केल्यानं पर्यटन

 

केल्यानं पर्यटन


कैसे हो....भुले तो नही...चलो आगे का प्लॅन करते है...अगदी भक्कम आवाजातला हा फोन आला आणि मी खळवळून हसले.  केल्यानं पर्यटन, काय मिळतं, तर मैत्रिणींच्या खजिन्यात वाढ होते, याचा प्रत्यय मला आला आहे.  गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या पर्यटनानं तर भारतभरातील मैत्रिणी भेटल्या.  मुळात फक्त मैत्रिणी भेटल्या असे नाही, तर आपल्या समृद्ध, संपन्न देशाची एक छोटीशी सहल करता आली.  यामुळे आमच्या दोघांच्याही वैयक्तिक अनुभवात वाढ झाली.  घरात बसून, टिव्हीमधून प्रत्येक प्रांत बघता येतो.  पण प्रत्यक्ष त्या भागात गेल्यावर तेथील माणसांना भेटता येतं,  त्यांच्याबरोबर संवाद साधता येतो,  आणि त्यातूनच आपल्या देशाच्या संपन्नतेचं कोडं सुटत जातं.  यावेळी झालेल्या आठवड्याच्या भ्रमंतीत असे अनेक प्रसंग आले, की जिथे आमच्या मनातील शंकांचं जाळं आपसूक गळून गेलं. 


जुनागढ, गिरनार, सोमनाथ म्हणजेच प्रभास पाटण आणि द्वारका असा आमचा दौरा झाला.  गेल्या काही वर्षापासून बाहेर फिरायला गेल्यावर आम्ही आमच्यापुरता एक नियम आखून घेतला आहे.  तो म्हणजे, शक्यतो हॉटेल निवडतांना साध असावं आणि जेवण स्थानिक चवीचं.  यावेळी याच नियमातून जुनागढच्या गुरु गोरक्षनाथ आश्रमामध्ये उतरलो होतो.  आश्रम असला तरी फाईव्हस्टार हॉटेल मागे पडेल अशा थाटाचा.  पहिल्यांदा आश्रम असा असावा का प्रश्न पडला.  येथील दोन दिवसाच्या मुक्कामात येथील गुरुजींबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली.  त्यांनी आस्थेनं माझे प्रश्न ऐकून घेतले.  मग त्या आश्रमाच्या भव्य कामाचा परिचय करुन दिला.  आश्रमात रोज हजारो भाविकांना मोफत भोजन दिले जाते.  त्याची माहिती मिळाली.  हे सर्व करतांना कुठलिही अपेक्षा नसते.  आश्रमात ठराविक कालावधीनंतर रहायला येणारी मंडळीही अनेक आहेत.  ही मंडळी आश्रमाच्या अन्नछत्रासाठी मदत करतात.  त्यापैकीच एकीबरोबर माझी जेवतांना ओळख झाली. सुनिता नावाची ही मैत्रिण गुजराथची.  डॉक्टर आहे.  दोन मुलं.  एक हैद्राबादला कुठल्याश्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर.  तर दुसरा मेडिकलचे शिक्षण घेतोय.  सुनिताचे पतीही डॉक्टर आहेत.  अहमदाबादमध्ये त्यांचा मोठा बंगला आहे.  पण हे सर्व सुनिताबरोबर खूप गप्पा मारल्यावर कळंल.  बाकी सुनिता अत्यंत साधेपणानं वावरत होती.  बोलता बोलता ती सहज बोलून गेली, आयुष्य इतकं व्यस्त झालंय की घड्याळ बघायला सुद्धा वेळ नाही.  मग आपल्याला थांबायला हवं हे कसं समजणार.  हा प्रश्न तिला आणि तिच्या नव-याला

काही वर्षापूर्वी पडला.  तेव्हा त्या दोघांनी एक वेळापत्रक बनवलं.  दोघंही वर्षातून दोनवेळा या आश्रमात येऊन आठवड्याभरासाठी रहातात.  आसपासच्या मंदिरांत जातात.  पण यात साध्या वाहनांचा वापर करतात.  अगदी बसनंही प्रवास करतात. शेअर रिक्षाही चालतात.  यातून काय मिळतं.  तर सुनिता सांगत होती, माणसं मिळतात.  त्यांच्या स्वभावाचे पैलू समजतात.  इथून परत गेल्यावर आम्ही पुन्हा आमच्या व्यवसायात व्यस्त होणार आहोत.  पण जेव्हा आमच्यासमोर रुग्ण येतो, तेव्हा आमचा त्याच्याप्रतीचा भावहा सारखाच असतो.  अनेकवेळा साधा कामगारही येतो,  तेव्हा हा कशाला आला, असा प्रश्न मनात येत नाही.  उलट त्याच्याबरोबर आस्थेनं अधिक बोललं जातं.  हा बदल इथे येऊन झाल्याचे सुनितानं आवर्जून सांगितलं.  अर्थातच सुनितानं मला अहमदाबादला रहायला येण्याचं आमंत्रण दिलं आणि मी तिला आमच्या घरी आग्रहानं बोलावलं आहे. 

