एका दिवसाचा बसप्रवास आणि...

 

एका दिवसाचा बसप्रवास आणि...


बुधवारी सकाळी अचानक बोरीवलीला काम निघालं.  या मार्गावर एरवी आम्ही जातो, तेव्हा ट्रेन, मेट्रोतून प्रवास करतो.  पण बुधवार म्हणजे, मधलाच वार.  ट्रेन फुल्ल असणार हा विचार करत बसचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला.  ठाण्याहून बोरीवलीला जाणा-या एसी बसचा उपयोग झाला.  सुरुवातीला बस बराचवेळ ट्रॅफीकमध्ये अडकते, अशी भीती नव-यानं घातली, पण ट्रेनमधील गर्दीपेक्षा ट्रॅफीक चालेल म्हणून मी बससाठी आग्रह धरला.  जातांना आणि येताना झालेल्या या बसप्रवासात दोन्ही वेळीही वेगळे अनुभव आले.  खरतर अशाच प्रवासामधून ज्या व्यक्ती भेटतात, त्यांच्याक़डून काहीतरी शिकता येते.  बुधवारचा माझा दिवस असाच दोन टोकाच्या अनुभवांचा ठरला. 

ठाण्याहून बोरीवलीला साधारण सकाळी साडेदहाची बस मिळाली.    टिकीट काढतांना एक सुखद धक्का बसला.  माझं तिकीट अवघं पंचवीस रुपयात झालं.  महिलांसाठी तिकीटाचे पैसे कमी आणि बसमधील एक बाजु राखीवही. बसमध्ये फार गर्दी नव्हती.  नशीबानं ट्रॅफीकही फार नव्हतं, त्यामुळे तासाभरात बोरीवलीला पोहचेल हा अंदाज घेत, हाती पुस्तक घेतलं.  पण पुस्तकातील शब्दापेक्षा एका महिलेचा आवाज भारी होता.  त्यामुळे नकळत


मन ती काय बोलत आहे, याचा वेध घेऊ लागले.  बहुधा ती तिच्या लहान बहिणीबरोबर बोलत होती.  बहिणीला दोन दिवस तिच्या घरी रहायला बोलवत होती.  अग, असं काय करतेस, किती दिवसात आपण भेटलो नाही, ये की दोन दिवस रहायला.  तिकडून बहिण बहुधा नाही सांगत होती.  तिच्या लहान मुलाला सर्दी झाली होती.  त्यामुळे येता येणार नाही, नाहीतर सासूबाई चिडतील असं ती सांगत होती.  ही कारणं ताई,  काही ऐकायला तयार नव्हती.  ऐक ग राणी, दोन दिवस वेळ काढ.  आम्ही दोघंच असतो ग.  कंटाळा येतो, कधीकधी.  तु आलीस तर जरा बरं वाटेल.  बोलायला आणखी एक माणूस येईल घरात.  तुझ्या लेकाची आम्ही दोघं काळजी घेतो.  पहिल्या पावसाची सर्दी असेल ग.  तुला वाटत असेल, तर तुझ्या सासूबाईंची मी परवानगी काढते.  तुझा हा फोन झाला की लगेच त्यांना फोन लावते.  हवं तर त्यांनाही घेऊन ये की.  तरीही त्या बहिणीचा नन्नाचा पाढा संपत नव्हता.  पलीकडून ती बहिणीला तिच्या आणि तिच्या नव-याच्या ऑफीसच्या धावपळीचे कारण देत होती.  बहिणीने हे कारणही फेटाळले.  कसली धावपळ.  काही नाही.  आणि दोन माणसांच्या जेवणात तिस-याचे जेवण करायला कितीसा वेळ लागतो ग.  तू निमित्त सांगू नकोस.  ये ग...तुझ्या आवडीचा स्वयंपाक करते.  आम्ही दोघं असल्यामुळे फारसं काही वेगळं होतच नाही बघ.  तू आलीस तर जर दोन पदार्थ होतील घरी.  आता बहुधा त्या बहिणीकडचे सगळे बहाणे संपले होते.  ती बघते, म्हणाली, आणि इकडे हिला हायसं वाटलं.  मग दोघी बहिणींच्या सुखाच्या गप्पा सुरु झाल्या.  हा सगळा संवाद एवढ्या मोठ्यानं आणि खुल्यादिलानं चालू होता की बहुधा बसमधील सगळे प्रवाशी माझ्यासारखे त्याकडे कान लावून बसले होते.  कारण मोठ्या आवाजत बोलणा-या या महिलेला दहीसर नाका येईपर्यंत कोणीही रोखले नाही.  दहीसर नाका आला तसा या दोघींच्या संवादाला थांबा मिळाला.  एव्हाना तिकडून लहान बहिणीनं या ताईकडे दोन दिवस रहायला येणार असं आश्वासन दिलं होतं.  ती बहिणीला विचारत होती, तुला काय हवं ते सांग, मी भाज्या घेऊनच घरी जाते.  बाळाला काय आणायचं, तेही सांग.  दोघी बहिणी फोनवर  आता हसत गप्पा मारत होत्या. 

