बापरे....सुशीसंग बाव...बाव...
आमच्या समोर दोन डबे होते...पार्सल फूड...काहीतरी नवं ट्राय करुया म्हणत लेक आणि त्याच्या जोडीला मलाही नव्या पदार्थाची चव बघाविशी वाटली...बाबा घरात नाही...या संधीचा फायदा घेत आम्ही दोघांनी दोन नवीन पदार्थांची ऑर्डर केली...पदार्थ म्हणजे एकदम आंतरराष्ट्रीय....जपानची सुशी आणि चीनचा बाव..बाव...त्यातल्या सुशीबद्दल मला थोडीफार माहिती होती...कुठल्याश्या आवरणात भात गुंडाळतात...त्यामध्ये काहीतरी भरतात...इतकीच माहिती होती...एकदोन वेळा लेकानं सांगितलंही होतं...एकदा करुन बघ म्हणून...तेव्हा असा कोरडा भात कसा खायचा...म्हणत मी त्याची मागणी धुडकावली होती...पण यावेळी मात्र थोडी फसले आणि समोरच्या सुशीकडे डोळे फाडून बघत होते...त्या बावचंही काही समजत नव्हतं...मागवलेल्या पार्सलमध्ये सुशीचे आठ पीस आले आणि बावचे दोन...लेकानं पहिला घास सुशीचा घेतला आणि त्याच्या चेह-यावरचे भाव बघून मी समजून गेले होते...अवघड आहे प्रकरण...एरवी पदार्थ आवडला की तो खातांना जराही न थांबणारा माझा लेक, आई तू घे ना...तू खा ग...घे
ना..म्हणून मला आग्रह करीत होता...तेव्हाच आम्ही फसलो, याची जाणीव झाली होती...सुशी नामक पदार्थाचा एक अख्खा तुकडा तोंडात टाकला आणि पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. लहानपणी पालेभाजी खाण्यासाठी जशी पाण्याची मदत लागायची तशीच मदत आत्ता लागली...आणि माझ्या चेह-याचे हावभाव बघून लेकही हसू लागला...पण प्रश्न पुढे होता आता हे दोन अवघड पदार्थ संपवायचे कसे...
पाच-सहा
डबे उघडले...लेकानं पहिला घास घेतला...आणि जाणिव झाली, सुशी काही आपल्या चवीची नाही....मी त्या सुशीचा घास घेतला आणि पक्की खात्री झाली...हे आपलं प्रकरण नाही...ना तिखट...ना मिठ...ना चव...कसं खातात कोण जाणे म्हणत मी त्या सुशीकडे बघत बसले. भात एका हिरव्या आवरणात गुंडाळला होता...त्या मध्ये काकडी, गाजरचे तुकडे ठेवले होते...भरीसभर म्हणून मध्ये चीज टाकलं होतं...भातासोबत कोणी चीज खात का प्रश्न विचारत आम्ही दोघंही हताश नजरेनं त्या पदार्थाकडे बघत होतो....एरवी, अरे जरा हळू खा...म्हणून लेकाला ओरडणारी मी आज शांत होते...तर, आई तू घे...तू घे म्हणून मला आग्रह करुन लेक त्यापासून दूर पळू पाहत होता...असे आम्ही दोघंही आता हे संपवायचं कसं म्हणून विचार करत बसलो होतो...सुशीसोबत नाही म्हणायला सोया सॉस आलं होतं...आणि एक महाभयंकर तिखट असणारा हिरवा रंगाचा गोळा....त्याला चटणी कसं म्हणणार...कारण तिखटच्या पलिकडे त्याची चव नव्हतीच...बाकी त्या सुशीलाही कसलीच चव नव्हतीच...शेवटी लेकानं उपाय सुचवला...मीठ, चाटमसाला आणि शेंगदाण्याची चटणी मला घेऊन यायला सांगितलं...मग त्या सुशीवर लाल चटणीचा एक थर लावला....त्यावर थोडं मिठ टाकलं...आणि थोडा चाट मसाला...असं करुनही अजून एक-एक तुकडे कसेतरी संपले...अजून चार बाकी होते...मग पुन्हा लेक
टंगळमंगळ करायला लागला...पापड तळतेस का...पोह्यांचे तळ...तिखट तिखट...म्हणून अजून एक मागणी त्यानं जोडली....मग बाकीचे चार तुकडे त्या पापडासोबत कसेतरी गिळले...अर्थात मदतीला पाणीही होतच...सुशी नावाचा पदार्थ कसातरी संपला...आपल्याकडे तो गिळगिळ्या भात नाही का करत...तसा भात चिजमध्ये बुडवून खाल्यावर कसं तोंड वेडवाकडं होईल...तसंच झालं होतं...पण ते अन्न होतं...आणि तेही चांगली किंमत देऊन विकत घतलेलं...परिणामी सुशीचा एक डबा संपला...दोघांनीही आता पुन्हा सुशीच्या वाट्याला जायंच नाही...अशी शपथ घेतली आणि दुस-या प्रकरणाकडे वळलो...
हा बाव...बाव नावाचा पदार्थ चांगला दिसत होता...टोफूसारखी त्याची रचना होती...पिझ्झा बेस सारखा पाव होता आणि त्याच्यामध्ये पनीर, कांदे भरलेले....फक्त त्या पावाचा रंग जरा जास्तच पांढरा वाटत होता...म्हणून मला काळजी वाटत होती....त्या बावचे दोन पीस होते...मी आधीच लेकाला सांगून टाकलं...माझं पोट भरलं आहे...मी अर्धाच खाईन...त्यानं कबूल केलं...कारण या बावसाठी त्याचा खूप आग्रह होता...मग एका बावचे दोन तुकडे केले...दोघांनीही पहिला घास घेतला...आणि एकाचवेळी एकमेकांकडे बघितले....कारण याचीही चव अगदी बेताचीच...त्यात त्या वरचे पावासारखे दिसणारे
आवरण काही केल्या चावले जात नव्हते...सारखं आपण काहीतरी कच्चं खात आहोत, याची जाणीव होत होती....पहिला घास घेतल्यावर आम्ही ते बाव कसे संपवायचे याचा विचार करु लागलो...मग चांगलं तूप टाकून तो कच्च्या पावासारखा दिसणारा भाग चांगला भाजून घेतला...त्यात भरलेला पनीरचा भाग बाहेर काढला....त्यात फक्त कांदा टाकला होता...त्याच्याजोडीला काकडी, टोमॅटो कापले...पापड पुन्हा तळला...मग हा बाव कसातरी संपवायला सुरुवात केली...आता तो पावासारखा भाग गिळायला जरा बरं वाटत होतं...पण राहूनराहून एक जाणीव होत होती...हे काहीतरी वेगळं शोधण्यापेक्षा जे माहित आहे, तेच बाहेरुन मागवायला हवं...दोन्ही पदार्थ कसेतरी संपले...दरम्यान आम्ही दोघांनी नको नको ते प्रयोग केले...जाम जोक मारले...आणि आपण कसे फसलो गेलो...आपला बाबा कसा वाचला यावर पोटभर हसून घेतलं...
पण एवढं होऊनही पोट काही भरलं नव्हतं...काहीतरी चवीचं खायला हवं....तोंडाची पार चव गेलीय म्हणत लेकानं खाऊचे डबे धुंडाळायला सुरुवात केली. एव्हाना रात्रीचे दहा वाजून गेले होते...मी त्याला पिठलं भात...भाकरी...मसालेभात आदी सर्व पर्याय दिले...पण पोट थोडं भरलंय...थोडं भरायचंय...अशावेळी जेवण नको, म्हणून त्याचा नकार येत होता....शेवटी
गाडी मसाला दुधावर आली...मी काही दिवसांपूर्वीच एक मिल्कशेचं मिक्सर घरी आणलं होतं...त्याला विचारुन झालं...तेव्हा ठसक्यात म्हणाला...आता काहीही बाहेरचं नको...आपला घरचा, तू केलेला दुधाचा मसाला आहे ना...तोच टाक फक्त...बाकी माझा कशावरही भरवसा नाही...खरतर रात्रीचे साडेदहा वाजत आले होते...त्या सुशी आणि बावच्या नादात नको तेवढी कामं करायला लागली होती...आणि एवढं करुनही तोंडाची चव गेली होती...त्यामुळे थोडी चिडचिड व्हायला लागली होती...त्यावर मलम म्हणून की काय हे लेकाचे बोल बसले...आणि एकदम कळी खुलली...मसाले दुधाच्या चवीनं त्या परदेशी पदार्थांवर मात केली...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
नशीबवान लेक
ReplyDeleteपोहा पापडासारखा कुरकुरीत आणि लज्जतदार लिहिलंय असं वाटलं!
ReplyDelete