या तर घराच्या चार भींतीं कशातरी उभ्या आहेत.  बाकी घरातील सर्व  सामानांचा चोथा झालाय.  त्या साठवलेला पैसा, धान्य, कपडे-लत्ते आणि सरकारी आवश्यक कागदपत्रांचाही समावेश आहे.  हे सर्व कसं भरुन निघणार...ही चिंता लागलीय.  अनेकांची तर घरही जमिनदोस्त झालीत...अनेकांना चिंता लागलीय ती कर्जाची.  कारण सर्व जमिनदोस्त झालं तरी कर्जाच्या वसूलीसाठी येणा-या एजंटाची त्याला आता काळजी पडलीय...या सर्वांतून सावरायला या माणसाला मदत हवी आहे.  पैशाची तर लागणारच...पण त्यासोबत गरज आहे ती आपल्या सर्वांच्या दिलासादायक अस्तित्वाची.  हा माणूस सदैव लढायला तयार असतो.  आत्तापर्यंत निसर्गाचे कितीतरी वार त्यांनी झेलले आहेत.  आत्ताही काही काळासाठी हा माणूस रडेल...भेदरेल..पण त्याला खचू द्यायचं नाही.  यासाठी त्याला आपल्या सर्वांची मदत लागेल.  पण सोशल मिडीयावर शेअर करण्यापूरता बिस्कीटचा पुडा देतांनाचा फोटो काढण्याची मनोवृत्ती असेलेली मदत मात्र देऊन त्याचा अपमान करु नका.  हा माणूस लाल मातीचा रांगडा गडी आहे.  आज पडलाय.  पण उद्या उठेलच...या संकटातही आपल्या देवला गा-हाणं घालून हा माणूस पुन्हा कामाला लागेल....सरकारी मदत मिळो ना मिळो...त्याला मदत करण्यासाठी बाहेर किती राजकारण होईल, पण हा बापुडा देवाक काळजी म्हणत आपल्या

लाल मातीला पुन्हा जवळ करेल...पुन्हा त्याचं अंगण भरुन जाईल.  पाहुण्याचं स्वागत करायला तो सज्ज होईल.  आपल्याकडे आलेल्यांचा पाहुणचार करतांना तो पुन्हा पहिल्या सारखा दिलदार होईल...फक्त ही थोडी वाईट वेळ जायला हवी.  त्यासाठी या कोकणी माणसाला आत्ता एकटं ठेवू नका...मंडळी, मी त्या आमच्याकडे आलेल्या कुटुंबाच्या संपर्कासाठी प्रयत्नशील आहे.  त्यांच्यागावातही पावसानं धूमाकूळ घातला होता.  लाईट गेले.  फोन कट झालेत.  संपर्क झाला की पहिला मदतीचा हात पुढे करणार....असेच अनेक हात पुढे झाले तर येवा कोकण आपलच असा म्हणत हा लाल मातीतला माणूस पुन्हा उभा राहील...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

Post a Comment