माझं काय चुकलं...
माझ्या हातात दिलेली पत्रिका वजा ते मोठं बंडल मी परत केलं. मला खरच शक्य होणार नाही. एकतर लग्नासाठी संपूर्ण आठवडा जाणार आणि त्यात त्या लग्नाला जी तयारी अपेक्षित आहे, ती मला जमणार नाही. मला माफ कर. म्हणत मी माझ्या घरात आलेल्या जोडप्यासमोर हात जोडले. अगदी रोखठोक भूमिका घेतल्यानं नवराही थोडा चकीत झाला होता. पण माझ्यापाठोपाठ त्यानंही माफी मागत हात जोडले. आमच्या समोर उभं असलेल्या जोडप्यानं ती पत्रिका हातात घेतली, पण त्यांच्या चेह-यावरील आश्चर्याचे भाव काही कमी होत नव्हते. अहो, एका आठवड्यानं काय होतं, आणि आजकाल तर लग्नात हे सर्व करतातच, त्यात काय झालं, चला तर...पण या एक-दोन मिनिटाच्या कालवधीत आमची मतं ठाम झाली होती. आम्ही दोघांनाही पुन्हा विनम्रपणे नकार दिला. आमच्या जागी अन्य कुणाला तरी बोलवा. आम्हाला राग येणार नाही. आम्ही नंतर तुमच्या घरी येऊन नवविवाहित जोडप्यांला शुभेच्छा देऊ, असे सांगितल्यावर मात्र त्यांनी काय बुवा...अशा थाटात खांदे उडवले. त्यांच्या त्या पत्रिका वजा जाडजुड आमंत्रणाला त्यासाठी असलेल्या खास पिशवीमध्ये ठेवत आमचा निरोप घेतला. ही मंडळी गेल्यावर मात्र मी पहिला नव-याला विचारला, माझं काही चुकलं का....त्यावर त्यानं नाही म्हटलं. आपल्याला जे पटत नाही, त्याला नकार दिला पाहिजे, तुझं काहीही चुकलं नाही.
त्याच्या त्या उत्तरानं मी थोडी निर्धास्त झाले. झालं असं की, आमच्या परिचितांपैकी एक जोडपं रविवारी घरी आलं. सुरुवातीला साधारण गप्पा झाल्या. त्यांनी माझ्या पुस्तकाचे कौतुक केले आणि हातात एक पुस्तकासारखी वस्तु दिली. ओळखा पाहू म्हणून आम्हाला त्यात काय आहे हे ओळखायला सांगितले. आम्हालाही आश्चर्य वाटलं. कारण त्याचं पॅकीग अप्रतिम होतं. पुस्तकच होतं ते. पण पहिली दोन पानं उलटली आणि कळलं की या पाहुण्यांच्या लेकीचं लग्न ठरलं आहे, आणि ही लग्नाची पत्रिका होती. कधी आहे लग्न, म्हणून मी तारीख शोधण्याचा प्रयत्न केला तर लग्न पार ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे. तेव्हा मुहूर्त आहे का...हा माझा पहिला भाबडा प्रश्न आला, तेव्हा त्यांनी अगदी मोजके मुहूर्त आहेत, म्हणून सांगितले. मग माझा आणखी एक प्रश्न, अहो, ऑगस्टमध्ये लग्न आहे ना, मग आत्तापासून का पत्रिका वाटत आहात. आणि ही पत्रिकाच आहे ना, एवढी मोठी पत्रिका मी पहिल्यांदाच बघत आहे, म्हणून त्यांना सांगितलं. एव्हाना मी ती पत्रिका वजा पुस्तक वाचण्यापेक्षा ते पुढे मागे कसे आहे हेच अधिक बघत होते. त्याच्यावर लावलेली कागदची फुले सुरेख, नाजूक होती. ती कशी केली, तो कागद कुठला याच्या विचाराचे चक्र माझ्या डोक्यात चालू झाले. तेवढ्यात ते गृहस्थ म्हणाले, नुसतं मागे पुढे पहाण्यापेक्षा ही पत्रिका वाच, त्यात तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
खरोखरच ती पत्रिका वाचनीय होती. त्यात त्या लग्नाचा सगळा कार्यक्रम
