स्वच्छतागृह...एकाचे आणि दुस-याचे..

 

 स्वच्छतागृह...एकाचे आणि दुस-याचे...


जय श्री कृष्ण,  भारत माता की जय,  सियावर रामचंद्र की जय,  घोषणा संपत नव्हत्या  आणि मंदिरात आलेल्या भाविकांचा उत्साह कमी होत नव्हता.  आम्ही दोघं आणि आमच्यासोबत असेच अनेकजण श्री कृष्णाच्या मोहक रुपाचे दर्शन करण्यासाठी थांबलो होतो.  भक्तांचा उत्साह, वाढती गर्दी पहाता मंदिर नेहमीपेक्षा अर्धा तास आधिच उघडण्यात आलं.   सर्वांसाठी हा आणखी एक सुखद धक्का होता.  त्यामुळे श्री कृष्णाच्या जयघोषात भर पडली.  त्यात तो दिवस म्हणजे, 15 ऑगस्ट.  भारतमातेचाही जयजयकार चालू होता.  मंदिरात चिक्कार गर्दी.  पण त्याची जाणीव होत नव्हती, इतकं सर्व शिस्तीत चाललं होतं.  आम्ही जवळपास मंदिर उघडण्यापूर्वी एक तास येऊन बसलो होतो.  मंदिर उघडल्यावर अजून एक तास मंदिरात बसलो.  आता निघायची वेळ झाली होती.  नव-यानं विचारलं, तुझं मन भरलं तर सांग, जाऊया.  मंदिराच्या वातावरणातून परत जावेसे वाटत नव्हते.  पण घड्याळ जी वेळ दाखवत होतं, त्यातून आता घराची ओढ लागली.  घरी जाण्यापूर्वी आणि मंदिरातून बाहेर पडण्यापूर्वी मंदिराच्या आवारातील स्वच्छतागृहाचा वापर केला.  जवळपास पाच तासाहून अधिक वेळ आम्ही या मंदिर परिसरात होतो.  जातांना आम्ही मंदिरात प्रवेश करतांना आमच्या चप्पला ज्या स्टॅडजवळ ठेल्या होत्या, त्या घेतल्या.  साधारण हे पाच तास आमच्या दोघांच्याही पायात चप्पला नव्हत्या.  पण त्याची जाणीवच झाली नाही.  अगदी मंदिर परिसरातील स्वच्छतागृहांचा वापर करतांनाही ही गरज भासली नाही.  आमच्यासोबत घराकडे परत येतांना मंदिरातील व्यक्तींपैकी काही व्यक्ती होत्या.  त्यांचीही मंदिराबाबत चर्चा सुरु होती.  सगळं किती छान आहे, मंदिराचा परिसर किती स्वच्छ आहे, आदी चर्चा चालू होती.  आमचा संवाद चालू झाला.  अर्थात मंदिराचीच चर्चा होती.  तुम्हाला काय आवडलं म्हणून एकानं विचारलं, मंदिरात न आवडल्यासारखं काहीच नव्हतं.  श्री कृष्णाची मनभावन मुर्ती,  सजावट फार काय मंदिरातील भोजन सर्व नंबर वन होतं.  आमच्यासोबत असणारे या सर्वांचेच कौतुक करत होते.  मला विचारल्यावर मी त्यात अजून एक भर घातली, ती म्हणजे, स्वच्छतागृह.  मी हा शब्द बोलताच, समोरचे चमकले.  पण लगेच सावरुन म्हणाले, बरोबर आहे,  अशी स्वच्छतागृहे सगळीकडे असली तर किती बरं होईल.

 


