बॅगांच्या ओझ्यापलीकडचा माणूस....

 

  बॅगांच्या ओझ्यापलीकडचा माणूस....


एक...दोन...तीन...ऩऊ...दहा....अकरा.....बारा....बारा, आहेत बारा....नवरा वारंवार आमच्या बॅग मोजत होता,  आणि मला तो बाराचा अकडा सांगत होता...लेकाला त्याच्या कॉलेजमध्ये सोडायचे होते...त्याची तयारी...आणि त्यातून तयार झालेल्या बॅगा...निघण्याच्या दिवशी....अगदी गाडी दारात आल्यावर शेवटचा प्रयत्न म्हणून नव-यानं बॅगांचा आकडा माहीत असूनही मोठ्यानं मोजून मला सांगण्याचा प्रयत्न केला...अकडा बाराचाच होता...तोच आला...कानावर पडला म्हणून मी ऐकलं...आणि त्याकडे दुर्लक्ष करीत बॅगा घराबाहेर काढायला सुरुवात केली.  नाईलाजानं नवराही बॅगा गाडीत भरायला लागला.  अर्थात प्रश्न माझ्यासमोरही होता.  आम्ही माणसं तीन आणि माझी हातातली फुगलेली हॅडबॅग पकडून बारा मोठ्या मोठ्या बॅगा आमच्यासोबत झाल्या होत्या.  कॉलेज असलेल्या शहरात जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास निवडला होता.  रिझर्वेशन झाले होते...पण प्रश्न या बॅगांचा होता.  त्या ठेवायच्या कुठे हा मोठा प्रश्न मलाही सतावत होता.  शेवटी लेकाबरोबर गुपचूप बोलून वरच्या रॅकवर झोपण्याऐवजी बॅगा ठेवायच्या आणि एका सिटवर मी आणि लेकानं अँडजेस्ट व्हायचं...असं ठरलं होतं..बरं बॅगांचा आकारही नको तेवढा फुगला होता...त्यामुळे त्या उचलण्याचा मोठा टास्कही होताच...स्टेशनवर पोहचलो...कशातरी त्या बॅगा गाडीच्या बोगी जवळ पोहचवल्या...बरोबर अर्धा तासानं गाडी आली...आणि आमचा टास्क सुरु झाला.  बॅगा कशातरी चढवल्या...सीट खाली फक्त चार बॅगा बसल्या.  बाकी आठ बॅगा सीटवर ठेवल्या आणि आम्ही उभं राहून त्याकडे बघू लागलो.  आमच्या समोरच्या सीटखालची जागा खाली होती,  तिथे ठेऊया मग कोणी आल्यावर त्या काढू असं सुचवून बघितलं...तर नवरा आणि मुलगा दोघंही नकारावर ठाम राहीले. 


तितक्यात आमच्या समोरच्या सीटवर बसण्यासाठी एक माणूस आला...त्याच्या हातात फक्त एक सॅक...पाठीला लावतात तशी...अगदी खाली....त्यानं आमच्या पसा-यावर नजर टाकली आणि आपली सॅक वरच्या हूकला लावली...इथर मेरे सिट के निचे रखो...सामने रखो...मेरा कुछ सामान नही है...मुझे कुछ नही लगेगा...रखो रखो आरामसे...असं म्हणत आमच्या आधी तो स्वतः कामाला लागला...

लेकाच्या कॉलेजचा जाण्याचा दिवस नक्की झाला,  आणि आमच्या घरातील एक खोली सामानानं भरुन गेली.  पहिल्यांदा जे- जे आवश्यक वाटेल, ते फक्त घेऊन त्या रुममध्ये डम करण्यास सुरुवात झाली.  लेक जाणार म्हणून नातेवाईक आणि मैत्रिणी घरी येऊन गेल्या.   येतांना सोबत भेटीही आल्या...त्याही त्या खोलीमध्ये गेल्या.  खाऊचे डबे,  पुस्तकं, कपडे,  चादरी,  अन्य आवश्यक वस्तू....असं करता करता संपूर्ण खोलीच भरल्यावर आम्ही जरा धास्ती घेतली.  हे सामान भरपूर होणार,  जातांना त्रास होईल...तीन माणसं एवढं सामान उचलू शकतील का...यावर चर्चा सुरु झाली.  मग त्यातील कुठले सामान कमी करता येईल यावर चर्चा सुरु झाली.  अर्थात यामध्ये नवरा आणि मुलाचाच सहभाग...मी यातील कुठलेही सामान कमी करणार नाही, यावर पहिल्यापासून ठाम राहिले.  मुलांनं माझा निर्धार पाहून मला सांगण्याचा प्रयत्न सोडला.  पण नवरा चिकाटीनं सांगत राहीला...सामान कमी करुया आपण तिथे जाऊन खरेदी करुया असं सुचवत होता.  पण नवीन शहर..तिथे दुकानं शोधत रहाण्यापेक्षा आपण आपल्याकडून वस्तू घेऊनच जाऊया म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहिले. 