या फोनवरील संवादानं मला विचार करायला भाग पाडलं.  बहिणीची आठवण यायला लागली.  आम्ही बहिणीची छोटीशी पार्टी नेहमी होते.  पण ती उभ्या उभ्याच.  म्हणजे, संध्याकाळी ती आमच्याकडे येते किंवा आम्ही तिच्या घरी जातो.  चहा-कॉफी झाली की बॅगा उचलून एखादे हॉटेल गाठतो.  मग त्या हॉटेलचा अँबिंयन्स, तिथले खाद्यपदार्थ अशा चर्चा सुरु होतात.  त्या वातावरणात आम्ही आमचे हरवून जातो.  मग आम्हा बहिणीबहिणींच्या गप्पा मात्र होत नाहीत.  पुढच्यावेळी गप्पा मारु असं आश्वासन देत-घेत निरोप होतो, तेव्हा घरी जायची घाई दोघींनाही झालेली असते.  पुन्हा पुढच्यावेळी अशीच काहीतरी कारणं पुढे येतात.  पण या दोघी बहिणींच्या गप्पा ऐकल्यावर जाणवलं,  घरी दोन दिवस मुक्कामालाच बहिणीला बोलवलं पाहिजे.  काय होईल तो कामाचा खोळंबा होईल, पण गप्पा तर भरपूर मारल्या जातील.  हॉटेलपेक्षा तिच्या आवडीचा स्वयंपाक करण्यात जे मला समाधान मिळेल ते वेगळं.  एव्हाना ती ताई उतरली होती आणि मी माझ्या बहिणीच्या विचारात गुंग झाले होते.  नव-यानं आपला स्टॉप आला आहे, असं सांगितल्यावर मी त्या विचारातून बाहेर पडले. 

बोरीवलीला ज्या कामाला गेलो होतो, ते वेळेवर झाले.  परतीला परत बसचाच आधार.  दुपारचे दोन वाचून गेलेले.  बसस्टॉपवर मोठी रांग होती.  बस आल्यावर लगबगीनं चढलो.  बसमधील एक बाजू महिलांसाठी राखीव, ती बाजू ब-यापैकी खाली होती.  तिथे जागा मिळाली.  बस चालू झाल्यावर माझ्याबाजुला एक पुरुष प्रवासी येऊन बसला.  मी त्याच्याकडे बघितल्यावर तो म्हणाला, कोणी महिला प्रवाशी आली की उठेन.  यावर मी काय हरकत घेणार.  पण त्या माणसाची सतत चुळबुळ चालू होती.  कधी मोबाईल काढ, कधी पैशाचं पाकीट काढ, कधी बॅग उघड.  दोन-तीन वेळा धक्का बसल्यावर मी त्याला समज दिली.  पुढच्याच स्टॉपवर एक मुलगी चढली.  ती या जागेवर बसेल असे वाटत असतांना तिनं कानावर हेडफोन घातले, आणि आपण या जगात नाही, असं समजून बसच्या खांबाला टेकून उभी राहिली.  आणखी पुढच्या बसस्टॉपवर दोन महिला चढल्या.  मी जिथे बसले होते, त्याच बाजुला येऊन त्यातील एक उभी राहिली.  मी माझ्या बाजुला बसलेल्या माणसाला सांगितलं, ही सीट महिलांसाठी आहे, त्या उभ्या आहेत, त्यांना ती जागा द्या.  या जागेवर बसतांना त्याचा जो नूर होता, तो बदलला होता.


