देवी Live आहे....
कधीतरी अशी काही वाक्य कानावर पडतात, की आपली विचारांची दिशाच बदलून टाकतात...तसेच हे एक वाक्य, देवी Live आहे....हे अचानक माझ्या कानावर आले...मुंबईला महालक्ष्मी मंदिरात अगदी निवांत वेळी दर्शनासाठी गेले होते...हल्ली सर्व मंदिरात सीसीटीव्हीचे जाळे पसरले आहे. सगळीकडे कॅमेरा लावले आहेत, कृपया आपले मोबाईल बंद ठेवा. फोटो काढू नका...असे ठळक अक्षरात आणि मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत बोर्ड लावलेले असतात...तसेच इथेही होते...पण त्याकडे फारसं कोणी बघत नाही, याचा अनुभव मला आला. दर्शनाच्या रांगेत असतांना माझ्यासमोरच दोन महिला होत्या...हातात देवीसाठी घेतलेल्या ओटीच्या सामानाचा मोठा ट्रे होता...एकदम छान तयार झालेल्या या दोघी रांगेत उभ्या असतांना हे सर्व बोर्ड बघत होत्या आणि ते बघत...किंबहुना वाचतच त्यांनी त्यांचा मोबाईल चालू केला, त्यात व्हिडीओ चालून करुन शूट करु लागल्या...हॅलो, आम्ही आलोत मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात...ही बघा देवी...कशी सजली आहे...असं हळू....दबक्या आवाजात बोलून, देवीची मुर्ती, मंदिर यांचे शुटींग करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू झाला. हे अगदी काही सेकंद होतं ना होतं तोच तिथे सुरक्षा रक्षक म्हणून असलेल्या महिलांची त्यांच्यावर नजर पडली. त्यापैकीच एकीनं या बाईंला लांबूनच जोरात हाक मारली...ओ..ओ...तुम्ही पिंक ड्रेसवाल्या....शुटींग बंद करा...शिकला नाहीत का...वाचा ना बोर्ड जरा...अहो, समोर देवी Live आहे....तिला बघा...तिचे कसले शूट करता....बंद करा फोन...माझ्या पुढे असलेल्या या दोन्ही महिलांना पुढे शुटींग केल्यामुळे सुरक्षेचे सगळे नियम पार पाडावे लागले. मी त्यांच्या मागेच होते. ज्या देवीच्या दर्शनासाठी त्या आल्या होत्या, त्या देवीच्या गाभा-याच्या उंब-यापर्यंत येऊनही त्यांना काही काळ थांबून ठेवण्यात आले. त्यात फायदा माझाच झाला, कारण मी त्यांच्या मागे होते, आणि त्यांना थांबवल्यामुळे माझा नंबर आधी लागला. देवीला नमस्कार केला, पण मनात मात्र त्या सुरक्षा रक्षक असलेल्या महिलेचे वाक्य गुंजी घातत होते... देवी Live आहे....
सोमवारी काही कामासाठी मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात गेले होते. जे काम करायचे होते, ते अनायसे लवकर झाले. सायंकाळी सातवाजता मोकळे झालो. आता परत डोंबिवलीची वाट धरावी तर ट्रेन हाऊसफुल्ल असणार...मग सहज विचार आला, जवळच असलेल्या महालक्ष्मी मंदिरात जावं...नव-याला विचारलं...तोही हो म्हणाला, त्यामुळे अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर असलेलं देवीचे मंदिर चालत गाठलं. सायंकाळची सातची वेळ होती. थोड्याच वेळात आरती सुरु होणार असल्यामुळे देवीचे दर्शन थांबवले होते. सायंकाळची होणारी देवीची पूजा चालू होती. गाभा-यात चाललेली ही पूजा बघण्याची व्यवस्था बाहेर थांबलेल्या भक्तांना मोठ्या टिव्हीद्वारे करण्यात आली होती. सोमवार सायंकाळची वेळ असल्यानं गर्दीही फार नव्हती...अगदी तीस-पस्तीस महिला आणि तेवढेच पुरुष रांगेत उभे होते. आम्ही दोघंही या रांगेत वेगवेगळे उभे राहून शांतपणे देवीची चाललेली पूजा बघत होतो. त्यानंतर आरतीही झाली. सर्वांनी देवीचा जयजयकार केला, आणि दर्शन रांग पुन्हा सुरु झाली. दोन रांगा...एक पुरुषांची आणि एक महिलांची....दोन्ही रांगेत अगदी 30-35 जण असणार...मी मध्येच होते...माझ्यापुढे असलेल्या दोन महिला, छान तयार होऊन आल्या होत्या. देवीला अर्पण करण्यासाठी त्यांनी खूप सामान घेतले होते. त्याचे भरलेले बास्केट एकीच्या हातात होते. दुसरीच्या हातात हार होता...दर्शनरांग चालू झाल्यावर अगदी दहा मिनीटात माझा नंबर येईल अशी परिस्थिती होती, तितक्यात माझ्या समोरच्या महिलांपैकी एकीनं मोबाईल काढला आणि कॅमेरा चालू केला. दुसरीनं तिला तसं करु नको म्हणून खुणावलं...