5जी विचारांची चौकट ओलांडलेली पिढी....

 

 5जी विचारांची चौकट ओलांडलेली पिढी....




अरे सॉलिड त्रास होतोय...सकाळपासून नुसती बसून आहे...लोळतेय...पण पोटातलं काही थांबत नाही...ए...तू गप्प बस्स तुला काय कळंतय...मुलींना काय त्रास होतो ते...हां...हां...मला माहितेय...माझ्याही बहिणीला होतो...त्या दिवसांत नुसती दादागिरी करते...आणि तुझ्यासारखीच लोळत बसते...माझ्यापुढेच दोन मुलं आणि दोन मुली चालत होत्या...त्यांच्यातला संवाद मला चांगला ऐकायला येत होता...एवढंच अंतर होतं...एरवी कुणाच्याही गप्पा ऐकण्यात स्वारस्य नसते...पण या तरुण पिढीचा संवाद कानावर पडला आणि कौतुकानं तो ऐकण्याची उत्सुकता वाढत गेली.  माझं घर येईपर्यंत मी या चौघांच्या मागे-मागे चालत होते...त्यांचा संवाद ऐकत होते...माझं घर आलं...आणि मी सोसायटीच्या दारकडे वळले...आणि ती चौघंही तशीच पुढे निघून गेली...हातावर टाळ्या देत...मोकळा संवाद साधत..मी मागे वळून वळून पहात होते...आणि मनात त्या चौघांनी आणि त्यांच्या पालकांना विशेषतः आईला सलाम करीत होते...कारण ही चौघंही मासिक पाळी आणि त्यावेळी मुलींना होणा-या वेदना याबद्दल बोलत होते...विशेषतः यातील दोन मुलं आपल्या मैत्रिणींना समजून घेत होती...बदलत्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणा-या या मुलांचे म्हणूनच मला कौतुक वाटले. 

भर दुपारी....म्हणजे दोन वाजता, बॅंकेच्या कामानिमित्त मी घराबाहेर पडले होते...एक तासात काम आटोपले...तीन वाजता घराकडे परतीचा रस्ता पकडला...नेहमीप्रमाणे अगदी किरकोळ खरेदी करायची होती...त्यामुळे ओढणीचा पुरेपुर वापर करत सर्व चेहरा झाकून घेतला आणि चालायला सुरुवात केली.  आमच्या घराच्या जवळ आले आणि थोडा श्वास घेतला...कारण दोन्ही बाजुला असलेल्या झाडांनी ब-यापैकी सावली होती.  याच सावलीच्या आधारानं ही चार मुलं चालत होती.  त्यांचे हास्यविनोद चालले होते...चौघंही एकमेकांच्या हातावर टाळ्या देत होती...त्यातला एका मुलीला मासिक पाळी आली होती...त्याचा त्रास होत होता...कॉलेजला असणा-या या मुलांच्या परीक्षाही चालू होत्या.  त्यातच पाळीचा त्रास होत असल्यानं ही मुलगी घरी लोळत पडली होती...अभ्यासात मन लागत नव्हतं...बहुधा मोबाईल चाटींगच्या माध्यमातून तिच्या मित्रमंडळींना हे कळलं...लगेच तिचे मित्र तिच्या घरी दाखल झाले...आणि तिला घराबाहेर काढलं...आता हे चौघंही आईस्क्रीम खायला जात होते...आईस्क्रीम खाण्याचं निमित्त होतं...त्यामुळे आपल्या मैत्रिणीला थोडं बर वाटेल अशीच त्यामागे भावना होती...विशेष म्हणजे यात दोघं मुलं होती...आणि ती मुलगीही कुठलाही संकोच न ठेवता त्यांच्यापुढे मासिक पाळीच्या दरम्यान होणा-या वेदना...मानसिक त्रास याबाबत सांगत होती...कौतुक म्हणजे ही मुलंही आपल्या मैत्रिणीला होणारा त्रास तेवढ्याच हळव्या मनानं ऐकत होती...आणि आम्हालाही तुझी वेदना समजते...आमच्याही घरात बहिण आहे...अर्थात स्त्री आहे...असा भरवसा देत होती...तिचं तिच्या वेदनांवरुन लक्ष दूर करण्यासाठी तिला अन्य विषयांवर प्रश्न विचारत होते...कॉलेजबाबत चर्चा करीत होते...एकूण या मुलीला हसवण्याचा प्रयत्न करत होते...एरवी चालतांना माझा स्पिड खूप चांगला असतो...अगदी तरातरा...या शब्दाला चपखल बसेल असाच...पण या चार जणांच्या मागे चालतांना मात्र मी माझ्या स्पिडला आवर घातला...ऐ माझ्याही बहिणीला पिरेड येतात...ती सुद्धा तुझ्यासारखीच रडते...आणि मी तिला आराम कसा पडेल याची काळजी घेतो...या वाक्यानं माझ्या स्पिडला आवर घातला...मी कुठलीही तमा न बाळगता, या चौघांच्या मागे-मागे चालत राहिले...त्यांच्या गप्पा ऐकत राहिले...या चौघांच्या मैत्रीतलं बॉण्डींग बघून मला माझ्या मित्रपरिवाराची आठवण येत होती...आणि दुसरं म्हणजे त्यांच्या परिपक्व विचारांची मोहीनीच मला पडली होती.

