घट्ट मनामागची तगमग....

 

 घट्ट मनामागची तगमग....


तुझं मन घट्ट आहे...पण माझं तसं नाही...मला त्याची खूप आठवण येते...काहीही सुचत नाही....म्हणून सरीता पुन्हा ओक्साबोक्षी रडायला लागली...आणि मी पुन्हा डोक्यावर हात मारुन घेतला....माझ्या या मैत्रिणीच्या लेकाचं अँडमिशन झालं...ओडीसा येथील कॉलेजमध्ये तो गेला...त्याला सोडून आल्यावर सरीतानं अवघं घर डोक्यावर घेतलं...नुसती रडारड...नवरा..तिचे आईवडील...सासू सासरे सर्व सांगून कंटाळले...आता बस्स कर...हद्द म्हणजे, लेकालाही व्हिडिओ कॉल...मी तुझ्यावाचून राहू शकत नाही...घरात कोणालाही काही कळत नाही...तुझी काळजी नाही...पण माझं तसं नाही...मला तुझी खूप आठवण येते...म्हणून पुन्हा रडारड..तिकडे ते कोकरुही दयनीय झालेलं....एकतर घरापासून एवढ्या दूर...अगदी आठवडा झालेला...नवीन मित्र-मैत्रिणी....अभ्यास....हॉस्टेलमध्ये रहाण्याची त्याचीही पहिलीच वेळ....नवीन मित्रांसोबत जुळवून घेत असतांना आईचे वारंवार फोन....जेवलास का...काय होतं...कसं वाटतंय...मित्र कसे आहेत....त्रास देतात का...सर्व ठिक आहे ना...आणि मग माझी आठवण येते का रे...आणि मग रडारड...


सरीताचा लेक माझ्या लेकामागोमाग...त्यालाही सुरुवातीपासून इंजिनिअरिंगचं वेड...भरपूर अभ्यास करणारा...सरीताही त्याच्यामागे मागे...ब-याचवेळा ती आणि मी सोबत असू, तेव्हा माझी ओळख, ही माझी मोठी बहिण....म्हणून करुन द्यायची...एवढं आमचं सख्य...माझा लेक बाहेर शिकायला गेला तेव्हा सरीतानं खूप मदत केली...आता तिच्यावेळीही मी पुढे होते....त्यात मी एक वर्षानं अनुभवी...त्यामुळे सर्व खरेदी आम्ही दोघींनी जाऊन केली.  काय हवं...काय नको...हे लेकाला विचारण्यापेक्षा सरीतानं मलाच विचारलं...आणि मी सुद्धा तेवढ्याच हक्कानं तिला सर्व सांगून खरेदी करत होते.  जाण्याचा दिवस ठरला.  ती लेकाला घेऊन आमच्याकडे एकदा आली...सहकुटुंब जेवण झालं...त्याला शुभेच्छा दिल्या...लेकाला कॉलेजमध्ये सोडून सरीता आणि तिचा नवरा थोडे दिवस तिथेच रहाणार होते...आसपास फिरणार होते...पण सगळं पावसावर आणि त्याच्या कॉलेजवर अवलंबून आहे,  असं सांगून सरीता निघाली...

तोपर्यंत तरी सगळं ठिक होतं.  तिच्या लेकालाही चांगलं कॉलेज मिळालं.  त्यामुळे ती खूष होती.   लेकाचं कौतुक चालू होतं.  कॉलेजची तारीफ झाली.  लेकाला सोडायला सरीता आणि तिचा नवरा जाणार होता.  खरतर सर्व कुटुंबच ओडीसाला जाणार होतं...पण पहिल्यावेळी नको...आणि तिथे आत्ता पाऊस आहे, पुढच्यावेळी सर्व जाऊया म्हणून सरीतानं सर्वांना सांगितलं होतं.  त्यात मी सुद्धा होते...जातांना सामान भरपूर म्हणून माझ्या अनुभवातून त्यांनी ट्रेनचं बुकींग केलं होतं.  येतांना दोघं विमानानं येणार होते.  तिघं निघाले तेव्हाही मी त्यांच्या घरी गेले होते.  सगळं आनंदी  वातावरण...उत्साह...लेकाच्या नवीन प्रवासासाठी सरीता कितीतरी उत्साही होती.  तसाच उत्साह ओडीसाला,  त्याच्या कॉलेजमध्ये गेल्यावरही होता.  मला तिथून व्हिडीओ कॉल झाला...लेकाची रुम दाखवली.  ओडीसाला पोहचल्यावर दुस-या दिवशी सरीताचा लेक कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गेला.   नेमकं त्या क्षणाला सरीताला तिच्या आयुष्यातल्या एका शांततेची जाणीव झाली.  तिचा लाडका...एकुलता एक लेक आता इथेच चार वर्ष रहाणार होता.  घरी येणार, पण फक्त आठवडा...पंधरा दिवसांसाठी...पुन्हा त्याच्या कॉलेजमध्ये  दाखल.   हॉस्टेलमध्ये लेकाचं सामान लावून देतांना तिनं शंभर सूचना केल्या होत्या.   त्यावेळी त्याचे हॉस्टेलचे मित्रही आसपास होते.  बहुधा सर्वजण याच अनुभवातून गेलेले...त्यांच्याकडे बघत सरीताच्या लेकांनं तिचे सर्व सल्ले...सूचना...ऐकल्या....संध्याकाळी सहानंतर कोणाही पालकांना कॉलेज 


