आम्हा चारचौघींची मानसिकता...

 

  आम्हा चारचौघींची मानसिकता...


रविवारचा दिवस...त्यात दुपार...म्हणजे ट्रेनचा घोळ...आम्ही दोघंही स्टेशनवर पंधरा मिनिटं थांबलो...दोन फास्ट ट्रेन रद्द झाल्या...मग स्लोचा पर्याय...तिथेही तसंच होतं...एक ट्रेन रद्द झालेली...त्यामुळे तिथेही गर्दी...गर्दीची एक ट्रेन सोडून दुसरी पकडली...फर्स्ट क्लासच्या डब्यात चढले...अर्थात बसायला जागा नव्हतीच...एक जागा पकडून उभी राहिले...तेवढ्यात पाठिला मोठी सॅक लावलेली एक मुलगी उठून उभी राहिली.  तिच्यापाठोपाठ तिची मैत्रिणही उभी राहिली.  नवखी दिसत होती...तिला निट उभंही रहाता येत नव्हतं...शेवटी माझ्या बाजुच्या जागेवर आली...तिची मैत्रिण दरवाज्यात आरामात उभी होती....तिच्याबरोबरच्या नवख्या मैत्रिणीचे प्रश्न सुरु झाले, स्टेशन कितना दूर है...अभीसे क्यो उठे...सब सामान आगे क्यू पकडा...बैठने को जगा नही है सबको...फर्स्ट क्लासमेंभी जगा नही मिलती...इतनी गर्दी क्यो है...तिच्या या प्रश्नावर तिच्या मैत्रिणीला आणि मलाही हसू आलं...ये गर्दी नही है...आम्ही दोघीही एकदम म्हणालो....मग पुढचं स्टेशन येईपर्यंत तिला रोजची ट्रेनची गर्दी किती असते...कसं चढावं लागतं...किती धक्के खावे लागतात....याची माहिती दिली...ती मुलगी बंगलोरची होती....मुंबईमध्ये ट्रेनिंगसाठी त्यांचा एक


ग्रुप आला आहे.  त्यांची कर्जतला पार्टी होती...ती करुन ही मंडळी परत चालली होती.  त्यांच्या बाकीचा ग्रुप शेजारच्या पुरुषांच्या डब्यात होता...आम्ही दिलेल्या महितीनं अचंबित झालेल्या या मुलीला आम्ही काळजीपूर्वक ठाण्याला उतरवलं...मला टाटा करतांना ती बोललेलं एक वाक्य मात्र मनात बसलं....आप लोग कुछ क्यो नही करते...रोज इतनी तकलीफमें सफर कैसे करते हो....तिच्या या वाक्यावर पहिल्यांदा हसायला आलं...आणि नंतर रोजच्या प्रवासातला त्रागा सहन करणा-या महिला समोर आल्या आणि मन वेदनेनं भरून आलं...

ज्या कामासाठी मुंबईत गेलो होतो, ते काम रात्री उशीरा पूर्ण झालं.  परत येतांना भायखळ्याहून ट्रेन पकडली.  पुन्हा फर्स्ट क्लासचा लेडीज डबा....रात्रीचे दहा वाजून गेले होते, आतातरी बसायला जागा मिळेल अशी अपेक्षा होती.  डब्यात इनमिन 13 सिट....त्यातल्या 10 भरलेल्या....सुट्टीचा वार आणि रात्रीची वेळ त्यामुळे भायखाळ्यात फार गर्दी नव्हती,  मी एकटीच ट्रेनमध्ये चढले..मला एक सिट मिळाली....आता अकरा सिट भरल्या....काही मिनिटातच पुढचं, दादर स्टेशन आलं....बायकांचा घोळका शिरला.  त्या दोन जागांना सोन्याचा भाव.  त्या भरल्यावर मग बाकी बसलेल्यांची चौकशी सुरु झाली.


  कोण कुठे उतरणार....गाडी बदलापूरची...बसलेल्यांपैकी मी आणि अजून एक महिला फक्त डोंबिवली-कल्याण....बाकी सर्व बदलापूर...मग बाकीच्या चौकशी करुन बाजूला झाल्या...काहीजणी तशाच उभ्या राहिल्या...पुढची दोन स्टेशनं येऊन गेली.  रात्र असली तरी डब्यातील गर्दी वाढत होती.  बाकीच्या सर्व येऊन जागांची चौकशी करुन उभं रहाण्याची जागा शोधत होत्या.  ठाणे स्टेशन आल्यावर उभ्या राहिलेल्या ब-याचश्या महिला उतरल्या.  तिथे चढलेली एक महिला माझ्या समोरच येऊन उभी राहिली.   माझी सीट आधीच गेलेली...तिनं चौकशी केल्यावर मी सांगितलं.  मग तिनं माझी सीट जिनं बुक केली त्या महिलेला विचारलं.  तर ती कल्याणला उतरणारी...मग तिनं कल्याणची सिट बुक केली.  बघा हे अँडव्हान्स बुकींग कुठून सुरु झालं....मी डोंबिवलीला उतरल्यावर माझ्या जागेवर डोंबिवलीला एक बसणार...ती कल्याणला उतरणार आणि ती उतरल्यावर दुसरी बुकींग केलेली बसणार...ही आमची अवस्था...हे सर्व होत असतांना माझं लक्ष त्या महिलेच्या पोटावर गेलं.  ती पोटुशी होती...मग मी आवराआवर करायला सुरुवात केली.  माझ्यापुढची बुकींग असलेल्या महिलेला कल्पना दिली....मी डोंबिवलीपर्यंत हिला सिट देते...नंतर तू घे...तिनं हो म्हटलं...ती पोटुशी महिला बसली...नंतर मी उतरतांना पाहिलं, त्या कल्याणवालीनंही सिट घेतली नाही...त्याच पोटुशा महिलेला बसायला दिलं....