निघण्याच्या आधी दोन दिवस घरातील सर्व रिकाम्या बॅगा बाहेर निघाल्या आणि सामान भरण्याची सुरुवात झाली.  बरोबर नऊ बॅगा सामानाच्या झाल्या.  एक बॅग ट्रेनमध्ये लागणा-या सामानाची आणि ट्रेनमधील खाऊची...अकरावी बॅग लेकाच्या खाऊच्या डब्यांची...आणि बारावी महत्त्वाची बॅग माझी खांद्याला असणारी मोठी बॅग...ती सुद्धा अगदी पॅक झालेली.  या बारा बॅगांचा आकडा बघून पहिल्या दिवसापासूनच नवरा तो बाराचा अकडा घेऊन बसला...मलाही काळजी पडली होती...पण त्या काळजीला लेकाच्या विरहाच्या दुःखात बूडवून मी वेगळ्याच विचारात होते...

निघण्याच्या दिवशी नव-यानं पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न केला.  दोन बॅगा कमी करण्याचा प्रयत्न केला.  पण मी जोरदार विरोध केला.  आवडतं हत्यारं...डोळ्यात पाणीही आलं...नव-यानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि माझी मागणी मान्य केली.  ट्रेनमध्ये या बारा बॅंगांसह चढल्यावर मलाही थोडं टेन्शन आलं पण तोच समोरच्या सीटवर बसलेल्या माणिकलाल नावाच्या माणसानं सर्व टेन्शन दूर केलंच...पण आयुष्य कसं जगावं...याचा एक पाठही त्यांनी या सोळा तासांच्या प्रवासात दिला.

हे माणिकलाल मूळ जयपूरच्या एका गावातील.  त्यांची ब-यापैकी शेतजमीन आहे.  गव्हाचं आणि सोबतीला काही भाजीपाल्याचं उत्पादन ते करतात.  एकत्र कुटुंब पद्धती.  राजस्थानमधील वातावरण....पाण्याची कमतरता...या सर्वांवर मात करत शक्यतो बारा महीने कसलं ना कसलं उत्पादन हे माणिकलाल शेतीत घेतात.  त्यांची दोन मुलं...दहावीनंतर या दोन्ही मुलांनी नेव्हीमध्ये जाण्याचे नक्की केले.  दिवसभर कॉलेज, मग वडीलांना मदत आणि संध्याकाळी नेव्ही प्रवेशासाठी आवश्यक शारीरिक प्रशिक्षण...मुलांनी दोन वर्ष स्वतःच्या जोरावर हे शिक्षण केलं.  त्यासाठी कुठलाही क्लास नाही.  युट्यूबवरुन बघून मुलांनी सर्व तयारी केली.  त्यांची प्राथमिक परीक्षा झाली.  पास झाले.  मग पुढच्या टप्प्यात गेले.  तिथेही उत्तीर्ण झाले.  आता त्यांची इंडीयन नेव्हीमध्ये निवड झाली आहे.  दोघंही मुलं एकमद प्रशिक्षणासाठी रवाना झाली.  रायगड जिल्ह्यात त्या मुलांचे प्रशिक्षण केंद्र होते.  तिथे ठराविक तारखेपर्यंत हजर राहण्याची नोटीस आली.  हे ठिकाण काही त्यांना गुगलवर आले नाही.  त्यामुळे दोन मुलांना सोडण्यासाठी माणिकलाल मुंबईत आले.  पहिल्यांदाच तेही मुंबईत आले.  मुंबईहून थेट मुलांच्या प्रशिक्षण केंद्रावर टॅक्सी करुन गेले.  तिथे मुलांना सोडून आमच्या समोर बसले


