आश्रम म्हणजे काय, याचा धडा.....

 

आश्रम म्हणजे काय, याचा धडा.....


चप्पल नही...चप्पल नही...पहले चप्पल उतारो...बाहर लिखा है...पढो...चप्पल पहेनके अंदर आना मना है...चप्पल उतारो और अंदर आवो....बरोबर पहाटेचे सव्वा पाच वाजले होते.  आम्ही गुजरातच्या जुनागढ शहरातील गिरनार तलेटीमधील गुरु गोरक्षनाथ आश्रमाच्या दारात उभे होतो.  हातात सामानाच्या बॅगा.  पहाटेच्या वेळी असलेली झोप अद्यापही डोळ्यावर होती.  आसपास अंधार आणि पहाटे असते तशी शांतता.  याच शांततेत जुनागढ रेल्वे स्टेशनपासून रिक्षा केलेली.  रिक्षाचालकास फक्त गुरु गोरक्षनाथ आश्रम असं सांगितलं,  त्यानंतर त्यानं सुसाट रिक्षा चालवत आम्हाला पंधरा मिनिटात आश्रमाच्या आवारात आणून सोडलं होतं.  हातातल्या चार बॅगा सांभाळत आम्ही प्रवेशद्वाराजवळ गेलो.  आत ब-यापैकी उजेड होता, आणि त्यातूनच गुरु गोरक्षनाथ आश्रम असे नाव लिहिलेली प्रवेशद्वाराची कमान दिसत होती.  त्यातच तो बोर्डही दिसला, चप्पल यहा निकाले....पण एवढ्या पहाटे कोण आडवतो...म्हणत आम्ही आश्रमात पहिलं पाऊल ठेवायचा विचार केला आणि त्याच पहिल्या पावलाला मागे घेण्याची वेळ आली होती.  भगवे कपडे घातलेले एक गृहस्थ पुढे आले...चप्पल घालून आम्ही आत येत असतानाच एवढ्या पहाटे त्या आश्रमातील काही मंडळी बाहेर पडत होती.  त्यांच्या हातात मोबाईल होता, आणि ते आश्रमाचे फोटो काढण्याचे प्रयत्न करीत होते.  त्यामुळे आमच्यावर आणि त्या मोबाईल धारकांवर एकाचवेळी ते गृहस्थ ओरडत होते.  पढे लिखे है...पर पढते नही...लिखा है, फोटोग्राफी मना है...चप्पल अंदर नही लाना...पर करेंगे नही...यामुळे आमच्या डोळ्यावरची उरली सुरली झोप उडाली.  आम्ही इथे दोन दिवस रहाणार होतो,  पण इथल्या नियमांची भीती मनात घेऊन आश्रमात प्रवेश केला.  अर्थातच पुढेचे दोन दिवस आयुष्याला नवीन आकार देणारे ठरले. 


गिरनारला जाणार हे नक्की केल्यावर जुनागढला कुठे रहायचे याची शोधाशोध सुरु झाली.  गिरनार शिखर जिथे येते, त्या भागाला गिरनार तलेटी म्हणतात.  गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या भागाला गुजरातची काशीही म्हणतात.  कारण अगदी पावलापावलावर मंदिरे आणि आश्रम या भागात आहेत.  येथे हॉटेलपेक्षा आश्रमांचीच संख्या जास्त आहे, त्यातच रहाणे सोयीस्कर पडते, असा आम्हाला सल्ला मिळाला होता.  सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांची माहिती जाणून घेतली.  गिरनारला जाणारे अनेक परिचित आहेत.  त्यांच्याकडूनही माहिती घेतली.  काही ठिकाणी फोन केले.  पण आम्ही ज्या ज्या आश्रमात फोन केले, ते आधीच बुक झाले होते.  एक आश्रमतर पूर्णपणे लग्नासाठी बुक होता.  मग गुरु गोरक्षनाथ आश्रमाचा पत्ता मिळाला. या आश्रमातून थेट गिरनारवरील दत्तमहाराजांच्या मंदिराचे दर्शन होते, हेही समजले.  त्यामुळे पहिल्यांदा फोनवरुन चौकशी करुया म्हणून फोन केला, तेव्हा तिथे आम्हाला हवी त्या तारखेला रुम असल्याची माहिती मिळाली.  अगदी मोजक्या शब्दात पलिकडून सांगण्यात आलं, तारीख, किती व्यक्ती, आणि किती दिवसांचा मुक्काम याची माहिती पाठवा.  मी लगेच वॉटसपच्या माध्यमातून ती माहिती पाठवली.  काही मिनिटं वाट बघितलं.  तास उलटला.  दोन तास झाले.  तरी त्याला काहीही रिप्लाय नाही.  आपल्याला अशा शांतीची आणि एवढ्या विलंबाची सवयच नाही ना.  मी लगेच फोन केला.  आमच्या बुकींगचे काय झाले.  किती पैसे पाठवू.  पण माझ्या आवाजातील अस्वस्थतेपेक्षा पलिकडचा स्वर कमालीचा शांत आणि आग्रही होता.  आपको दोन दिन मे बतायेंगे.  रुम बुक करने के लिए पहिलेसे पैसे नही देने है..वॉटसअपपर एकही मेसेज आयेगा...बाकी कुछ नही. 