तर तिनं तू सुरक्षा रक्षकांवर लक्ष ठेव म्हणत हारामध्ये मोबाईल लपवून शूट करायला सुरुवात केली. हळू आवाजात आपण कुठे आहोत, काय करत आहोत, हे सांगून ती शूट करत होती. मंदिरात अगदी देवीसमोरच आम्ही होतो. पुढे फक्त चार-पाच बायका होत्या. काही क्षणात आमचाही नंबर येईल, हे माहिती होते...देवीच्या गाभा-यात आम्ही जाणार होतो....तिथे मोबाईलल बंद ठेवावा म्हणून सूचना लिहिल्या होत्या...त्या इकत्या ठळक शब्दात होत्या की माझ्या मागचेही स्पष्टपणे वाचू शकतील अशा होत्या. त्या दोघी मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करीत मोबाईलवर शूट करत होत्या...पण हे चालू असतांना काही क्षणातच सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेल्या महिलांनी त्यांना पकडलं. त्या सुरक्षा रक्षक गाभा-याच्या दाराजवळ होत्या...तिथूनच त्यांनी त्या महिलांना जोरजारानं हाक मारायला सुरुवात केली. इथे त्या महिलांना कळलं की आपण पकडलो गेलो आहोत, तेव्हा त्यांनी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला...तितक्यात आम्ही तिघीही अगदी त्या सुरक्षा रक्षकांच्या पुढ्यात गेलो. त्या दोघींना बाजुला काढण्यात आलं. इथं देवी समोर Live आहे, आणि तुम्ही मोबाईलच्या नादात तिला बघतही नाही....शूट करण्यापेक्षा आत्ताच देवीचं रुप डोळ्यात...मनात सामावून घ्या ना...या सूचना उगाचच लिहिल्या आहेत का...वाचता येत नाही...म्हणत एकीकडे त्यांनी त्या महिलांचे मोबाईल काढून घेतले. जे शूट केले, ते
बघितले आणि डीलीट करायला लावले...इकडे माझा नंबर थोडा का नाही लवकर आला. देवीसमोर डोकं टेकवून मी बाजुला झाले...एव्हाना रात्रीचे आठ वाजत आलेले...आणि पावसाची एक सर जोरात आलेली....त्यामुळे ज्यांचे दर्शन झाले होते ते भाविकही पाऊस थांबण्याची वाट बघत उभे होते...आम्ही देवीला प्रसाद म्हणून संकटमोचक बेसन लाडू घेतला होता...एरवी आपण जो बेसन लाडू खातो, त्यापेक्षा अगदी वेगळ्या आणि फर्मास चवीचा हा लाडू असतो...पेढ्याच्या आकाराचा हा लाडू एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटेल असाच...मंदिराच्या जवळच असलेल्या मिठाईच्या दुकानात हे लाडू दिसल्यावर पहिल्यांदा ते देवीसाठी घेतले. नंतर आम्ही सोबत घेतलेले लाडू त्या सुरक्षा रक्षक महिलांना दिले...आत्ता दर्शन रांगही संपली होती...त्यामुळे त्याही निवांत होत्या...जवळच त्या शूट करणा-या महिलाही पाऊस थांबण्याची वाट बघत होत्या...त्या मात्र महिला सुरक्षा रक्षकांकडे रागानं बघत होत्या....
पाऊस थोडा कमी झाला आणि आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो...आमच्यापाठोपाठ
त्या महिलाही बाहेर पडल्या. दोघीही
रागारागानं बडबडत होत्या...जरा शूट केलं तर काय झालं. देवी काय बोलते...याचं काहीही...कसलेही नियम
लावतात...त्यातून त्या दोन सुरक्षा रक्षक बायका...त्या दोघींच्या नादात आपल्याला
देवीला निट नमस्कारही करता आला नाही...असं बडबडत त्या निघून गेल्या...
मला मात्र त्या दोघींच्या बोलण्यानं हसू आलं. आणि त्या दोन महिला सुरक्षा रक्षकांचे बोलही पुन्हा मनात आले...देवी Live आहे...अर्थात देवी Live असूनही या दोन महिला त्यांच्या दर्शनापासून मुकल्या होत्या....जैसी करनी....म्हणतात ना...अगदी तसंच...आमचे मात्र देवीदर्शन सावकाश आणि मनाप्रमाणे झाले होते...फोन बॅगेत आराम करत होता....त्याला तसंच ठेऊन आम्ही पुन्हा त्या मिठाईवाल्याचे दुकान गाठले. देवीदर्शन झालं होतं...आता पेटपूजा बाकी होती....घराकडे परत जातांना पुन्हा ते संकटमोचक बेसन लाडू घेतले...त्याचा स्वाद आणि देवीच्या दर्शनाचा आनंद दोघंही सोबत घेत घराकडे वाटचाल सुरु केली...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खरंच आहे, मोबाईलमुळे आपण अनेक live आनंदाला मुकतोय. गोष्ट छोटी पण आशय मोठा!!
ReplyDeleteजे समोर आहे, ते डोळ्यांनी पहायचे सोडून आपण त्याला मोबाईलच्या कॅमे-यांनी टीपायचा प्रयत्न करतो....मला वाटतं काही दिवसांनी डोळे भरुन पाहिलं हा शब्दप्रयोगही लुप्त होईल, त्याजागी मोबाईलच्या कॅमे-यांनी पाहिलं असं म्हटलं जाईल....
Deleteशिल्पा फारच छान लिहिले .. .
ReplyDelete