देशभक्ती आणि आम्ही....

 

   देशभक्ती आणि आम्ही....



पांढरा शुभ्र शर्ट आणि त्याच पांढ-या रंगाच्या कापडाची पॅन्ट...चेह-यावर पांढराच मास्क...माझ्या घरात आलेल्या इलेक्ट्रिशयनकडे बघत होते.  प्रजासत्ताक दिन होता त्या दिवशीची ही घटना...सक्काळ सक्काळी वॉटर क्युरिफायरची गडबड सुरु झाली.  त्याचा निळा दिवा सारखा बाकबुक करत होता...जमेल तेवढी खटपट केली...पण ते काही चालू होईना...शेवटी स्विचमध्ये प्रॉब्लेम असल्याचा अंदाज आला...नव-यानं लगेच नेहमीच्या इलेक्ट्रिशयनला फोन केला...तो साधारण तासाभरात हजर झाला, तो असा पांढ-या शुभ्र कपड्यात...शेवटी मी उत्सुकतेनं विचारलं, ये आज के दिन का स्पेशल कपडा है क्या...त्यावर तो हसून म्हणाला,  हा ना...मै तो सुबह ही होके आया...होके आया...कहांसे...मी परत विचारलं...अरे भाभी सुबह स्कूल गया था...झंडा लहराया...वहासें घर आ रहा था...तभी आपका फोन आया, तो इधर चला आया...मी क्षणभर त्याच्याकडे बघत राहीले...टिव्हीवर दिल्लीच्या राजपथावर होत असलेल्या परेडचं लाईव्ह चालू होतं...त्यावर अधूनमधून नजर टाकत तो काम करीत होता...मध्येच म्हणाला, मै दोन दिन ये कपडा पेहनता हू...15 ऑगस्ट और आज का दिन...मी यावर काय बोलणार...नेहमी देश प्रथम...आपला देश महान...या विचारात असते...पण तरीही मला माझ्यातली एक उणीव जाणवली...

प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी योगाच्या ग्रुपवर मेसेज होता...उद्या योगाला सुट्टी...इथे थंडी मी म्हणतेय...पण या सर्वात योगाचा नेम चुकवत नाही....त्यामुळे सकाळी सव्वापाचची वेळ ठरलेली.  आत्ता सुट्टी म्हणून थोडी जास्त झोप काढता येणार होती.  त्यात लेकाला आणि नव-यालाही सुट्टी...काही पाहुणे संध्याकाळी जेवायला येणार होते...त्यामुळे सकाळी आरामात उठून साधसं जेवण....आणि संध्याकाळी पाहुण्यांसाठी नॉनव्हेजचा बेत ठरला.  साडेसात-आठला आरामात उठणं झालं...अर्धा एक तास योगा...आणि मग आरामात नाष्टा...नाष्टा करत करत हा वॉटर क्युरिफायरचा प्रश्न आला आणि इलेक्ट्रीशयनला बोलवयला लागलं.  तो येईपर्यंत सगळा


सुट्टीचा मुड होता.  टिव्हीवर दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाची परेड चालू होती...ती बघता बघता काम चालू होतं....तेवढ्यात इलेक्ट्रीशयन आला आणि नवीन धडा देऊन गेला. 

