ती भेटते तेव्हा...

 

ती भेटते तेव्हा...


गेल्या आठवड्य़ात एका समारंभाला गेले होते.  नातेवाईक आणि जवळच्या मित्र परिवाराची तिथे गर्दी होते.  अशावेळी नेहमी असतं तसच वातावण होतं.  ब-याच दिवसांनी नातेवाईक भेटले की जशा चौकश्या सुरु होतात, तशाच सुरु झाल्या.  घरातील मंडळी काय म्हणतात, सर्व कसे आहे, मुलांचे काय चालू आहे.  या सर्वात माझ्याजवळ ती आली...नातेवाईक शिवाय जवळची मैत्रिणही.  तिला बघून मला कोण आनंद झाला.  आमच्या गप्पा सुरु झाल्या.  ती उच्चशिक्षित.  तिच्या शिक्षणासारखीच तिचं ऑफीसमधील पदही.  मी तिच्याबरोबर गप्पा मारत असतांना तिची आईही धावत आली.  पुन्हा नमस्कार-चमत्कार.  मग आईनं सर्व ताबा घेतला.  तिच्या प्रगतीचा आलेख आई अधिक उत्साहानं सांगू लागली.  किती जणांची टिम तिच्या सोबत आहे, ती परदेशात कशी जाते,  तिचा पगार, तिला मिळणा-या सुविधा सर्वांची बेरीज माझ्यासमोर मोकळी करत आई सुखावली.  या सर्वात माझी तिच्याकडे नजर गेली.  ती मान खाली घालून बसली होती.  शेवटी तिची आई आमच्यापासून दूर झाली. तेव्हा कुठे तिची झुकलेली मान वर झाली.  तिचा काही क्षण आधी असलेला उत्साह मावळला होता.  थोडीशी नाराजी तिच्या चेह-यावर आलेली.  मग आमच्या गप्पांचा रोख बदलला.  थोड्या वेळातच ती पुन्हा भेटूया असं सांगून दुसरीकडे गेली.  ती गेली आणि माझ्याभोवती बायकांचा वेढा पडला.  काय बोलत होती ग.  वय विचारलस का तिला. पस्तीशी होऊन गेलीय.  आता परदेशाच्या वा-या करण्यापेक्षा सातफे-यांची तयारी करायला पाहिजे.  तू लक्ष घाल जरा, तिच्या आईला सांगा.  कुठलंही स्थळ गेलं की पहिली आई पुढे येते.  अपेक्षांची यादी वाचून दाखवते.  मग आलेलं स्थळ आपसूक जातं.  हे किती दिवस चालणार.  वय निघून गेलंय लग्नाचं.....अशी बोलणी सुरु झाली.  माझी नजर परत एकदा तिला शोधायला लागली.  ती सापडली ती अशीच कुणाशीतरी बोलतांना.  तिला तिची मैत्रिण भेटली होती, त्या मैत्रिणीच्या मुलासोबत ती खेळण्यात गुंग झाली होती.  ते दृष्य बघून दहा वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला.


एका मैत्रिणीच्या मुलाची लग्नाची तयारी चालू होती.   तुझ्या ओळखीत कोण असेल तर नक्की सांग, असा निरोप घेऊन ती स्वतः घरी आली होती.  मुलगा चांगला शिकलेला.  नोकरीही चांगली.  मुलगा माझ्याही पाहण्यातला.  त्यामुळे आसपास कोणी लग्नाची मुलगी आहे का म्हणून मी सुद्धा चौकशीला लागले.  त्याचवेळी संध्या समोर आली.  एमबीए झालेली.  नुकतीच नोकरीला लागलेली.  मी तिच्या आईला फोन करुन मुलाबद्दल सांगितले.  माझं सगळं बोलणं ऐकून तिची आई माझ्यावर किती चिडली.  आत्ताशी पंचवीसची झालीय.  आत्ता कुठे लग्न करणार.  अजून दोन वर्ष थांबणार आहोत आम्ही.  तिला अजून काही कोर्स करायचे आहेत, असं तिच्या आईकडून समजलं.  ऑफीसमध्ये प्रमोशनही हवं होतं.  लग्न झाल्यावर कुठे एवढं करता येणार, म्हणून तिच्या आईनं मला अनेक कारणं सांगितली.  संध्याला विचारलं का, असा साधा प्रश्न मी त्या आईला विचारला.  तर त्या पुन्हा चिडल्या.  तिला काय कळतंय.  तिच्या शिक्षणासाठी आम्ही किती खस्ता काढल्यात.  अजून दोन वर्ष तरी लग्नाचा विषयच आमच्या घरात निघणार नाही.  दोन वर्षाचा तिचा पगार आईनं साठवायला सांगितलं होतं.  त्यातूनच मग तिचं लग्न खूप मोठ्या थाटामाटात लावून देणार असल्याची माहितीही तिच्या आईनं सांगितली. 

