बॉम्ब आईस नावाचा हलवा

 

बॉम्बे आईस नावाचा हलवा


डायट बिएट ठिक आहे, पण जेवण संपल्यावर एक मिठाईचा तुकडा हवाच.  तू मिठाई कर नाहीतर मी बाहेरुन घेऊन येतो.  हे रोखठोक बोल नव-याचेच.  डायट आहाराचे कितीही प्रकार केले तरी त्याला ताटावर एक स्विट डिश लागतेच.  नेमकं गुरुवारी उपवास सोडतांना ताटात स्विट डिश नव्हती.  त्यामुळे चिडलेल्या नव-यानं या रोखठोक स्वरात नाराजी व्यक्त केली आणि गुळाच्या खड्यावर गोडाची भूक भागवली.  संक्रातीनिमित्तानं बनवलेल्या तिळाच्या वड्या एवढे दिवस होत्या.  नेमक्या त्या संपलेल्या.  बाहेरची मिठाई म्हणजे, काजूकतली आणि त्याच चवीच्या मिठाया.  त्या मिठाईत रंग आणि सुक्यामेव्याचा भडीमार जास्त असतो.  त्यामुळे या काजूकतलीला पर्याय म्हणून तिळाच्या वड्या, मोतीचूर लाडू, खोब-याच्या वड्या आमच्याकडे नित्याच्या असतात. पण आत्ता नवराच नाराज झाला म्हणजे, आता काहीतरी नवीन करायची गरज होती.  तेव्हाच आठवलं बॉम्बे आईस हलवा खूप दिवसात केला नव्हता.  कमी सामानात भरपूर होणारा हा हलवा करायलाही अगदी सोप्पा.


दुस-या दिवशी नवरा कामाला गेल्यावर बॉम्बे आईस हलव्याची तयारी सुरु केली.  एक वाटीचे प्रमाण.  मैदा, सारख, तूप आणि दूध या सर्वाचे सारखे प्रमाण.  एका कढईत सर्व मिक्स करुन त्याचा गोळा होईपर्यंत घाटायचं. त्यात वेलचीची पूड टाकायची.  हा गोळा तयार झाला की बटर पेपरवर ठेवायचा आणि लाटण्यानं अगदी पातळ लाटायचं.  त्यावर बारीक केलेले काजू, बदाम, पिस्ते टाकायचे.  पुन्हा एकदा हलकेसे लाटणे फिरवायचे,  आणि मग हवे तेवढे तुकडे कापायचे.  बॉम्बे आईस हलवा तयार.  पण एवढा सोप्पा पदार्थ सहजासहजी मी कशी करेन.  हा बॉम्बे आईस हलवा बनवायलाच घेतला तर त्यातला सॅण्डविचचा प्रकार करुया म्हणून तयारी सुरु केली केली.  सॅण्डविच.  तेही दोन प्रकारचे.  दोन फ्लेवरमधले.   

अननस आणि संत्र,  या दोन फळांवर मी अनेक प्रयोग केले आहेत.  नशिबानं ती दोन्हीही फळं घरी होती.  पहिल्यांदा अननसाला घेतलं.  मिक्सरमधून अननसाचा ज्युस करुन घेतला.  कढईमध्ये चमचाभर तुपावर हा अननसाचा ज्युस टाकला.  अननसाची आंबट चव जाणार नाही, एवढी बेतानं साखर घातली.  पंधरा-विस मिनीटात त्याचं घट्ट मिश्रण व्हायला सुरु होते.  आंबट गोड चवीचं हे मिश्रण होत आलं की घरभर अननसाची चव फिरु लागते. हिच हे मिश्रण तयार झाल्याची खूण.  अगदी हवा असेल तर नावाला पिवळा खायचा रंग टाकायचा.  अन्यथा यात इसेन्स आणि रंग टाकण्याची गरजही


लागत नाही.    असाच गोळा संत्र्यांच्या ज्युसचा करुन घ्यायचा. 

दोन प्रकारचे सॅण्डविचचे प्रकार होते, म्हणून चार बटर पेपर घेतले.  हलव्याचे मिश्रण या चार वेगवेगळ्या बटर पेपरवर पसरलं.  थोडं थंड झाल्यावर एकावर अननसाचा रस लावून घेतला.  नंतर त्यावर दुसरा भाग ठेवून त्यावर हवे तेवढे ड्रायफूटचे तुकडे टाकले आणि लाटण्यानं हलकेस लाटून घेतले.  मग असेच दुसरे बॉण्बे आईस हलव्याचे सॅण्डविच तयार करुन झाले.  एरवी बॉम्बे आईस हलवा पातळ लाटायचा असतो.  पण हा सॅण्डविच प्रकार थोडा जाडसर असतो.  पण याची चव अप्रतिम असते.  त्याचा पहिला तुकडा तोंडात टाकल्यावर हलव्याच्या मिश्रणातील वेलचीची चव आधी जाणवते.  मग त्यात दडवलेला अननस किंवा संत्र्याचा रस बाहेर येतो, आणि तोंडात या फळांची चव फिरु लागते. अशेच मनाप्रमाणे करुन झालेले हे बॉम्बे आईस हलव्याचे सॅण्डविच डब्यात भरुन ठेवले.  अगदी दोन तासांच्या अवघीत दोन डबा भरुन मिठाई घरात तयार झाली. 