हा इलेक्ट्रीशयन आमच्या ओळखीचा...गेली काही वर्ष घरातील छोट्या मोठ्या कामासाठी एक फोन केला की हजर व्हायचा.  एक छोटसं दुकान होतं...कोरोनाच्या काळात भाडं परवडत नाही म्हणून हे दुकान सोडायची वेळ त्याच्यावर आली.  नशीबानं मुलगा तेव्हाच पदवीधर झाला आणि त्याला नोकरी मिळाली.  दोन मुलं आणि नवरा बायको असं चौकोनी कुटुंब असलं तरी कोरोनाचा फटका बसला होता.  दुकान बंद झालं.  फक्त ओळखीचे लोक फोन करायचे तेव्हा घरोघरी जाऊन काम करत होता...बाकी सर्व मुलाच्या पगारावर अवलंबून...शेवटी दोन्ही मुलांना इथेच ठेऊन दोघं नवराबायको गावाला गेले.  गाव गुजराथमध्ये.  तिथे मोठा भाऊ आणि त्याचं कुटुंब.  शेती आणि दुधाचा व्यवसाय.  भावाला त्याच्या कामात मदत केली.  शेतीची कामं केली.  सोबतीला गावातही काही इलेक्ट्रीकची कामं करायला मिळाली.  जवळपास वर्ष गावाला काढलं.  इथे दोन्ही मुलांनी घर सांभाळलं.  आत्ता धाकट्या मुलाच्या कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे.  त्यात मोठ्या मुलाला आठवड्यात दोन दिवस ऑफीसला जावे लागते.  त्याच्या डब्याचा प्रश्न आला.  त्यामुळे दोघंही नवरा बायको परत आले.  गावाहून येतांना सहा महिन्याचं धान्य घेऊन आलेत.  दरवर्षी मोठा भाऊ धान्य देतो...यावर्षी जरा जास्त वाटा मिळालाय.  थोडे पैसेही आणलेत...त्यामुळे पुन्हा एकदा दुकान भाड्यानं घेऊन दुकान चालू करायचे प्रयत्न सुरु केले त्या प्रयत्नांना यश मिळालं आणि दुकान चालूही झालं.  कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात विस्कटलेली घराची घडी आता सुरुळीत होऊ लागली.  मद्दा आला या सफेद कपड्यांचा.  हे सफेद कपडे म्हणजे या माणसाच्या गावची ओळख.  त्यांच्या गावाला म्हणे कपडे शिवायचे मशीन घेऊन शिंपी घरोघरी जातो.  साधारण सहा महिन्यांनी एका घराची फेरी करतो.  एक अख्खा दिवस किंवा दुसरा दिवस थांबून तो घरातील सर्वांचे कपडे शिऊन देतो.  महिला आणि पुरुषांचे कपडे शिवले की त्याला धान्य आणि पैसे देण्यात येतात.  तिथे कपडे म्हणजे सफेद.  दरवर्षी भाऊ एक असा पांढरा पोशाख याला इथं पाठवून द्यायचा.  पण यावर्षी गावीच असल्यानं हे असे पांढरे कपडे तिथेच समोरा समोर शिऊन घेतले.  सोबत आता तो शिंपी मास्कही बनवून देतो.  तसे


पांढरे मास्कही झाले.  गावात पहिल्यापासून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ग्रामपंचायत कार्यालय किंवा प्राथमिक शाळेत जाण्याची परंपरा आहे.  या दोन्ही दिवशी सणासारख्या घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात.  घरात गोडधोड होतं...ही गावची परंपरा आणि संस्कार आपण ज्या भागात रहातो तिथंही पाळण्याचा प्रयत्न असतो.  त्यामुळे या माणसांनी आत्तापर्यंत एकही 15 ऑगस्ट किंव 26 जानेवारी चुकवलं नाही.  मुलांसोबत त्यांच्या शाळेत जाऊन झेंडा वंदन केले आहे, आणि झेंड्याला कडक सॅल्यूट ठोकला आहे.  आत्ता तो सोबत दोन मुलांनाही घेऊन जातो...गावका वसूल है...म्हणत मुलांनाही आपल्या गावच्या परंपरेचा वारसा दिला आहे.

तो सर्व सांगत होता, एकीकडे काम करत होता...मी मात्र एखादी कथा ऐकावी असं ऐकत होते.  26 जानेवारीला सुट्टी मिळाली म्हणून खूष होते.  त्यादिवशी आराम करता येईल, म्हणून आनंदात होते.  देशाबद्दल मलाही अभिमान आहे,  पण त्याचा मान ठेवायच्या मार्गावर मात्र अजूनही चाचपडत आहे, हे स्पष्ट झाले.  तो माणूस त्याचं काम करुन निघून गेला.  15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला दिवसभर स्वातंत्र्याची गाणी ऐकायची आणि टिव्हीवर बॉर्डर, लक्ष, उरी, एओसी सारखे चित्रपट बघायचे की झाले.  आणि शनिवार-रविवारला जोडून जर हे दोन दिवस आले तर...तर सोने पे सुहागा....सरळ तीन दिवसांच्या पिकनीकला रवाना व्हायचे....हे इथपर्यंत देशाबद्दलचे प्रेम येऊन थांबते.  मला कुठेतरी त्या माणसाचा हेवा वाटला.  त्याचे देशाचे प्रेम या सर्वांवर होते.  त्यांनी घातलेल्या पांढ-या कापड्यांसारखे निर्मळ...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. छान.. कशी आहेस?

    ReplyDelete
  2. अतिशय वास्तववादी लेख!! हल्लीच्या पिढीला तर २६ जानेवारी आणि १५ आॅगस्ट मधला फरकसुध्दा माहित नाही.. फक्त सुट्टी येवढं त्यादिवसाचं महत्व उरलंय!!

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना...अशावेळी गावातील मराठी शाळांचा आदर्श घ्यावा वाटतो....

      Delete
  3. खूप छान! एका आदर्श गावातील आदर्श कुटुंबाची कथा खूपच प्रेरणादायी आहे. 👍👍🙏🏻💐

    ReplyDelete

Post a Comment