हा फोन झाला आणि मी काळजीत पडले.  कारण कुठल्याही हॉटेलमध्ये बुकींग करतांना आधी पैसे भरावे लागतात.  त्यांचा मेसेज आला की आपली रुम बुक झाल्याची माहिती मिळते, आणि समाधानही.  पण इथे तसं काहीच नव्हतं.  मी मेसेज पाठवल्यावर चार दिवसांनी आमची रुम बुक झाली.  एवढाच मेसेज आला.  तिथे गेल्यावर बघुया म्हणून आम्ही प्रवासाच्या


तयारीला लागलो.  जुनागढमध्ये ट्रेन बरोबर पहाटे पाच वाजता दाखल झाली आणि तिथून रिक्षा केल्यावर आम्ही पंधरा मिनिटानी त्या आश्रमाच्या दारावर होतो. 

गेल्यागेल्याच आश्रमातील वातावरण बघून आम्ही दोघंही धास्तावलो होतो.  चप्पल काढून आत प्रवेश केल्यावर मात्र थोडासा श्वास घेतला. कारण आश्रम अतिशय मोठा होता.  चारमजली गोलाकार इमारत.  पांढरा शुभ्र रंग संपूर्ण इमारतीला देण्यात आला होता.  त्यातही आश्रमाच्या भल्यामोठ्या अंगणात काही मंदिरे होती आणि तीही पांढ-या शुभ्र संगमरवरी दगडात बांधलेली दिसत होती.  मी हे निरिक्षण करतांना नवरा आश्रमाचे बुकींग ऑफीस कुठे आहे, याची चौकशी करायला गेला.  तो तसाच परत आला, म्हणाला, कोणी बापू म्हणून आहेत, ते बाहेरच्या गाडीत झोपलेत, त्यांना उठवायला सांगितलं आहे.  हे सर्व बुकींग ते बघणार आहेत.  मला सांगून नवरा परत आश्रमाच्याबाहेर त्या बापूंना उठवायला गेला.  एव्हाना आमच्या पाठोपाठ आणखी काही मंडळी आली.  त्यांनाही चप्पल बाहेर काढण्याचा सल्ला मिळाला.  काही क्षणातच नवरा त्या बापूंसोबत आला.  त्यांच्याजवळ एक वही होती.  त्यांनी एक रांग लावायला सांगितली.  आमचा नंबर पहिला.  आधार कार्ड आवश्यक होते.  त्यांनी आम्हाला रुमची चावी दिली, पण आमचा प्रश्न होता, चप्पल.  त्यावर त्यांनी एका पिशवीमधून चप्पला रुममध्ये नेण्याचा सल्ला दिला.  तसेच बाहेर पडतांनाही अशाच पिशवीमधून चप्पला बाहेर नेण्याचे सांगितले.  नशिबानं एक कापडी पिशवी निघतांना मी बॅगेच्या कप्प्यात खोचली होती.  ती कामी आली.  आमची रुम चौथ्या माळ्यावर.  लिफ्टची सोय होती.  अतिशय प्रशस्त  आणि स्वच्छ लिफ्ट मधून आश्रमाच्या चौथ्या माळ्यावर गेलो आणि आमच्या मनातली आश्रमासंदर्भातील उरला सुरला संभ्रमही दूर झाला.  एखाद्या फाईव्हस्टार हॉटलेला मागे टाकेल अशी स्वच्छता होती, तशीच रुमही.  दोनच काय पण आणखी दहाजणंही या रुममध्ये राहू शकतील एवढी प्रशस्त.  गरम आणि थंड पाण्याची सोय.  मुख्य म्हणजे, रुमचा दरवाजा उघडला की समोर गिरनार शिखर.  सकाळी सात वाजता आम्ही दोघंही तयारी करुन बाहेर पडलो.  नाष्टा करुन गिरनार शिखर चढायची तयारी करायची होती.  आश्रम असल्यामुळ रुमसर्विस नाही.  खाली जाऊन चहानाष्ट्याची चौकशी केली, तर थोडावेळ थांबण्याचा सल्ला मिळाला.  आम्ही उशीर नको, म्हणून आश्रमाच्या बाहेर पडलो.  थोड्या अंतरावर दुकानं होती.  तिथून चहा, नाष्टा, कॉफी पिऊन आश्रमात परत आलो, तर तिथे चहा नाष्टा सुरु झालेला. 



