चैत्राचं सोनं
बाहेर ऊन आहे, बाहेर ऊन आहे...आठवड्याचे सुरुवातीचे तीन दिवस या वाक्यावर काढले. फ्रिजच्या भाजीच्या ट्रेमध्ये भाजीच्या नावावर ब्रोकली, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा आणि गाजर एवढचं उरल्यावर एक दिवस बटाट्याच्या भाजीनं साजरा केला. पण गुरुवारच्या पुढे जायचं असेल तर भाजीची पिशवी घेऊन बाजारात जायलाच हवं याची जाणीव झाली. ऊन आहे. असणारच. अशी मनाची समजूत काढून बाहेर पडेपर्यंत सकाळचे साडेदहा वाजून गेले. पण एकदा ती भाजीची पिशवी हातात असली आणि बाजारात ताडगोळ्यांपासून ते काजू गरापर्यंत सर्व मेवा उपलब्ध असेल तर उन्हाचा कितीही चटका का असेना काहीही फरक पडत नाही, याचा प्रत्यय मला पुढच्या काही तासात आला. दुपारी दिडच्या सुमारास घरी परतले. तेव्हा दोन्ही हातातील पिशव्या टम्म फुगल्या होत्या. त्यात काय नव्हतं,
शेवग्याच्या फुलासारखी हलकी फुलकी भाजी, ते वजनदार कलिगंडापासून काजू बियापर्यंत बहुतांशी रानमेवा या पिशव्यात होता. मग काय अख्खा दिवस या भाज्यांच्या आणि फळांच्या आसपास गेला.
चैत्र महिन्यातील उन्हाचा कडाका काय आहे, याची जाणीव घरात बसल्यावरही होत आहे. त्याच उन्हाच्या कडाक्याचा अनुभव घेता घेता, या उन्हाळ्यातील सोनेरी बाजाराची झलक बघता आली. मुळात सूर्य कितीही तापला असला तरी त्याच्या उन्हाच्या झळा सुसह्य करण्यासाठी लागणारी सर्व सामुग्री बाजारात उपबल्ध आहे. अर्थात त्यासाठी थोड्या तरी उन्हाच्या झळा सोसण्याची तयारी करावी लागते. अशीच तयारी मी करुन बाहेर पडले. सोबतीला दोन पिशव्या घेतल्या. मनातील उन्हाची भीती जात नव्हती, त्यामुळे कधी नव्हे ती रिक्षा केली. रिक्षानं जिथे स्टेशन परिसरात सोडलं, तिथूनच या उन्हाळी बाजारातील चवींचा खजिना खुला होण्यास सुरुवात झाली. एका बाजुला ढिगभर विलायती चिंचा विकायला आल्या होत्या. दोघी आदिवासी महिला त्याचे वाटे करण्यात गुंग होत्या. एक चिंचेचा तुकडा चविला बघू म्हटल्यावर त्यांनी अख्ख बोंडच हातात दिलं. गोड हाय...हे त्यांनी सांगायला आणि मी ते चाखायला एकच वेळ पडली. गोड म्हणजे, म्हातारीचा कापूस मिळतो ना, तशाच चवीचे. मी तिन वाटे घेतले.
एक फक्त पिकलेल्या चिंचाचा. तर दोन वाटे जरा कच्च्या असलेल्या चिंचांचे. त्याच्याच पुढे जाम, हिरवी करवंद घेऊन एक महिला बसली होती. जाम म्हणजे, या गरमीमध्ये बर्फाचा गोळा खाल्याचा अनुभव देणारे फळ. अगदी रसाळ आणि गोड. मग जाम, करवंदाचे वाटे घेऊन झाले.
आता बाजारात आल्यावर आणि आवडीच्या भाज्या, फळं मिळायला सुरुवात
झाल्यावर त्या उन्हाच्या झळा कुठल्या कुठे पळून गेल्या. पुढे काय आहे, त्या कोप-यावर भाजीवाल्या बसल्या
असतील, त्यांच्याकडे कुठली भाजी असेल, अशी मनाला उत्सुकता लागली. परिणामी चालण्याचा वेग वाढला. माझा अंदाज बरोबर होता. बाजार अक्षरशः चैत्राच्या सोन्यानं बहरला
होता. अशावेळी जो उत्साह येतो, तोच माझ्या
अंगात आला. पहिली नजर गेली ती शाही
भाजीवर, अर्थातच हिरव्या बियांमध्ये
दडलेल्या काजू बियांवर. भाजीवाल्या महिलेकडे
अवघ्या दहाबारा काजू बिया सोललेल्या होत्या.
