हिरव्या हिरव्या रंगाची...
नोव्हेंबर महिना सुरू झाला आणि थोडा जिवात जीव आला. का... कारण भारताचा स्वर्ग म्हटलं की जसं काश्मीरचं नाव डोळ्यासमोर येतं, तसंच खाऊपिऊसाठीचा बेस्ट सीझन म्हटलं की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील छान हिरवीगार बाजारपेठ डोळ्यासमोर येते. थंडीची चाहूल घेऊन आलेल्या या नोव्हेंबर महिन्यात दर दोन दिवसांनी बाजारात फेरी मारायची. आज काय, शिंगाडे आले. मग दोन दिवसांनी शेवग्याची फुलं मिळाली. अजून दोन दिवसांनी भोपाळ्याची फुलं. अशाच एका दिवशी एका मावशीच्या टोपलीमध्ये हिरव्या हिरव्या रंगाचे टोमॅटो डोकावताना दिसले. माझी नजर तिनं ओळखली. घरचे आहेत. सकाळी तोडलेत. सगळे घे, म्हणत त्या मावशीनं टोमॅटो पुढे केले. मी दोन क्षण त्या गर्द हिरव्या रंगाकडे बघत राहिले. त्या क्षणात त्या टोमॅटो पासूनच्या सगळ्या पाककृती डोळ्यासमोर दिसू लागल्या. मग काय, मी आपसूक माझी पिशवी त्या मावशीसमोर आ....करुन धरली आणि त्या हिरव्या हिरव्या रंगाच्या छान टोमॅटोंना घेऊन सरळ घरची वाट पकडली.
तसं पाहिलं तर या कच्च्या आणि हिरव्या रंगाच्या टोमॅटोचा नक्की सिझन नसतोच. हे कच्चे टोमॅटो कुठल्याही महिन्यात मिळतात. पण माझा आजवरचा असा अनुभव आहे की, थंडीच्या सिझनमध्ये मिळणारे टोमॅटो आणि त्यांची चव ही काही वेगळीच असते. सिझननुसार प्रत्येक फळाची, भाजीची चव बदलते. तसाच गुणधर्म या कच्च्या टोमॅटोमध्ये असतो. हिरवे टोमॅटो बहुतांशी हे थोडे आंबट लागतात. पण या दोन महिन्यात जे कच्चे टोमॅटो मिळतात, ते मात्र कमी आंबट आणि चांगले भरीव, रसदार, चवदार असतात. या कच्च्या टोमॅटोची चटणी, सार, पातळ भाजी आणि भरीतही करता येतं. शिवाय याच सिझनमध्ये येणा-या पेरुची आणि या कच्च्या टोमॅटोची भाजून केलेली कोशिंबीरही भारी लागते. दोन-चार वर्षापूर्वी एका टिव्ही शोमध्ये दाखवलेल्या रेसिपीची कॉपी करत हिरव्या टोमॅटो आणि मिरच्यांचे लोणचेही घातले होते. चव ब-यापैकी झाली होती. पण लोणचं या प्रकाराला आमच्या घरी उठाव नाहीच. त्यामुळे नंतर कधी हा प्रयोग केला नाही. असो.
हिरवे टोमॅटो घरी आले आणि पहिली त्यांची वाटणी केली. चटणी, सार, भरीत आणि कोशिंबीर...चार भाग झाल्यावर मग कामाला लागले. एरवी लाल टोमॅटो हा स्वयंपाकघरातील प्राणवायूच. जरा टोमॅटो महाग झाले की धाकधूक सुरु होते. पण एकाच गोष्टीवर अडून रहायचं, हा आपला स्वभावच नाही. त्यातूनच जे मिळेल, त्यापासून काही छान पदार्थ तयार करण्याची माझी
नेहमीच तयारी असते. असाच एक पदार्थ म्हणजे, हिरव्या टोमॅटोची चटणी. फार झंझट नाही. मोजून पाच ते सात मिनीटात तयार होणारी. तेल गरम होईपर्यंत आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करायची. तेलावर फोडणी आणि ही पेस्ट टाकल्यावर ती छान परतेपर्यंत त्यात कांदा अगदी उभा चिरुन टाकायचा. त्यावर लगेच मिठ. मग हा कांदा साधारण गुलाबी व्हायला लागेपर्यंत टोमॅटो उभा बारीक चिरुन होतो, तो त्यात टाकायचा. अगदी तीन ते चार मिनिटे परतायचे. चौथ्या मिनिटाला ओलं खोबरं, शेंगदाण्याचा कूट आणि गुळ टाकून पुन्हा एखादं मिनीटं परतायचे. गॅस बंद करतांना हवी तेवढी कोथिंबीर