दुसरे उंचपुरे गुरुजी पुढे आले, प्रसादी ली क्या...म्हणून आम्हाला विचारलं. 
काही समजेना.  मग त्यांनी चाय ली क्या म्हणून विचारलं.  आम्ही बाहेरुन नाष्टा केल्याचे त्यांना सांगितले.  तेव्हा ते चिडले.  बाहर से खाया.  क्यू.  पैसे जादा है.  बाहर का खाना नही.  आश्रमे  खाना.  चलो,  म्हणून त्यांनी आम्हाला नाष्ट्या जिथे मिळत होता तिथे जायला सांगितले.  जेवणाची जागा अतिशय प्रशस्त आणि स्वच्छ.  पुरुष आणि महिलांना बसायची सोय वेगवेगळी.  आम्ही आता नावालाच नाष्टा घेऊया म्हणून तिथे गेलो.  पुरीभाजी, ढोकळा, भजी, कढी आणि मोहनथाळ असा बेत होता.  शिवाय चहाही.  नव-यानं पहिल्यांदा चहा घेतला.  पहिला घोट घेतल्यावर त्याचा चेहरा उजळला.  नंतर चौकशी केल्यावर समजले,  आश्रमात गिर गाईंसाठी मोठा गोठा आहे.  त्या गिर गाईंच्या दुधाचा चहा होतो.  पाण्याचा एकही थेंब नाही.  जेवढा हवा तेवढा प्यायचा.  नव-याचा चहाचा दुसरा पेला चालू असतांना मी कॉफीची चौकशी केली.  कॉफी नव्हती, पण पाच मिनीटानंतर माझ्यासमोर कॉफीचा तांब्या भरुन ठेवण्यात आला.  कॉफी पेल्यात ओतून घेतली आणि पहिला घोट घेतल्यावर माझीही नव-यासारखी प्रतिक्रीया होती.  दुसरा कप घेऊ का म्हणून विचारायला गेले, तेव्हा त्यांनी तो सर्व तांब्या माझाच असल्याचं सांगितलं.  नाष्टाही असाच, जेवढा हवा तेवढा घ्यायचा.  आश्रमात रहायला येणा-या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य मंडळीही आता आश्रमात येऊ लागली होती.  चहासाठी दुधाचे कॅनच्या कॅन रिकामे होत होते.  पण अजिबात आवाज नाही.  कमालीच्या शांततेत सर्व काम चालू होतं.  आश्रमात महिला आणि पुरुषांच्याही पोशाखाबाबत कडक नियम आहेत.  महिलांसाठी नियम असतात, असे सांगून नव-यानं हाफ पॅन्ट घातली होती, या सर्व दरम्यान त्याला चार जणांनी नियमांची आठवण करुन दिली, आणि पुन्हा अशी चूक नको अशी समजही दिली.  

आम्ही थोड्यावेळानं गिरनार शिखर चढण्यासाठी निघालो.  त्यानंतर थेट रात्री अकरा वाजता आश्रमात दाखल झालो.  सकाळी आलेला अनुभव बघून गिरनार शिखर उतरतांना फोन करुन जेवणाची सोय एवढ्या रात्री आहे का हे विचारले.  तेव्हा रात्री बारा वाजता आलात तरी गरम जेवण मिळेल, असा निरोम मिळाला.  गिरनार शिखर चढल्याचा सर्व थकवा आश्रमातील सात्विक जेवणानं दूर झाला.  रात्री अकरा वाजताही अनेक मंडळी जेवत होती.  जेवण गरम होते.  चपाती, बाजरीची भाकरी, दोन भाज्या, खिचडी, भजी, मोहनथाळ, कढी असा बेत होता.  प्रत्येकजण जेवढं हवं तेवढं वाढून घेत होते.  आम्ही थकलो होतो.  त्यामुळे अतिशय आरामात जेवण केलं.  जेवल्यावर प्रत्यकानं आपलं ताट स्वतः स्वच्छ करायचं.  मध्येच कोणी साधू येत होते.  त्यांचीही जेवणाची सोय होत होती.  पण कुठलाही आरडाओरडा नाही की गोंधळ नाही. 