त्यानंतर कधीमधी तिच्या आईची भेट व्हायची.  तेव्हा संध्याच्या प्रगतीचा आलेख समजायचा.  आता तिनं अन्य कंपनी जॉईन केली होती.  ती इंटरनॅशनल फर्म होती.  त्यामुळे संध्याला पगार अजून चांगला मिळाला होता.  काम पण किती असतं, बाई.  म्हणून आई माझ्याकडे तिचं कौतुक करत होती.  आत्ताशा संध्या ऑफीसच्या मिटींगला देशात आणि परदेशात दौरेही करत असल्याची माहिती मिळाली.  त्यानंतर आणखी दोन-तीन वर्षात माझ्याकडे असंच एक ओळखीतल्या कुटुंबातील मुलाचं स्थळ आलं होतं.  माझी चौकशी सुरु झाली.  संध्याच्या आईला पुन्हा फोन केला.  तेव्हा त्यांचा सूर बदलला होता.  आम्हीपण लग्नाचं बघतोय, पण संध्याचा पगार पाहिलास ना केवढा आहे.  तिच्यापेक्षा जास्त पगार हवा मुलाला, अशी पहिली अट होती.  माझ्याकडे जे स्थळ आहे, ते त्यात पास होणारं होतं.  पण त्यांची यादी संपत नव्हती.  त्यांना ज्या घरात मुलगी द्यायची होती, ते अगदी स्वप्नवत होतं.  आम्हीही तिच्या शिक्षणासाठी खूप खस्ता काढल्यात असे त्यांचे पालुपद सुरुच होतं.  मग मात्र मी संध्याचा नाद सोडला.  संध्या कधीतरी भेटायची.  ती सुद्धा अशाच कार्यक्रमात.  दरवेळी तिच्या प्रगतीमध्ये भर पडलेली असायची.  तिचं त्यासाठी मनमुराद कौतुक व्हायचं.  पण नंतर नंतर संध्या अशा कार्यक्रमातही यायची बंद झाली.  तिचे आईवडिल भेटायचे.  वडिल हमखास सांगायचे, कोणी ओळखीचा चांगला मुलगा असेल तर संध्यासाठी नक्की सांगा.  पण लगेच आई तिला मिळणारं पॅकेज सांगायची.  तिच्यापेक्षा कमी पॅकेजचा मुलगा नकोच, यावर ती


ठाम होती.  याच पॅकेजच्या नादात लेकीचं लग्न लांबतंय, असं तिचे वडिल एकदा सर्वासमोर बोललेही.  या वादात पडायचं नाही, हे मी नक्की केलं होतं. त्यामुळे नंतर संध्या नावाचा विषय मी बंद केला. 

आता अशाच एका कार्यक्रमात संध्या भेटली.  तिच्यासोबत गप्पा सुरु असतानाच तिची आई आली आणि नंतरचा सगळा घोळ झाला.  आता मी त्याच संध्याकडे बघत होते.  ती आणि तिच्या वर्गमैत्रिणीच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या.  मैत्रिणीच्या छोट्या बाळाचा ताबा संध्यानेच घेतला होता.  आम्ही ज्या कार्यक्रमाला आलो होतो, तो कार्यक्रम संपत आलेला.  सर्वाची आवराआवर सुरु होती.  मी निघतांना संध्याला टाटा करायला गेले. ती अजून तिच्या मैत्रिणीसोबतच होती.  संध्या तिला अजून थोडं थांब, गप्पा मारुया म्हणून आग्रह करीत होती.  पण ती मैत्रिणही निघण्याची घाई करत होती.  तिच्या बाळाची आता झोपायची वेळ झाली होती.  ती संध्याला तिच्या बाळाच्या सवयी सांगत होती.  याच्यात कसा वेळ जातो, हे कळंतच नाही ग....चल, पुन्हा भेटूया, असंच कधीतरी, म्हणून संध्याची ती मैत्रिण निघण्याची तयारी करु लागली होती.  मी फक्त संध्याच्या चेह-याकडे बघत होते.  अचानक तिच्या चेह-यावरचा रंग उडाला होता.  काही वेळेपूर्वी हसत गप्पा मारणारी संध्या कुठे हरवली होती.  मी बाहेर पडले माझ्यापाठोपाठ संध्याही आई वडिलासह बाहेर पडली.  तिच्या आईनं जाताजाता मला एक महत्त्वाची माहिती दिलीच.  संध्या पुढच्या आठवड्यात ऑफीस टूर साठी लंडनला जात होती.  तुला काय हवं असेल तर नक्की सांग ग तिला, म्हणत माझ्यासमोर ते निघून गेले.  मी हताशपणे त्या संध्याकडे बघत होते.  तिच्या मनात काय काहूर चाललं असेल ते तिच जाणो.  पण तिच्या आईच्या अतिरकी स्वभावापुढे तिच्या शिक्षणानं, ऑफीसमधल्या पदानं मात्र पार नांगी टाकली होती. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

Comments

  1. Super dear ❤️

    ReplyDelete
  2. छान लिहिलंय

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर👌👌👍👍

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर👌👌👍👍

    ReplyDelete
  5. मुली सिनसिअर असतात .अभ्यासात पुढे जाऊन छान करिअर करतात पण त्याचवेळी त्यांच्या आयांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात त्यामुळे अगदी वस्तुस्थिती सांगितली आहेस सई त्यामुळे कित्येक मुलींची लग्न राहिलेली आहेत किंवा झालेली लग्न घटस्फोटा पर्यंत आलेली,झालेली आहेत या आयांच्या अपेक्षा मुळे. मला हे पाहून आठवते आपण ऐकायचो की सिनेमाच्या शूट च्या वेळी नट्यांच्या आयांचाच खूप रुबाब असे त्यांचीच मर्जी राखावी लागे.समाजातला हा ज्वलंत विषय मांडला आहेस.

    ReplyDelete
  6. हल्लीच्या काळातली एक विचार करायला लावणारी समस्या खूप छान मांडली आहेस....ललिता छेडा

    ReplyDelete

Post a Comment