माझं नाव..माझी संपत्ती
दोन कळश्या, चार तांबे, स्टिलचे मोठे दोन डबे, टोप, वाट्या, मोदकपात्र, परात अशा ब-याचश्या गराड्यात मी बसले होते. घरातील जवळपास सगळी भांडी काढून घासून झाली होती. अगदी तांब्या-पितळीचे टोप आणि कळशाही चिंचेच्या कोळानं घासून लख्ख झाल्या होत्या. पंख्याखाली ठेवलेल्या या लख्ख भांड्यांवर आता मी हात फिरवत बसले होते. त्यावरील एक-एक नाव, तारीख चारवेळा वाचून झाली. सुट्टीचा दिवस. नवरा घरी. माझा हा सर्व पसरा बघत तोही सामिल झाला. किती भांडी आहेत. यातील तर कधी वापरत नाहीस, ही देऊन काही नवीन भांडी घेऊया, म्हणत नव-यानं पितळेचा एक मोठा टोप हातात घेतला. त्याच्या मनातला हेतू जाणून मी तो खचकन खेचून घेतला. त्यावर कोणाचं नाव आहे, हे वाचायचीही गरज नव्हती. आईनं दिलेला तो टोप होता. अगदी जड. माझ्या लहानपणापासूनचा. आईनं आठवण म्हणून दिलेला. तो कसा द्यायचा. त्यावर माझ्या कुठल्याश्या आत्याचं नाव, अशा आठवणी विकायच्या...नव-याला म्हटलं, राहूदे. अडचण नाही माझ्यासाठी. ही भांडी, यावरची नावं, ही माझी संपत्ती आहे. नव-याला ठसक्यात हे सांगून मी पुन्हा त्या भांड्यांवरील नावांवर हात
फिरवत राहिले. कितीही जुनी असली तरी, यातील प्रत्येक भांड्यांत एक आठवण जपली होती. आणि आठवणी विकल्या जात नाहीत, तशीच त्यांची किंमतही केली जात नाही.
दहा दिवसाच्या सुट्टीवर आलेला लेक आदल्या दिवशीच त्याच्या कॉलेजला
रवाना झालेला. हे दहा दिवस अगदी
फुलपाखरासारखे होते. लेकासोबत ते कसे गेले
हे समजले नाही. या दिवसांत अगदी श्वास घ्यायलाही
उसंत नव्हती, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.
दर अर्धातासानं काही तरी फर्माहीश.
दिवस रात्र स्वयंपाकघरात गेला. पण
तरीही कंटाळा आला नाही की थकवा. उलट हे
राहिलं, ते तुला आवडतं, करु का...अरे अजून खा, म्हणण्यात दिवस गेले. दहा दिवस लाड करुन घेऊन लेक रवाना झाला आणि मला
बैचेन करुन गेला. सारखी त्याची आठवण, एकाकी भावना. रविवारचा दिवस असूनही सकाळी लवकर उठले. व्यायाम, नाष्टा, जेवण सर्व करुन मोकळी
झाले. पुस्तक हाती धरलं, विणकाम करुन
झालं, तरी वेळ जाईना आणि मनही लागेना. मग घराची
साफसफाई हाती घेतली. माळ्यावर ठेवलेली
सगळी भांडी खाली काढली. वापरातील
तांब्याच्या कळश्या घेतल्या, डबे, वाट्या सगळं काढून साफसफाई सुरु केली.
ही भांडी म्हणजे, आपल्या एखाद्या मैत्रिणीसारखी असतात. कधीही एकटं
वाटलं तर त्यांची सोबत पुरेसं बळ देते. त्यावरील नावं, आणि तारीख वाचायची मला भारी हौस. लग्नाला पंचवीस वर्ष झाली, लग्नात मिळालेला भांड्याचा आहेर, मी जपून ठेवला आहे. नाही म्हणायला, काही भांडी खराब झाली, ती मोडीत निघाली. पण तरीही काही भांडी ही जपून वापरली. कारण ती ज्यांनी दिली होती, त्या सर्व व्यक्ती माझ्या आयुष्यात मानाचे स्थान असलेल्या आहेत. माझी आजी, लग्नात तिनं एक कळशी दिली होती. ती कळशी आजही मी रोज वापरते. कळशी घासतांना त्यावरील आजीच्या नावाला हळुवार हातानं साफ करते. त्यावेळी आजीसोबतची एखादी तरी आठवण जागी होते. तांब्याची एक मोठी कळशी, तांब्याचा मोठा तांब्या आणि पितळेची एक नाजूकशी कळशीही अशीच आहे. हळुवार आठवणी जपणारी. ही अमुल्य भांडी मला आईनं दिलेली. त्यावर माझ्या आजी आणि आत्यांची नावं आहेत. भांडी जुनी आहेत, तेवढीच जड आहेत. आत्ता या कळशा भरुन ठेवणं आणि त्यांची रोजची सफाई करणं जड जातं. तरीही घरात अधिकचे पाहुणे येणार असले तर पाणी भरुन ठेवण्यासाठी त्यांना बाहेर काढते. त्यातही पितळेची लहान कळशी माझी खूप लाडकी. शाळेत असतांना गॅदरिंग मध्ये माझ्यासोबत ही कळशीही हमखास सोबत असायची. त्या गॅदरींगच्या आदल्या दिवशी माझ्या तयारीपेक्षा या कळशीला घासण्यातच अधिक वेळ जायचा. आधी चिंचेच्या कोळानं मॉलिश मग चण्याच्या पिठाचा हात. पितळेची कळशी चमकून जायची. त्यावर एक मोग-याचा गजरा बांधला की तयार व्हायची. गॅदरींगच्या प्रत्येक फोटोमध्ये ही कळशीही आहे. आईनं ही भांडी दिली तेव्हा त्यांची काळजी घे, म्हणून सांगितलं होतं. काही भांडी ही घराचा एक भाग बनून जातात. कुटुंबात
त्यांचंही अस्तित्व महत्त्वाचं असतं. तसंच या भांड्यांच झालं आहे.
