मैत्रीचा पुढचा प्रवाह...
गेल्या आठवड्याचा शनिवार हा वर्षभराचे टॉनिक देऊन गेलाय...मैत्रीचे...प्रेमाचे...आपुलकीचे..असे हे टॉनिक मिळाले ते आमच्या शाळेच्या ग्रुपच्या गेटटूगेदरमध्ये...मैत्रीचा सोहळा...गप्पांचा अड्डा...जुन्या आठवणींचा हिंदोळा...अशा कितीही शब्दात त्याचे वर्णन केलं तरी ते कमीच होणार...अर्थात, या सगळ्यांचे सार फक्त एकच असते....मैत्री...आणि पक्की मैत्री...माझी शाळा रेवदंड्याची...सरदार रावबहादूर तेंडूलकर विद्यालय...समुद्र किना-यावर उभी असलेली काळ्या दगडातली इमारत. या काळ्या दगडाच्या शाळेनं माझ्यासारख्या अनेकांचं आयुष्य घडवलंय...सोनेरी आठवणी दिल्या आहेत. या शाळेच्या कोप-यात अजूनही आम्हा सर्वांच्या आठवणीं कुठेतरी खोचून ठेवल्या आहेत...त्या परीराज्यात दाखवतात ना, एखादा दरवाजा उघडला जातो...तिथून सर्व रंगबिरंगी फुलपाखरं उडून येतात...आणि त्याबाहेर अत्यंत रमणीय असा निसर्ग पसरला असतो...धावत जाऊन त्यात फक्त हरवायचं असतं....तसंच आम्हा सर्व एसआरटी परिवाराचं आहे...वर्षातून कधीतरी आम्ही सर्व रेवदंड्याला आमच्या केदराच्या घरात एकत्र भेटतो...आणि तो आठवणींचा सोनेरी दरवाजा उघडतो...मग ती रंगबिरंगी फुलपाखरं आमच्यात सामावून जातात...या फुलपाखरांनी पेरलेलं सोनं टिपून मग पुन्हा घराकडे परततो...म्हणूनच कधी एक दिवसाचं तर कधी दोन दिवसाचं होणारं हे गेटटूगेदर संपूर्ण वर्षभरासाठी आम्हा सर्वांच्या मैत्रीच्या धाग्यासाठी एका टॉनिकचं काम करतं....
साधारण दहा-पंधरा दिवसापूर्वी माझ्या शाळेच्या ग्रुपमधला अमेरिकेत रहाणारा बाळा मनोहर हा माझा वर्गमित्र काही दिवसासाठी गावी येणार असा निरोप आला. तेव्हापासून आमच्या शाळेच्या ग्रुपवर हलचल सुरु झाली होती...कोरोनाच्या प्रतापमुळं दोन वर्ष आम्ही सर्व मित्रमैत्रिणी भेटलो नव्हतो...आता चांगली संधी आहे, गेटटूगेदर करुया...असा निरोप यायला लागला. संकेत जोशी आणि आमचा डॉक्टर मित्र केदार ओक त्यामध्ये आघाडीवर...शेवटी हो ना हो ना करत एक तारीख ठरवली जाते...या सर्वात एक शब्द उदयाला आला आहे...फोनाफोनी...कारण किती फोन होतात याची गणतीच नाही...कोण येणार...कधी निघणार...कसे जाणार...किती वाजता पोहचाणार...या अशा क वर्गातल्या प्रश्नांचीही गणतीच नसते....सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे मेनू काय...दरवर्षी आमच्या गेटटूगेदरच्या मेनूची जबाबदारी स्वाती नावाची मैत्रिण घेते....पण यावर्षी तिचीच दांडी होणार होती...त्यामुळे मग मेनू ठरवण्याची जबाबदारी संकेत, केदार या मंडळींनी पार पाडली...बिर्याणी, कोशिंबीर आणि सोलकडी...बस्स....आणि नंतर आंब्याचे पॉट आयस्क्रिम...हा मेनू ठरेपर्यंत शुक्रवारची रात्र झाली...दुस-या दिवशी कोण, कसे निघणार याचे फोन अक्षरशः रात्री बारा वाजेपर्यंतही चालू होते...
दरवेळी आमच्या गेटटूगेदरला माझा लेक पहिला पुढे असतो...त्याला या सर्व मामा, मावशींचा भारी लळा...पण यावेळी तो नाही...त्याची कमी नव-यानं भरून काढली. तो आग्रह करुन सोबत आलेला...सकाळी सात वाजता घर सोडलं...आणि मधला केदारच्या घरचा स्टॉप करत आमचा नेहमीचा अड्डा गाठला....दरवाजा बंद...गरमीचा इफेक्ट यावेळी कधी नाही तो आमच्या गावालाही बसलेला...त्यामुळे आलेली सर्व मंडळी आत एसीची हवा खात गप्पा मारत बसलेली....दरवाजा उघडला तो दांडी मारणार अशी धमकी देणा-या
आमच्या लाडक्या स्वातीनं...या क्षणात एकच गोंधळ...आनंद....मग काय बाकी काही नाही....आलेल्या सर्वांची प्रेमळ चौकशी...नव-याची ओळखपरेड आणि भरपूर गप्पा...दुपारी जेवण...मग आयस्क्रिमवर आडवा हात...अक्षरशः गळ्यापर्यंत येईपर्यंत...आणि या सर्वात फोटोचे क्लिक...समीर हा आमचा मित्र शिवाजी महाराजांचा अप्रतिम पोवाडा गातो...त्याचा पोवाडा....त्यासोबत सुटलेले सर्वांचे आवाज...मग प्रशात, केदार, अनिल, संदिप, आशिष, संकेत, महेंद्र, बाळा या सर्वांच्याचा आवाजादून रफी...किशोर कुमार डोकवू लागले...संध्याकाळी चहासोबत घेतलेला जड मनानं सर्वांचा निरोप...झालं गेटटूगेदर...
सर्वावर प्रेमाची मोहोर लावली जाते...बस्स...इथे येणारी सर्व हक्काची असतात...महेंद्र, आशिष, संदिप, अजित, प्रशांत यांच्यासारख्या मित्रांना फोन करायची गरज नसते...आम्ही आहोत ग, तू ये आधी...म्हणत त्यांचा निरोप असतो...प्रत्यक्ष भेटी गाठी झाल्यावर एकमेकांची थट्टामस्करी होते...शाळेत असलेल्या गमती नव्यानं होतात...आणि मनात ती फुलपाखरं पुन्हा भिरभिरु
लागतात...गेल्या शनिवारीही असंच वातावरण होतं.
गप्पांचा फड रंगला असतांना आमचा मित्र केदार यानं प्रश्न केला...तुम्ही मुली कशा येता ग...घरात किती कामं असतात...ती करुन तुम्ही या गेटटूगेदरसाठी वेळ काढता...तुम्हाला नेमकं काय मिळतं यातून....आम्ही ज्या चार-पाच जणी उपस्थित होतो, त्यांचं एकच उत्तर आलं...हे जे मिळतं त्याची मोजदाद करता येणार नाही. पण हे उत्तर खूपच तोकडं होतं...घरी आल्यावर मला त्याची जाणीव झाली. रात्री उशीरा घरी पोहचलो...घरी आल्यावर लेकाला फोन केला...आम्ही घरी आलो, असं त्याला सांगितलं...तेव्हा तो अक्षरशः संतापला...परत आलीस...राहीली नाहीस...का...त्यानं माझ्याऐवजी त्याच्या बाबाला ओरडायला सुरुवात केली...बाबा...अहो राहायचं होतं ना तुम्ही...आईला कशाला विचारलंत...स्वाती मावशीला सांगायचं होतं...राजा मामा होता ना...केदारमामा, संकेतमामा, समीरमामा...कोणालाही सांगितलं असतं तरी चाललं असतं...रात्री समुद्रकिना-यावर गेला असतात...स्वाती मावशीनं वडे केले असते...उगाच परत यायची घाई केलीत...खूप मस्त आहेत, ती सर्व मंडळी....लेक एकीकडे त्याच्या बाबाला फोनवर आमच्या जुन्या गेटटूगेदरच्या आठवणी सांगू लागला. आमच्या पहिल्या गेटटूगेदरपासून तो माझ्यासोबत येत आहे. त्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये माझ्यापेक्षा त्याची वट
वाढलीय...यावेळी तो नव्हता...पण व्हिडीओ कॉल केल्यावर सर्वजण त्याच्याबरोबर बोलले आणि तो पलिकडून खळवळून हसलाही होता...आत्ताही घरात बाबाला तो जुन्या आठवणी सांगतांना रंगून गेला होता...आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं...नातं हे असचं असतं...आमच्या मैत्रीच्या नात्यातला हा नवा प्रवाह सुरु झाला आहे....नातं हे कधीही जबदस्तीनं होत नाही...ते असंच मनातून होतं...आपुलकीनं...प्रेमानं...आज आमच्या शाळेच्या ग्रुपचे हे कुटुंब असेच घट्ट होत आहे...यातील प्रत्येक मित्र-मैत्रिण आपापल्या क्षेत्रात दादा आहेत....पण ते कधीही स्वतःचा बडेजाव मारत नाहीत...तर ग्रुपमधील इतरांचं कौतुक करतात....इथे मी पण संपलेला आहे....बाकी आहे तो फक्त जिव्हाळा...यातच आमची सर्वांची नवी पिढीही बांधली जात आहे....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
नॉस्टॅल्जिक....🤗🤗
ReplyDeleteवा किती सुरेख ना आपल्याला शाळेतल्या मित्र मंत्रिणींशी बोलताना प्रत्यक्ष भेट ही तर दुधात साखरच म्हणावी2 लागेल
ReplyDeleteखरच असेच रिचार्ज ठराविक अंतराने मिळाले की आयुष्य पुन्हा पुन्हा नव्या उमेदीने फुलून जात . . .✍️👌👍
ReplyDeleteखूप छान शाळेचे दिवस आठवले.
ReplyDelete