सोमनाथ-द्वारका या शहरांमध्ये फिरतांनाही असाच अनुभव आला.  मुळात


जुनागढ ते सोमनाथ या प्रवासाठी आम्ही जी गाडी केली होती, त्यामुळे एका अफलातून माणसाबरोबर ओळख झाली.  जोशी नावाच्या या गृहस्थांची गाडी आम्ही बुक केली होती.  जोशी म्हणजे, चालते बोलते माहितीपुस्तक.  त्यांनीच आम्हाला बजावून सांगितले होते की, सोमनाथला तुम्हाला जी मंडळी भेटतील तिच द्वारकेला असतील  आणि नंतर तिच बेट द्वारकेला.  त्यातीलच काहीजणं तुमच्यासोबत परतीच्या प्रवासात असतील.  त्यामुळे चांगला ग्रुप होईल.  जोशींचा हा सल्ला तंतोतंत खरा होता.  कारण सोमनाथाचे दर्शन घेण्यासाठी जी रांग होती, त्यापासून सुरुवात झाली.  पश्चिम बंगालमधून आलेला एक आठजणांचा ग्रुप होता.  शिवाय ओडिसा, राजस्थान, आंध्रप्रदेश, बिहार मधून आलेली मंडळी या रांगेत उभी होती.  भाषेचा अडसर दूर झाला.  अवघ्या पंधरा मिनिटात ओळखी झाल्या. नंतर सोमनाथमधील अन्य स्थळांना भेटी देतांना यातील प्रत्येकाची वेगळी ओळख मिळाली.  हा या राज्यातला.  तो हा भाषिक.  हे भेद या सर्वांबरोर संवाद साधतांना दूर झाला. 

पश्चिम बंगालमधून आलेला आठजणांचा ग्रुप अधिक बोलका होता.  फोटोच्या निमित्तानं परिचय झाला आणि एकमेकांच्या राज्यांच्या गोडव्यापर्यंत गेला.  पश्चिम बंगालमधील वातावणाबद्दल मी पहिल्यांदा विचारले.  तेव्हा त्यांचे उत्तर होते,  हां थोडा गडबड है...पर हम हमेशा अच्छाही बोलता है....आपना गांवका बदनामी बाहर नकी करनेका....एवढं सांगून ती महिला मनसोक्त हसली.  तिच्या हसण्यातच खरं तर माझ्या प्रश्नाचे उत्तर होतं.  पण किती छानपणे ती व्यक्त झाली होती.  भालका तिर्थस्थानावर बसून आम्ही गप्पा मारल्या.  तेव्हा या महिलेकडून समजले,  की ही मंडळी भारतभर फिरत असतात.  वर्षातून किमान चारवेळा तरी फिरतात.  तेही भारतातील प्राचीन


मंदिरांमध्ये आवर्जून जातात.  का, तर आपल्या देशाची संस्कृती किती उज्ज्वल आहे, याची माहिती त्यातून होते.  सोबत कुटुंबातील लहान मुलांनाही घेतात.  त्यांनी आपला देश म्हातारपणी नाही, तर बालवयातच पहायची गरज आहे.  यावर माझा पहिला प्रश्न होता, मग त्यांच्या शाळा बुडत नाहीत का.  तेव्हा त्या बंगाली बायका किती मोठ्यानं हसल्या.  शाळेमध्ये फक्त पुस्तकातलं शिकवतात...आणि फिरल्यावर आपण त्या स्थळी प्रत्यक्षात जाऊन माहिती करुन घेऊ शकतो, हे तिनं सांगितलं.  फक्त सांगितलच नाही, तर तिच्यासोबत असणा-या मुलांना माझ्यासमोर उभं केलं, आणि काय काय बघितलं हे सांगण्यास सांगितले.  त्यावर त्या लहान मुलांनी मला जी माहिती सांगितली होती, ती पुस्तकातही नव्हती हे नक्की. 