कॅम्पसमध्ये रहाण्याची परवानगी नव्हती.   त्यामुळे सरीता आणि नवरा लेकाला बाय करुन निघाले....ती परत दुस-या दिवशी त्याच्या कॉलेजला जाणार होती...या क्षणाला सरीताला पुढच्या काही वर्षांची जाणीव झाली....चार दिवसांनी दोघं नवराबायको निघून आले....तिथून निघतांनाही सरीताची खूप रडारड झाली.  घरी परत आल्यावर तर लेकावाचूनच रिकामं घर अजून त्रासदायक ठरलं.  मग काय...रडारड....त्रागा...ज्याचा काहीही उपयोग नव्हता...सर्व समजून थकले होते...पण उपयोग नाही. 

आमचा दोघींची दोन दिवसानंतर तरी फोन होतो...पण ओडीसामधून आल्यापासून सरीताचा चार दिवस झाले तरी फोन आला नाही, म्हणून मीच तिच्या घरी दाखल झाले.  तेव्हा हा सर्व गोंधळ मला समजला.  तिची सासू पुढे झाली...बघ बाई तू...आधी माहित होतं ना आपण मुलाशिवाय राहू शकत नाही, मग त्याला पाठवायचंच का एवढ्या दूर...तरी आम्ही सांगत होतो...इथेच कुठेतरी त्याला घाला...पण तेव्हा आमचं ऐकलं नाही...आता हा गोंधळ घातलाय...तू कशी रहातेस ग...तुझाही लेक नाही ना सोबत...जरा तुझा अनुभव सांग सूनबाईला....म्हणत तिच्या सासूबाई मंदिरात जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडल्या...नव-यानंही खांदे उडवले आणि टिव्ही पकडला.  मी आणि सरीता आतल्या खोलीत....सरीतानं सगळी उजळणी पुन्हा केली...अक्षरशः धो धो रडारड...

मी तिला काय समजवणार...मनाची तगमग काय होते हे विचारु नका...मी कुठे पुरती सावरेलय अजून....रात्री अचानक आठवण झाली तर हात त्याच्या जागेवर पडतो...अर्धवट झोपेतही डोळे लख्ख उघडतात...तो काय करत असेल...झोपला असेल का....जेवला असेल का...अभ्यास निट करत असेल का.....त्याचे मित्र कसे असतील...कसं वातावरण असेल...असे एक ना दोन अनेक प्रश्न मनात येतात...बरं त्यादिवशी फोन लागला नसेल तर अजूनही घालमेल...मग झोपेचा पार विस्कोट होतो....डोळे घट्ट मिटले तरी झोपेचा पत्ता नसतो...मग तळमळ...पण यातून हळूच पहाटेचा वारा येतो, तसे सकारात्मक विचारांची रांग सुरु होते.  अभ्यासाला गेलाय...करणार...तो करणार...त्यासाठी मेहनत घेतोय...आणि इथून त्याला आपण पाठिंबा देणार...हे सर्व सावरतांना मध्येच कोणीतरी एका फटक्यात पुन्हा बांधलेल्या ह्दयात छेद करतं....काय आता काय एकटीच ना...मग टराटर फाटलेलं ह्दय समोरच्याला ओरडून सांगतं....एवढी वर्ष आम्ही मेहनत घेतली ती याच गोष्टीसाठी....मुलं अभ्यासासाठी....त्यांनी जीवनात ठेवलेल्या उद्दीष्ठांसाठी दूर जातात...ती काय कायमची दूर जाणार का...नाही हो...पुन्हा काही वर्षांनी आम्ही एकत्र येणार...पण समोरचा हे सर्व ऐकण्याच्या पलिकडचा असतो....त्याचं चालू असतं...काय ग आता काय लेक नाही...नवरा ऑफीसला...तू एकटीच ना...मजा  आहे बाबा....घरात नुसता आराम ना....मग पुन्हा पोकळी...समोरच्याला हात जोडून सांगावसं वाटतं...बाबांनो...घरात कामं असतात...मी सुद्धा काम करते...बरचं काम आहे...पण बोलणारा त्याच्या सोंगट्या टाकून निघून जातो...आणि त्यातून सुरु झालेला अर्धवट डाव पुन्हा साधण्यासाठी मनाची धडपड सुरु होते....