या अशा घटना किती होतात...नेहमी अशा हजारो बायका कामाच्या निमित्तानं बाहेर पडतात.  धक्के खात प्रवास करतात.  ऑफीसच्या दगदगीतून घर गाठतांना तर त्यांची तारांबळ बघता येत नाही....त्यात कितीतरी महिला गरोदर असतात.  सकाळच्या वेळी तर कित्तीतरी जणी आपल्या मुलांना शाळेत किंवा क्लासला सोडण्यासाठी जातात.  आता काही जणी तर लहान मुलांना घेऊन त्यांच्या ऑफीसमध्ये जातात.  ऑफीसमध्ये मुलांना सांभाळण्याची व्यवस्था असते.  पण ते गाठण्यासाठी ट्रेनमधून धक्के खात प्रवास करावाच लागतो.  याच सर्वजणी एकमेकींना सांभाळून घेतात.  याबद्दल कोण दखल घेतं...महिलांचे ट्रेनमधील डबे किती...आणि रोज प्रवास करणा-या महिलांची संख्या किती...हे गणित तर कोणीही सोडवू शकणार नाही....आता तर एसी ट्रेन आल्या आहेत.  पण महिला प्रवाशांची स्थिती किती सुधारली हा प्रश्न आहे. 

मला आठवलं, काल परवा वॉटसअपवर एक व्हिडीओ फिरत होता.  कुठल्याश्या ट्रेनमध्ये महिलांमध्ये भांडणं झाली.  नवरात्रानंतर देवी आल्या...म्हणत कितीतरी वेळा हा व्हिडीओ माझ्या मोबाईलवर आला....अहो, त्या बायकांची मानसिकता तरी जाणून घ्या....बसायची जागा हवी हा आमचा हक्क आहे.  त्यासाठी आधी पास काठतो...आधीच पैसे भरतो..पण बसायला साधी सीट नाही...पण उभं रहायलाही जागा नसते.  एक महिला जेव्हा नोकरीसाठी बाहेर पडते, तेव्हा तिची काय तारांबळ होते, हे तिचे तिलाच माहित असते.  घरचं सर्व सांभाळून ऑफीस करा,  मुलांची जबाबदाही, त्यांच्या शाळा, अभ्यास ...किती दगदग होत असणार त्या जिवाची...या सर्वात एखाद दिवशी मनावरची सर्व बंधनं तुटतात...कोणावर तरी राग काढावासा वाटतो....कुठेच शांतता नाही...निदान प्रवासात तरी असावं की...असं वाटत...पण तिथे तर अजून कठीण परिस्थिती,  मग अनोळखी व्यक्तींवर राग निघतो...बायकांची भांडणं म्हणून हसत बसण्यापेक्षा त्या बायकांची त्या भांडणामागची काय मानसिकता होती हे जाणंणं गरजेचं वाटतं....हा व्हिडीओ पाठविणा-यांनी फक्त मनोरंजन म्हणून या भांडणांकडे बघितलं...पण त्यामागची वेदना कोणालाच दिलसी नाही.

फार काय पण महिलांही या वेदनेमागचे मूळ जाणू शकल्या नाहीत याचे वाईट


वाटले.  पण जेव्हा एक बाईच बाईवर केलेले अशा विद्रुप मानसिकतेचे व्हिड़ीओ किंवा जोक फॉरवर्ड करते, तेव्हा कमालीचं दुःख होतं...आम्ही चारचौघीही एकमेकींना समजून घेऊ शकत नाही का...की आपल्यावर होणा-या अशा टिंगल टवाळीला भर घालणार....हा प्रश्न तेव्हा मनात येतो...अशात त्या सकाळच्या मुलींनं केलेला प्रश्न पुन्हा आला...आप कुछ करते क्यो नही...कधी करणार...जेव्हा आम्ही चारचौघी एकमेकींना समजून घेऊ तेव्हाच पुढचा टप्पा गाठणार...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments

  1. जोपर्यंत खर्या अर्थाने स्त्रीला घरात सन्मान,बरोबरीची वागणुक मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न निरुत्तरीतच रहाणार.
    हेच सत्य

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे. धन्यवाद...

      Delete
  2. प्रवाही,सुगम भाषा

    ReplyDelete

Post a Comment