होते....परतीच्या प्रवासाठी...मी तर पहिल्यांदा भारावून गेले.  दोन्हीही मुलं एकदम नेव्हीमध्ये...त्यांचं मी अभिनंदन केलं.  त्यांच्या घरात सर्व शेतकरी.  आता मुलं एकदम वेगळ्या मार्गाला गेली.  त्यांना विचारलं दोघंही एकदम दूर जाणार...घर खाली खाली नाही का वाटणार...मी मला सतावणारा प्रश्न त्याला विचारला होता...त्यावर माणिकलाल एकदम शांतपणे म्हणाले...देखो बहनजी, हमारी खेती है...पर अब पुरा खर्चा उसपर नही निकलता...मेरा एक भाई रिक्षा चलाता है...और मै भी कभी टाईम मिले तो दुसरे काम करता हू....बच्चे ये सब पसंत नही करते...इधर उधर काम करनेसे बेहतर है...देश का काम करे....और बीस पच्चीस साल मै वापस आयेंगे...घर की खेती हैही...वो वापस आयेंगे तो उसे सभांलेंगे....तबतक हम है ही...और वीस साल तो ऐसे ऐसे निकल जायेंगे.....त्याच्या उत्तरावर मी आ करुन बघत बसले...इथे माझं लेकरु चार वर्षासाठी दूर रहाणार होतं...मी तर रडून...हुंदके देऊन कितीतरी दिवस गोंधळ घातला होता...त्या माणिकलाल बरोबर बोलतांनाही डोळे पाणावत होते...तशाच डोळ्यांनी त्यांना विचारलं...और आपका सामान कहा है...बच्चो को कितना सामान दिया...त्यावरही माणिकलालचं उत्तर मला गप्प करणारं...हमारे बच्चो को जो थाली में खाना मिले वो खाने का आदत है...और बाकी क्या लगता है...कपडेका एक बॅग हुआ...दोनो के एक-एक बॅग...और मेरा एक बॅग होगया...या माणिकलालच्या उत्तरावर मी पुन्हा आ करुन...नव-यानं हसत हसत आमच्या लेकाच्या कॉलेजबद्दल सांगितले...आणि आमचे सामान...बारा बॅगा पुन्हा एकदा त्याला दाखवले...माणिकलाल नुसते हसले...आमच्या लेकाचे कॉलेज त्यांच्या गावाच्या आसपास होते...चांगले असल्याचा त्यांनी अभिप्राय दिला.  हा माणूस एवढा आटोपशीर होता की सायंकाळी सातची ट्रेन पकडायच्या आधी तो जेवण करुनच आला होता...आम्ही रात्री साडेनऊनंतर जेवणाचे डबे उघडले.  तेव्हा आमच्या समोरच्या दोन सिटही भरल्या...त्यांच्याकडेही एकच बॅग...त्यामुळे आमच्या सर्व बॅंगांनी खालची जागा पकडली.  आम्ही माणिकलाल यांना जेवायचे विचारले...पण त्यांनी नकार देत आम्हाला ते बसलेली समोरची जागाही दिली आणि आरामात जेवायचा सल्ला दिला.  रात्री साडेदहावाजता त्यांनी झोपायची तयारी केली...म्हणजे त्यांची ती सॅक डोक्याखाली उशी म्हणून घेतली...आणि लाईट बंद करा...आवाज कमी करा..अशा कुठल्याही सूचना न देता डोळ्यावर हात ठेऊन झोपीही गेले.  सकाळी थेट सात वाजता उठले...चहा पिऊन लगेच निघण्याच्या तयारीत बसलेही...तोपर्यंत आम्ही दोन स्टेशनवर चहा-कॉफी-कचोरी-पोहा खाऊन पोटपुजा चालू केली होती...माणिकलाल यांनी या सर्वाला,

घरपे खाना तयार होगा म्हणत नकार दिला.  साडेअकराच्या सुरमारास आमचे स्टेशन आले.  माणिकलाल यांनी न सांगताही आमच्या दोन बॅगा उचलल्या,  खाली उतरुन सामान उचलण्यासाठी असणारे मदतनीस शोधले.  आमची ओळख करुन देत हात जोडले...मिलेंगे...चिंता मत करो..सब अच्छे है....अच्छाही होगा...म्हणत आमचा निरोप घेतला...हातात काही नाही...पाठीवर मोजकं सामान असलेल्या सॅकचे ओझे..बस्स...बाकी भरपूर अनुभव...आणि चांगले विचार असलेल्या माणसाला आम्हीही हात जोडून निरोप दिला....आणि आमच्या बारा बॅगांच्या हिशोबात गुंतलो...

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. वा खरच आपल्या आजूबाजूची माणसं किती साध्या पद्धतीने सरळ सोपी जीवनशैली करून जगतात आणि नाही तर आपण किती तरी अधिक गोष्टीचा विचार करतो

    ReplyDelete
    Replies
    1. खरच आहे. आपण गरजा वाढवतो, आणि त्यातून आपल्या भोवती अनेक वस्तूंची गर्दी वाढते...

      Delete
  2. मला लेखाचं शीर्षक फार आवडलं!! आपण सर्वजण अपेक्षांची ओझी घेऊन फिरत असतो पण त्याबरोबरच माणूसपण जपणं पण गरजेचं असतं. एक साधासुधा पण सुंदर लेख!!

    ReplyDelete

Post a Comment