शहर शहर की बात है...
बस्स आठ दिन ही रुकेंगे...उसके बाद वापस अपने शहर....आठ दिन के बाद दम घुटने लगता है...यहा बच्चे है...नातीन है...वो ठिक है...पर बाकी हाल बेहाल है...आखिर अपना शहर अपना ही होता है...आमच्या इंदौर-उज्जैन ट्रीपची सांगता झाली ती अशा भरपूर गप्पांच्या प्रवासात. मुळ इंदौरला रहाणारे एक जोडपे, आम्ही दोघं आणि दोन मुली आणि त्यांचे आईबाबा...परतीच्या ट्रेनमध्ये असा ग्रुप मिळाला. आम्हा आठ जणांचं गुळपीठ अगदी थोड्याच वेळात एवढं जमलं की रात्री दोन पर्यंत गप्पांचा अड्डा जमला...या गप्पांमधून इंदौरला रहाणा-या या काका-काकूंनी खूप माहिती दिली...मुळात स्वच्छ, सुंदर शहर म्हणून मिरवत असलेल्या इंदौरला त्याची सुंदरता कशी मिळाली, हे कोडंच त्यांनी मार्मिक शब्दात उलगडून दाखवलं. आम्ही गेली अनेक वर्ष इंदौरला जात आहोत. पण वय होत असतांना सुंदर होत चाललेल्या सुंदरीसारखं इंदौरचं रुपडं बदलतं चाललं आहे. यावेळी तर आम्ही रात्री दीड वाजेपर्यंत इंदौरच्या रस्त्यावर फिरत होतो...सकाळी दहा वाजल्यापासून जेवढं फिरता येईल तेवढं इंदौर फिरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकवेळा नजर काहीतरी शोधत होती...अर्थात आमचा शोध काही सफल झाला नाही....अगदी रात्री दीड वाजता फिरतांनाही काही ठिकाणी सफाई कर्मचारी दिसत होते...कुठेही कचरा नाही. कचरा कुंडी बाहेर अस्तव्यस्त पडलेला कचरा नाही...अगदी रस्त्यावर फिरतांना एकही कागदाचा कपचा नाही...ही एवढी स्वच्छता नेमकी कशी साधली गेली, हा प्रश्न आम्हाला पडला होता...त्याच प्रश्नाचं उत्तर आम्हाला परतीच्या प्रवासात मिळालं. आमच्या सोबत असलेल्या इंदौरच्या काकांनी सहज गप्पांमध्ये सांगितलं...हम अब मनसेही बदल गये है...हमारे घर का कचरा रस्ते पर नही आऐगा...ना कोई दुकानदार रस्तेपे कुछ डालेंगे....हम हमारे शहर को गिरता हुआ नही देख सकते....उसे साफ रखेंगे तो उसका और हमारा सर हमेशा उंचा रहेगा...काकांच्या या वाक्यांनी आम्ही सर्व स्तब्ध झालो होतो...नकळत आम्हा समोर आमच्या शहरामधील चित्र झळकलं होतं...
इंदौर हे माझं सर्वात आवडतं शहर. गेल्या दोन वर्षात या शहराला भेटता आलं नव्हतं, याची रुखरुख होती...अचानक इंदौरला जाण्याचा बेत ठरला...घाईघाईनं तयारी केली आणि इंदौर गाठलं....यावेळी खूप बदल झालेलं शहर दिसेल याची जाणीव होती...अगदी रेल्वे स्टेशनला उतरल्यावर त्याची खात्री पटली...धुवून पुसून स्वच्छ केलेले प्लॅटफॉर्म आणि जिनेही....सकाळचे नऊ वाजता आम्ही हॉटेलवर पोहचलो...घाईघाईनं तयार होत पुन्हा तासाभरानं आमच्या कुलदेवीला जाण्यासाठी बाहेर पडलो. हा सर्व भाग आमचा अगदी नेहमीचा...गेली अनेक वर्ष ठरलेल्या हॉटेलमध्ये आमचा मुक्काम असतो. स्टेशनपासून जवळ...त्यामुळे चालण्यावर भर...या सर्वात नजर सारखी आसपासच्या चित्रांवर जात होती. रस्त्याच्या बाजुला असलेल्या कुठल्याही भींती मोकळ्या नव्हत्या...तर त्या सुंदर चित्रांनी सजवलेल्या होत्या. यापूर्वीही हे असेच इंदौरचे सजलेले रस्ते आम्ही बघितले होते. मात्र यावेळी रस्तेच काय फुटपाथही स्वच्छ आणि साफ होते. विशेष म्हणजे स्टेशन समोरचे फुटपाथ खाली....फेरीवाल्यांची तिथे गर्दी नव्हती...अगदी ठराविक फूड स्टॉल...पण त्यांच्याकडेही स्वतंत्र डस्टबीन आणि स्वच्छतेची साधनं....
