महाकुंभ की महाकुटुंब
वाराणसी, मथुरा, वृंदावन दौरा प्लॅन करतांना त्यात प्रयागराज हे नाव नव्हतच. चार-साडेचार महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही हॉटेल बुकींगसाठी फोनाफोनी सुरु केली, तेव्हा या भागातील हॉटेल चालकांनी महाकुंभ बद्दल सांगायला सुरुवात केली. नतंर सोशल मिडियामध्ये बातम्या सुरु झाल्या. मी नव-यामागे भुणभूण सुरुच केली होती, मला प्रयागराज येथील लेटे हुए हमुमान मंदिर बघायचेच होते. शेवटी प्रयागराज महाकुंभची महती पटल्यावर नवरा प्रयागराजला आमच्या दौ-यामध्ये सामिल करायला तयार झाला. मग पुन्हा सर्व बदल. एक दिवस आणखी वाढला. नव-याचे काम म्हणजे सर्व सिस्टमॅटीक. त्यानं प्रयागराजचे अंतर गुगल मॅपवरुन काढले. वाराणसी ते प्रयागराज अंदाजे अडिच तास. वाराणसीहून पहाटेची टॅक्सी आम्ही आधी तीन महिने बुक केली. टॅक्सी भाड्यानं देणा-या संबंधित कंपनीबरोबर तेव्हाच बोलणं झालं. त्यांनी, आम्ही आहोत, कसलीही काळजी करु नका, असे आश्वासन दिल्यामुळे आम्ही निर्धास्त झालो. अगदी महाकुंभ सुरु झाल्यावर आणि आम्ही त्यामध्ये जाणार असल्याचे समजल्यावर काहींनी आम्हाला भीती वाटेल असे अनुभव सांगायला सुरुवात केली. प्रवास त्रासदायक होतो, असेही कळले. आम्ही पुन्हा संबंधित टॅक्सी कंपनीला संपर्क केला. पण त्यांनी या सगळ्या अफवा असल्याचे सांगून आम्हाला अश्वस्त केले. मग आम्ही
निर्धास्तपणे तयारीला लागलो. वाराणसीमध्ये दाखल झालो, तेव्हा त्या टॅक्सी चालकाचा नंबर आम्हाला मिळाला. आम्ही प्रयागराजला पहाटे पाच वाजता जाण्यासाठी निघणार होतो, पण टॅक्सी चालकाच्या सुचनेनुसार पहाटे चार वाजता निघण्याचे नक्की केले. कुठे, कसे भेटायचे हे रात्री दहा वाजता ठरले आणि आम्ही प्रयागराज महाकुंभची स्वप्न बघत झोपी गेलो. दुस-या दिवशी पहाटे तीन वाजण्यापूर्वीच जाग आली. पावणेचारच्या ठोक्याला तयार होऊन बाहेर पडणार तोच, त्या कंपनीचा एक मेसेज आला. आमची टॅक्सी रद्द झाली होती. प्रयागराज रस्त्यावर तुफान ट्रॅफिक असल्यानं वाहन चालकानं नकार दिल्याचे कंपनीचे म्हणणे होते. आम्हा दोघांना वाराणसीच्या त्या थंडीतही घाम फुटला. आता करायचे काय, हा प्रश्न होता. त्या ड्रायव्हरला फोन लावला, तर पठ्यानं फोन बंद केलेला. कंपनीत फोन लावला, तर त्यांनी सरळ पैसे परत पाठवतो, पण आता काहीही होणार नाही, म्हणत फोन बंद केला. आता करायचे काय, म्हणत आम्ही दोघंही हताश होऊन बसलो. पण अगदी पंधरा मिनिटातच काय उर्जा आली कोण जाणे, तयार झालो आहोत ना, जाऊन तर बघूया, एखादी गाडी मिळाली तर जाऊ, नाहीतर वाराणसीच्या घाटावर येऊन माता गंगेला नमस्कार करु, या वाक्यावर दोघांचीही सहमती झाली, आणि आम्ही महाकुंभ साठी पहाटे सव्वाचारला हॉटेल सोडले. हे सगळं अगदी वेळेसह सांगण्याचा उद्देश एवढाच की, पुढचा सगळा दिवस हा अभूतपूर्व ठरला. काही गोष्टी या ठरलेल्या असतात. त्या कोणीही, कितीही अडथळा आणला तरी बिघडवू शकत नाहीत, याची प्रचिती देणारा हा दिवस, आम्हा दोघांच्या आयुष्यातील एक सोनेरी दिवस ठरला.
