बोली फक्त मेहनतीची....

 

 

   बोली फक्त मेहनतीची....


गेला सर्व आठवडा साखरपुडा, हळद आणि लग्नाचा झाला.  तीन वेगवेगळे समारंभ...तीन वेगवेगळ्या ठिकाणी...आणि तशाच वेगळ्या माणसांच्या संगतीत...आणखी एक म्हणजे गेला आठवडा नवीन माणसांच्या ओळखीचाही ठरला.  पहिला दिवस एका हळदीसमारंभाचा होता...ठाण्याहून परत येतांना रात्र झाली.  कॅब बुक केली...अर्धा तास वेटींग आले...तेवढा वेळ होऊनही कॅब येईना, तेव्हा त्या ड्रायव्हरला फोन करायला सुरुवात केली...उत्तर येईना...आम्ही दोघंही अस्वस्थ झालो...रात्र खूप होत होती...त्यात दुस-या दिवशीही असाच कौटुंबिक सोहळा...त्याची तयारी करायची होती.  त्या अस्वस्थेमध्ये ड्रायव्हरला फोन करायचा सपाटा लावला...एकदाचा त्याचा फोन लागला...अरे मै कबसे आपको फोन कर रहा हूं...इधरही खडा हूं...कहा है आप लोग...म्हणत त्यानंच आम्हाला फैलावर घेतलं...मग माझा आणि नव-याचाही आवाज वाढला...दोन शब्द अधिक आले...एव्हाना रात्रीचे अकरा वाजून गेले होते.  पाच मिनीटं तुझं...माझं...बोलून झालं...शेवटी कळलं की दोघांनाही पर्याय नाही...त्याला कॅबचे बुकींग रद्द करायला सांगितले तर दुसरी कॅब यायला आणखी वेळ जाणार होता...त्या ड्रायव्हरचाही सूर थोडा निवाळला...शेवटी अडला हरी...म्हणत त्या कॅबमध्ये बसलो आणि घराकडे निघालो...पहिले अगदी दहा मिनीटं एकदम चिडीचाप वातावरण...कोणीही बोलत नव्हतं...काही वेळानं त्यानंच सुरुवात केली,  सर ट्रॅफीक क्लिअर है...आप बोलो कहांसे चलू...एव्हाना आमच्याही रागावर थंड वारा सवार झाला होता...नवरा त्याला म्हणला, कहासेभी चलो...पर शांतीसे चलो...नव-याच्या बोलण्यावर तो हसला...रामजीपर भरोसा रखो सर...हम अच्छे है...ये गुस्सा कैसे आया पता नही...असं म्हणत त्यानं समोर ठेवलेल्या रामाच्या फोटोला नमस्कार केला...आत्ता कुठे आम्ही दोघांनी त्याची गाडी निट पाहिली...गाडीच्या प्रत्येक काचेवर रामाचे चित्र होते...रामभक्त हो क्या...आम्ही दोघांनीही त्याला एकदम विचारलं...तेव्हा तो म्हणाला मैं तो राम का गांववाला हू...


अजय नावाचा हा ड्रायव्हर नंतर अर्धा तास एकटाच बोलत होता...आम्ही दोघं फक्त मध्ये मध्ये अच्छा...अरे व्वा...हां...असं बोलून ऐकण्याचं काम करत होतो...अजय आणि त्याचा धाकटा भाऊ सध्या वडाळ्याला रहात होते...हे सर्व कुटुंब अयोध्येचं.  राममंदिरापासून अवघ्या अर्धा तासावर त्यांचे वडीलोपार्जीत घर आहे.  घर मोठं असलं तरी उत्पादनाचं साधन नव्हतं...अजयचे वडील तीस वर्षापूर्वी मुंबईला आले.  त्यांनी कपड्यांचा व्यवसाय सुरु केला.  डोक्यावर पंजाबी सुटचे कपडे आणि साड्या घेऊन ते विकायला लागले.  हाती थोडे पैसे आले तेव्हा त्यांनी पत्नीलाही मुंबईला आणले.  दोघं पती-पत्नी दिवसभर कपडे विकण्याचं काम करायचे.  पुढे मुलं झाली. अजयच्या आईला मुलांना सांभाळत वडीलांना मदत करता येत नव्हती.  तेव्हा हिंमत्तीनं दोघांनी वडाळ्याला एक जागा भाड्यावर घेतली आणि स्वतःचं छोटं दुकान सुरु केलं.  मुलंही वडीलांना मदत करु लागली.  दोन मुलांचं लग्न झालं...गावच्या घराची दुरुस्ती झाली...आणि सोबत गावी थोडी शेतीही खरेदी करता आली...आता धाकट्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरु झाली आणि कोरोना नावाचा आजार आला. 

सगळं बंद झालं.  अजयचं कपड्याचं दुकानही बंद झालं.  वडीलांनी अगदी हजार-दोन हजार रुपये भाड्यावर घेतलेल्या या दुकानाचं भाडं आता तीस हजार रुपयांवर गेलं होतं.  सुरुवातीला काही दिवस बंद राहील असा अंदाज होता...पण दोन महिने गेल्यावर अंदाज आला, हे प्रकरण काही थांबण्यासारखं नाही...हातातलं दुकान सोडलं तरी प्रश्नच होता.  कारण वडाळ्याला पुन्हा असं भाड्याचं दुकान मिळणार नव्हतं.   दोन महिन्यांनी धाकट्या भावानी ऑनलाईन कपडे विक्री करण्यास सुरुवात केली...तरीही भाडं वसूल होत नव्हतं...राखीव पैसे संपत आले.  तेव्हा अजयचा एक भाऊ त्याच्या पत्नीला घेऊन गावी गेला.  खाण्याची दोन तोंड कमी झाली...पण उत्पादनाचं आणखी साधन शोधण्याची गरज होती...अजयला गाडी चालवता येत होती,  त्यानं कॅब ड्रायव्हर म्हणून नोकरी स्विकारली.  कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हाची परिस्थिती भयानक होती.  घरात बसून त्याची तीव्रता जाणवत होती...पण जी मंडळी नोकरीसाठी बाहेर पडत होती,  त्यांना त्याची अधिक झळ बसत होती. 


कॅब ड्रायव्हर म्हणून वेळी अवेळी कधीही फोन यायचा...पत्नी, बायको दोघीही चिंतेत असायच्या...पण उपाय काहीच नव्हता...

इकडे गावी गेलेल्या भावानं शेतीकडे लक्ष दिलं.  संध्याकाळी चहा आणि भजीची गाडी चालू केली. त्यानं ब-यापैकी बस्तान बसल्यावर आई वडीलही तिकडे गावीच गेले...मात्र जातांना अजयला काहीही झालं तरी दुकानाचा ताबा सोडू नकोस म्हणून सांगितलं...लॉकडाऊन कमी झाल्यावर दुकान चालू झालं,  तेव्हा अजयनं पुन्हा सुरत आणि जयपूरवरुन नवीन स्टॉक भरला.  दिवसभर दोघंही भावंडं दुकान सांभाळतात...अजय शक्यतो रात्रपाळीत गाडी चालवतो...आता भावालाही गाडी शिकवली आहे.  तो अगदी पहाटेपासून गाडी चालवायला जातो.  तिकडे गावाकडे भावाचा चहाच्या गाडीवर चांगला जम बसलाय...आता अयोध्येत येणा-या भाविकांची संख्या वाढलीय...शिवाय अनेक ठिकाणी कामही सुरु आहे.  त्यामुळे लोकांची चांगलीच वर्दळ असते...एकूण वडील आणि एक भाऊ गावाला स्थिरावलाय...पण तरीही वडीलांचं पहिलं लक्ष इकडे, मुंबईच्या दुकानाकडे असतं...रोज रात्री ठराविक वेळी ते अजयला फोन करुन सर्व चौकशी करतात...आम्ही जेव्हा कॅब बुक केली होती तेव्हा हा अजय आपल्या वडीलांबरोबरच बोलत होता...त्यांना दिवसभरचा सगळा हिशोब सांगत होता...

अजय बोलत असतानाच आमचं घर आलं.  पैसे देतांना अजय बोलला अयोध्या जाके आओ...बहोत अच्छा है सब...आम्ही त्याला हो सांगून नमस्कार केला.  नव-यानं त्याला आता किती वेळ गाडी चालवणार हे विचारलं...तेव्हा त्यानं पुढचं बुकींग दाखवलं...रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते...अजय आम्हाला हात दाखवून निघून गेला.  आम्ही घरी आलो तरी अजय आणि त्याच्या कुटुंबाची चर्चा करीत होतो.  आमचा दुसरा दिवसही व्यस्त गेला...पुन्हा तिस-या दिवशी लग्न सोहळा...घर सकाळी सातच्या सुमारास सोडावं लागणार होतं....पुन्हा कॅब...मी नव-याला आणि लेकाला पुढे व्हायला सांगितलं...मी पाच मिनिटात येते म्हणाले...तर पुढच्या दोन तीन मिनीटांनी लेकच धावत परत आला...आई...बाबांनी तुला चहा ठेवायला सांगितलाय...चहा...आत्ता...अरे उशीर होईल...मी अजून काही बडबडणार इतक्यात कोणाबरोबर तरी बोलत येणा-या नव-याचा आवाज कानावर आला...तो त्या अजयला घेऊन आला होता...पहाटे त्याला डोंबिवलीतील भाडं आलं होतं...त्यांना सोडून झाल्यावर नेमकं आमचं भाडं त्याला मिळालं...आमच्या सोसायटीच्या खाली गाडी लावून थर्मासमधला चहा पित होता, तितक्यात नवरा माझा खाली गेला...अजयला बघून कोणी खूप ओळखीचा भेटल्याचा आनंद त्याला झाला.  तो थर्मासमधला चही पित होता, हे बघून नवरा त्याला घरचा चहा पिण्यासाठी घेऊन आला...एरवी मला चहा करायला अजीबात आवडत नाही...पण अजयला बघून तो कंटाळा केला नाही.  त्याला चहा आणि बिस्कीट दिलं...त्यानं अगदी संकोचून चहा घेतला.  बिस्कीट खाल्लं...हात जोडून धन्यवाद म्हणाला...त्याच्या पाठोपाठ आम्ही तिघंही गाडीत बसलो...ठाण्याला आम्हाला जायचं होतं...एवढ्या वेळात नव-यानं अजयबरोबर गप्पा सुरु केल्या.  त्याचा भाऊ सूरतला गेला होता...त्यामुळे तो आणखी एखादं भाडं घेऊन दुकानाकडे परतणार होता...दिवसभर दुकान सांभाळायचं होतं.  कितना काम करते हो...कभी आराम करनेका मन नही करता...त्यावर अजय म्हणाला मेहनत करनेसे थोडी कंटाला आता है...आप


नही गांव जाने का सोचते हो...अभी उधर अच्छा हो रहा है ना...नव-याच्या या प्रश्नावर अजय हसला...सर, मरे सोच में तो जहा अपना गुजारा होता है, वही अपना गांव है...ऐसे तो पुरा जगही अपना गांव जैसा है...मेहनत करो, और रामपर भरोसा रखो...अजय हसत बोलत होता...आणि ते खरंही होतं...

रविवारची सकाळ...रस्त्यावर फार वाहतूक नव्हती....अवघ्या पंचेचाळीस मिनिटात अजयनं आम्हाला हॉल पर्यंत पोहचवलं...नवरा त्याला गुगलपे द्वारे पैसे देत होता...तोपर्यंत त्यानं एक कार्ड काढलं आणि माझ्या हातात दिलं...त्याच्या दुकानाचं कार्ड होतं...भाभी अपनी दुकान है...आप कभीभी आओ...अच्छी कॉलिटीका कपडा है...आप घरकी दुकान समजके आओ...रामजीकी कृपा रहेगी...दुबारा जरुरु मिलेंगे...असं बोलून नमस्कार करुन अजय निघून गेला...

मी त्यानं दिलेलं कार्ड जपून बॅगमध्ये ठेवलं...लेकानं आणि नव-यानं नेमकी माझी ही कृती बारकाईनं बघितली...लेकानं सूचकपणे नव-याकडे बघितलं...तुमचा चहा वाया जाणार बाबा...म्हणत दोघांनीही टाळ्या दिल्या...मी दोघांकडे दुर्लक्ष केलं...मला तो अजय आवडला...प्रांत, भाषा या सीमा ओलांडून मेहनतीची बोली बोलणारा....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. छान ओघवती भाषा, आपणही लगेच कनेक्ट होतो

    ReplyDelete

Post a Comment