सण...समारंभ...मंडळ...आणि तो एक....

 

  सण...समारंभ...मंडळ...आणि तो एक....


ही छोटीशी भेटवस्तू घ्या....आमच्याकडून तुम्हाला खास...आज गोपालकाल्यानिमित्त...ही भेट ठेवा आणि कायम आमची आठवणही ठेवा...असं बोलून समोरच्या महिलेनं, एक नाजूकशी बासरी माझ्या हातात दिली.  नाजूक म्हणजे अगदी करंगळी एवढी...एक मोठा हिरा फक्त सजावटीसाठी लावलेला...त्या छोट्या बासरीला नकळत मी डोक्याला लावून नमस्कार केला...त्या महिलेचे आभार मानले.  तिनेही आभार मानून स्वतःचे कार्ड आमच्या हातात दिले...बासरी पर्समध्ये निट ठेवल्याची मी पुन्हा एकदा खात्री केली आणि त्या महिलेचा निरोप घेतला.  तब्बल चार तास त्या मॉलमध्ये आम्ही घालवले होते...खरेदी करण्यासारखं काहीच नव्हतं...फक्त एक छोटं दुकान दिसलं तिथे आम्ही दोघंही, नवरा-बायको आपणहून थांबलो.  तो नेमका गोपालकाल्याचा दिवस होता.  समोरच बालकृष्णाची छोटी मुर्ती छान दागिन्यांनी सजवली होती.  बालकृष्णाला फेटाही छान घातला होता.  आम्ही दुकनासमोर थांबल्याचे पाहून तो दुकानदार आणि त्याची पत्नी या दोघांनीही आईये....आप खाली देख भी सकते है....आपको पसंद नही आया तो खरीदनेकी जबरदस्ती नही है...आईये तो....म्हणत आम्हाला गळ घातली.  आम्ही दोघंही मॉलमध्ये फक्त वेळ काढण्यासाठी आलो होतो...त्यामुळे अशा


आमंत्रणाचा स्विकार करण्यात आनंद होता....लगेच त्या दोघांनी आमच्याकडे बालकृष्ण आहे का ते विचारले, हिंदीमध्येच...आणि माझ्या नव-यानंही हिंदीचा आधार घेत त्यांच्याबरोबर बोलायला सुरुवात केली.  आमच्या घरातल्या बाळकृष्णाच्या मापाचे कपडे त्या मंडळींनी शेल्फ मधून काढून आमच्यासमोर ठेवायला सुरुवात केली...या वस्तूंची संख्या वाढू लागली, तेव्हा माझी चलबीचल सुरु झाली...नक्की घेणार आहेस का....उगाचच त्यांचा वेळ नको घेऊस...म्हणून मी थेट नव-याला विचारलं...तेव्हा त्यानं फक्त मान हलवली...पण समोरच्या दोघांही विक्रेत्यांनी एकाचवेळी विचारलं,  मराठी का तुम्ही....अरे व्वा...आपण मगासपासून उगाच हिंदीमध्ये बोलतोय...त्यानंतर मात्र आमच्या चौघांमध्ये गप्पांचा चांगला फड जमला....खरेदी झालीच पण मराठी मन...आपले सण...उत्सव आणि सध्याची परिस्थिती यावर नव्यानं मंथन करता आलं...

गोपालकाल्याच्या दिवशी लेकाचा एक पेपर होता.  यावेळी सेंटर आलं ते


बोरीवलीमध्ये...गुगुलबाबांवर त्या कॉलेजचा शोध घेतल्यावर कळलं की सर्वात गर्दीच्या ठिकाणी संबंधित कॉलेज होतं...अत्यंत गैरसोयीचं कॉलेज म्हणून उल्लेख केला होता.  त्यातच दोन दिवस आधी झालेल्या परीक्षेला ठाण्याला पोहोचायला पंधरा मुलांना उशीर झाला आणि त्यांची परीक्षा बुडाल्याची बातमी आली.  दोन्हीही बातम्यांनी घरी टेन्शन वाढलं...त्यात गोपालकाल्याच्या दहिहंडीवरुन रोज होणा-या घोषणा...उगीचच रिक्स कशाला म्हणत आम्ही दुपारी दोन वाजता रिपोर्टींग असलेल्या परीक्षेला सकाळी आठ वाजता घर सोडलं.  साडेबाराला त्या कॉलेज परिसरात पोहचलो....अत्यंत अस्वच्छ परिसर...कसलीही सुविधा नाही...अगदी महिला पालकांना स्वच्छतागृहाची सोयही नव्हती...त्यात पाऊस...परीक्षा केंद्रावर आधी आलेल्या महिला पालकांबरोबर बोलल्यावर एका लांब असलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृहाची माहिती मिळाली...सायंकाळी सहा वाजेपर्यंत पेपर होता,  तोपर्यंत वेळ कसा काढायचा हा प्रश्नही होता...आमच्याआधी आलेल्या पालकांनी एका मॉलचा शोध घेतला...त्यामुळे सर्वांनी त्या मॉलकडे मोर्चा वळवला...