सविस्तर लिहिला होता. अगदी लग्न सोहळ्यात कुठले कार्यक्रम होणार आहेत आणि त्या सोहळ्यांसाठी कुठला ड्रेसकोड ठरवला आहे, हे सुद्धा पत्रिकेत लिहिले होते. लग्न गोव्याला होणार होते. एकुण आठवड्याचा सगळा सोहळा होता. त्यामुळे पहिल्या पानावर गोव्याला जाण्यासाठी असलेल्या सगळ्या प्रवाससुविधांची माहिती होती. स्वतःच्या गाडीनं गेल्यास किती वेळ लागेल, हे सांगून रोडमॅप दिला होता. खाजगी बसची माहिती होती. तर ट्रेनचे नंबर आणि वेळाही होत्या. तशीच माहिती विमानांबद्दलही होती. मी अंदाजानेच शेवटचे पान उघडले, तर त्यात गोव्याहून परत येण्यासाठीच्या प्रवासाबद्दल सगळी माहिती दिलेली होती. गोव्याला पोहचल्यावर रेल्वे, बस स्थानक आणि विमानतळाहून खास व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याची माहिती आणि त्या फार्महाऊसचे फोटो होते. त्यात रहाण्याची व्यवस्था कशी आहे, याची माहिती होती. मग लग्नामधील सर्व कार्य़क्रमांची माहिती देण्यात आलेली होती.
मेहंदी, हळद या लग्नपूर्व कार्यक्रमात संगीत नावाचा कार्यक्रम कधी जोडला गेला काय माहित, इथे त्याच्यासह असेच आणखी चार कार्यक्रम होते. या सर्वांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांची थिम ठेवण्यात आली होती. लग्नाच्या दिवशी आणखी वेगळा गेटअप. त्याच्यासाठीही सांगण्यात आलेल्या कपड्यांच्या प्रकारात विशिष्ट रंगाचेच कपडे घालायचे होते. पुन्हा संध्याकाळी बीचपार्टी हा प्रकार. त्याचा पुन्हा वेगळा गेटअप. मी एक-दोन-तीन करत या लग्नासाठी किती कपडे घ्यायला लागतील, हे मनातच मोजायला सुरुवात केली तर ती संख्या आठवर येऊन थांबली. लेक येण्याचा प्रश्नच नव्हता. त्याची याबाबत मतं माझ्यापेक्षा अधिक ठाम आहेत. माझ्या मनातला कपड्यांचा हिशोब सुरु होता. आठ अधिक आठ....ही बेरीज बहुधा नव-यानंही माझ्यासोबत केली होती. कारण त्यानं माझ्याकडे त्याचवेळी बघितलं, आणि त्याच्या चेह-यावरील भाव या बेरजेपुढे गेल्याचे दिसत होते. बरं एवढ्यावरच पत्रिका थांबत नव्हती. तर गोव्यामध्ये त्या फार्म हाऊसच्या आसपास काय आहे, याची माहिती दिली होती. लग्नातल्या बिझी शेड्यूलमधून तेथील काही किना-यावरही फिरायला जाता येणार होतं. नशीब त्यासाठी कपड्यांची थिम नव्हती. पण लग्न सोहळा संपल्यावर तेथील एका देवीच्या मंदिरात सगळ्यांना नेण्यात येणार होते. इथे सर्वांच्या साड्यांचे रंग काय आहेत, आणि पुरुष मंडळींच्या झब्याचे रंग कुठले असावेत याची माहिती होती. म्हणजे आता नऊ-नऊ अशी बेरीज झाली होती. पुढच्या सर्व पानावर त्या जोडप्याचे फोटो होते. प्रीवेडींग शुट केलं होतं. त्यातील काही
फोटो लावून ती पत्रिका वजा पुस्तक सजवण्यात आले होते.
मी ती हातातली पत्रिका तशीच बंद केली. बहुधा याच क्षणाची वाट ते पाहुणे बघत होते,
म्हणाले, कशी वाटली. तुला आवडली
असणार. चांगली तयारी कर. आरामात शॉपिंग कर. त्यासाठीच एवढ्या आधी पत्रिका दिली आहे. मस्त गोवा ट्रिप होईल, आणि लग्नसमारंभातही
सामिल व्हा. या सर्वांसाठी आम्ही किती
तयारी करत आहोत. भरपूर शॉपिंग चालू
आहे. तुला म्हणून सांगते, या सर्व
सोहळ्यात बेस्ट ड्रेस, बेस्ट कपल अशाही स्पर्धा आहेत, तर तुम्ही दोघं तयार व्हा
आणि जिंकूनच दाखवा. मला त्यांच्या या
बोलण्यावर हसावे की रडावे हे कळेना.