सरीताचा हात हातात धरुन मनात या सर्व विचारांची सरबत्ती सुरु होती.  सरीताला हे सर्व कसं सांगणार...अनुभवाचे बोल असले तरी हा अनुभव प्रत्येकानं घ्यावा....टाकीचे घाव म्हणतात ना ते  हेच बहुधा...त्याशिवाय मनाचा कणखरपणा येत नाही...माझ्याकडे आत्तासा येतोय....सरीताकडेही येईल...पण त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल....आम्ही दोघी बराच वेळ न बोलता बसलो होतो....दोघींचे हात एकमेकींच्या हातात होते...ती रडत होती...आणि मी सुद्धा...पण अगदी शांतपणे...अर्ध्या एक तासानं सरीता थोडी शांत झाली...कठीण असतं ग....रहावत नाही...तू कसं जमवलंस...कमाल आहे तुझी...मग सरीताला थांबवून म्हणाले,  कठीण आहे,  पण निट विचार कर...ही चार वर्ष तुझ्यासाठी मिळाली आहेत...एवढी वर्ष आपण मुलांच्या पाठीपाठी आहोत....आपलं अस्तित्वच संपलंय का...नाही...ना...मग आता ते सिद्ध कर...काहीतरी नवीन शिक...जे करता आलं नाही ते कर...अगदी ट्रेकींगला जा लांब लांब...मन रमेल...मी सुद्धा केलंय...आणि करतेय...तुझं गाण्याचं शिक्षण चालू कर...छंदाला वेळ दे...कुठल्यातरी संस्थेसाठी वेळ दे...बघ फायदा होईल...यापलिकडे मी तुला काहीही सांगू शकत नाही...आपला अनुभव आपणच घ्यावा...पण सरीता लेकाला तुझा हा दुबळेपणा दाखवू नकोस...तो तिथे एकटा आहे...आणि तो अभ्यासाला गेलाय...हे विसरु नकोस...तुझ्या रडण्यानं तो सर्व सोडून आला तर काय करशील...सरीता खूप शांत झाली होती...हो ग...सर्व समजतं...कळतंय पण वळत नाही यातली गत झालीय...एव्हाना संध्याकाळ उलटून गेली होती...माझी घरी जायची घाई सुरु झाली...सरीतानं जेवून जा, म्हणून आग्रह केला...तिला नाही म्हणत मी घरी निघाले...पुन्हा तिनं हात हातात धरला...दुपारी येऊ का ग जरावेळासाठी तुझ्याकडे...मी लगेच हो म्हटलं...एक साडी घेतलीय पेंटींगला...त्यावर टिकल्या लावायच्यात....ये नक्की ये...मला थोडी मदत होईल...सरीताची कळी थोडी खुलली...तिच्या नव-याला नमस्कार करत घराकडे निघाले...मलाही माहित होतं...दार उघडून घरात पहिलं पाऊल टाकल्यावर मनाची तगमग होणार होती...पण तिथेच सावरायचं होतं...मन घट्ट आहे,  पण त्यामागचा हळवेपणा फक्त माझ्यातल्या आईपुरताच...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. शेवटी ती आईची माया.... ज्यांची मुले शिक्षणासाठी बाहेर आहेत त्यांनी हा लेख जरूर वाचावा.

    ReplyDelete
  2. मनाची तगमग व मनाचा समजूतदारपणा दोन्हीही मस्तच जमलंय. 👍🙏

    ReplyDelete

Post a Comment