वैशाख वणव्यातील मैत्रीचा गारवा....
उन्हाच्या झळा गेल्या उडत...गेल्या दोन वर्षापासून या आनंदाला मुकलो होतो...आता मस्त खरेदी करणार...संध्याकाळ पर्यंत आमचा मसाला होईल...मग सावकाश घरी जाऊ...माझ्यासमोर आठ मैत्रिणींचा ग्रुप मस्त गप्पा मारत होता. आम्ही लालबागच्या चिवडा गल्लीत होतो...त्याची मागची गल्ली, मसाला गल्ली...रविवारी 1 मे रोजी वैशाख महिना सुरु झाला. या वैशाख वणव्याच्या पहिल्याच दिवशी आम्ही दोघं मसाला आणण्याचं निमित्त करीत लालबागला गेलो...दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उन्हाच्या झळांनी मी हैराण झाले होते. मसाला आणि चिवडा गल्लीतली खरेदी पटापट करायची म्हणून माझी घाई चालू होती...तोच माझ्या समोर आठ मैत्रिणींचा एक ग्रुप नाचत-बागडत फिरत होता त्यावर माझी नजर गेली. एका दुकानातून दुस-या दुकानात जात होत्या...काय काय घेऊया, म्हणून एकमेकींना विचारत होत्या...हसत होत्या...बागडत होत्या...वर सूर्य तापला होता...त्या झळांनी मी सुद्धा तापले होते..वैतागले होते...नव-याला घाई करत होते...पण समोरच्या त्या मैत्रिणींच्या ग्रुपकडे बघत मी सुद्धा थोडावेळ थांबले. हसले...एवढ्या गरमीत फिरताय...म्हणून त्यांना विचारलंही...तेव्हाच त्यांनी मला असं उत्तर दिलं...उन्हाच्या झळांना...वाढत्या गरमीला टेचात बाय बाय करत त्या फिरत होत्या...त्यांचा आनंद वेगळा होता...कोरोनाचा कहर वाढल्यामुळे गेल्या दोन वर्षात या मैत्रिणी या भागात खरेदीसाठी आल्या नव्हत्या...आता दोनवर्षांनंतर या भागात आल्यावर वैशाखाचे ऊन कितीही तापदायक ठरले तरी त्यांच्यातला मैत्रीचा गारवा त्यांना मोठा सहारा देत होता. अर्थातच त्यांची ही मैत्री बघून मी सुद्धा शांत झाले....
वर्षभरातले काही कार्यक्रम हे ठरलेले असतात. त्यातलाच हे मसाल्याचे प्रकरण...वर्षभराचा मसाला हा मार्च-एप्रिल महिन्यात एकदाच करायचा...हा विशेष सोहळा. हा मसाल्याचा सोहळा खूप मोठा कौतुकाचा...कोरोनापूर्वी हा सोहळा आम्ही दोनवेळा करायचो...एकदा मसाल्याची ऑर्डर द्यायला जायचं...त्यानिमित्त लालबागची फेरी...लालबागच्या बाजारात मनासारखं फिरायचं...मसाल्याची ऑर्डर देऊन झाली की या बाजारात मिळणा-या इतर वस्तूंवर डल्ला मारायचा....त्यात ओले काजू, फेण्या, कुरडया, मोरंब्बा घालण्यासाठी कै-या...आणि चिवडा गल्लीतील चिवडे, वेफर्स...असं सर्व एका फेरीत घरी आलं की आठवडाभरानं दुसरी फेरी मसाला आणण्यासाठी....तेव्हा शक्यतो अन्य वस्तू घ्यायला संधी मिळायची नाही. कारण मसालाल्याला जपणं गरजेचं...फक्त ओले काजू आणि नवरतन फरसाण घेऊन घर गाठायचे....पण कोरोनानं हे सगळं गणित बिघडलं. आमच्या वालावलकर मसाल्यांच्या दुकानात गेली बारा-तेरा वर्ष मी मसाला करत आहे. तेव्हापासूनच्या सर्व पावत्या सांभाळून ठेवलेल्या आहेत. कोरोना आल्यावर या सर्व पावत्या कामाला आल्या. आमची मसाल्याची ऑर्डर देण्यासाठी होणारी पहिली फेरी त्यामुळे कमी झाली. वॉर्टसअपच्या माध्यमातून मसाल्याचं प्रमाण कमी-अधिक होऊ लागलंय. फक्त मसाला घेण्यासाठी जायचं...शेजारच्या चिवडा गल्लीत लपून लपून जायचं...आणि फरसाण, वेफर्स, कचोरी घेऊन घरी यायचं...