बाकी काजूचे गर तसेच घेतले. त्यासोबतच
फणसाचा पाराही होता. आता खरी माझी परीक्षा
सुरु झालेली. कारण मोजून दोन पिशव्या
आणलेल्या. त्यात एक भाजी वजनानं जास्त, तर
दुस-या भाज्या फुलाप्रमाणे हलक्या. नाही नाही
करता फणसाचा लहानसा पारा घेतला. त्यासोबत
चार कै-या, रातांब्याचा वाटा आणि शेवग्याच्या फुलांचे दोन वाटेही मिळाले.
आणखी थोडं फिरल्यावर चोखायच्या आंब्यांचा वाटा मिळाला. आणि चक्क तोरणं मिळाली. घरात पांढ-या कांद्यांची गावाहून आलेली माळ आहे, पण बाजारात तशीच माळ दिसल्यावर मोह मात्र सुटला नाही. परिणामी पिशव्यांमधील वजनाची जाणीव होऊ लागली. आता घरी परतण्याची वेळ झालेली. आणखीही काही भाज्या घेतल्या. पण हातात दोन पिशव्या असल्या तरी रिक्षा केली नाही. न जाणे आणखी काही आवडती भाजी, फळं वाटेत
असतील आणि रिक्षाच्या नादात ती मिळणार नाही. याच विचारानं पिशवीत एक छोटी कलीगडाची कळी आली. टरबूज आलं. नाजूक ताडगोळेही अलगद बसले. एवढं होऊनही रिक्षा करुन घर गाठायचा विचार मनातही आला नाही. उसाच्या रसाचा मोठा ग्लास रिचवल्यानं दुपारचा एक वाजला तरी मला सुसह्य वातावरण वाटत होतं. आणखी अर्धा तासानं घरी आले तेव्हा मात्र घामाघूम झाले होते. पण हातातल्या पिशव्या खाली केल्यावर सर्व थकवा कुठल्याकुठे पळून गेला.
पहिल्यांदा त्या जामवर मोर्चा वळवला. आमच्या रेवदंड्याला या मौसमात ही जाम फळाची झाडे एवढी भरुन येतात,की ब-याचवेळा त्या वजनानं फांद्याही तुटतात. पहिला जाम तोंडात टाकल्यावर तीच झाडं नजरेसमोर आली. मग एक-एक जाम खात बाकीची साफसफाई सुरु झाली. पहिली किचकट कामं. त्यामुळे फणस स्वच्छ धूवून शिजण्यासाठी ठेवला. एकीकडे रांजणं साफ करुन झाली. ताडगोळे स्वच्छ करुन थोडे थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये गेले. शेवग्याच्या फुलांना पाण्यात टाकून ठेवलं. विलायती चिंचेची विभागणी केली. पिकलेली चिंच खाण्यासाठी आणि कच्ची चिंच भाजीसाठी. आयत्यावेळी ही भाजी करता येत नाही, त्यामुळे चिंच सोलून त्यातील काळ्या बिया वेगळ्या केल्या. त्याचे छोटे तुकडे केले आणि स्वच्छ धुवून भाजी थोडी वाळायला ठेवली. ही दुस-यादिवसाची सोय होती. आलं, लसूण, हिरवी मिरची, कडिपत्ता, राई, जिरं, आणि हिंग यांची फोडणी आणि वरुन भरपूर कांदा यावर ही विलायती चिंच परतायची. अगदी पाच-दहा मिनीटात भाजी तयार होते. हवं असल्यास खोबरं आणि कोथिंबीर. एक वेगळा प्रकार. मी नाशिकला होते, तेव्हा आमच्या हॉस्टेलसमोर मोठं विलायती चिंचेचं झाड
होतं. तिथे काम करणा-या मावशी कायम या चिंचेची भाजी करायच्या. त्यांनी एकदा चव चाखायला दिली होती. मला कच्चा फणसाच्या भाजीसारखीच ती भाजी लागली होती. त्याचा म्हणे, डायबिटीजच्या रुग्णांना फायदा होतो. मला त्याची ही औषधीय गुणवत्ता माहित नाही, पण चव नक्कीच चांगली लागते. त्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा ही विलायती चिंच घरी येते. असो.