  त्यानं मला विचारलं, कुठे लिहिलं आहे, महिलांसाठी राखीव, उगाच कशाला उठू...आणि तो फोनवर मोठ्यानं गप्पा मारु लागला. मी समोर उभ्या असलेल्या बाईकडे बघितलं, तिच्यासाठीच मी शब्द टाकला होता.  पण ती बाई ढिम्म...काही बोलेना...शेवटी काहीवेळानं कंडक्टर असलेली महिला आली.  तिनं त्या माणसाला उठवलं.  मग त्या सीटकडे आशाळभूतपणे बघणारी ती महिला धप्पकन बसली.  मला म्हणाली, काय माणूस आहे, महिलांची राखीव जागा होती,  तरी बसला.  आता मात्र मी चिडले.  तो काय माणूस आहे ते सोडा, पण तुम्ही काय बाई आहात.  तुम्ही उभ्या होतात, म्हणून मी त्याला उठायला सांगितलं.  तेव्हातरी तुम्ही दोन शब्द बोलायला हवं होतत ना.  तुम्ही तेव्हा गप्प राहिलात, तेव्हाच जर बोलला असतात तर तो लगेच उठला असता.  राखीव जागा हव्यात पण त्या आयत्या..आम्ही नाही

लढणार...आमच्यासाठी तुम्ही लढा आणि आम्हाला आयती जागा द्या असं आहे तुमचं.  मी हे वाक्य एवढ्या जोरात बोलले की बाजुला उभ्या असलेल्या महिला कंडक्टरला हसायला आले.  अहो, हे रोजचं आहे.  या बायकांना सर्व आयतं लागतं.  त्यांच्या जागी कोण बसलं तरी मला बोलवतात.  मग आम्ही त्याला उठवायचं आणि या बसणार.  मी डोक्याला हात लावला.  यावर काय बोलणार...

एका दिवसात बसच्या प्रवासात दोन अनुभव आलेले.  दोन्हीवेळी दोन वेगळ्या स्वभावाच्या महिलाच भेटल्या.  एक जिव्हाळ्याच्या माणसांना जवळ बोलवणारी.  तर एक आपल्या हक्कासाठीही दुस-यावर निर्भर असणारी....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

 


Comments

  1. Khup chhan lekh महिलांनी आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे आणि नाती पण जपली पाहिजेत.

    ReplyDelete
  2. छान लेख लिहिला आहे

    ReplyDelete
  3. बसमध्ये महिलांकरिता व ज्येष्ठ नागरिकांकरिता राखीव जागा असतात.तसे ठळक.अक्षरात फलकही लावलेले असतात.बसमधील प्रवाशांनी महिलाना व ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करायला हवे अशी अपेक्षा अशते.आपण वास्तव सर्वांसमोर ठेवले.मनःपुर्वक अभिनंदन!

    ReplyDelete
  4. महेश टिल्लू1 July 2024 at 18:16

    प्रवासात अशा गमती अनुभवायला मिळत असतात.व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशी म्हण आहेच. समाजात अन्याया विरुद्ध लढणारा एकटाच असतो,बाकी नुसते बघ्याची भूमिका घेत असतात.असो असे अनुभव टिपून ठेवावे.कधीतरी आपण त्या आठवणीत हरवून जातो. खूप छान लेख

    ReplyDelete
  5. प्रवासात बारकाईने केलेले निरीक्षण खूप छान शब्दबद्ध केले आहे. मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहाण्यासाठी प्रवास हा अतिशय उत्तम मार्ग आहे, असाच माझाही अनुभव आहे.

    ReplyDelete

Post a Comment