मॉल छोटासा पण कोरोनाचा फटका लागल्यानं अर्धी अधिक दुकानं बंद होती...आश्चर्य म्हणजे जी दुकानं चालू होती त्यातली अर्धी दुकानं रत्न-खडे-ज्योतिषी वर्गातील होती.  जवळपास पंधरा दुकानं....तीन मजल्याच्या मॉलमध्ये या पंधरा दुकानात ब-यापैकी गर्दी होती.  बहुधा कोरोना काळातील मंदिचा फटका दूर कसा करावा याचा सल्ला मागण्यासाठी ही गर्दी झाली असणार...ही दुकानांची संख्या मोजता मोजता आम्ही त्या बाळकृष्ण सजवलेल्या दुकानासमोर थांबलो. 


देवाची लहान मोठी वस्त्र,  मुकुट, फेटे, देव्हा-यात लावतात अशा छोट्या पण सजवलेल्या घंटा,  पितळी दिवे, समया आणि सजवलेल्या अनेक पणत्या....नित्य देवपुजेला वापरतात ते सामान...नवरात्रीला लागतात ते घट...आम्ही त्या दुकानातील कलाकुसर पाहून मोहीत झालो.  जरा वेळ बघितल्यावर त्या दुकानदारांनीच बोलावलं...अनायसे हातात वेळही होता.  आम्ही आत आल्याचे पाहून त्या पती पत्नीनं स्वागत करत काऊंटरवर एक-एक वस्तू काढायला सुरुवात केली.  देखिए...देखनेके पैसे नही....आपने कुछ खरीदा नही तोभी चलेगा...असं सांगत एक-एक वस्तू येऊ लागल्या.  नव-याला देव्हा-यासाठी खरेदी करायला आवडते...त्यामुळे त्यांनी त्यातील वस्तू बाजुला काढल्या...ते पाहून त्यांनी अजून काही वस्तू समोर ठेवल्या....शेवटी मी त्याला विचारलं,  घेणार आहेस का...उगीचच टाईमपास नको करुस...माझं हे रोखठोक मराठी ऐकल्यावर त्या महिलेनं विचारलं...अहो मराठी का तुम्ही...आम्हाला वाटलं मराठी नाही म्हणून हिंदीत बोललो...आम्हीही मराठीच....काही काळजी करु नका...आरामात बघा...खरेदी करु नका...पण बघा नक्की...यातील ब-याच वस्तू आम्ही स्वतः बनवतो...काही वस्तू बाहेरुन आणून त्यांच्यावरची सजावट करतो.  आता या कोरोना काळात ऑनलाईनही या वस्तू विकल्यात....अगदी बाहेरच्या देशातही गेल्यात वस्तू....तुम्ही बघा...आम्हाला सांगा...असं सगळं एकादमात बोलून त्या बाई अक्षरशः पदर खोचून कामाला लागल्या.

मग त्या पती पत्नीनं ते हातानं करत असलेल्या वस्तू वेगळ्या केल्या...आणि


त्यांनी अन्य ठिकाणाहूंन मागवलेल्या वस्तू वेगळ्या केल्या...आणि एक-एक वस्तू, ते बनवण्याची पद्धत,  उपयोग,  किती ठिकाणी किती मागणी...याची माहिती द्यायला सुरुवात केली.  समोर इतक्या सुबक आणि कलाकुसरीच्या वस्तू आल्या की मनात नसतांनाही मी त्या हाताळू लागले.  त्या दिवशी गोपालकाला...अनायसे कृष्णाची खूप छानशी वस्त्र समोर आली, ती घेतली...छोटा फेटा घेतला...लाल मखमलीच्या छोट्या गाद्या देव ठेवण्यासाठी होत्या...त्या घेतल्या...नाजूक नक्षिदार छोट्या बाटल्यांमध्ये चंदनाचे अत्तर होते...ते घेतले...उदबत्या हा तर माझ्या नव-याचा विकपॉईंट...त्यामुळे त्यांची खरेदी झाली.   या सर्वांसोबत गप्पाही झाल्या...साधारण दहा वर्षापूर्वी हे जोडपं बोरीवलीमध्ये रहायला आलं.  त्याआधी त्याचं गिरगांव मध्ये, म्हणजे मुंबईच्या अगदी प्राईम एरीयामध्ये घर होतं.  एका चाळीवजा इमारतीमध्ये त्यांची स्वतःची रुम होती.  दुकानदार म्हणजे राजनजी पक्के मुंबईकर...गणपती, होळी, दहीहंडी, नवरात्र सगळे सण त्यांच्या मंडळांच्या माध्यमातून साजरे करायचे.  आपला पक्ष आपली संस्कृती याबाबत कोणी बोललं तर बोलणा-याची चांगली शाळा घ्यायचे...एकीकडे संसाराच्या जबाबदा-या वाढत होत्या...लग्न...मुलं...याबरोबर घरातील ज्येष्ठांचे आजारपण आले...नोकरी सांभाळून समजसेवा करतांना आता दमछाक व्हायला लागली.  त्यात मुलांच्या शाळा प्रवेशाची तयारी सुरु झाली.  मोठी मुलगी तिसरीला होती...सरकारी शाळेमध्ये जात होती...छोट्या मुलाला मात्र त्यांना इंग्रजी शाळेमध्ये दाखल कारायचे होते.  आसपासच्या शाळेमध्ये चौकशी केली तेव्हा डोनेशन आणि शाळेची फी आपल्या टप्याबाहेर असल्याचे समजलं...धाकट्या भावाच्या शाळेबद्दल ऐकून मोठ्या लेकीनंही मोठ्ठी शाळा हवी म्हणून हट्ट धरला...घरात वाद सुरु झाले...ज्या पक्षासाठी मेहनत घेतली त्यातील मोठ्या

