चक्रव्यूहामधलं आईपण....

 

 चक्रव्यूहामधलं आईपण....


तुझं काय....कुठपर्यंत आलंय...मी या महिन्यापर्यंत बघणार, नंतर थांबवणार...मग जून नंतर बघू...तूझं काय...माझ्या समोरच दोघी गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होत्या.  सकाळी साडेआठची ट्रेन मी डोंबिवलीहून पकडली होती.  ठाण्यापर्यंतचा प्रवास...फर्स्टक्लासचा डबा...तरीही अगदी हात हलवायचीही सोय नाही, एवढी गर्दी होती.  मी कशीबशी दरवाज्याला टेकून उभी रहाण्याचा प्रयत्नात होते.  माझ्यासमोरच्या दोघी एकमेकींबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होत्या...एकीचे प्रश्न विचारुन झाले होते.  आता दुसरीची वेळ...माझं तर काही खरं नाही...ऑफीसमध्ये कामाचं लोड...त्यात हे टेन्शन...आमच्या ऑफीसमध्ये तर डिसेंबरलाच कामाचा लोड आलाय...मला बहुधा एक टूरपण करावी लागणार आहे....मी गेल्याच महिन्यात थांबवली ट्रिटमेंट...सगळे पैसे वाया....हो का...पहिलीचा प्रश्न आणि उत्सुकता...किती झाला ग खर्च....तिनं आकडा सांगितला...ट्रिटमेंट कुठली होती काय माहित, पण तो आकडा ऐकून माझे डोळे विस्फारले...बस्स...एवढाच...हा दुसरीचा प्रश्न आल्यावर तर आणखी उत्सुकता ताणली गेली.  एव्हाना दिव्याची गर्दी आली...पुन्हा रेटारेटी...यातून सावरल्यावर बस्स म्हणणारी महिला म्हणाली, मला दे ना तुझ्या सेंटरचा नंबर...मी बघते...मी जाते तिथे तर यापेक्षा जास्त पैसे घेतात....माझापण रिझल्ट कुठे आलाय...जून नंतर मी तुझ्या सेंटरलाच जाईन...यावर पहिलीनं लगेच नंबर पाठवला...आणि त्या सेंटरचे फोटो दाखवू लागली.  खचाखच भरलेल्या त्या ट्रेनमध्ये कितीशी प्रायव्हसी रहाणार...ते फोटो माझ्यासह आसपास असणा-या आणखी दोघी तिघींनी बघितले.  आयव्हीएफ सेंटरचे फोटो होते.   त्या दोघीही बाळासाठी प्रयत्न करत होत्या.  त्यासाठी आयव्हीएफ ट्रिटमेंट, या सेंटरमधून घेत होत्या.  दोघीही नोकरीत मोठ्यापोस्टवर वाटत होत्या...त्या आयव्हीएफ सेंटरमधील खर्चाचे आकडे ज्या सहजपणे सांगत होत्या त्यावरुन त्यांच्या पगाराचा अंदाज येत होता...पण तरीही त्यांचे बोलणे ऐकून मात्र मी अस्वस्थ झाले होते....

पण त्या दोघी मात्र निर्धास्त होत्या...ट्रेनमध्ये गर्दी वाढत होती...अगदी थोडफार हलायलाही जागा नव्हती...पण या दोघींच्या गप्पा चालू होत्या त्यात तो आयव्हीएफ सेंटरचाच भाग अधिक होता.  तू जूनपासून जाणार असलीस तर मीपण तेव्हाच पुन्हा ट्रिटमेंट घेते...आता बघ ना ऑफीसपुढे तर काहीच