वाराणसीमध्ये आम्हा गेलो तेव्हा भाविकांचा महापूर आला होता. परिणामी
मंदिरापर्यंत जाण्याचे सर्व रस्ते किमान 4 किलोमिटर आधीच चारचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आले होते. त्यात आमचे हॉटेल पार मणिकर्णिका घाटावर. त्यामुळे तब्बल एकतासाची पायपीट फक्त कारस्टॅंड पर्यंत पोहचण्यासाठी करावी लागणार होती. गल्ल्यागल्लांतून चालत रस्त्यापर्यंत येईपर्यंत आम्ही दोघंही शांत होतो. काय करावं, हा प्रश्न होता. धाडस अंगाशी येणार नाही ना, ही भीती वाटत होती., पण, गल्लीतून बाहेर पडत, रस्ता गाठतांना आमचं पहिलं पाऊल पडलं, आणि आम्हाला एक अवाढव्य बाईक आडवी आली. अँव्हेंजर नावाची ही बाईक चालवणारा मुलगा नेमका आमच्यासमोर येऊन थांबला. हा होता, संजू बाबा, फ्रॉम बनारस. आमच्यापुढील सगळ्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे, हा संजू बाबा. वाराणसी आणि प्रयागराजमधील अनेक तरुण अशाप्रकारे बाईक चालवून प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी सोडत असल्याची माहिती आम्हाला नंतर मिळाली. संजू बाबा एका साडीच्या दुकानात काम करणारा, पण पहाटे चारवाजल्यापासून आपल्या गाडीवर आमच्यासारख्या गरजू प्रवाशांना तो इच्छित स्थळी सोडत असे. आमच्यापुढे हा संजूबाबा अगदी देवासारखा आला, आणि नंतरच्या वाराणसीच्या चार दिवसांच्या मुक्कामात आमचा हक्काचा वाराणसी गाईड झाला. त्याच्या गाडीवरुन आम्ही दोघांनीही वारणसीमधील गल्लीबोळ पालथे घातले. असो.
अँव्हेंजर गाडीवर आम्हा दोघांनाही बसवून संजूबाबानं पहाटे पाचच्या सुमारास टॅक्सीस्टॅंडकडे धूम ठोकली. त्याची भन्नाट गाडी...तिचा भन्नाट स्पिड...पहाटेच्यावेळीही गजबजलेले वाराणसीचे रस्ते...आणि गोंधळलेले आम्ही दोघं...या पंधरा-वीस मिनिटाच्या प्रवासात संजूबाबानं आमची सगळी चौकशी केली, आणि अगदी एखाद्या कुटुंबातील सदस्यासारखा मदतीचा हात पुढे
केला. त्यानं ज्या टॅक्सी स्टॅडवर आम्हाला नेलं, तिथे एक गाडी प्रयागराजसाठी भरलेली होती, त्यात फक्त दोघांची कमी होती. नंतर कळलं की ही मंडळी पहाटे तीन वाजेपासून फक्त दोन सिटसाठी थांबली होती. पण आमचा ताबा संजूबाबाकडे होता. त्यानं त्या टॅक्सी ड्रायव्हरसोबत सिट दराबाबत चांगली घासाघीस केली. शेवटी त्यांनी सांगितलेल्या दरापेक्षा दोनशे रुपये कमी झाल्यावर संजूबाबानं आम्हाला त्या टॅक्सीत बसण्याची परवानगी दिली. पण त्याचवेळी प्रयागराजमध्ये गेल्यावर कुठे जाचयं, कसं फिरायचं, याबाबत आवश्यक सूचनाही दिल्या. या गाडीमध्ये वाराणसीमध्ये प्राध्यापक परीक्षा देण्यासाठी आलेले बिहारचे तीन युवक होते, आणि एक कोलकत्याचं जोडपं. बरोबर पाच वाजता हर हर महादेवच्या घोषात आमची गाडी निघाली, आठ वाजता प्रयागराजला आम्ही हजर. नशिबानं आमची गाडी प्रयागराजचीच होती. त्यामुळे त्या