गेल्या दोन वर्षानंतर आता थोडं कोरोनाचं वादळ निवळलंय...त्यामुळे मसाल्याची ऑर्डर द्यायला गेलं नाही तरी मसाला आणण्यासाठी गेल्यावर थोडीफार अधिक खरेदी करता येईल असा माझा बेत होता. सकाळी लवकर, अगदी दहा वाजता मसाला गल्ली गाठायची आणि बारा वाजेपर्यंत खरेदी करुन घरी येण्यासाठी ट्रेन पकडायची....असा माझा बेत होता...पण नव-यानं या सर्वांवर पाणी टाकलं. लालबागलाच जायचं ना...त्याआधी थोडं दादरला जाऊया...तिथे काही खरेदी करुया...तुला एखादा ड्रेस का घेत नाहीस...असं मला मधाचं बोट दाखवलं...अर्थातच मी या प्रलोभनाला भुलले...आणि नव-
याला होकार दिला आणि अख्खा दिवस वैशाख वणव्यात घालवला.
सकाळी लवकर निघण्याचा बेत हवेत विरला...बरोब्बर बारा वाजण्याच्या सुमारास आम्ही घर सोडलं...वैशाख महिन्यातला पहिलाच दिवस...त्यामुळे सूर्य ऐन रंगात आलेला...दीडच्या सुमारास दादरला पोहचलो...उन्हाचा तडाखा होताच..पण दादरच्या मार्केटमध्ये जणू थंड हवेचा शिडकावा होतोय, अशी गर्दी होती. आमची खरेदी आटोपली आणि जेवणासाठी हॉटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अशासाठी की, जवळपास सर्वच हॉटेलच्या बाहेर तोबा गर्दी होती...लांब लाईन लागलेली. मग श्रीकृष्णची लस्सी कामाला आली. एका लस्सीनं जेवणाचं काम केलं... दुपारी तीनच्या सुमारास लालबाग गाठलं...तिथेही तशीच परिस्थिती...सर्वत्र खरेदीचा उत्सव चालू आहे अशी गर्दी...इथेही कुठल्याही हॉटेलमध्ये आमचा नंबर लागला नाही. शेवटी आपल्या घरी जाऊन काय ते खाऊ, आता मसाला आणि फरसाण घेऊन पहिलं घर गाठूया, म्हणून नव-याला ताकीद दिली. गरमीनं अगदी नको झालं होतं...आपण काय सारखे येतो का...थोडं थांबूया आणि इथलं फूड टेस्ट करुया म्हणून त्याची भूणभूण चालू होती...पण माझ्यावर वाढत्या गरमीनं चांगलाच परिणाम केला होता...नको ते हॉटेल आणि नको त्या रांगा...आपण आपल्या घरी जाऊन काहीतरी खाऊ...आता आटपा पटापट म्हणून मी त्याला विनंती केली...शेवटी माझा पडलेला चेहरा कामी आला...पहिली चिवडा गल्ली लागली. इथे मिळणारं नवरतन फरसाण लेकाला खूप आवडतं...त्यामुळे नवरतन फरसाण, कचोरी, उपवासाचा चिवडा, वेफर्स असं काय काय घ्यावं याची यादी करु लागलो...तितक्यात या आठ मैत्रिणींचा ग्रुप आमच्या समोर आला. आम्ही दोघंही उन्हापासून वाचण्यासाठी डोक्यावर टोपी...हातात पाण्याची बाटली...शिवाय तोंडावर मास्क अशा आवतारात होतो....पण समोरच्या सर्वजणी जणू चांदण्यात फिरत आहेत, अशा मोकळ्या होत्या...जोरजोरात हसत होत्या...कुठे जाऊन फरसाण टेस्ट करुया म्हणून
अंदाज घेत होत्या...एकीच्या कानावर आमचा नवरतन फरसाण हा शब्द पडला...एव्हाना आम्हीही त्यांना बघून जवळपास फ्रीज झालो होतो...त्यापैकी एकीनं विचारलं नवरतन फरसाण म्हणजे काय....मी पहिल्यांदा हा प्रश्न ऐकला पण तिला उत्तर देण्याऐवजी अजूनही त्या सर्वांकडे बघतच होते. त्या महिलेच्या ते लक्षात आलं...तिनं विचारलं, काय झालं...तुम्ही का बघत आहात...तेव्हा मी त्यांना माझ्या चिडचिडीचं कारण सांगितलं...आणि एवढ्या गरमीतही आनंदी असणा-या त्या महिलांच्या आनंदाचं कारण विचारलं....त्यावर त्या सर्वजणी हसल्या...मी फरसाणाच्या दुकानात सावलीत उभी होते...पण त्या सर्वजणी अजूनही दुकानाच्या बाहेर, उन्हात उभ्या होत्या...तिथेच उभं राहून त्यापैकी एक म्हणाली...आम्ही गोरेगावहून आलोय...एका सोसायटीतल्या आहोत आम्ही....दरवर्षी मसाल्याच्या निमित्तानं लालबागला येतो...आणि दिवसभर खरेदी, हॉटेलिंग करतो...