15 ऑगस्टला सकाळी नव-याच्या सहज मनात आलं, जुहू येथील इस्कॉन मंदिरात जाऊया म्हणून.  त्यानं मला विचारलं, मी हो म्हटलं.  अगदी तासाभरात सगळी तयारी करुन आम्ही दोघंही जुहूच्या इस्कॉन मंदिरात जाण्यासाठी निघालो.  मंदिर दुपारी काही काळ बंद करण्यात येते.  आम्ही सगळा प्रवास करुन नेमकं या बंद होण्याच्या वेळेआधी पाच मिनिटं पोहचलो.  मंदिर परिसरात गेल्यावर चप्पला ठेवतात, त्या स्टॉलवर चप्पला जमा केल्या,  त्याचवेळी तेथील एकानं सांगितलं, घाई करा, मंदिर बंद होईल.  आम्ही दोघंही धावपळत मंदिराच्या मुख्य भागात गेलो.  श्रीकृष्णाचे दर्शन झाले ना झाले तोच गाभा-याचे दरवाजे बंद करण्यात आले.  आता हे दरवाजे पुन्हा सायंकाळी चार वाजता उघडतील, असे सांगण्यात आले.  आमचे दोघांचेही चेहरे पडले.  थांबूया की जाऊया, या दोन शब्दांवर आमची चर्चा झाली.  मग ठरलं, एवढ्या लांबून आलो आहोत तर चार पर्यंत थांबूया.  जेवणाचीही वेळ झालेली, जेऊन घेऊया म्हणून कॅन्टीनची चौकशी करायला सुरुवात केली.  या इस्कॉन मंदिरात जेवणाचा एक आगळा थाटच असतो.  गोंविदा म्हणून तिथे हॉटेल आहे.  ऐसपैस परिसर.  गर्दी असली तरी सगळं शांतपणे चालू होतं.  आम्ही दोघांनीही आमचा नंबर लावला.  दहा मिनिटं थांबा म्हणून सदर गृहस्थानं सांगितलं आणि आमची बसण्याची सोय केली.  एव्हाना दोन वाजत आले होते.  माझी चुळबूळ चालू झाली.  मला वॉशरुम वापरायचे आहे, म्हणून मी नव-याला सांगितले.  त्या जेवणाचे नंबर देणा-या व्यक्तीकडे चौकशी केली.  त्यांनी वॉशरुमला कसे जायचे हे सांगितले.  पुन्हा माझी चुळबूळ.  कारण पायात चप्पला नव्हत्या.  आम्ही त्या कधीच बाहेर जमा केल्या होत्या.  त्याला सांगितले, मी चप्पला घेऊन येते.  त्यावर तो

गृहस्थ हसत म्हणाला.  काही नाही, तुमच्या आसपास बघा, खूप जणांच्या पायात चप्पला नाहीत.  वॉशरुम स्वच्छ आहेत, तरीही तुम्हाला काही कमी वाटलं, तर तिथे स्वच्छता कर्मचारी आहेत, त्यांना नक्की सांगा.  असं सांगत त्यांनी मला आत जाण्यासाठी सांगितलं.  मी आणि नवरा दोघंही त्या वॉशरुमकडे गेलो.  पायात चप्पला नाहीत, साफ नसेल तर मी परत येईन, असं नव-याला सांगत असतांनाच समोर वॉशरुम असं लिहिलेला बोर्ड दिसला.  मी जरा बिचकतच आत प्रवेश केला.  वॉशरुममध्ये तीन बाथरुम होते.  माझ्या आधी एक महिला तिथे आलेली होती.  तिच्यासोबत तिची लहान मुलगीही होती.  त्या बाईला वॉशरुमला जायचे होते, मग मुलीला एकटं कसं ठेवायचं, हा प्रश्न तिच्यापुढे आला होता.  तितक्यात तिथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणारी एक महिला आली.  तिला त्या महिलेची अडचण समजली.  काही काळजी करु नका ताई, लेकीला सोडा माझ्याकडे, तुम्ही जा, पर्स बाहेर ठेवायची असेल तर ती सुद्ध ठेवा, काहीही होणार नाही.  त्या बाईचं बोलणंच एवढं मधुर आणि विश्वासार्ह होतं की, त्या महिलेनं आपल्या मुलीचा हात त्या महिलेच्या हातात दिला आणि पर्स तेथील मोठ्या ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवली.  मी उभीच होते.  माझ्याकडे बघत ती महिला पुन्हा म्हणाली, ताई तुम्हीही जा आत, सर्व स्वच्छ आहे.  त्या महिलेवर विश्वास ठेवत मी बाथरुममध्ये प्रवेश केला.  खरचं होतं, सगळा भाग स्वच्छ होता.  कुठलीही दुर्गंधी नाही,  पाण्यानं ओला झालेला भाग नाही.  बाथरुमध्ये आवश्यक असलेली सर्व साधनं होती.  मी बाहेर आले, सोबत दुस-या बाथरुममध्ये गेलेली ती महिलाही बाहेर आली.  मी तिच्या पायाकडे बघितले, तिच्याही आणि तिच्या मुलीच्या पायातही चप्पल नव्हती.  आम्ही दोघींनी आरामात

ड्रेसिंग टेबलचा वापर केला.  त्या महिलेचे आभार मानले आणि त्या भागातून बाहेर पडलो.  नव-याला माझ्यासारखाच अनुभव आलेला.  त्यानंतर तासभर जेवणाचा आनंद घेतला.  थोडा परिसर फिरुन घेतला.  तीन वाजून गेल्यावर मंदिराच्या मुख्य भागात जाऊन बसलो.  आमच्याही आधी अनेक भक्त तिथे जमले होते.  श्रीकृष्णाच्या नावाचा जयजकार चालू होता.  सायंकाळी चार वाजता उघडणारे मंदिर अर्धातास आधीच उघडले.  मग काय उपस्थितांचा उत्साह अधिक वाढला.  आम्ही दोघं त्यात सामिल झालो.  सायंकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही त्या उत्सवात सामिल होतो.  नंतर निघण्याची तयारी सुरु केली.  निघण्यापूर्वी पुन्हा एकदा त्या स्वच्छतागृहांचा वापर केला.  आधी जसे होते, तसेच.  सर्वपरिसर एकदम स्वच्छ.  यावेळी तिथे असलेल्या स्वच्छता कर्मचा-यांबरोबर संवाद साधला.  त्यांचे आभार व्यक्त केले.  खूप स्वच्छ आहे, हा परिसर.  तुमचे कौतुक आहे.  तर त्यावर नम्रपणे ती महिला म्हणाली, आमचे कामच आहे हे.  कोणी बाथरुम वापरले की त्याची लगेच सफाई करण्यात येते.  औषध टाकण्यात येतं.  त्यामुळे इथे कितीही गर्दी असली तरी हा भाग स्वच्छ असतो.  सायंकाळी पाच नंतर आम्ही मंदिर परिसरातून बाहेर आलो.  तेव्हात आमच्या चप्पला ताब्यात घेतल्या.  देवाच्या दर्शनानं आनंद झालाच होता.  पण या मंदिरातील स्वच्छता पाहून अधिकच आनंद झाला होता. 

आमच्यासोबत ट्रेनमध्ये असलेल्या मंडळींचे स्थानक कधीच आले होते.  सुट्टीचा दिवस असल्यामुळे ट्रेन खाली होती.  मला आठवलं,  गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही खरेदीच्या निमित्तानं मुंबईला गेलो होतो.  खरेदी करुन घरी परत येत असतांना छत्रपती शिवाजी टर्मिनस अर्थात सीएसटी येथून गाडी पकडली.  पण त्यापूर्वी तेथील स्वच्छतागृहात गेलो होतो.  अतिशय खराब अनुभव.  नाकाला रुमाल, ओढणी लावून उभ्या असलेल्या महिला.  चारपैकी दोन बाथरुम बंद.  खाली चिखल झालेला.  बाथरुममधला नळ अखंड चालू.  बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्याच पाणीचं अंगावर उडालं.  बाहेर बेसिनमधील नळाचीही अशीच अवस्था.  आणि ते बेसिन किती खराब हे विचारु नका.  बाहेर असलेल्या महिलेनं आधीच पाच रुपये घेतले होते.  तिला बाहेर पडतांना सांगितलं,  आतले नळ चालूच आहेत, त्यावर ती रागानं म्हणाली, मग प्रत्येकवेळी साफ करायला कोण जाणार. यावर काय बोलणार.  मुंबई, देशाची आर्थिक राजधानी म्हटली जाते.  त्याच राजधानीमधलं सीएसटीसारख्या स्थानकात महिला स्वच्छतागृहाची अशी अवस्था असेल तर इतर स्थानकांबद्दल बोलायलाच नको. 

आम्ही पंधरा दिवसापूर्वी घेतलेल्या या अनुभवापुढे मंदिरातील आलेला अनुभव अगदी वेगळा होता.   देवच जाणो, असा अनुभव सर्वत्र कधी येणार ते. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments

  1. या अतिआवश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं आपल्या देशात.मंदिराचा अनुभव फार छान वर्णन केला आहे.

    ReplyDelete
  2. खरं आहे , सार्वजनिक स्वच्छता प्रत्येक नागरिकांनी पाळायला हवी आणि तशी सोय शासनाने करायला हवी. छान लेख!

    ReplyDelete
  3. आदरणीय सई जी प्रणाम
    वरील विषय हा आपल्या संस्कृतीत आपल्या घरात आपण जशी स्वच्छता टिकवतो तसेच स्वच्छता सर्वजणी ठिकाणी टिकवायला हवी हे आपल्या प्रत्येकाच्या मनात असायला हवा मते धार्मिक स्थळ असो प्रवासाचे ठिकाण असो आपण ही गोष्ट कटाक्षाने पाळली पाहिजे

    ReplyDelete
  4. खूप छान लेख लिहिला आहे. सर्वसाधारणपणे असे विषय कोणी लेख लिहिण्यासाठी घेत नाहीत, पण विषयापेक्षा विचाराला महत्त्व देऊन लिहिलेला हा लेख खूपच छान! ईस्काॅन मंदिराचा अनुभव प्रत्यक्ष घेतल्यासारखा आनंद झाला. 🙏🌹

    ReplyDelete
    Replies
    1. एका वेगळ्या विषयावरचा सुंदर व विचार करायला प्रवृत्त करणारा लेख.

      Delete
  5. Dr Adwait Padhye26 August 2023 at 21:18

    स्वच्छतागृह ही संस्कृतीच्या विकसितपणाचे प्रतिक असते!

    ReplyDelete

Post a Comment