चालकाला गाडी घाटावर नेण्याची परवानगी होती. दरम्यानच्या प्रवासात आमच्यासोबत असणा-या बिहारच्या तीन प्राध्यापक युवकांनी प्रत्येक घाटाची सविस्तर माहिती दिलेली, आणि आम्ही कसा महाकुंभ बघायचा याचीही माहिती दिली. त्यात त्या चालकांनीही आम्हाला वाराणसीला परत जातांना मला फोन करा, असे सांगितले. शिवाय गाडीमध्ये असलेल्या त्या जोडप्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली. हे दोघंही कोलकत्याचे. अविनाश, अविशा आणि आम्ही दोघं असा चौघांचा आमचा ग्रुप महाकुंभमध्ये पोहचला. सुरुवातीला थोडं गोंधळल्यासारखे झाले. अफाट
गर्दी. कोण कुठे चालले आहे, हे कळेना. पण एक पोलिस मदतीस आला, त्यानं आम्हाला ज्या घाटावर जायचे आहे, तिथे कसे जायचे याची माहिती दिलीच, पण काहीही काळजी करु नका, आणि एकमेकांचे हात सोडू नका, ही सूचना दिली. महाकुंभमधील पोलीसांचा आलेला हा पहिला अनुभव. त्यानंतर अवघा महाकुंभ फिरतांना येथे तैनात असलेल्या पोलीसांचा आलेला अनुभव हा या सर्वांचे पाय धूवून आशीर्वाद घ्यावेत इतका भावणारा होता.
महाकुंभ त्रिवेणी स्थानावर स्नान झाले. फोटो काढून झाले. डॉ. अविनाश आणि डॉ. अविशा आमच्या जुन्या परिचयाचे आहेत, असेच जोडले गेले. अशीच अनेक मंडळी या महाकुंभमध्ये जोडली गेली. मध्यप्रदेशच्या रतलाममधील एक मुलींचा गटही असाच जोडला गेला. वय वर्ष 15 ते 25 वयोगटातील या 12 मुली. त्रिवेणीमध्ये स्नान झाल्यावर कपडे बदलण्यासाठी आम्ही चेंजिंग रुमबाहेर रांग लावून उभे होतो. तिथेच या सगळ्या आल्या. दोन-तीन नंबर होते. अरे बहोत टाईम लगेगा, म्हणत त्यांनी सरळ त्यांच्या बॅगांमधून चार चादरी काढल्या. त्यातील दोन चादरींचीं टोंक माझ्या हातात दिली, दिदी, जरा पकडो तो...म्हणत आणखी दोन टोकं समोर उभं असलेल्या महिलेच्या हातात दिली. त्यांनी त्यांचा चेंजिंग रुम तयार केली. एकावेळी अगदी चार चार जणी त्यात घुसल्या आणि कपडे बदलून मोकळ्या झाल्या. मी आवाक होऊन त्यांच्या कृतीकडे बघत होते. त्यांना सहज विचारले, डर नही लगा...चादर छोडी होती तो...अरे दिदी...डर काहे का...यहा सब अपने लोग है...और आपको दिदी बोलाना...तो, असं म्हणत ती पोरगी चक्क गळ्यात पडली. तिच्यासोबतच्या सर्वजणीही हसायला लागल्या. काही क्षणात आम्ही एका कुटुंबाचा भाग झालो. मग गप्पा झाल्या आणि त्या निघाल्या. त्या गेल्यावर जाणवलं, की हा महाकुंभ म्हणजे, एक मोठं कुटुंबच आहे. आम्ही महिला कपडे बदलण्यासाठी ज्या रांगेत उभ्या होतो, त्यात बंगाल, तामिळनाडू, गुजरात या राज्यातून आलेल्या सर्वजणी होत्या. पण राज्य, भाषा, जात बाजूला ठेऊन आम्ही गप्पा मारल्या. भेटल्यावर पहिला प्रश्न कॉमन, स्नान हुआ...अच्छा लगा...एवढ्या दोन वाक्यांनी बोलायची सुरुवात व्हायची आणि मग आपलेच कोणी जवळचे भेटले आहेत, अशा गप्पा रंगायच्या.