शक्य नाही.  जानेवारीपर्यंत इन्क्रीमेंट होणार आहेत.  त्यासाठी वर्कपरफॉर्मन्स तर द्यावाच लागेल.  अरे आमच्याकडेपण तसचं आहे.  पुढच्या महिन्यात तर घरातली दोन लग्न आहेत.  त्यामुळे पाहुणे पण येणार...त्यात ऑफीसला सुट्टी घेता येणार नाही.  कसं जमणार कोण जाणे.  यावर दुसरीची प्रतिक्रीयाही अशीच काहीशी...आमच्याकडे तर विचारु नकोस...पाहुणे आणि त्याच चौकशा...अरे येऊन जाऊन बाळावरच सर्व...वयाची तिशी पार झालीय...तर होऊ दे ना...आम्ही आमचं मॅनेज करु...सर्वांचे तेच सल्ले आणि डॉक्टरांची नावं...इथे ऑफीसचं टेन्शन आणि घरी या लोकांचं....त्यामुळे आम्ही डिसेंबरमध्ये आठवडाभर बाहेरच जाणार आहोत...उगीचच टेन्शन नको...

या दोघींच्या गप्पा अशाच चालू होत्या...एव्हाना ठाणं आलं होतं.  माझ्या हातात दोन पिशव्या.  बहिणीला आणि तिच्या छोट्या बाळाला बघायला मला जायचं होतं.  पिशवीत बाळंतणीसाठी हळीवाच्या लाडवाचा आणि मुगाच्या लाडवाचा, असे दोन डबे होते.  शिवाय बाकीच्या भेटवस्तू...त्यामुळे बॅग जड झालेली.  ठाण्याला उतरण्यासाठी तयारी करतांना या पिशवीला अगदी पोटावर गच्च पकडून ठेवलं होतं.  तेवढ्या कमी वेळात मागचा लोड वाढलेला...मागच्या मुलीची बॅग गर्दीत अडकली होती, ती काढण्याच्या प्रयत्नात तिचे धक्के लागत होते.  पण या धक्क्यांपेक्षा मी माझ्या पुढे उभ्या असलेल्या दोघींमुळे अस्वस्थ झाले होते.  बाळा होण्यासाठी त्या आयव्हीएफ सेंटरची मदत घेत होत्या...पण या सर्वात बाळ की स्वतःच्या करीअरमधले यशाचे टप्पे या  चक्रव्यूहात त्या अडकल्या होत्या.  बाळ हवं आहे, कुटुंब हवं आहे, पण सोबत करीअरचा सोनेरी ग्राफही हवाय...हा ताळमेळ कसा साधायचा यात मात्र त्यांची गडबड होत होती.  स्टेशन आल्यावर आमचा सर्वजणींचा लोंढा उतरला...त्यात त्या दोघीही होत्या...एकमेकींना बाय करुन त्या दोन्ही दिशेला विभागल्या गेल्या....त्यातली एक अगदी माझ्यापुढेच होती...हातात मोठी बॅग आणि तसाच मोठा मोबाईल...कानाला इअरफोन...आणि सतत कोणालातरी सूचना...ऑफीसचे काम सुरु झाले होते.  त्याचा प्रचंड ताण तिच्या बोलण्यात जाणवत होता...मिटींग...रिपोर्ट...या शब्दांचा भडीमार चालू होता...ती तशीच गर्दीला चिरत पुढे चालती झाली...मी मला जिथे जायचं त्या ठिकाणच्या बस स्थानकावर गेले....

मनातला हा आयव्हीएफ शब्द मात्र जात नव्हतं.  गेल्या काही महिन्यात हा शब्द ब-याचवेळा आसपास फिरत आहे.  एका परिचितांनीही आयव्हीएफ सेंटरमध्ये नाव नोंदवले होते.  तिथून त्यांची बाळासाठी ट्रिटमेंट चालू होती.  दोघंही नोकरी करणारे...ऑफीसमध्ये उच्चपदावरचे...त्यामुळे दोघांच्याही बोलण्यात कायम मिटींग, सेमिनार, टार्गेट...असेच शब्द असतात...फारकाय कोरोनाच्या काळातही दोघं घरात असूनही एकमेकांना वेळ देऊ शकले नाहीत.  दोन वेगवेगळ्या रुममध्ये लॅपटॉप घेऊन काम करायचे...ब-याचवेळा जेवणही