दुस-यादिवशी पहाटे चार वाजता जाग आली ती आश्रमात होणा-या आरतीनं



आणि त्याला सोबत असणा-या वाद्यांच्या आवाजानं.  सकाळी बघितलं तर आश्रमाचे अंगण भरले होते.  राजस्थानमधील महिलांचा एक मोठा ग्रुप आलेला.  त्यांचा चहा आणि नाष्टा चालू होता.  मंदिराच्या याच भागात भोलेनाथ, अंबामाता, गणपती आणि हनुमानाची मंदिरे आहेत.  शिवाय गुरु गोरक्षनाथांचेही मंदिर आहे.  पांढ-या शुभ्र मार्बलमधील या मंदिरांकडे बघितले तरी प्रसन्न वाटत होते.  शिवाय अखंड धुनीही जिथे होती, तिथेही मनाला शांती मिळेल असेच वातावरण.
 सायंकाळी जेव्हा जुनागढ बघून परतलो तेव्हा तेथील गुरुजी भेटले.  त्यांनी आश्रमाची माहिती सांगितली.  गेली कितीतरी वर्ष या आश्रमातर्फे असेच अखंड अन्नदान केले जाते.  हजारो भाविक येऊन प्रसाद घेऊन जातात.  महाशिवरात्रीला तर येथे लाखो शिवभक्त येतात.  त्यांच्यासाठी जेवणाची सोय असते.  चोवीस तास जेवणाची सोय असते, तीसुद्धा कुठलेही मुल्य न घेता.  आज हजारो भाविक या आश्रमाला जोडले गेले असल्याचे त्या गुरुजींनी सांगितले.  त्यांच्यासोबत गप्पा मारतांना रात्रीचे अकरा वाजून गेले.  आम्ही रुममध्ये परतलो, तेव्हा धक्का बसला.  कारण नव-याचा फोन मिळत नव्हता.  त्या गुरुजींबरोबर आम्ही बोलत असतांना त्यांनी फोन बाकड्यावर ठेवला होता.  नवरा धावत खाली उतरला, तर ते गुरुजी हातात फोन घेऊन हसत उभे होते.  डरो मत, यहांसे कुछ नही जाता...म्हणत त्यांनी फोन नव-याच्या हातात दिला.  या दोन दिवसांच्या मुक्कामात आम्ही गुरु गोरक्षनाथ आश्रमाच्या याच सात्विक वातावरणाच्या प्रेमात पडलो.  दुस-या दिवशी सकाळी आश्रम सोडतांना आश्रमाच्या अंगणात अनेक पक्षी मुक्तपणे फिरत होते.  आम्हाला भेटलेले गुरुजी समोर आले.  प्रसादी घेऊनच जाण्याचा आग्रह केला.  महाशिवरात्रीला अवघे काही दिवस होते, म्हणून रुक जा बेटा दोन दिन, बाबा को मिलकेही जाना म्हणूनही प्रेमाची साद घातली.  पण आम्ही प्रवासाच्या वेळापत्रकात अडकलो होतो.  पुढच्यावर्षी महाशिवरात्रीला येऊ, म्हणून त्यांना सांगून आश्रमाच्या बाहेर पडलो.  आश्रमात रहाण्याची ही आमची पहिलीच वेळ होती, पण आपल्या परंपरा काटेकोरपणे पाळल्या की किती मानसिक समाधान मिळते, याचे प्रत्यक्ष उत्तर आम्हाला मिळाले होते.  शिवाय जय श्री गोरक्षनाथ,  आदेश या शब्दांची ताकदही समजली.  

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. खूप छान लिहिले आहे ताई

    ReplyDelete
  2. सुंदर .
    मी पण त्या आश्रमाच्या प्रेमात पडले .
    पुढच्या वेळेला नक्की तिकडे जाणार

    ReplyDelete
  3. आश्रम श्रम नाहीसा करणारा आहे.हे तुझ्या लेखातून कळले.छान कधी जायचे असेल तर नक्कीच इथे जाऊ..

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती मिळाली !!

    ReplyDelete
  5. कित्ती सुंदर छान लिहिलय सविस्तर माहिती पण मिळाली.

    ReplyDelete
  6. महेश टिल्लू17 March 2024 at 19:12

    खूप परिपूर्ण आणि वास्तववादी प्रवासवर्णन.गुरू गोरक्षनाथ आश्रम तुम्ही वाचकांसमोर उभा केलात.कुणालाही हा आश्रम पहायची वा मुक्काम करायची इच्छा होईल अशी माहिती आपण दिलीत.असेच लिखाण करीत जावे.

    ReplyDelete
  7. खुप छान माहिती व वर्णन...

    ReplyDelete

Post a Comment