नात्यातील धुरळा....

 

 नात्यातील धुरळा....


एप्रिल-मे महिन्यातील काही शास्त्र असतात, ती करावीच लागतात.  त्यातलं मुख्य म्हणजे वाळवणं...आत्तासं वातावरही गडबडीचं झालं आहे.  दरवर्षी थोडे का होईना पापड आणि फेण्या घरात होतातच.  गेल्या काही वर्षापासून सांडगे करायला सुरुवात केली आहे.  अगदी काही भाजी नसेल किंवा भाकरीसोबत काही चमचमीत खावेसं वाटलं तर ही सांडग्यांची भाजी आवडायला लागलीय.  सांडग्यांची चव अशी आहे की, एकदा त्याची चटक जिभेला लागली की ती जात नाही.  एका प्रदर्शनातून हे सांडगे घरी आणले.  त्यानंतर मात्र मुगाचे सांडगे घरी करायला सुरुवात केली.  एकदा असेच सांडगे ताटात  टाकून ते खिडकीतून येणा-या उन्हात वाळवायला ठेवले होते.  तेवढ्यात मीना घरी आली.  मीना नावाची माझी ही मैत्रिण धुळ्याची.  तिच्या घरी सांडगे, पापड, शेवया मोठ्या प्रमाणात केले जातात.  माझा हा ताटातला उपद्व्याप बघून तिनं डोक्याला हात लावला.  असे घरात थोडी सांडगे होतात...तू आधी सांगायचंस ना, आवडतात ते, मी घेऊन येते....आमच्याकडे डबेच्या डबे भरले आहेत.  असं...म्हणत ती तशीच पुन्हा तिच्या घरी गेली आणि सांडगे घेऊनच परत आली.  मीनाच्या घरी केलेले हे सांडगे सर्व डाळींचे होते...मीना फक्त सांडगे आणून थांबली नाही तर तिनं तिच्या पद्धतीनं या सांडग्यांची भाजीही केली.  मग दुपारी आम्ही दोघी मैत्रिणींनी या सांगड्यांच्या भाजीवर आणि ज्वारीच्या भाकरीवर ताव मारला होता.  तेव्हापासून मीनाकडून येणारे हे सांगडे फिक्स झाले.  अर्थात मी घरी सांडगे करण्याचे सोडले नाही...मी मुगाचे सांडगे करुन मीनाकडे देऊ लागले.  तेव्हापासूनची ही आयात-निर्यात चालू आहे.  यावर्षी मी जरा सांडग्यांच्या रेसिपीमध्ये बदल करायचं ठरवलं.  आता या सांडग्यांमध्ये मीना नंबर वन...त्यामुळे तिच्याकडे गेले रेसिपी ठिक आहे, का


म्हणून विचारायला. पण तिथले वातावण प्रचंड गंभीर...माझा सांडग्यांचा विषय मनातच ठेऊन मी मागच्या पावली परत जाण्याचा प्रयत्न केला...पण मीनानं थांबवलं...