देवीचे दर्शन घेऊन साधारण संध्याकाळी चारच्या सुमारास आम्ही परत शहरात
दाखल झालो...या सर्व प्रवासादरम्यानही सुखद अनुभव...रस्ता चारपदरी...डिव्हायडरवर अनेक प्रकारची झाडं लावलेली. रात्रीचा प्रवास करणा-यांसाठी एलएडीची वेगळी सुविधा...रस्तात ठराविक अंतरावर स्वच्छता गृह...या रस्ता चौपदरीकरणात अनेक गावांची जमिन गेलेली...रस्त्यावरील दुकानं मागे झालेली...असेच एक मध्ये लागणारे गाव आहे, तिथे चहा-कॉफीसाठी आम्ही दरवेळी थांबतो. सोबतच्या कारचालकाला त्या गावाचे नाव सांगितले, तेव्हा त्यांनी बरोबर त्या दुकानासमोर थांबवले. आत्तापर्यंत साध्या असलेल्या त्या दुकानाचा चेहरामोहरा बदलला होता. पण चहा-कॉफीची चव नेहमीचीच...त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या, तेव्हा समजले, रस्ता रुंदीकरणात त्यांचीही जमिन गेली...पण त्याचा मोबदला मिळाला. शिवाय व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन मिळाले. आता या दुकानात आमच्यासारख्या पर्यटकांची वरदळ जास्त वाढली आहे. फक्त याच दुकानात नाही, तर आसपासच्या अशा अनेक दुकानात पर्यटक येतात. असाच काहीसा अनुभव शहरातील दुकानदारांनी सांगितला.
इंदौरचा सराफा बाजार जगप्रसिद्ध आहे. एरवी हा सराफा सायंकाळी बंद होत असे आणि मग या भागात खाद्यपदार्थांचे स्टॉल लागायचे...आता हे स्टॉल रात्री नऊ नंतर लागतात...इंदौरचा हा बाजार म्हणजे मोठा खजिना आहे. एरवी यात फिरण्यासाठी सकाळी जावे लागायचे...यावेळी मी रात्री उशीरापर्यंत इथे मनमुराद फिरले...माझ्याकडेही खरेदीची मोठी लिस्ट होती, पण त्यापेक्षा उत्सुकता अधिक होती...इंदौरच्या बदलाची कारणं जाणून घ्यायची होती....व्यापा-यांबरोबर चर्चा केली....रात्री दहा वाजता एका पाटा-वरवंटा विकणा-या दुकानात गेले. इथे फक्त पाटा-वरवंटा आणि पोलपाट लाटणं मिळतात...हे इंदौरचे आणखी एक वैशिष्ट...हा दुकानदार दुकान बंद करत होता...मी सहज फक्त बघायचे आहे, असं सांगितलं...तर त्यांनी कोई बात नही...देखिए...आईए....आईए...करत माझे स्वागत केले. त्याच्याकडच्या वस्तूंचे वैशिष्ट सांगितले. माझ्यापाठोपाठ काही परदेशी पर्यटकही आले. त्यांनाही पाटा-वरवंटा म्हणजे काय हे समजवून सांगितले. आम्ही सर्वांनी फोटो
काढले. किमान अर्धा तास तरी या सर्वात गेला. कोणीही खरेदी केली नाही...तरीही त्या व्यापा-याच्या चेह-यावरचे हसू कमी झाले नाही...की कुठलाही त्रागा नाही....मी अजून एका दुकानात गेले...इंदौरची शंकरशेठ मेहंदी खास असते...त्या दुकानदाराला ओळख सांगितली...दोन वर्षांनी आम्ही आल्याचे सांगितले....रात्री साडेदहा वाजताही त्यांच्या दुकानात गर्दी होती....त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या....तेव्हा त्यांनीही ट्रेनमध्ये भेटलेल्या काकांसारखेच सांगितले. हमे सिर्फ साफ-सुधरा शहर चाहिए ऐसा नही...उसके साथ हम क्या देते ये भी बहोत मायने रखता है...म्हणत त्यांनी सर्वांच्या एकजुटीचे हे सार्थक असल्याचे सांगितले. शहराचे नाव झाल्यावर पर्यटक वाढलेत...अगदी रात्री बारा वाजेपर्यंतही दुकानं चालू असतात...अनेकवेळा फक्त मॉलसारखे फिरायला पर्यटक येतात...तरीही आम्ही दुकानं चालू ठेवतो...का तर त्यांना समाधान मिळायला हवं....असेच विचार इतरही व्यापारी व्यक्त करीत होते...रात्रीच्या दिड वाजेपर्यंत या गल्ल्यांमध्ये आम्ही फिरलो....सर्वकडे रोषणाई, सजावट...पण कुठेही कचरा नाही....रात्री आमच्यासारखेच अनेक पर्यटक रस्तांवर चालत होते....शहरभर असलेल्या रोषणाईसमोर अनेकजण फोटो काढून घेत होते...आम्ही शांतपणानं शहराचे हे सुंदर रुप टिपत होतो...मनात मात्र आमच्या शहराबरोबर तुलना चालू होती...