रात्री उशीरा मसाल्याच्या पिशव्या घेऊन घर गाठतो...पण गेल्या दोन वर्षात हे सगळं करता आलं नाही. फोनवरुन ऑर्डर करत होतो आणि आमच्यापैकी एक-दोन जणी येऊन मसाला घेऊन जात होत्या...पण यावर्षी या दोन वर्षाचं सगळं भरुन काढणार....त्यामुळेच सकाळी आलो...आमचं मसाल्याचं सामान घेतलं....आता तो मसाला कांडायला म्हणजेच कुटायला दिलाय...तिथे अधून-मधून नजर टाकायचीय...त्यामुळेच या चिवडा गल्लीत फिरतोय...हे त्या महिला सांगत असतांनाच बाजुला असलेल्या मसाला कुटायचं काम चालू असणा-या एका गाळ्यात त्यापैकी दोघी जाऊन बघून आल्या...मसाला चांगलाच झणझणीत असणार...कारण त्या दोघीही शिंकत बाहेर आल्या...आणि कोणाचा मसाला चालू आहे ते सांगितले...आमच्यासमोर असलेल्या महिला आता त्या फरसाणाच्या दुकानात शिरल्या...गरमी-गरमी काय करायचं ती तर दरवर्षाची आहे....आता वैशाख वणवा नाही सोसला तर पाऊसाचा गारवा कसा अनुभवता येणार...दरवर्षीचा हा मसाला उत्सव आम्ही असाच साजरा करतो...वैशाखाच्या उन्हाचा चटका खात...दिवसभर या गल्यांमधून फिरतो...खरेदी होते...पुढे एका हॉटेलमध्ये मिसळ छान मिळते...त्यावर ताव मारतो...संध्याकाळ पर्यंत आमच्या सर्वांचे मसाले कुटून होतात...मग ते ताब्यात घेऊन गोरेगाव गाठतांना रात्र होते...थोडा थकवा येतो...पण मसाल्याच्या झणझणीत वासापुढे आणि आमच्या मैत्रीपुढे सगळा थकवा दूर
जातो...हे सर्व बोलत असतांना त्या खरेदीही करत होत्या...
एव्हाना प्रत्येकीनं नवरतन फरसाण टेस्ट करण्याच्या निमित्तानं चांगलं
बकणाभर खाऊन घेतलं होतं...अर्थात छान आहे म्हणत, प्रत्येकीनं एक-दोन किलोची
ऑर्डरही दिली. आमच्याप्रमाणेच कचो-याही बांधून
घेतल्या...दुसरं काय आहे ते दाखवा आणि चाखवा पटापट म्हणून त्यापैकी एकीनं
दुकानदाराला ऑर्डरच केली...त्यावर पुन्हा हास्याचा धबधबा वाहू लागला...आम्हीही
त्यात सामिल झालो...आमची ऑर्डर घेऊन त्यांना बाय बोलून निघालो...वालावलकरांचा
मसाला तयार होता...त्याचं बिलींग केलं, दोन्ही हातात पिशव्या...आता माझी घरी जायची
घाई सुरु झाली...नव-यानं हळूच विचारलं...त्या बायका म्हणाल्या, त्या मिसळीची टेस्ट
करुया का...आत्ता गर्दीही कमी असेल...माझ्याकडे पर्याय नव्हताच...भूकही लागलेली...मग
आम्हीही त्या चविष्ठ मिसळीची टेस्ट करुन घेतली...परत येतांना पुन्हा मसाला
गल्लीवरुन आलो...तर हा महिलांचा ग्रुप पुन्हा दिसला...आता त्यांचा मोर्चा ओले
काजूगर मिळतात त्या दुकानावर होता...त्या तशाच छान हसत-बागडत होत्या...मग
जाणवलं...वैशाख वणवा फक्त नावाचा असतो...मन छान प्रसन्न असेल तर वैशाख कितीही
तापला तरी तो छान गारवा देतोच...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
छान लिहिलं आहेस. लालबागच्या मसाला गल्ली आणि चिवडा गल्ली ची माहिती मिळाली.
ReplyDelete- जयश्री कर्वे
धन्यवाद मॅडम...
DeleteNicely described the things and feelings
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteआनंद हा आनंदच असतो. तो कोणत्याही गोष्टीतून मिळतो. आनंद आपल्या मानण्यावर असतो. हीच गोष्ट महिलांच्या ग्रुपने दाखवून दिली आहे. नेहमी आनंदी रहा.
ReplyDeleteसुहास सरफरे
काका....एकदम खरं....आनंद हा आपल्या मानण्यावर असतो....आणि तो मित्र मैत्रिणींच्या सहवासानं अधिक अनुभवता येतो...
Delete👍👍👍
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteKhup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteखूप आवडलं बरं का,
ReplyDeleteधन्यवाद...
Delete