मीना धुळ्याची...सासर, माहेर दोन्हीही धुळ्यातच...दोन्ही घरी भरपूर शेती...मीनाच्या सासरी तिच्या दोन नणंदा आणि तिचा नवरा अशी तीन भावंडं.  दोन वर्षापूर्वी मीनाचे सासरे वारले.  तेव्हापासून मीनाची सासू शेतीची कामं कोणाला तरी करायला देते.  आईच्या मदतीसाठी मीनाचा नवराही महिन्यातून एकदा तरी गावाला जातोच.  मीनाही सगळे सण-समारंभ करण्यासाठी गावाला जाते.  मीनाच्या मोठ्या नणंदेचे सासर त्याच गावात आहे.  लहान नणंद पुण्याला रहाते.  कोरोनाच्या काळात आणि सासरे आजारी असतांना या मोठ्या नणंदेची खूप मदत झाली.  मीनाचा नवराही वर्षभर आईवडीलांकडे जाऊ शकला नव्हता.   अशावेळी त्यांची सर्व काळजी या बहिणीनं घेतली होती.  लॉकडाऊन उठल्यावर पुन्हा या मंडळींच्या गावाला भेटी सुरु झाल्या.  आता होळीला हे सर्व कुटुंब गावाला गेलं होतं.  तेव्हाच त्याच्यात वादाची ठिणगी पडली.  गावाला रहाणा-या मोठ्या बहिणीनं शेतीमध्ये वाटा मागितला.  तिचं बघून धाकट्या बहिणीनंही वर्षाला ठराविक धान्य मिळालंच पाहिजे अशी अट भावापुढे ठेवली.  गेली अनेक वर्ष हा सर्व व्यवहार मीनाचे सासरे बघत होते.  मीनाच्या घरी आणि तिच्या नणंदांकडे सर्व वस्तू समान वाटत होते.  मीना आम्हाला सांगायची त्यानुसार शेतीतील उत्पादनातील काही भाग मीनाचे सासरे आठवणीनं तिच्या नणंदांकडे पोहचते करीत असत.  अगदी मीनाच्या मोठ्या नणंदेकडेही भरपूर शेती असली तरी वडील तिला तिचा वाटा पोहचवत असत.  तुरडाळ, गहू, ज्वारी सोबत मसाले, पापड, लोणचे, सांडगे, शेवया असं बरच सामान या बहिणींकडे आणि मीनाच्या घरी सासरे पोहचतं करत असत. 

सासरे गेल्यावर्षी गेल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली.  एरवी तिचे सासरे शेतात उभे रहात असत.  आता शेत कोणाला तरी राखायला दिलं आहे.  त्यामुळे दरवर्षीपेक्षा उत्पादन कमी आलं.  ते वाटायला आता तिच्या सासूला


जमत नव्हतं.  तिनं ज्याला हवं त्यांनी घेऊन जावं म्हणून सर्व मुलांना सांगितलं होतं.  इथूनच वादाला सुरुवात झाली.  आम्हाला शेतातलं पिक देण्यापेक्षा आमच्या वाट्याचं शेतच आम्हाला देऊन टाक म्हणून मोठ्या नणंदेनं हट्ट् धरलाय.  तिच्या या मागणीनं मीनाच्या नव-याला मोठा धक्का बसला.  कारण मोठ्या ताईच्या लग्नात तिच्या सासरच्या मंडळींच्या मानपानासाठी बाबांनी  खूप खर्च केल्याचे मीनाच्या नव-याचे म्हणणे आहे.   शिवाय दरवर्षी सणावाराला, समारंभाला मानपानही ठेवला गेला आहे.  मोठ्या बहिणींचं बघून धाकटीनंही मोठ्या थाटात लग्न केलं होतं.  यासाठी मीनाच्या नव-यानं मदत केलीच पण काही कर्जही काढावं लागलं होतं.  बहिणींना हा व्यवहार न सांगता, मीनाचे सासरे आणि तिच्या नव-यानं परस्पर कर्ज फेडलंही होतं.  आत्ता तिच धाकटी लाडकी बहिण शेतातील उत्पन्नाचा ठराविक हिस्सा हवाच म्हणून आडून बसली होती.  वरुन या दोन्ही बहिणींनी आम्ही फक्त शेताचा भाग मागतोय घर तुलाच आहे ना म्हणून भावाला बोलून अजून एक वार केला होता.  एरवी या तिघा भावंडांत  अतिशय खेळीमेळीचं वातावरण होतं...अचानक काय कुठलं वादळ आलं आणि या तिघांमध्ये वाद सुरु झाले.  गावात त्याची फार चर्चा सुरु झाली...मीनाच्या सासूला शेजारी विचारु लागले.  त्यामुळे तिलाही नकोसं झालं.  ती सरळ लेकाकडे निघून आलेली.  आता सुट्टीमध्ये काही करुन गावाला जावे लागणार होते.  ज्या व्यक्तिला शेत राखायला दिलं आहे, त्याच्याबरोबरही बोलणी करावी लागणार होती.  त्यामुळे गावी जाऊन नक्की काय करावे या गंभीर विषयावर चर्चा चालू होती.  आणि त्या चर्चेत मी मीनाच्या घरात घुसले...

