जस्ट फ्रेंण्ड
फराळ झाला का...असे दिवसाला चार फोन यायला लागले की समजायचं दिवाळी जवळ आली. अर्थातच या आठवड्याच्या सुरुवातीपासून फोनचा मारा सुरु झाला. लेकाला पाठवण्यासाठी दिवाळी आधी पंधरा दिवस आधी थोडा फराळ केला. तोही त्याच्या आवडीचा. लाडू, चकल्या आणि तिखट शंकरपाळ्या. ज्याला केला होता, त्याला तो सगळा फराळ पाठवून दिला आणि आमचे डबे पुन्हा खाली झाले. मग फराळ झाला का, असे फोन आल्यावर माझं उत्तर एकच, एक टप्पा झाला, आता दुसरा टप्पा निवांत करेन....तसंच झालंही हा कॉलम लिहिण्याआधी अगदी तासभर दिवाळीचा फराळ झालाही. हा दुस-या टप्प्यातला फराळ. लेकाला पाठवला तो फराळ अगदी खरा. साजूक तुपात डुंबलेला. तेलात बुडलेला. साखरेत पोहणारा. आणि आमचा दुस-या टप्प्यातील फराळ म्हणजे, डायट नावाला साजेसा. शंकरपाळ्या, करंज्या कमी तेलाच्या. लाडू मोजक्या तुपातले आणि चिवडाही तसाच अगदी ब्रशनं तेलाचा वापर करुन झालेला. असा फराळ कधी तयार होतो का, हा प्रश्न मलाही पहिला पडायचा. पण एक मित्र मदतीला आला आणि हे बिनतेलाच्या फराळाचं गणित सहज जमलं. हा मित्र म्हणजे, एअर फ्रायर. जस्ट फ्रेंण्ड.
स्वयंपाकघरात नवीन प्रयोग करायला मी नेहमी तयार असते. त्याच प्रयोगातून काही वर्षापूर्वी ओव्हन घेतला. पण या ओव्हनचं आणि माझं काही ताळतंत्र जमलं नाही. सुरुवातीला हौशेनं केक, बिस्कीट, ब्रेड बनवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला हे गणित जुळलं. नंतर मात्र काहीतरी गडबड व्हायला लागली. केकला वर तडे पडायला लागले. बिस्कीटं जळायला लागली आण ब्रेड खालून करपायला लागला. एकदा मी काहीतरी गडबड केली आणि ओव्हनच्या आत चांगलेच फटाके फुटले. दुरुस्तीचा खर्च आला. ओव्हन चालू झाला, पण माझ्या मनात भीती बसली ती कायमचीच. मग या ओव्हनचा वापर फक्त बटाटे, रताळी शिजवण्यासाठी व्हायला लागला. एकूण ओव्हन घरात आला तसाच गेलाही. ओव्हनचा सर्वाधिक वापर होतो, तो केक, बिस्कीटांसाठी. आणि हे दोन पदार्थ माझ्याकडे अगदी साध्या कुकरमध्ये सहजपणे होत असल्यानं नंतर कधीही ओव्हनच्या वाट्याला जायंच नाही, असा निर्धार केला. पण एका मैत्रिणीच्या घरी एअर फ्राय बघितला. त्याचा सर्रास वापरही बघितला. ते पाहून माझ्याही मनात कालवाकालव सुरु झाली. तेव्हा बहुधा करोनाचं सावट थोडं फार कमी होत होतं. घरात नवीन नवीन पदार्थांचा राबता सुरु होता. लेक तेव्हा अभ्यासातील तणाव कमी करण्यासाठी मला स्वयंपाकघरात थोडी मदत
करायला उभा रहात होता. अशात एअर फ्राय घरात आला तर त्याला अधिक सोप्प जाईल असा विचार नव-याला बोलून दाखवला. नव-याला ओव्हनचा अनुभव होता, त्यामुळे त्यानं सुरुवातीला ठाम नकारच दिला. हा नकार बघूनच मी एअर फ्रायर घरात आलाच पाहिजे यावर ठाम राहिले. शेवटी ऑनलाईन शोधाशोध झाली. कोरोना काळातील शॉपिंग. घरात एकदिवस मोठा बॉक्स आला आणि माझे नवीन प्रयोग सुरु झाले.
सुरुवातीला लेकाला फार उत्सुकता होती. त्यानं तो सर्व कॅटलॉग वाचून मला समजावून
सांगितलं. तपमान आणि वेळेचं बंधन मुख्य
असतं. ते प्लस, मायनस करायचं समजलं की एअर
फ्रायर कसाही वापरता येतो. नव्याचे नऊ
दिवस हा अनुभव त्याच्या बाबतीतही आला. त्यातच
ज्याचे नाव घेऊन एअर फ्रायर घेतला होता, तो लेक बाहेर गेला. आता दोघांच्या जेवणासाठी त्या फ्रायरची काय गरज,
म्हणून तो पुन्हा काही महिने तसाच पडून राहिला.
पण एक दिवस अडला हरी...अशी परिस्थिती आली.