द्वारकेला आम्ही गोमतीनदी घाटावरील एका साध्या हॉटेलमध्ये उतरलो होतो.  त्याच्या अगदी समोर गोमतीनदी आणि समुद्राचे संगम होते ते स्थान.  हा गोमती घाट आणि त्यावर भेटलेली मंडळीही अशीच अमुल्य होती.  मुळात गोमतीच्या घाटावर आम्ही गेलो तेव्हा हजारो सीगल पक्षांचा वेढा पडला होता.  त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी कितीतरी मोबाईल फोटोग्राफरची गर्दी झालेली.  त्यात काही परदेशी पर्यटकही होते.  रात्री हा घाट नदिपात्रात सोडलेल्या दिव्यांनी सजून जातो.  आम्ही दोघंही असेच दिवे सोडून घाटावर निवांत बसलो असतांना दोघं परदेशी पर्यटकही शेजारी बसले.  लंडनमधून आलेलं हे दोघं गेल्या महिन्यापासून भारताच्या कानाकोप-यात फिरत आहेत.  आता कुठे जाणार हा प्रश्न केला तर अजून नक्की नव्हतं.  दोघंही द्वारकेच्या प्रेमात पडलेले.  इथल्या सर्व मंदिरांना भेट देऊन झालेली.  फारकाय बांधणीच्या साड्या करतात, ते कारखानेही पाहून झालेले.  त्यांनी आमच्यापेक्षा जास्त माहितीचा भंडार गोळा केला होता.  आवडला का भारत,


हा प्रश्न आम्ही विचारला आणि त्यांनी आपला देश म्हणजे, काय हे आम्हालाच सांगितले.  त्यांच्यामते भारत म्हणजे, विविधता,  प्रत्येक ठिकाणचे फूड वेगळं, ड्रेस वेगळा, भाषा वेगळी.  पण एवढं असूनही सगळे एक...हे सांगतांना दोघांनीही एकाचवेळी खांदे उडवले.  आता दोघंही उत्तराखंडमध्ये जाणार आहेत.  तिथल्या कुठल्याश्या आश्रमात राहून योग, प्राणायामचे धडे घेणार आणि मग आपल्या देशात जाणार.  त्यांच्यामते आमच्या देशात सर्व आहे,  पण इथे फिरण्यात मजा आणि शांती एकाचवेळी मिळते, ती नाही. 

या उत्तरांनी मला आठवलं होते,  मध्यंतरी चारदिवस परदेशात राहून आलेल्या एका मैत्रिणींनं आवाजाच्या वरच्या पट्टीत विचारलं होतं, मग तू कधी परदेशात जाणार आहेस की नाही, की इथेच डोमेस्टिक डोमेस्टिक करत रहाणार...तेव्हा मी तिला सांगितले होते,  अग पहिला आपला देश तर बघून होऊदे.  तो झाला की बघूया.  अर्थातच आपला देश किती दिलदार आहे, याची प्रचिती या छोट्या छोट्या पर्यटनातून येते.  कारण आमच्या आठवड्याभराच्या या पर्यटनातून अनेक मित्र मैत्रिणींचा ठेवा मिळाला.  विशिष्ट भाषेबद्दल मनात असलेला किंतू दूर झाला.  आणि हो, पुढच्या प्रवासाची ओढ लागलीय. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

      

Comments

  1. आदरणीय सईजी नमस्कार
    सुंदर प्रवासाचे वर्णन केलेले आहे

    ReplyDelete
  2. सुंदर प्रवास वर्णन

    ReplyDelete
  3. खूप छान प्रवास वर्णन.

    ReplyDelete
  4. Khup chaan pravas varnan

    ReplyDelete
  5. khup chhan pravas varnan

    ReplyDelete
  6. खूप छान प्रवास वर्णन

    ReplyDelete
  7. सुंदर प्रवासवर्णन !!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद डॉक्टर...

      Delete
  8. छान लिहिलंय! आधी आपला देश बघायला हवा.

    ReplyDelete
  9. विविधतेत ऐक्याचे दर्शन फक्त आणि फक्त भारत भूमीत होते.खरे आहे ,संपूर्ण भारत पहावा.जे इथे मिळेल ते बाहेरच्या देशात मिळणार नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं महेशजी....

      Delete

Post a Comment