मीनाच्या घरी गेल्यागेल्या तिच्या सासूला बघून मी त्यांची चौकशी केली.  किती दिवस मुक्काम म्हणून विचारलं...तर त्या म्हणाल्या...आता सर्व विकणार...आणि इथेच रहाणार...त्यांच्या त्या उद्विग्न बोलांनी मी भानावर आले होते....आजुबाजुला बघितलं तर मीना, तिचा नवरा आणि मुलंही चेहरा पाडून बसली होती.  मीनाची सासू तर सारखा पदर डोळ्याला लावत होती....मी लगेच निघालेच होते...पण पुन्हा त्या आजींनी थांबवलं...तू तरी सांग काय उपाय आहे का...दोन्ही लेकी समोर उभ्या राहिल्यात...शेत, घर विकून येतील ते पैसे तीन घरात वाटायला सांगते...तर हा नको सांगतो....शेत पुन्हा मिळणार नाय...ताईला हवं ते देऊया म्हणतोय...मग पुढे काही दिवसांनी धाकटी येईल...आज शेत मागितलं...नंतर घर मागतील....पोटच्या पोरी...पण परक्या झाल्या....सूनेपेक्षा दोन दागिने जास्तच दिलेत मी त्यांना...त्यांना सांगते, घरी या हवं ते घेऊन जा....पण वाटा हवा म्हणून हट्ट धरु नका...तर त्या मलाच


बोल लावतात....सांग, मी कुठे चुकले....

मी काय सांगणार...मुलींना कायद्यानं हक्क दिला आहे....पण या सर्वात नात्यांचे नाजुक दोर दुखावतात...दुरावतात....ते कुठल्या कायद्यानं साधले जातात देव जाणो....मी होईल सर्व बरं म्हणत बाहेर पडले.  मीनाच्या घरी येतांना असलेला उत्साह कुठल्याकुठे पळाला होता.   तिच्या बिल्डींगच्या बाहेरच खूप काम चालू होते.  गटारांची नव्यानं बांधणी चालू होती.  त्यामुळे मीनाच्या बिल्डींगमधून कसरत करत बाहेर आले.  त्याच्याच पुढचा रस्ताही खोदलेला.  मशिनचा जोरजोराचा आवाज....धूळ...दगडं...यांनी सर्व रस्ता भरला होता.  मशिनची धडधड वेगळी...यासर्वानं सर्वत्र धुळ पसरली होती...मनात विचार आला  मीना आणि तिच्या घरात अशीच धूळ पसरली आहे.  ही धूळ नात्यातली आहे.  काही दिवसांनी हा रस्ता तयार होणार आहे.  धूळ गायब होऊन छान चकचकीत सिमेंटची रस्ते तयार होतील.  फक्त त्या दरम्यानचा महिना दिड महिना रहदारीसाठी त्रासाचा ठरणार होता.  मीनाच्या घरातील उठलेली नात्यातील धूळही कदाचित अशीच कधी ना कधी खाली बसेल.  पुन्हा तिचे आणि तिच्या नणंदेचे नाते हसते खेळते होईल...फक्त त्या दरम्यानची तगमग सहन करता आली पाहिजे...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. घरोघरी मातीच्या चुली... कुठे कमी कुठे जास्त एवढेच.. पण त्रिकाल बाधित सत्य आहे हे.!!!!.अबोली..

    ReplyDelete
  2. खुप छान आहे.👍👍👌👌🌹🌹!!अभिनंदन!!

    ReplyDelete
  3. खूप छान

    ReplyDelete
  4. आजकाल नात्यापेक्षा पैसा मोठा झाला आहेे. कोणी कितीही श्रीमंत असले तरी प्रत्येकाला आईवडिलांच्या प्रॉपर्टी मधला हिस्सा हवा असतो. नात्यांमधला समजूतदारपणा खूपच कमी झाला आहे.

    ReplyDelete
  5. मस्त लिहिले आहेस

    ReplyDelete
  6. नवीन कायद्या मुळे आजोळची नाती संपवली , मामा माहेरपण संपवलं.

    ReplyDelete
  7. वाटण्या हा संवेदनशील विषय आहे पण तू तो विषय साध्या सोप्या भाषेत विचार करायला लावणारा लिहीला आहेस!! प्रत्येक घरात हल्ली हाच प्रश्न आहे!!

    ReplyDelete

Post a Comment