घालायची. चटणी तयार. तांदळाच्या भाकरीसोबतचा हा फक्कड बेत ठरतो. मग येते साराचा बारी. लाल टोमॅटोचे जसे सार करतो, तसेच या हिरव्या टोमॅटोचे सार होते. फक्त लाल टोमॅटो ऐवजी हिरवे टोमॅटो आणि लाल मिरची ऐवजी हिरवी मिरची, बाकी, जिरे, धणे, लसूण, आलं आणि ओलं खोबरं. सगळं छान मिक्सरमधून बारीक करुन घ्यायचे. तेलावर लसूण आणि कडीपत्याची पानं लालसर झाली की, जिरं, हिंग आणि नावाला थोड्या हळदीची फोडणी टाकायची. लगेच त्यावर हिरवं वाटण टाकायचं, बेतानं पाणी आणि मिठ. चांगली उकळी आली की, हिरव्या टोमॅटोचं सार तयार. नरम भात आणि तांदळाच्या पापडाबरोबर हे सार भारी जातं. यानंतर या हिरव्या टोमॅटोचा येणारा पदार्थ म्हणजे, भरीत. वांग्याचं, दोडक्याचं, शेवग्याच्या शेंगाचं भरीत मस्त होतं. त्याच रांगेत हे हिरव्या टोमॅटोचं भरीत बसतं. टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण आणि एक हिरवी ढोबळी मिरची हे भाजून घ्यायचे.
भाजल्यावर टोमॅटो आणि हिरव्या मिरचीची साल काढून घ्यायची. अख्खा लसूण भाजला असेल तर त्याचीही साल काढायची. मग मिरचीसकट, लसूण, टोमॅटो आणि ढोबळी मिरची छान रगड्यानं बारीक करुन घ्यायची. त्यात कच्चा कांदा बारीक करुन टाकायचा, कोथिंबीर आणि मिठ टाकायचं. या हिरव्या भरीताची खरी जान त्याची फोडणीच आहे. फोणीमध्ये कडीपत्ता, हिंग, जिरं, आणि बडीशेप टाकायची. ही फोडणी चांगली तडतडली की भरीतावर टाकयची. फोडणी टाकल्यावर अगदी काही सेकंद भरीतावर झाकण ठेवायचं. त्यानंतर कच्च्या टोमॅटोचं भरीत तय्यार...या सर्वात कच्च्या टोमॅटो आणि पेरुची कोशिंबीरही छान होते. जसे कच्चे टोमॅटो घ्यायचे तसाच कच्चा पेरुही घ्यायचा. दोन्हीही भाजून घ्यायचे. भाजल्यामुळे त्यांची काळी झालेली साल काढून टाकायची. पेरुच्या छान बारीक फोडी करुन घ्यायच्या. टोमॅटोही तसाच बारीक करुन घ्यायचा. भाजल्यामुळे त्याचा गरच अधिक हाती लागतो. या सर्वात मिरची बारीक करुन टाकायची. लिंबाचा रस, काळं मिठ, साखर टाकून मिश्रण ढवळलं की कोशिंबीर तयार.
या अशा पदार्थांची गर्दी आता घरात सुरु होणार आहे. बाजारातील फेरफटका
वाढणार आहे. आत्ताशी तर कुठे सुरुवात आहे. ती अगदी कोवळ्या देठाची मेथी येते ना ती मेथी शोधायला. मग तसाच कोवळा पालक येईल, कोथिंबीर येईल. आणि त्या हिरव्यागार मटारच्या दाण्यांचं किती कौतुक करावं, त्याचा हात धरुन गाजरही येईलच की. थोडक्यात पुढचे महिने चांगली चंगळ रहाणार आहे. हिरव्या टोमॅटोनं त्याची सुरुवात झाली आहे, एवढंच...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
It's interesting 👍
ReplyDeleteThanks...
DeleteWow superb
ReplyDeleteमस्तच!! आमच्याकडे नेहमी करतो आम्ही ही चटणीो आता सार वगैरे पण करता येईल !!
ReplyDeleteमी चटणी करते खूप छान लागते नविन रेसिपी मिळाली छान च
ReplyDeletekhup chhan lekh
ReplyDeleteछानच ग सई
ReplyDelete🤗👌
ReplyDeleteNice information on green tomatoes..feel like immediately going to market, bring it and prepare as per receipe
ReplyDeleteलेख खुप छान आहे
ReplyDeleteखूप छान चटणी नेहमी करते.नवीन रेसीपी समजली.
ReplyDelete