सर्दी आणि चण्याचा काढा

 

सर्दी आणि चण्याचा काढा


नोव्हेंबर महिना सुरु काय झाला, सर्दीचा त्रास जाणवायला लागला.  डोकं जड,  सततच्या शिंका, कानाला दडे काय विचारु नका. सर्दीमुळे की काय, झोपही भयंकर येऊ लागली.  सतत अंग गरम वाटायला लागलं.  अशावेळी नेहमीचे उपाय सुरु झाले.  कॉफीमध्ये नेहमीपेक्षा जरा जास्तच आलं ठेचून घालायला सुरुवात केली.  हळद, काळीमिरी, तुळशीची पानं आणि लवंग टाकून काढा करुन झाला.  वाफ घेतली पण सर्दी काही बाहेर पडेना.  सर्व उपाय थकले की एक रामबाण उपाय लागतो.  तो रामबाण उपाय आठवला आणि तयारीला लागले.  फार काही नाही.  रात्री झोपतांना वाटीभर चणे भिजत घालून ठेवले.  या चण्यांचा काढा म्हणजे थंडी आणि पावसाळ्यामधील चोवीस कॅरेट उपाय ठरतो.  तोच उपाय मी केला आणि सर्दीच्या त्रासातून बाहेर पडले. 


भरपूर पेरु, आईस्क्रीम आणि दही खाल्यावर जे होतं तेच मला झालं होतं.  सर्दी.  डोकं जड झालं.  घसा खवखवायला लागला.  कान दुखायला लागले.  यावर जमेल तसे उपाय चालू होते.  नवरा दहावेळा मी खालेल्या आईस्क्रीमची आठवण करुन देत होता.  त्याकडे दुर्लक्ष करीत काढा, चाटण असे उपाय सुरु केले.  पण ते जड झालेलं डोकं काही खाली होईना.  अशावेळी एक हमखास कामी येणारा उपाय सुचला. हा उपाय म्हणजे, चण्याचा काढा.  थंडी आणि पावसाळ्यातलं टॉनिक म्हणून कोकणातल्या घराघरात हा काढा होतो.  अगदी आठवडाभर पाऊस चालू असतांना हा चण्याचा काढा किंवा कढण पावसातील थंडाव्यापासून आपसूक बचाव करतो.  हाच काढा करायची मी तयारी सुरु केली.  सकाळी पहिल्यांदा भिजलेले चणे स्वच्छ धूवून कुकरमध्ये टाकले.  त्यात हळद, दोन लवंगा आणि एक मोठा दालचिनीचा तुकडा टाकला.  मग चार ग्लास पाणी टाकून कुकरखाली मंद गॅस चालू केला.  अगदी चार-पाच शिट्या झाल्या तरी या शिट्यांकडे दुर्लक्ष करीत आणखी चार शिट्या होऊ द्यायच्या.  तोपर्यंत एकीकडे काढ्याच्या मसाल्याची तयारी करायची.  चांगल्या मुठभर लसणाच्या पाकळ्या, आल्याचा मोठा तुकडा,  किमान दहा-दहा काळीमिरी आणि लवंगा, चमचाभर ओवा आणि बडीशेप.  हा सर्व मसाला एकत्र भाजायचा.  आधी गरम मलाल्याचे पदार्थ मग त्याच्यावर लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे.  हे सर्व भाजत असतांनाच याचा मस्त असा खमंग वास सुटतो.  सर्दीवर येथूनच उपचार होण्याची सुरुवात होते.  बहुधा चण्याचा काढा हा

अगदी पाण्यासारखा होतो.  पण यात अगदी चमचाभर किंवा अर्धाचमचा सुकं खोबरं घातलं तर चव अधिक छान होते, हा माझा अनुभव आहे.  त्यामुळे हा सर्व मसाला भाजतांना अगदी छोटासा खोब-याचा तुकडाही भाजून झाला.  मग या सर्व मिश्रणाला मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक करायचे. 

एव्हाना तो कुकर थंड झालेला असतो.  चणे छान शिजून मऊसर झाले असतात.  जर पाणी कमी असेल तर त्यातच पुन्हा पाणी टाकून एखादी उकळी काढायला ठेवायचे.  तेव्हा दुस-या गॅसवर तेल तापवून त्यात लसूण ठेचून टाकायचा.  अगदी सालासकट असलेल्या या लसूणाच्या पाकळ्यांवर सर्दीमुळे आपल्याला होत असलेला सर्व त्रागा काढायचा.  हा लसूण तेलावर अगदी लालसर होईपर्यंत परतायचा.  त्यातच दोन तमालपत्र टाकायची. त्यावर हळद टाकून मग  शिजवलेल्या चण्यांचे पाणी आणि बारीक केलेला मसाला टाकायचा.  चण्याचा काढा करतांना शक्यतो हे चण्याचे पाणीच वापरतात.  वाटीभर चणे घेतले असतील तर त्यातील अगदी पाव वाटी चणे मी या काढ्यात टाकते.  चवीनुसार मिठ टाकून हे सर्व मिश्रण पुन्हा दहा मिनिटांसाठी गॅसवर ठेवायचे.  या काढ्याला चांगली उकळी फुटली की काढा तयार झालाच.  बरं या सर्वात मी फार कमी वेळा मिरचीचा वापर करते.  काळीमिरी, लवंगा, आलं आणि ओव्याचा नैसर्गिक तिखटपणा या काढ्याला पुरेसा पडतो.  पण जर लाल तिखट हवेच असेल तर लाल मसाल्याची पावडर