ही यादी मोठी आहे, पितळेचं घंगाळ, परात, मोदकपात्र, करंजीची कात्री अशी कितीतरी भांडी आहेत, जिवापाड जपलेली. घरात प्रत्येकाची एक जागा असते. तशीच जागा या भांड्यांनीही पकडली आहे. आत्ताही ही भांडी धूवून पुसून झाली. त्यावरील नावं वाचण्यात आणि त्या आठवणीनं मला पुन्हा ताळ्यावर आणलं होतं. लेकाचं नाव असलेले दोन डबे पुन्हा साखर आणि गुळ घालून त्यांच्या जागी ठेऊन दिले. एव्हाना नव-याला जाणीव झाली होती, मी कशाबरोबर लढतेय याची. लेक नसेल तेव्हाचा एकाकीपणा हा मोठा असतो. तो कधीही भरुन येऊ शकत नाही. पण त्यात डूंबून रहाण्यापेक्षा त्यातून बाहेर निघून आपला मार्ग पकडलेला कधीही चांगला असतो. या भांड्यांनी आपलं काम केलं होतं. मी मार्गस्थ झाले. सगळं आवरुन ठेवेपर्यंत संध्याकाळ झाली होती. संध्याकाळी कॉफी पितांना नव-यानं एक पत्रिका हातात ठेवली. मित्रपरिवारातील एक लग्न होतं. सहज म्हणून पत्रिका वाचायला घेतली. त्यात खाली महत्त्वाची टिप लिहिली होती. कुठल्याही भांड्यांचा आहेर करु नका. बापरे, असंही लिहितात का हल्ली, म्हणून मी नव-याला विचारलं. म्हणाला, हल्ली तुझ्यासारखा पसरा काढायला कोणाला आवडत नाही. नवीन
घरात नवीन भांडी घेतात सर्व. कितीतरी प्रकार आले आहेत. किचनच्या रंगाप्रमाणे रंगीत भांडीही असतात, तशीच घेतात. आपल्याकडे चार प्रकारचे डबे आहेत. आता नवीन मॉड्युलर किचनमध्ये सर्व एकाच प्रकारची आणि एकाच आकारातील डबे असतात. तू जरा एक डबा किंवा भांड काढायचं म्हटलं तरी ओरडतेस...काकांनी दिलंय, मामांनी दिलंय, यांचं नाव आहे, त्यांचं नाव आहे. तसं इथे नाही, हल्ली मुली हुशार असतात. त्या सगळं इंटिरेअर करुन घेतात. मी ठिक आहे म्हटलं. मला हे माहित नव्हतं का....ते ही चांगलंच आहे. नवी पिढी, नवे विचार...पण म्हणून काय माझी जपलेली भांडी जुनाट आहेत, नक्कीच नाही. गेल्या अनेक वर्षाची आमची अबोल मैत्री आहे आमची. मनाचा अशांतपणा अचूक टिपणारी, आणि त्यावर उपाय करणारी....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूप सुंदर लेख. माझ्या घरातही आहेत अशी भांडी जी आताच्या kitchen मध्ये match होत नाहीत. पण तरीही ती माहेर, प्रेम याची आठवण करून देतात. ती आपली संपत्ती आहे हे मला ह्या लेखातून कळाले. धन्यवाद
ReplyDeleteजुनं ते सोनं हे खरं आहे आणि आठवणी जितक्या जुन्या होत जातात तितक्या त्या सोन्यासारख्या होत जातात.. परंतु आजकाल मलाही वाटतं थोडं प्रॅक्टिकल वागायला शिकायला हवं आपण
ReplyDeleteजुनं ते सोनं, जपून ठेवण्याचा तुमचा आटोकाट प्रयत्न तुमच्या लेखातूनही जाणवतो.
ReplyDeleteइथे मी same pinch असं म्हणू शकतो कारण मलाही या वस्तूंचा संग्रह पाहायला आवडतो आणि अनामिक हुरहूर लावून जातो तो सुवर्ण काळ आपण जगल्याची.
माझा कडे हि खुप तांब्या पितळेची भांडी आहेत . ज्या दोन्ही आई ( आई नी सासूबाई ) न ची आठवणी प्रकर्षाने करतात.. आणि त्या भांड्यांचा रुबाबाच काही वेगळा आहे. आताची किती नवीन फॅशन ची भांडी येवोत पण ह्या भांड्याना तोड नाही कसली 😊
ReplyDeleteया लेखातून खूप शिकायला भेटल मला... खरंच खूपच छान ताई साहेब सांगायला शब्द नाही 😊😊😊😊
ReplyDeleteहल्लीच्या जमान्यात अशी जुनी भांडी पाहायला मिळत नाहीत,ज्यांनी जपून ठेवली आहेत त्यांना सलाम.जुन्या सोबत त्या आठवणी जोडलेल्या असतात ज्या नवीन पिढीला कळणार नाहीत.त्या जुन्या वस्तूंमध्ये आपण आपल्या आधीच्या pidhilapahat असतो.खूप छान आणि प्रेरणादायी विचार मांडले आहेत.
ReplyDelete