रात्री जेवणावर हे दोन्हीही प्रकार ताटात होते.  नव-याची गाडी खूष.  या आईस हलव्याच्या सॅण्डविचचा पहिला घास घेतला आणि म्हणाला,  काजू कतलीपेक्षा भारी झाली आहे.  अजून काय पाहिजे.  लहान असतांना गोंद्या हलवा, बॉम्बे आईस हलवा, सुतारफेणी अशा मिठायांचा एक छोटा तुकडा मिळाला तरी हातात सोनं असल्यासारखं भारी वाटायचं.  तेव्हा आतासारख्या ड्रायफ्रूटच्या मिठाया नव्हत्याच मुळी.  पण जी मिठाई तेव्हा मिळायची, तिची प्रत्येकाची चव आणि खासियत वेगळी असायची.  कोणीतरी मुंबईचे पाहुणे आले की या मिठायांचे डबे दिसायचे, तेव्हा कोण आनंद व्हायचा.  मग ही मिठाई घरातली सर्वामध्ये वाटली जायची.  सुतार फेणीचा दो-यासारखा गोळा हातावर पडला की त्याचा प्रत्येक दोरा वेगळा करत चव चाखली जायची.  तसाच प्रकार बॉम्बे आईस हलव्याच्या बाबतीत.  त्याच्यावर असलेला बटर पेपरही हळूवारपणे दूर केला जायचा.  जेणेकरुन तो तुकडा अख्या बघण्याचं सुख डोळ्यांना मिळायलं हवं.  मग जिभेची पारी यायची.  छोटासा तो तुकडा जिभेवर गेला, की त्याचा तो परिचित स्वाद तोंडात भरुन जायचा आणि चेहरा खुलायचा.  तेव्हा कुठे अशी रोज मिठाई खायचे सुख होते, पण ज्या मिठाया मिळायच्या त्यांची चव अजूनही तोंडात खेळत असते.

आता मिठाईच्या दुकानात गेलं, तर सर्व सुक्यामेव्याचं राज्य असतं.  कुठलीही
मिठाई घ्या, त्यात सुक्या मेव्याचा भरणा जास्त असतो.  त्यामुळे त्यांची चव जवळपास सारखीच असते.  अर्थात त्या वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या आहेत, हे दाखवण्यासाठी त्याचे आकार मात्र बदललेले असतात.  त्यासोबत त्याच्यात भरपूर रंगाचा वापर असतो.  त्यातही त्या किती अमूल्य आहेत, हे दाखवण्यासाठी त्यांच्यावर सोन्या, चांदीच्या वर्कच्या आवरणाचा लेप असतो.  मिठाईच्या दुकानात गेल्यावर हे सजलेले मिठाईचे ट्रे बघायला मला खूप आवडतं,  पण त्यांची चव बघण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र मनात पहिला विचार येतो, की, ड्रायफूटच खायचे आहेत ना, मग ते असेच खाईन की, त्यासाठी मिठाई कशाला.

या सर्वात नव-यानं दोन्ही चवीचे बॉम्बे हलव्याच्या सॅण्डविचचे दोन-दोन तुकडे संपवले.  पाचवा तुकडा हातात घेऊन म्हणाला, आता हे संपले की मोतीचूर कर.  त्यातही वेगळा कुठला फ्लेवर वापरता आला तर बघ...तुला प्रयोग करायला काय....आता यावर काय बोलणार. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. khup chhan lekh

    ReplyDelete
  2. Changli mahiti

    ReplyDelete
  3. खूपच छान,पदार्थ करतेस.. आणि लिहतेस पण छान..

    ReplyDelete
  4. नुसतं वाचून पोट भरत नाही कधीतरी प्रत्यक्ष चव दे बरं

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच...आवडेल मला....

      Delete
  5. किती छान लिहिलंयस आणि हलवा पण किती सोपा आहे करायला!! तुझं सुगरण म्हणून करावं तेवढं कौतुक थोडच आहे... ललिता छेडा

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ललिला मॅडम....हे सर्व तुमच्यामुळे शक्य होतं...

      Delete
  6. खूप छान लिहिलंय!! सुगरण आहात,रूचिरा /तरला दलाल सारखं पुस्तक लिहा!

    ReplyDelete
    Replies
    1. ओ...किती छान सांगितलं डॉक्टर तुम्ही....धन्यवाद...

      Delete
  7. Nostalgic.
    लहानपणची आवडती मिठाई.आता जरा विस्मरणात गेलेली

    ReplyDelete
    Replies
    1. हो...अत्यंत चवदार मिठाई....

      Delete
  8. खूप छान खूप सोपं करुन सांगितल आहे.

    ReplyDelete
  9. मस्तच हलवा आणि रेसिपीही

    ReplyDelete
  10. मुंबई आईस नावाचा हलवा,खुप छान रेसिपी आहे.खाण्यापेक्षा पहातच रहावं अस वाटतं........लय भारी हाय!!!

    ReplyDelete
  11. महेश टिल्लू18 February 2024 at 18:31

    झटपट रेसिपी शिकलेली अचानक केव्हाही उपयोगी पडते, नेहमी पेक्षा वेगवेगळे पदार्थ try करायला आणि ते चवीने खायला खूप मजा येते.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद महेशजी...

      Delete

Post a Comment