टाकण्यापेक्षा लाल मिरची, मसाल्यासोबत भाजून टाकली तर ती चव अधिक खूलून येते.  अर्थात चण्याचा काढा हा अगदी पातळ आणि तो पितांना तोंड पोळणार नाही, एवढी तिखटाची मात्र असावी असा माझा नियम आहे.  ग्लासभर काढा प्यायल्यावर अंगाला घाम सुटु लागतो, हा तो काढा अगदी शंभरटक्के जमला आहे, याची खूण मानण्यात येते.  आणि झालेही तसेच चण्याच्या काढ्याचे दोन ग्लास पोटात गेले आणि त्या डोक्यातील सर्दीवर जादू झाली.  शिंका थांबल्या, कानदुखी थांबली आणि डोंक अगदी हलकं झालं. 

बरं या सर्वात ते उरलेले चणे नाष्ट्यासाठी उपयोगी ठरले.  या चण्यांमध्ये थोडं थोडं चण्याचं आणि तांदळाचं पिठ घालायचं.  हिंग, हळद, तिखट, मिठ आणि चाट मसाला घालायचा.  हे सर्व त्या चण्यांना हलक्या हातांनी लावून मिश्रण तसेच मुरवायला ठेवायचे.  साधारण पंधरा-वीस मिनिटात चण्यांना पिठ, मिठ, मसाला छान लपेटून घेतो.  हे चणे मग अगदी चमचाभर तेल टाकलेल्या तव्यावर परतले की छान चणा चाट तयार होतो.   फार हौस असेल तेव्हा या चण्यांवर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, उकडलेला बटाटा, डाळींबाचे दाणे, अननसाचे तुकडे, शेव असे सर्व छान वाटेल ते ते पदार्थ टाकता येतात.  फारकाय वरुन थोंड फेटलेलं दही आणि पुदिन्याची चटणीही छान लागते.  चवीला काळं मिठ आणि धण्याजि-याची पूड टाकली तर अजून सुभान चव.  पण हे सर्व करतांना सर्दीचे भान ठेवायला लागते.  ते भान


ठेवतच मी या बाकी राहिलेल्या चण्यांवर चमचाभर तेल लावले आणि मग थोडे चण्याचे पिठ भुरभुरले.  तिखट, मिठ आणि हळद टाकून सर्व एअर फ्रायरच्या आश्रयाला दिले.  अगदी दहा मिनिटात चणा कुरकुरीत तय्यार....

याच चण्याच्या काढ्याच्या जोरावर आता तुफान सर्दी असलेल्या इंदौरच्या गल्लीबोळातून फेरफटका मारत आहे.  हातात या चण्यांचे हिरवे रुपडे आहे.  अर्थातच ताजे हिरवे चणे मिळालेत, टोपलीभर.  हवरटासारखे हे सर्व चणे घेतले तेव्हा नवरा डोळे वटारुन बघत होता.  पण यापासून जी खाद्ययात्रा सुरु होईल, त्यात मात्र तो आनंदानं सहभागी होणार आहे, याची खात्री आहे.  या खाद्ययात्रेचा आढावा आता पुढच्यावेळी....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. मस्तच ग . . .👌😋 . . .काढा आणि मग इंदोर ची थंडी सॉलीड कोंबो 👍

    ReplyDelete
  2. ह्या काढयाची कृति वाचताना त्याचा घमघमाट नाकात गेला आणि त्या त थोडे चणे घालून आमटी सारखा गरम पोळी बरोबर केंव्हा खाईन असे झाले

    ReplyDelete
  3. नवीनच रेसिपी कळली .करून बघेन. इंदोर दौऱ्यासाठी खूप खूप शुभेच्छा खाऊ पियो मजा करो

    ReplyDelete
  4. Sahaj Ani sopi पाककृती करून पाहायलाच हवी

    ReplyDelete
  5. सर्दी आणि चण्याचा काढा हा लेख उपयुक्त व छान आहे,अभिनंदन!!

    ReplyDelete
  6. खूप छान छान माहिती मिळाली

    ReplyDelete
  7. महेश टिल्लू7 December 2024 at 10:41

    कोकणात राहून कधीही न ऐकलेली रेसिपी.सध्या थंडी तर गायब आहे, पुढील पावसाळ्यात आणि थंडीत प्रयोग करून बघायला हवा

    ReplyDelete

Post a Comment