त्यांच्या एकुलत्या एका मुलीचे लग्न होते.
लग्नात हौसमौज करावी. पण माझ्यामते
ही हौसमौज नव्हती, तर निव्वळ पैशांची उधळपट्टी होती. आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार लग्नासाठी घेतलेले
स्पेशल कपडे हे पुन्हा कधी फारसे वापरता येत नाहीत. ते तसेच एका बॅगेत बंद रहातात. आणि या सोहळ्यात तर सांगितलेला ड्रेस कोड अगदी
वेगळा होता. आमच्या दोघांच्याच कपड्यांचा
खर्च बघितला तर तो आकडा पन्नास हजाराच्या घरात जाणार होता. हा एवढा खर्च फक्त एका आठवड्यासाठी करायचा आणि
नंतर त्या कपड्यांना गुंडाळून ठेऊन द्यायचे.
ही गोष्ट मला काही पटत नव्हती. मी
त्यांना तसं सांगून बघितलं. तर अजून काही
माहिती मिळाली. या सर्व सोहळ्यासाठी
स्पेशल व्हिडिओ शुटींग होणार होतं. रिल
बनवण्यात येणार होते. एक कोरिओग्राफर
नेमला होता. त्यांनी या सगळ्या सूचना
दिल्या होत्या. त्या संगीत सोहळ्यात होणारी गाणीही ठरली होती. त्यानुसार ड्रेसकोड ठरवण्यात आला होता. आमचे नाव ज्या गाण्यासाठी होते, ते ऐकले आणि
नव-यानं पहिला डोक्यावर हात मारुन घेतला.
मग पहिल्यांदा त्यानं बचावाचा पहिला मुद्दा मांडला. सुट्टी मिळणार नाही. मी सुद्धा तोच मुद्दा पुढे रेटला. माझे काम एवढे दिवस थांबवता येणार नाही. पण ते पाहुणे काही ऐकेनात. नाही, तुम्हाला यावेच लागेल, यावर ते ठाम होते. मग मात्र मी सुरु झाले. त्यांना स्पष्ट सांगितले. एका लग्नासाठी एवढा खर्च करणे मला चुकीचे वाटते. मुळात हे सर्व कपडे नंतर कधी घातले जात नाहीत. नुसते पडून जातात. असा निष्पळ खर्च करणे मला आवडत नाही. तुम्ही आम्हाला माफ करा. आम्हाला तुम्ही या
सोहळ्याला बोलवले याचा आनंद आहे. पण आम्हाला येता येणार नाही. आमच्याजागी तुम्ही अन्य कुणाला बोलवू शकता. नाराज होऊ नका. रागवू नका. आमची भूमिका समजून घ्या, म्हणत मी त्यांच्यापुढे हात जोडले. ही वाक्य बहुधा त्यांना अपेक्षित नव्हती. अहो, तुम्हाला काय कमी आहे, बघा लग्न होतं कसं ते, पुढे तुमच्याही घरात लग्न होईल, तेव्हा असाच प्लॅन तुम्हाला करता येईल म्हणून त्यांनी अजून आग्रह केला. आम्हाला काही कमी नाही, हे मान्य, पण जे आहे ते असं उगाच खर्च करावं, या मताची मी नाही, मला खरच शक्य नाही. माफ करा म्हणत मी पुन्हा हात जोडले. यावेळी नवराही पुढे आला. त्यानंही माझीच वाक्य पुन्हा बोलून दाखवली. आलेल्या पाहुण्यांसमोर हात जोडले. आलेल्या पाहुण्यांनी एकमेकांकडे बघितले आणि ती जाडजुड पत्रिका आपल्या हातात घेतली. त्याच्या छानशा पिशवीत ती भरली. औपचारिक गप्पा मारत आमचा निरोप घेतला.
ही मंडळी गेल्यावर आम्ही दोघं बराचवेळ शांत बसलो होतो. नंतर या बदलत्या लग्नपद्धतीबाबत चर्चा
झाली. त्यातून निष्पन्न काय झाले, तर
ज्याचे विचार जसे, तसे त्याचे आचरण. लग्न
हा एक संस्कार आहे. त्या संस्कारमध्ये अशी
चमक धमक आली की बहुधा त्याचे डेस्टिनेशन मॅरेज होत असावे....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूप छान लेख
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDeleteMast lekh
ReplyDeleteTumhi khup chaan lekhika aahaat
पैशाची मस्ती तत्त्वाने जिरविणे. लग्न हा एक पवित्र विधी आहे, दोन कुटुंबाचे मनोमिलन आहे. तुमचे तत्व व रोखठोकपणा हे या भंपकपणाला डोळ्यात अंजन घालणारे आहे.
ReplyDeleteआदरणीय सई जी नमस्कार
ReplyDeleteतुम्ही तुमच्या लेखात अतिशय सुंदर पत्रिकेचे वर्णन केलेले आहे लग्न समारंभात काय काय आणि कशा कशा पद्धतीने नवीन एकविसाव्या शतकातील नियोजन आणि आयोजन कसे केले जाते याचे सुंदर वर्णन केलेले आहे
मात्र..
पूर्वी लग्न सोहळा आणि समारंभ हा आप्तेष्टांना नातेवाईकांना मित्रांना एकत्र येण्याचे एक निमंत्रण म्हणून आयोजित केले जात होते त्यात कुठलीही थीम नव्हती होता तो फक्त ज्याच्या त्याचा मानपान जो सहाजिकच आहे समाज रचनेत.
आता तशी परिस्थिती राहिलेली नाही सर्वसामान्य व्यक्तीला लग्न पार पाडणे म्हणजे एक दिव्य आहे त्यात अति हौशी मंडळी त्यांच्या योग्यतेनुसार विवाह समारंभ पार पाडतात!!
हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा एक भाग असतो..
निर्णय आपल्यावर असतो की आपण पारंपारिक सामाजिक न्यायव्यवस्थेला धरून चालणारे विवाह सोहळ्यास उपस्थित रहावे की सद्य परिस्थितीत प्री-वेडिंग शूटसह होणाऱ्या विवाह सोहळ्याला उपस्थित रहावे
धन्यवाद
दादा पाटील
Very nice
ReplyDeleteजबरदस्त कान उघाडणी केली आहेत, पण आपल्यासारख्या तत्त्वनिष्ठ माणसांना हल्ली समाजात "बावळट" , "अडाणी", "मागासलेले" किंवा काहीच नाही,तर "कंजूष" वगैरे विशेषणे लावून फटकारले जाते आणि आपण केलेल्या विरोधाला "आमच्यावर जळतात!" सारखे उद्गार काढत आपल्या अनुपस्थितीत भरभरून टीका होते, हा माझा स्वानुभव आहे. त्यामुळे कोणतेही विधान करताना दहा वेळा विचार करून ह्यावर अभिप्राय लिहावा लागेल, ह्याची जाणीव ठेवून मगच, "व्यथित मनाने " हा अभिप्राय लिहीत आहे.
ReplyDeleteखुप छान लेख आहे👍👍👌👌
ReplyDeleteखूप सुंदर लेख
ReplyDeleteThe Best ! Supperbbb !
ReplyDeleteखरंच पैशाचा उन्माद असणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालेल असा लेख. सध्या लग्न हा एक इव्हेंट झालाय. लग्नात केल्या जाणाऱ्या विधिमधील पवित्रता बाजूला पडली आहे. नोकरी करणाऱ्या मुली करतातंच पण नोकरी न करणाऱ्या मुलींसुद्धा लग्नात भरपूर खर्च करतांना दिसतात.
ReplyDeleteछान लेख
ReplyDeleteअशा तरहेचे लग्न सोहळे हे ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांनी करावेत मात्र त्यात आलेल्या पाहुण्या विषयी गरीबा प्रमाणे आपुलकी , माया प्रेम असत नाही.अशी लग्न म्हणजे तांत्रिक नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असतो.बाकी सर्व दिखाऊपणा.हाच आपण आपल्या लेखात रेखाटला आहे.छान
ReplyDelete