नेत्यांना भेटून झालं...डोनेशन रद्द करु पण दरवर्षाची फी तुला परवडणार आहे का...हा प्रश्न त्याला विचारण्यात आला.  या प्रश्नानं ते भानावर आले.  एवढी वर्ष नोकरी सांभाळून संध्याकाळचा सगळा वेळ पक्षाला आणि मंडळाला दिला होता...तो वाया गेला, म्हणून घरातून बोलणी खायला लागली.  या सगळ्याला कंटाळून राजनच्या पत्नीनं गिरगांवचं घर विकून उपनगरात रहायला जायचा निर्णय घेतला.  गिरगावच्या घरासाठी पैसेही ब-यापैकी येणार होते.  त्यातून बोरीवलीमध्ये घर घेऊन उरलेल्या पैशामध्ये मुलांच्या शिक्षणाची सोय होणार होती...या निर्णयाला पहिल्यांदा विरोध झाला...नव-याच्या मित्रांनी त्याची टवाळी केली...पण पत्नी आपल्या निर्णयावर ठाम राहीली...बोरीवलीमध्ये पहिल्यांदा वनरुमचा फ्लॅट घेतलाच...मुलांची शाळा सुरु झाली...हे घर गिरगांवपासून लांब असलं तरी नव-याच्या फॅक्टरीजवळ होतं...त्यामुळे सायंकाळी तोही लवकर घरी येऊ लागला.   यात राजनच्या पत्नीला जवळच्याच एका लघुउद्यागात काम मिळालं...इथेच ती हे सर्व कलाकुसरीचे काम शिकली...घरी येतांना पत्नी काही काम घरी करायला आणायची....राजनची आई आणि स्वतः राजनही यात मग मदत करु लागले.  पुढे राजनची फॅक्टरी बंद झाली.  तेव्हा पत्नीनं हिम्मत करुन मिळालेल्या पैशामध्ये दुकान घेतलं...हळूहळू एक घडी पुन्हा बसली...हे मॉलमधलं दुसरं दुकान...


आता कोरोना आला...त्यात दुकानं बंद झाली...अनेक जण निराश झाले...पण

राजन आणि त्यांच्या पत्नीनं आधीच एवढं सोसलं आणि लढा दिला होता की या कोरोना काळातही त्यांनी हिम्मत हरली नाही.  दोघांनीही ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याकडील वस्तू विक्रीस काढल्या...वाईटातून काहीतरी चांगले होते ना...तसाच अनुभव या दोघांना आला...परदेशातही वस्तूंना मागणी मिळू लागली...राजनच्या दोन्ही मुलांनी अभ्यास सांभाऴून आई वडीलांना मदत केली...आता दुकानं पुन्हा सुरु झाल्यावर थोड्याप्रमाणात माल दुकानांमध्ये भरून पुन्हा नव्यानं सुरुवात केली आहे....या सर्व गप्पांमध्ये तीन तासांच्या वर वेळ गेला...निघतांना दोघांनीही आपलं कार्ड आणि सुंदर छोटीशी बासरी भेट दिली.  मी निघतांना राजनला विचारलं,  तुम्हाला तुमच्या मंडळाची, पक्षाची आठवण येत नाही का...राजन हसून म्हणाले, जेव्हा मला कळलं मराठी मराठी करत आमच्या नेत्यांची मुलं परदेशी शाळांमध्ये शिकतात...तिथेच माझं सर्व भूत उतरलं होतं...त्यामुळेच दहा वर्षात एवढी प्रगती झाली...नाहीतर अजूनही सतरंज्या उचलण्यातच धन्यता मानली असती...आम्ही दोघांनाही हात जोडून नमस्कार करत निरोप घेतला...

घरी येईपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते...अशावेळी करतात ती साधी खिचडी आणि पोहा पापड जिंदाबाद म्हणत साडे अकरापर्यंत पहिला घास पोटात गेला...जरा निवांत झाल्यावर बातम्या ऐकाव्यात म्हणून टिव्ही लावला...दिवस सरुनही त्या नेहमीसारख्या होत्या....एका नेत्यानं दुस-याला टोला लावला...मग दुस-यानं तिस-याला टोमणा दिला...मग तिस-याच्या कार्यकत्यानं रस्तावर उतरुन आंदोलन केलं...असंच काहीतरी...या टोलवा टोलवीमध्ये अजून किती कार्यकर्ते वाहवत जाणार म्हणत, टीव्ही बंद केला आणि शांतपणे खिचडीवर ताव मारायला सुरुवात केली....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments

Post a Comment