पुढचा नंबर त्या हिरव्या करवंदांचा.
त्यांची चटणी हा सर्वोत्तम पदार्थ.
त्यांना कापून, बिया वेगळ्या करुन खोबरं, जिरं, मिरच्या, नावाला कडिपत्ता,
मिठ आणि साखर टाकून चटणी तयार झाली.
रात्रीच्या जेवणात ही चटणी नाचणीच्या नीर डोशांसोबत सुरेख जाईल, हा विचार
आला आणि नाचणीचे पिठ भिजवलं. सोबत
शेवग्याच्या फुलांच्या भाजीची तयारीही केली.
त्यालातर फार खटपटही नाही.
लसणाच्या पाकळ्या ठेचायच्या फोडणीवर ब-यापैकी कांदा आणि त्यावर थोडीशी हळद,
मिठ. बस्स. मग शेवग्याची फुलं परतली की भाजी तयार. ही फुलं साफ करुन ठेवेपर्यंत अर्धे जाम संपवून
झाले होते. माझा मोर्चा मी त्या रांजणांवर
वळवला. एव्हाना, फणस शिजला होता. त्याला थंड पाण्यात ठेवून तो साफ करायला घेतला. नव-याच्या डब्याला दुस-या दिवशी ही फणसाची भाजी
आणि तांदळाच्या भाक-या हा बेत नक्की केला.
फणस शिजवून आणि बारीक करुन ठेवला की भाजी करतांना फार वेळ लागत नाही.
आता त्या कै-या आणि रातांबे राहीले होते. त्यातल्या दोन कै-या सोलून त्याचे बारीक तुकडे करुन वाळवत ठेवले. दोन कै-या सोलून त्याचे बारीक तुकडे, गुळ, जिरं आणि काळं मिठ हे मिक्सरला फिरवून घेतलं. या आंबट गोड चटणीला वरुन तुपाची कडिपत्ता, जिरं आणि हिंग टाकून फोडणी दिली. पुढच्या आठवड्यातली पानातील एक बाजु पक्की झाली होती. रातांबेही असेच साफ करुन घेतले. साखर आणि रातांब्याची सालं पंख्याखाली ठेवले. बाकी एक रातांबा ठेवला होता. सोलकढीमध्ये त्याची जागा नक्की झाली. एवढं सर्व होईपर्यंत रांजणंही संपली. सोललेल्या काजूबिया पाण्यात गेल्या आणि अख्खे गर
कापायसाठी सुरीला तेल लावून ठेवलं. एव्हाना दुपारचे तीन कधी वाजून गेले, हे कळलंच नव्हतं. जेवणाची इच्छा नव्हती. मग ती कलिंगडाची लहानशी कळी कामाला आली. कलिंगडाचे तुकडे करुन ठेवतांना त्यातले अर्धेअधिक तुकडे पोटात गेले. बाकीच्या भाज्या साफ करुन फ्रिजमध्ये गेल्या होत्या. पुढच्या पाच-सहा दिवसांचे काम झाले होते. आता ते पाच दिवस पुन्हा उन्हाचे कारण देत घरी बसता येणार होतं. नंतर मात्र पुन्हा असेच सोने लुटण्यासाठी बाजाराची फेरी होणार होती
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूप छान वर्णन करतेस सई. अगदी आंखो देखा हाल. तुझ्या स्टॅमिनाची कमाल आहे मात्र. विलायती चिंचेची भाजी पहिल्यांदा ऐकली. कलिंगडाच्या सालीची चटणी तसेच कलिंगडाच्या सालीचा जो पांढरा भाग असतो त्याची भाजी किंवा भोपळ्यासारखं भरीत, आणि सांडगे आपण करतोच. मी तर कलिंगडाची साल थालीपीठ मध्ये घालते खूप सुंदर थालीपीठ होतात.
ReplyDeleteपुढच्या ब्लॉकची उत्सुकता.
मस्त लिहिलं आहेस सई
ReplyDeleteविलायती चिंचेची भाजी पहिल्यांदाच ऐकली