नंतर आम्ही चौघांनी जेवढा जमेल तेवढा महाकुंभ बघितला. अक्षयवट,
पाताळपुरी, सरस्वती कूप, लेटे हुए हनुमानजी या पवित्र स्थानांना भेट दिली. येथेही थोडी गर्दी होती. पण कुठलिही गैरसोय जाणवली नाही. सगळीकडे लक्षात येईल, अशी स्वच्छता आणि कायम मदतीसाठी तयार असलेले सुरक्षा रक्षक, पोलिस. अनेक आश्रमांमध्ये भाविकांसाठी भंडारे चालू होते. काही ठिकाणी सरबताचे वाटप, तर काही ठिकाणी जिलेबी,बुंदीचे वाटप. कितीतरी भाषा एकाचवेळी कानी पडत होत्या. आम्ही एका चणेवाल्याच्या गाडीवर गेलो. कच्च्या चण्यांना मोड आणून त्याचे चाट हा तरुण विकत होता. रमेश त्याचे नाव. रमेश आणि त्याच्या सर्व कुटुंबांनी या महाकुंभमध्ये अशाच गाड्या लावल्या आहेत. कुणी असेच चणाचाट विकतोय तर कुणी फळांचा ज्युस. रमेश चाट करतांना सांगत होता, मेरे अकाऊंटमे दस लाख जमा हो गये...आज तक एतना पैसा नही देखा. रमेश महाकुंभ सुरु होण्याआधी दहा दिवस येथे आला होता. तेव्हापासून नावापुरता तो घरी गेलेला. अगदी तिन शिफ्टमध्ये त्याची चाट गाडी सुरु असल्याचे तो अभिमानानं सांगत होता. त्याच्या घरातील महिलासुद्धा आता याच कामात मदत करत होत्या. जेवढं काम करु तेवढा पैसा मिळतोय, पुरा भारत यहा है...अरे भारत क्या परदेसभी यहा है...म्हणत त्यानं आमच्या हातात चाटच्या पुड्या दिल्या. भविष्यात तो याच पैशांच्या मदतीनं प्रयागराजमधील मंदिरांच्या आसपास दुकान खरेदी करण्याचा विचार करतोय. आम्ही पैसे देऊ लागलो तेव्हा म्हणाला, स्कॅनकरुन पैसे द्या...ते बरं पडतं...बदलत्या भारताचे चित्र महाकुंभमध्ये होते. हेच चित्र बघत आम्ही
चौघंही मनमुराद फिरलो. आमच्यासोबत असलेले अविनाश आणि अविशाही भटके निघाल्यानं सायंकाळी सात वाजेपर्यंत चांगलीच पायपीट केली. मग वाराणसीला परत जाण्याची तयारी सुरु केली. ज्या गाडीनं आम्ही आलो होतो, त्या गाडीच्या चालकाला फोन लावला. तर तो परत वाराणसीला गेल्याचे कळले. त्याला यायला दोन तास लागणार होते. पण त्यानं आम्हाला बसस्टॅड गाठण्याचा सल्ला दिला. तिथून वाराणसीसाठी लागोपाठ गाड्या सुटत असल्याची माहिती दिली. महाकुंभ परिसराला शेवटचा नमस्कार करत चालायला लागलो. पण बसस्टॅड जवळपास अर्धातासाच्या अंतरावर, तिथे जाण्यासाठी वाहन मिळेना. प्रयागराजच्या ज्या चौकात उभे होतो, तिथे प्रयागराजचे काही तरुण आलेल्या भाविकांना काय, हवं नको, याची चौकशी करत होते. आम्हा दोघींनाही बाथरुम वापरायचे होते. त्यापैकी एका तरुणानं मला विचारणा केली, आपको कुछ चाहिए दिदी, तेव्हा मी जरा संकोचत बाथरुमला जायचे असल्याचे सांगितले. लगेच त्या तरुणानं, चलो, मेरे पिछे, म्हणत आम्हा दोघींनाही एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. आम्हाला बाथरुम दाखवत म्हणाला, कुछ भी लगेगा तो बोलो, सब अपनेही है. आम्ही दोघींनीही त्याला नमस्कार केला. असेच तरुण पुढे भेटले. त्यांच्या बाईक होत्या. त्यांनी आम्हा चौघांनाही बसस्टॅंडवर सोडलं. बसनं प्रवास करायचा म्हटल्यावर माझ्या पोटात गोळा आला. पण उत्तरप्रदेश परिवहन सेवेची ती स्वच्छ बस बघून निश्वास सोडला. रात्री दहाच्या सुमारास या बसनं आम्हाला वाराणसीच्या वेशीवर सोडलं.