गॅस अचानक बंद झाला. रात्रीच्या
जेवणासाठी कटलेट आणि सूप करायचे होते. सूप तयार होते, प्रश्न कटलेटचा होता. शेवटी फ्रायरचा आधार घेतला. मला कुठल्याही मशिनची सिस्टिम शिकायला थोडा
वेळच लागतो. तसंच झालेलं. खूप दिवसांनी वापरल्यामुळे कुठलं बटन दाबावं
हेच कळेना. शेवटी कसातरी तो फ्रायर चालू
झाला. अवघ्या दहा मिनिटात एकदम कुरकुरीत
कटलेट तयार झाले. तेही बिना
तेलामध्ये...मग काय युरेका....युरेका अशी परिस्थिती.
तेव्हापासून रोजचा वापर सुरु झाला. अगदी मागच्या दिवाळात शंकरपाळ्या याच फ्रायरमधून बिना तेलाच्या करुन झाल्या. आज काय ताक झालं. मग कपभर ताकात गव्हाचं पिठ, गाजराचे बारीक तुकडे आणि कोथिंबीर, पुदिना,
हिरव्या मिरच्या, आलं, लसूण असं जे हाताला लागेल ते त्यात टाकून ब्रेडचं पिठ तयार करु लागले. फ्रायरमध्येच त्या ब्रेडच्या मिश्रणाला चांगलं पसरण्यासाठी ठेवायचं. मग तपमान आणि वेळ यांचं गणित सोडवून ब्रेड तयार करायला ठेवायचा. साधारण अर्धा तासात घरी ब्रेड तयार. असंच केकचंही...जेवायला सुरुवात केली की लाव्हा केक दोन वाट्यात लावायचा. जेवण होईपर्यंत केक तयार. अगदी बारीक सारीक गोष्टींसाठी या फ्रायरचा वापर व्हायला लागलाय. मग समजलं, कांदा, लसूण, खोबरं, शेंगदाणे भाजण्यासाठी त्याच्याशिवाय चांगला पर्यांय नाही. फ्लॉवर, ब्रोकली, मशरुम, बेबी स्विट कॉर्न यांचे प्लॅटर करायचे असेल तर ते या फ्रायरशिवाय कशातही होत नाही. वांग्याचं भरीत खायचं असेल तर वांग फ्रायरमध्येच भाजलेलं असावं असा आग्रह आता घरी असतो. फारकाय मसालेभात, बिर्यानी सारखे प्रयोगही मी यात केले आहेत, आणि ते यशस्वी झाले आहेत. एकूण या छोट्याश्या एअर फ्रायरनं घरात मोठं स्थान पटकावलं आहे.
आता येऊया दिवाळीकडे. दिवाळीचा फराळ म्हटला की तो तुपा, तेलाचा
येणारच. पण एअर फ्रायरनं तोही प्रश्न सोडवला आहे. गेल्यावेळी शंकरपाळ्या यशस्वी झाल्यावर मी करंजी करुन बघितली. पहिल्या एक-दोन करंजा तपमान आणि वेळ ठरवण्यात वाया गेल्या. पण नंतर एकदा हे गणित पक्क बसल्यावर बाकीच्या करंज्या या फ्रयरमध्ये सुरेख झाल्या. चिवड्याचे पोहे भाजणे हे मोठं प्रकरण असतं. पण ते फ्रायरनं अधिक सुलभ केलं. शेंगदाणे, सुक्या खोब-याच्या फोडी, डाळी, काजू, बदाम या सर्व जिन्नसांना चहुबाजूंनी भाजून खुसशुशीत करण्यात त्याची खूप मदत झाली. फराळ झाला का, असे फोन येणा-यांना आता, हो झाला, मित्रानं केला असं सांगतेय. मग, कोण ग...कोणी मदत केली, असा पुढचा प्रश्न येतो. तेव्हा माझ्या या छोट्या मित्राचं पोटभरुन कौतुक सांगते...एकूण काय अशा चालू आहे, तयारी दिवाळीची....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
जबरदस्त. मस्त लेख. आणि माहितीपूर्ण. मलाही हा कधीचा हवा आहे. बघते, केव्हा योग येतो ते.
ReplyDelete- माधुरी याडकीकर, डोंबिवली
धन्यवाद, माधुरीताई....नक्की घ्या....छोट्या जागेत रहातो आणि खूप उपयोगी पडतो...
Deleteखूप छान लेख सई! मी पण वापरते Air fry पण फराळाचे पदार्थ केले नाहीत अजून !आता करीन
ReplyDeleteनक्की करा...मी शंकरपाळ्या, करंजी करते...आळूवडी, चिप्सही छान होतात.
Deleteधन्यवाद
ReplyDeletekhup chhan lekh
ReplyDeleteखूपच छान खुसखुशीत लेख!! डॉ पाध्ये
ReplyDeleteदिपावलीचे औचित्य साधुन जस्त फ्रेंडला सर्वांसमोर सुंदर लेखाच्या माध्यमातुन सर्वांसमोर आणलं त्याबद्दल !!मनःपुर्वक अभिनंदन!! दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
ReplyDelete