त्यांच्या गप्पा ऐकत मी माझं घर गाठलं…सुरुवातीला भर दुपारी घराबाहेर पडायला लागलं म्हणून माझ्यावरच चरफडत होते...पण येतांना हा नव्या पिढीच्या विचारांचा सुखद गारवा सोबत भेटला.  बरं वाटलं...दर महिन्याला महिलांना ठराविक दिवसात रक्तस्त्रांव होतो...त्याला पाळी का म्हणतात...हा प्रश्न मला सुरुवातीला पडायचा...त्यावेळी असे वात्रट प्रकारात गणती होणारे प्रश्न विचारायची सोय नव्हती...त्यामुळे मीच माझे उत्तर शोधले होते...दर महिन्याला येते...आणि ठराविक दिवसात येते...म्हणून ती पाळी...ते काहीही असो...पण नंतर नंतर पाळी ते अगदी ती कटकट आलीय...म्हणण्यापर्यंत मजल गेली होती...आता वयानं पंचेचाळीशी ओलांडल्यावर या मासिक धर्माचे महत्त्व कळायला लागले.  महिलांचे आरोग्य आणि हा मासिक धर्म यांचे अतुट नाते आहे.  उलट या कटकटीच्या दिवसातच आरोग्याची गुरुकिल्ली दडल्याची जाणीव झालीय...पण तरीही या तीन दिवसांत शारीरिक वेदना...त्यामुळे होत असलेली मानसिक कोंडी...यांची फारशी कधी मोकळीक करता आली नाही.  पुढे नवरा आणि आता लेक या बाबतीत समजून घेऊ लागला...ब-याचवेळा मीच स्पष्ट करते, मला पिरेड आलेत...त्रास होतोय...त्यामुळे दोघंही काळजी घेतात...विशेषकरुन लेक...त्याकडेच बघून जाणवतं की नवी पिढी अधिक स्पष्ट विचारांची आहे...कुठलाही किंतू ठेवण्या आगोदर त्याचा शास्त्रीय विचार करणारी ही पिढी आहे. 

ब-याचवेळा नवीन पिढीला नावं ठेवली जातात...त्यांच्या वागण्यावरुन...भाषेवरुन...विचारांवरुनही...पण यापलीकडेही ही पिढी आहे.  खरंतर प्रत्येक पिढीला एक स्टॅम्पपेपरवरील वाक्य ऐकावे लागते...आत्ताच्या पिढीचं काही खरं नाही...हे वाक्य एवढं कॉमन आहे की, मी कॉलेजमध्ये असतांना सुद्धा ते ऐकलं होतं....कदाचित माझ्या आईनंही ते ऐकलं असणार...पण यासोबत तरुण पिढी म्हणजे विचारांचे...आचाराचे...आणि तंत्रज्ञानाचे...एक मोठा स्त्रोत आहे...आणि कायम रहाणार आहे.  फक्त हे मान्य करुन तसं वागायला लागतं...तुला काय कळतं हे वाक्य मी सुद्धा लेकासमोर बोलले असेन...पण मोबाईल किंवा संगणक काम करेनासा झाला की त्याच्याच हाती कमान द्यावी लागायची...तेव्हा तो न कुरकुरता सर्व पूर्ववत करुन परत माझ्या हाती द्यायचा...थोडे पेशन्स ठेव...हे त्याचे प्रमाण वाक्य...मुळात आपल्यापेक्षा त्यांना अधिक माहिती आहे, हे मान्यही करायला हवे.  आमच्याघरात असे अनेक प्रसंग झाले आहेत, की ज्यात मी लेकाला सॉरी म्हटलं आहे.  आणि यातूनच आमच्यातला संवाद हा कायम राहीलाय...आता या मुलांमध्ये थोड्यावेळ रमल्यावर हेच जाणले...की ही नवी पिढी खूप समजदार आणि मोकळ्या स्वभावाची आहे.  फक्त त्यांचा हा वैचारिक मोकळेपणा जाणण्याची आणि त्याचा आदर करण्याची गरज आहे.

सध्या मोबाईल कोणता वापरतो याची चर्चा होते....5जी...6जी...परदेशात किती वेळा गेलात...युरोप ट्रीप केलीत का...घराचं इंटेरिअर कसं केलंय...या चर्चापेक्षा आपल्या विचारांचे आधुनिकीकरण करण्याची गरज वाटते...पाळी...म्हटलं तर तो बायकांचा विषय...म्हणून टाळणारे अधिक आहेत...पण पाळी म्हणजे आपल्या बहिणीच्या, आईच्या, पत्नीच्या आणि कुटुंबातल्या प्रत्येक स्त्रीच्या आरोग्याचा विषय आहे.  आणि तो तिच्याइतकचा आपल्यालाही माहिती असायला हवा...असा विचार करणारे पुरुष प्रत्येक घरात किती आहेत....निदान या तरुणांच्या गप्पा ऐकल्यावर तरी थोडी आशा वाटायला लागलीय...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. खुप संवेदनाशील लेख

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...

      Delete
    2. नवीन पिढी खूप वेळा जबाबदारीने वागते, बोलते,समजून घेते,हा बदल निश्चित चांगला आहे. आपणही या विषयावर सुंदर लेख लिहिला आहे. अभिनंदन.

      Delete
  2. आदरणीय सई जी
    नमस्कार
    अपन नेहमीप्रमाने अतिशय सुरेख लिहलेले आहे.
    आज ची तरुण पीढ़ी ही खरोखर 5G (आभ्यासू) आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...तरुण पिढी खूप हुशार आणि तेवढीच संवेदशील आहे...त्यांचा तेवढाच आदर केला पाहिजे....

      Delete
  3. बरोबर लिहिलं आहे.

    ReplyDelete
  4. Yes the present generation is open and frank in their thoughts and behavior.

    Jayshree Karve

    ReplyDelete
    Replies
    1. हो नक्कीच...नवीन पिढी खूप हुशार आणि प्रगत विचारांची आहे. त्यांना तेवढाच आदर दिला पाहिजे...त्यांच्या मतांना जाणून घेतलं पाहिजे....

      Delete
  5. लेख खरंच खूप छान आहे कारण सहसा या विषयावर बोलली जात नाही

    ReplyDelete
  6. फार सुंदर लिहिलय.. खरंतर या मुलांना तुला काय कळतंय किंवा जास्त आगाऊपणा नको करूस असं बोलण्यापेक्षा सुसंवाद साधून त्यांना काय म्हणायचंय ते ऐकून घेतलं पाहिजे. त्यांच्या कडे आपल्या बऱ्याच समस्यांची नव्या द्रुष्टिकोनातून अगदी सोपी अशी उत्तरं मिळतात.
    प्रत्येक आई बाबांनी वाचावा असा लेख.👍👍👌👌

    ReplyDelete
  7. सुंदर 👌 लेख आहे। आजची नवी पिढी
    नक्की चाणाक्ष आहे आणि शास्रावर अधिक विश्वास ठेवणारी आहे। मोकळी आहे।

    ReplyDelete

Post a Comment