बाहेरुन मागवायची वेळ आली होती...थोडं वातावरण ठिक झाल्यावर जेवण करणा-या मावशी पुन्हा यायला लागल्या तेव्हा कुठे घरचं जेवण सुरु झालं.  हे सर्व ही दोघंही अगदी आरामात सांगतात.  दोघांचेही पालक मुलांसाठी विचारतात...तेव्हा आणखी दोन वर्ष सेटल होऊ दे...हेच उत्तर...इथे तिशी-पस्तीशी ओलांडली म्हणून पालक काळजीत आहेत.  तू तरी बोलून बघ म्हणून एकदा माझ्याकडे फोन आला होता...अगदी नाईलाजानं मी या जोडप्याला विचारलं होतं...तेव्हा त्यांनी कोरोनाचा किस्सा आनंदानं सांगितला...आम्ही घरात असून एकमेकांना वेळ देऊ शकलो नाही...आता तर ऑफीस सुरु झालंय...कसला लोड असतो...त्यात मध्येच बाळासाठी ब्रेक नाही घेऊ शकत...असं म्हणून  मला उडवून लावलं होतं...तरीही मी निकरानं त्या दोघांना डॉक्टरांकडे जाऊन आवश्यक तपासणी करायला सुचवलं होतं.  तेव्हा त्या मुलीची मासिक पाळी अनियमीत झाल्याचं समोर आलं.  त्या दोघांची वय बघता संबंधित डॉक्टरनी त्यांना आयव्हीएफ ट्रिटमेंट बाबत सुचवलं होतं.   या दोघांनाही आयव्हीएफ सेंटरला नाव नोंदवल्यावर त्यांना कसं वाटलं हे माहित नाही, पण त्यांच्या पालकांना तरी एक पायरी सर केल्याचं समाधान मिळालं आहे. 

बस स्थानकावर मी बहिणीची वाट बघत उभी होते, तेव्हा हाच सगळा विचार चालू होता.  हल्लीच्या मुलां-मुलींभोवती एक चक्रव्यूह आहे....करीअरचं चक्रव्यूह...थोडं पुढे जा...अधिक यश...थोडं आणखी पुढे जा...अधिक अधिक यश..मग अजून थोडं पुढे...असं चालू आहे...यात बरोबर कोण...चुकीचं कोण...हा विषय नाही....पण कधीतरी...कोणीतरी थांबावं लागतं...हा थांबा कायम थांबवणारा नसतो...तर सर्व आयुष्याला आधार देणारा असतो...कुटुंबाला आकार देणारा असतो....आणि एकदा थोडं थांबून यशापासून आपण कायम दूरावतो...या विचारातूनही बाहेर पडले पाहिजे...हे जाणणे महत्त्वाचे आहे. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. आज दुर्दैवाने आपल्या नात्यातील एकाच्या तरी बाबतीत असं घडताना दिसत आहे.
    मुलांचे हाल नोकरी करिअर आणि नातेवाईकांचे प्रश्न (हे प्रश्न असतात की टोचणी) किंवा एक छद्मी समाधान. आपल्या सुनेला किवा मुलीला वेळेत बाळ झाले.यात खरी पंचायत होते ती त्या मुलीच्या आई वडिलांची. मानसिकता बदलायला हवी .क?ईतर की बाळ कौटुंबिक सौख्य की करिअर आणि बरच काही.
    छान पणे विषय मांडला.
    धन्यवाद

    श्रीकांत जोशी डोंबिवली

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद जोशी सर...

      Delete
  2. Khup chhan lekh.

    ReplyDelete
  3. खूप छान लेख !

    ReplyDelete

Post a Comment