मनाला अस्वस्थ करणा-या या प्रश्नांची उत्तरे आम्हाला प्रवासात मिळाली. आमच्यासोबत असणारे काका-काकू मुळ इंदौरचे....दोघांचाही जन्म इंदौरचाच....इंदौरमध्ये त्यांचे मोठे घर आहे. दोन मुलं...आता ही दोन्ही मुलं शिकून अमेरिका आणि मुंबईमध्ये नोकरीला आहेत. त्यातीलच मुंबईतील मुलाच्या घरी आता हे काका-काकू जात होते. त्याचा खूप आग्रह असतो, आईवडीलांनी त्याच्याच घरी रहाण्यासाठी....पण इंदौरवर मनापासून प्रेम करणारे हे काका-काकू फारतर आठवडा किंवा दहा दिवस मुंबईत रहातात...मग त्यांची चिडचिड सुरु होते....त्याला कारण काय....सकाळी बाहेर पडलं तर भरलेल्या कचराकुंड्या...रात्री बाहेर पडलं, तरीही तेच चित्र....लोकं कसाही कचरा टाकतात...रात्री नातीला घेऊन आईस्क्रीम खायला एकदा गेले तर आईस्क्रीम खाल्यावर तिथेच अनेकांनी रिकामी पाकीटं टाकली होती...तेव्हा ते दुकानदारावरच चिडले होते....नंतर मुलानं काळजी घेत घरीच आईस्क्रीम मागवलं...आमच्याबरोबर हा अनुभव सांगतांना ते काका भावूक झाले होते...बुरा लगता है...अपना शहर है...अपना देश है...उसे गंदा कैसे करते है....मन व्याकूल होता है...हमारे यहा, हर कचरा अलग अलग होता है....एक दवाईकी स्ट्रीप भी हो तो उसे भी अलग देना पडता है....पहले थोडा गुस्सा आया था...ये क्या मजाक है, करके सुनाया था...पर अब आदतसी हो गयी है....ऐसेही हर शहर सुंदर होगा...खाली सबके मन साफ होने चाहीए....ते काका असेच रात्री उशीरा पर्यंत आपल्या शहराचं कौतुक करत होते, आणि आम्ही ऐकत होतो....या गप्पांमध्ये गोडवा म्हणून मी चॉकलेट गजक पुढे केलं, काका-काकूंनी ते चॉकलेट घेतलं...आणि सफाईदारपणे त्याच्यावरचा कागद आपल्या पाकीटात ठेऊन दिला...आम्हीही त्यांचेच अनुकरण केले....
पहाटे ट्रेन मुंबईत दाखल झाली...सर्वांचा निरोप घेतला....घराकडे
येतांना नवरा सारखा आग्रह करत होता...गाडी करुया...सामानाची संख्या जास्त
आहे. आपण दोघंच आहोत, गाडीत सामान ठेऊन घर
गाठू...ट्रेन पकडतांना धावपळ होईल...पण मी नकारावर ठाम राहिले...कारण गाडीनं
जेव्हा आमच्या शहरात प्रवेश करतो, तेव्हा ट्रॅफीक कोण असतं...सकाळी ट्रॅफीक नसेल,
पण कच-याचे ठिग स्वागताला असतील त्याचे काय....आम्ही ट्रेनने घरी आलो...सकाळ
असूनही रेल्वे स्थानकासमोर फेरीवाल्यांचा घेरा होता...रिक्षात सामान ठेऊन घराकडे
निघालो....पुढे दोन्ही बाजुला ओसंडून वाहणारे कच-याचे डबे...मनात मात्र त्या
काकांचे वाक्य रुंजी घालत होते....शहर साफ सरकार नही करती...उसके लोग करते है...बस
उनके मनमें सफाईकी प्रेरणा होनी चाहीए....आमच्या शहराचीही अशीच अवस्था आहे...अनेक
योजना आहेत...पण जोपर्यंत नागरिक मनावर घेत नाहीत...तोपर्यंत त्यांचा उपयोग
नाही...इथे फक्त ओला कचरा...सुका कचरा असे भाग करा म्हणून आवाहन करतांनाही नाकात
दम आलाय...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खुप छान लिहिलं आहेस.
ReplyDeleteआपल्या जनतेला स्वच्छतेचे महत्व कधी कळणार....
हो ना....स्वच्छता...सफाई...हे विषय आता शाळांमधून नव्यानं शिकवायला हवेत...जेव्हा घरातील लहान मुलं मोठ्यांना शिकवतील...तेव्हा कुठे काही चांगली सुरुवात होईल असं वाटतंय...
Deleteअगदी स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई एक मी गाव पाहिला बाई असे वाटले! सुंदर विचार.....
ReplyDeleteइंदौर...अगदी तसंच आहे, स्वप्नातलं शहर....
ReplyDeleteखाऊ गल्लीला गेली होती का
ReplyDeleteहो...खाऊ गल्ली आता पहाटे तीन वाजेपर्यंत चालू असते....त्यामुळे रात्रभर भटकंती झाली...
Delete