अर्थात तिथे आमचा संजूबाबा त्याच्या डॅशिंग अँव्हेंजरसह आधीच हजर होता. पहिली त्यानं आमची सगळी चौकशी केली. स्नान कैसे हुआ...कोई तकलिफ तो नही हुई...हे विचारल्यावर मग, बाबा का दर्शन किया क्या...म्हणत अजून एक बॉम्ब टाकला. बाबा म्हणजे, बाबा विश्वनाथ...आम्ही दोघंही एकसाथ नाही म्हटलो. मग काय, संजू बाबा म्हणाला, मै हूं ना...चिंता मत करो. पुढच्या अर्धा तासात या पठ्ठ्यानं आम्हाला बाबा विश्वनाथ दर्शनाच्या रांगेत उभंही केलं, आणि त्यानंतर अवघ्या तासाभरात दर्शनही झाले. त्याच्याच सुचनेनुसार मग रात्री बाराच्या सुमारास माता अन्नपूर्णा आणि माता विशालाक्षीचेही दर्शन घेतले. या सर्व दरम्यान संजू बाबाच्या हजार सूचना होत्या. अर्थात चांगल्याच. आम्ही घाटावरुनच कसे आमचे हॉटेल गाठू शकतो, याचाही मार्ग त्यानं दाखवला होता. रात्री साडेबाराच्या सुमारास माता
विशालाक्षी मंदिरातून बाहेर पडलो, आणि घाट गाठला. पहाटे तीन वाजता आमचा दिवस सुरु झाला होता. रात्री एक वाजता आम्ही हॉटेल गाठलं, तेव्हा या सगळ्या दिवसांची रिवीजन आमच्या मनात चालू होती. दोघांनाही जाणीव झाली, ती म्हणजे, महाकुंभ म्हणजे, एक महाकुटुंब. आज हे महाकुंभ करतांना आमचेच कुटुंब कितीतरी मोठं झालं होतं. संजूबाबा... डॉ. अविनाश आणि डॉ. अविशा, चाटवाला रमेश, त्या रतलामच्या मुली, नेपाळचे एक कुटुंब, आम्हाला वेळोवेळी मदत करणारे पोलिस...असे कितीतरी त्यात समाविष्ठ झाले होते. महाकुंभमधील त्रिवेणी संगमावर स्नान करुन नेमकं काय मिळतं, हे मला माहित नाही...मात्र आम्हा दोघांना आलेल्या अनुभवानुसार या महाकुंभमध्ये नुसतं गेल्यावरही मन व्यापक होतं. आपल्या देशाची खरी ओळख होते. आपल्याच देशातील माणसं नव्यानं भेटतात. त्यांची भाषा, चेहरे, पोशाख, जात वेगळी असली तरी मन हे अस्सल भारतीय असतं, याची जाणीव होते. तिच आम्हाला झाली....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
केवढी प्रचिती त्याच्या अस्तित्वाची ! सई तुमचा अनुभव आणि त्याचे रेखाटन दोन्ही सुंदर !
ReplyDeleteखूप सुंदर प्रवास वर्णन, पर्यटनाचा मुख्य उद्देश आपला देश पाहणे,संस्कृती अनुभवणे,निसर्गाचा आनंद घेणे,वेगळे खाद्यपदार्थ अनुभवणे आणि माणसे जोडणे. तुमच्या संपूर्ण प्रवासात हा उदेश तुम्ही मनसोक्त अनुभवला, जसाच्या तसा वाचकांपर्यंत पोहोचवला .मुख्य म्हणजे खूप माणसे जोडली.पुन्हा ती भेटतील का नाही माहीत नाही,पण आठवणींच्या रूपाने त्या व्यक्ती कायम स्मरणात राहतील.खूप छान
ReplyDeleteखूपच छान वर्णन !!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete