नात्यातील डिलीट ऑप्शन....
चाबुकाचा फटकारा कसा लागत असेल, सटाककन. त्याचा वळही तसाच. लाल रंगाचा. पण फक्त चाबुकाचाच फटकारा लागतो का. नाही हो. शब्दांचाही लागतो. आणि त्याच्यामुळेही लाल वळ येतो. फक्त तो शरीरावर येत नाही तर मनावर असतो. या चाबुकांच्या फटका-यांचे वळ मी सोसत होते. अनिता बोलत होती. तिच्या वाक्यावाक्यानं मी जखमी होत होते. मनावरचे वार असह्य झाले आणि मी तिचा हात गच्च धरला. धरला काय जोरात दाबला. त्यात ती मनावर झालेल्या वळांची वेदना उतरली. अनिताला तो इशारा बाकी होता. ती थांबली. बघ, माझं कसं झालं असेल. आता पुन्हा हे नाव आपल्यामध्ये काढायचं नाही. मी आता तिच्या हातातलं बाहुलंच झाले होते. तिनं माझा हात हातात धरला आणि आम्ही पुन्हा कार्यक्रम चालू असलेल्या ठिकाणी गेलो. तिथे एकदम वेगळं वातावरण. हास्यविनोद. गप्पा. सर्व छान चाललेलं. माझा हात अजूनही अनिताच्या हातात होता. ती तशीच एका परिचितांच्या समोर उभी राहिली. नमस्कार झाला. आणि गप्पा सुरु झाल्या. क्षणांपूर्वी मला शब्दांच्या माध्यमातून आतून हादरवणारी अनिता आता कुठे गायब झाली होती. तिच अनिता आता मनमोकळेपणे हसत होती. बोलत होती. मी नकळत माझा हात तिच्या पाठीवर ठेवला. मी आहे, तुझ्या सोबत असा त्यात अर्थ भरला होता. न बोलताही अनिताला ते जाणवलं. हसतांनाच आम्ही दोघींनी एकमेकींकडे त्याच विश्वासानं बघितलं आणि त्या कार्यक्रमाचा भाग होऊन गेलो.
अनिता माझी मैत्रिण. काही मैत्रिणी अशा आहेत, की ज्यांची मैत्रीची नाती कधी पुढे गेली आहेत, हे कळंलही नाही. मैत्री नकळत कधीतरी नात्यात गुंफली जाते. अनिताची आणि माझी मैत्रीही तशीच. आम्ही दोघी कुठेही गेलो तरी एकमेकींची ओळख, माझी बहिण असाच करुन देतो. अनिता, आमच्याच जवळपास रहाणारी. तिचा लेक माझ्या लेकापेक्षा दोन वर्षांनी लहान. त्यांची शाळा एक. त्यामुळे सुरुवातीला बसस्टॉपवर जी ओळख झाली. ती कायमची. आता दोघींची मुलं शिक्षणासाठी पंख पसरुन बाहेर गेलेली. एवढ्या वर्षाच्या मैत्रीत कुठलं गुपित असं राहिलेलं नाही. अनिताची दुखरी नसही त्यापैकीच एक होती. अनिता तिच्या घरात धाकटी सून होती. तिच्या मोठ्या दिरानं तिच्या नव-याचा शिक्षणाचा सर्व खर्च केलेला. गावाला त्यांची शेती आहे. मोठं घर आहे. सासरे वारल्यानंतर अनिताची सासू गावातील शेती आणि घराची काळजी घेते. अनिताचं लग्न झालं तेव्हा, तिच्या नव-यानं मोठ्या भावाबद्दलचा आदर तिच्याकडे व्यक्त केला होता. लग्न झाल्यावर थोड्याच दिवसातच अनिताच्या लक्षात आलं होतं की तिच्या मोठ्या जावेचा स्वभाव प्रचंड कडक आहे. थोडीजरी चूक झाली तरी, चारचौघात तोडून बोलणार. बरं, चूक कोणती, आणि बरोबर काय, हे सर्व नियमही त्या जावेनंच ठरवलेले. सुरवातीच्या दिवसात तर अनिता सगळं शांतपणे ऐकून घ्यायची. पण तिच्या जावेच्या स्वभावात काही बदल झाला नाही. तिनं सासूबाईंना सांगितलं. तर त्यांनी हात वर कले. नंतर अनितानं बघितलं की, सासूबाईही जावेच्या तावडीतून सुटल्या नाहीत. तेव्हापासून ती जावेसोबत जाण्यासाठी टाळाटाळ करु लागली. कुठल्याही कामाला तिची ना नव्हती, पण कारण नसतांना
मिळणारा ओरडा तिला सहन करता येत नव्हता. दरवर्षी गावाला गेल्यावर होणारी मानसिक कोंडी ती सहन करत होती. नव-याला सांगून झालं. पण त्याच्याकडे काहीही उपाय नव्हता. अनेकवेळा चार महिला जमल्यावर अनिताची जाऊ, अनिताच्या नव-याच्या शिक्षणावर कसा खर्च केला याचे हिशोब सांगायची. शिवाय अनिताच्या प्रत्येक सवयीची थट्टा, मस्करी व्हायची.
अनिताला लेक झाला. त्याची
शाळा, क्लासेस ही सत्र चालू झालं. या सर्वांमागे अनितानं लपण्याचा खूपवेळा
प्रयत्न केला. ती काही तरी कारण काढून
जावेला टाळत होती. पण नातंच ते. कितीही दूर सारण्याचा प्रयत्न केला तरी
कुटुंबाच्या कार्यक्रमात भेट होत होती. आपल्या
धाकट्या जावेनं कायम आपल्या अधिकारात रहावं, याचा सुप्त आनंद घेणारी मोठी जाऊ
मनानं कधी मोठी होणार हा अनिताचा प्रश्न होता.
या मुद्द्यावरुन या नवरा-बायकोमध्ये अनेकवेळा वादही झाले. एरवी हसरी असणारी अनिता गावावरुन आली की रडवेली
झालेली असायची. ब-याचवेळा मानसिक दृष्ट्या
खचलेल्या अनिताला मी मानवी स्वभावाचे कांगोरे सांगून, जावेच्या वागण्याकडे दुर्लक्ष कऱण्याचा सल्ला
दिला आहे. पण दिवसागणिक त्यांच्या नात्यात
जेवढा दूरावा निर्माण झाला तेवढेच अनिताच्या मनातले प्रश्न वाढत गेले.
प्रत्येक गोष्ट त्या सांगतील तशीच का करायची. आपल्या मनासारखं केलं तर त्यात चूक काय आहे. चारचौघात समोरच्याला तोडून बोलण्यात काय आनंद
मिळतो. वर त्याला आपला स्वभावच
स्पष्टवक्ता आहे, म्हणून कोंदण का घालावं.
स्पष्टवक्ता नाही तर स्वार्थी स्वभाव नाही का हा. असे अनेक प्रश्न अनिता विचारायची. अर्थात मला.
पुढेपुढे अनिताच्या नव-यालाही ही गोष्ट समजली. तेव्हा अनिता लेकाच्या अभ्यासाच्या निमित्तानं
जाऊबाई असेल त्या कार्यक्रमांना दांड्या मारायला लागली. गावालाही जायचं टाळू लागली. या दोन्ही नवराबायकोनी सासूला याबाबत स्पष्ट
कल्पना दिली. सासूबाई हताश होत्या. त्या म्हणाल्या, घर तुटायला नको, एवढं
बघा. पण हा उपाय जाऊबाईंच्या अधिक
जिव्हारी लागला. कारण एरवी गावाला हातखाली
काम करायला अनिता असायची. कितीही बोललं
तरी अनिता सर्व कामं चोख करत असे. आता तिच
गावी जायची बंद झाल्यामुळे ही सर्व कामं मोठ्या जावेच्या अंगावर पडायला
लागली. त्यातून तिची चिडचिड अधिक
वाढली. चक्क अनिताच्या नव-यालाही तिनं
यावर सर्वांसमोर सुनावलं होतं. त्यानं
बिचा-यानं मोठ्या भावाकडे बघत वहिनीची बोलणी ऐकून घेतली.
मुख्य म्हणजे, आता अनितासारखीच अवस्था तिच्या लेकाचीही झाली
होती. कारण मोठ्या काकूची दहशत त्यालाही
जाणवू लागली होती. गावाला असतांना काकू
शब्दाशब्दाला त्याला अडवत होती. कधी आईनं
शिस्त लावली नाही म्हणून, तर कधी हातानं
निट जेवत नाही म्हणून. कौतुकाचे
चार शब्द नाहीत. त्यामुळे जशी अनिताच्या
मनात दहशत बसली, तशीच तिच्या लेकाच्याही मनात बसली. परिणामी एक चांगलं नांत दुरावलं. अनिता घरी आल्यावर कधी हा विषय निघाला की
विचारायची, यात माझा दोष काय. मी कितीवेळा
सांभाळून घेऊ. त्यांना कधी त्यांची चूक
समजणार. तिच्या या प्रश्नांना माझ्याकडे
उत्तर नव्हतं. गेल्या वर्षा-दोन वर्षात
अनितानं कधी हा विषय काढला नव्हता. त्यावर
मला वाटलं आता हे कोडं सुटलं असणार. तिच
अनिता कार्यक्रमात भेटली आणि हे नात्याचं गुंफण सुटलं नव्हतं, तर अनितानं त्याला
पार वर टांगून ठेवल्याचं समजलं.
ब-याच दिवसांनी अनिता आणि मी एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात भेटलो. अनिताची नातेवाईक मंडळी. माझ्या मित्रपरिवारातील कुटुंब. त्यामुळे आम्ही दोघीही या कार्यक्रमाला हजर होतो. दोघीही लगेच गप्पा मारायला लागलो. तेवढ्यात मला अनिताची जाऊ दिसली. ती सुद्धा या कार्यक्रमाला आलेली. मी सहजपणे बोलून गेले, अनिता, तुझी जाऊ बघ. आता बोलता ना तुम्ही. तेव्हाच अनितानं माझा हात पकडला. अगदी जोरात. मला ती बाहेर घेऊन गेली. आणि बोलत राहिली. अनितानं जावेबरोबर जमवून घेण्याचा प्रयत्न करुन बघितला. मध्यंतरी जावेकडे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात अनिता स्वतःहून गेली होती. सर्व सोहळ्यासाठी पडेल ते काम केलं. पण कार्यक्रम झाल्यावर अनिताच्या जावेनं पुन्हा तिला डिवचलं. सर्वांसमोर तिनं कसं
वागलं पाहिजे, याची उजळणी केली. अनिताला प्रचंड लाजल्यासारखं झालं. अपमान वाटला. काहीच चूक नाही. फक्त घरात लहान असणं हाच अपराध. तिथल्या तिथे तोडून बोलता येत नाही असा स्वभाव. यामुळे किती अपमान सहन करायचा आणि का. हा प्रश्न तिला पडला. तिथून बाहेर पडतांना अनिताच्या नव-यानं तिची माफी मागितली. पण अनितानं तेव्हाच निर्धार केला होता. तिनं सांगितलं की आजपासून माझ्या आयुष्यातून मी या बाईला डिलीट केलं आहे. ही बाई आणि तिचं अस्तित्व आता माझ्यासाठी संपलं आहे. मी सर्व प्रयत्न केले. पण आता नाही. माझ्यात कमीपणा असेल, पण मी इतकी वाईट नाही. मग मला वाईट बोलणारी, माझ्यात उगीचच निराशा भरणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात कशाला हवी. तिचा नवरा आत्तापर्यंत भाऊ की बायको, अशा दोलायमान परिस्थितीत वावरत होता. पण त्यादिवशीच्या घटनेनं त्यालाही खंबीरपणे बायकोची बाजू घ्यावी लागली. तेव्हापासून अनिता बदलली. पहिल्यांदा कुटुंबाच्या कार्यक्रमांना टाळणारी अनिता आता हक्कानं जाऊ लागली. मोठी जाऊ तिथे असेल तर ती नाहीच आहे, अशा थाटात वावरु लागली. काही दिवस तिचं वागण दबक्या चर्चेचा विषय झाला. पण कुटुंबात सर्वांनाच या दोघींचे स्वभाव माहित होते. त्यांनी अनिताला समजून घेतलं. आता माझी वेळ होती. मला अनिता म्हणाली, डिलीट केलं ग मी तिला माझ्या आयुष्यातून. मान्य, लग्न झाल्यावर आपलं सासर आपलं सर्वस्व असतं. पण म्हणून कितीवेळा सत्व गमवायचं. कितीवेळा स्वतःला निराशेत पाडून घ्यायचं. मी खूप विचार केला. एवढी वर्ष माझंच चुकलं. आता ती चूक दुरुस्त करतेय. कितीतरी वेळा अपमान झाला. तो पचवला. पण म्हणून समोरच्याची हिम्मतच वाढत गेली. यातून मलाच खूप निराशा आली होती. मी अशीच आहे, की काय अशी समजूत व्हायला लागली. आठव, तुझ्याकडे कित्तीवेळा येऊन रडलेय. हे कशाला. एक व्यक्ती आपल्याला जज करतो म्हणून. मग त्याचं जजमेंट कशावरुन चुकत नसेल. मी तसाच विचार केला. उगाच मनाला जखमी करायचं नाही. त्यापेक्षा त्या वक्तीला जे करायचंय ते करु द्या, पण माझ्यासाठी त्याचं अस्तित्वच शून्य आहे. हा विचार केला, तेव्हापासून मी या निराशेतून बाहेर पडले. आत्ता घरातही त्या बाईचा विषय निघत नाही. त्या काहीही बोलल्या तरी मला फरत पडत नाही. कारण त्यांचं अस्तित्वच माझ्यासाठी संपलं आहे. एकूण मला माझ्या आनंदाचं कारण मिळालंय. मी अनिताकडे बघत होते. ती बोलतांना माझ्या अंगावर सरकन काटा आला. मनुष्य स्वभावाला औषधं नसतं. पण चुकूनही असा स्वभाव नको, की कोणी कंटाळून आपल्याला थेट आयुष्यातूनच डिलीट करेल. एवढं स्वभावाचं अधःपतन नको रे बाबा.....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खरं आहे.काही माणसं,प्रसंग आपलं आयुष्य व्यापून टाकतात....तसं तर ती एक जगण्याची शिक्षा असते. अशावेळी असं खंबीर होऊन जगणं नवं बळ देते ! छान लेख.😊😊👍👍
ReplyDeleteअगदी असाच प्रकार माझ्या बाबतीत घडला आहे.फक्त फरक इतकाच की मी मोठी जाऊ असूनही सतत अपमान सहन केला आणि आता धाकट्या जावेला माझ्या आयुष्यातून डिलिट केले आहे.
ReplyDeleteकोणी असं वागतच का...हा पहिला प्रश्न मला वाटतो. समोरच्या व्यक्तीचं मन दुखेल असं वागून कोणतं समाधान त्यांना मिळतं हे तेच जाणो...पहिल्यांदा असं कोणाला डिलीट करण्याचा निर्णय घेतला की वाईट वाटतं. तो माणूस समोर आल्यावर चुकल्यासारखं वाटतं. पण त्यााचा स्वभाव पहाता आपला निर्णय योग्य असल्याची जाणीव होते.
Deleteअप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद
Deleteआदरणीय सई जी तुम्ही अतिशय योग्य असं पारिवारिक सामाजिक मोठा प्रश्न सुंदर रीतीने मांडलेला आहे आपण म्हणतो ती गोष्ट खरी आहे "घरोघरी मातीच्या चुली' त्यात आपली चूल वेगळी कशी करायची सन्मानाने कसे जगायचं हा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो हिम्मत फार कमी लोक करतात ज्यांनी हिम्मत केली ते या जीवनात यशस्वी झाले अन्यथा बाकी अशाच रहाटगाड्यात घुसमटत गेली
ReplyDeleteघरोघरी मातीच्या चुली....पण एका व्यक्तीच्या स्वभावामुळे या चुली दुभंगतात, याचे वाईट वाटते.
Deleteखरंय खूप छान
ReplyDeleteधन्यवाद
Deleteमी सुध्धा असे काही जणांना डीलिट केले आहे गेल्या १२ वर्षात आणि खूप खुश आहे...
ReplyDeleteछान.....सर्वात आपली मानसिक शांतता ही पहिली असते. नेहमी दुस-याची मने राखता राखता आपल्या मनाची शांतता कुठे तरी हरवली जाते. मग हे असे डिलीट ऑप्शन वापरावे लागते.
Deleteछान लिहिता तुम्ही विविध विषयांवर!! समोरचा माणूस बदलत नसतो ,आपणच आपल्यासाठी आपल्या विचारात बदल केलेले केव्हाही इष्ट!!
ReplyDeleteधन्यवाद डॉक्टर....सर्वाला औषध आहे, फक्त मानवी स्वभावाला औषध नाही, हेच खरं.
Deleteसुंदर लेख
ReplyDeleteधन्यवाद
DeleteKhup chhan lekh
ReplyDeleteखुप छान लेख आहे.👍👍👌👌
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteKhupach chhan
ReplyDeleteI can relate this, not for a year but for 23 years. Now started ignoring that lady with her nature and to those who are still supporting her even after knowing her behavior, for only the reason that she is holding the elder position. My foot
ReplyDelete