साजूक तूप
मी आल्याशिवाय काहीही करु नकोस...असा धमकीवजा फोन मला दोनवेळा आला. पण तो फोन करणा-या सुनिताचा अर्धा तास पत्ता नव्हता. आत्ता येते, पाच मिनिटात येते, म्हणत, सुनिता बरोबर चाळीस मिनीटांनी धापा टाकत हजर झाली. दरवाजा उघडायच्या आता तिचा पहिला प्रश्न होता, झालं का...मी नाही म्हणताच, बाई धापकन सोफ्यावर बसल्या. मग पंख्याची हवा आणि दोन ग्लास पाणी पिऊन सुनिता तयार झाली. मी करते सर्व, तू फक्त सांग, काय करायचं ते, म्हणत, तिनं स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. यावरुन आम्ही दोघी कोणतातरी अवघड पदार्थ करणार आहोत, असा गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज दूर करा. कारण सुनिताची ही तयारी सुरु होती, साजूक तूप करण्यासाठी. आमच्याकडे दर आठवड्याला ठराविक दिवशी सायीच्या विरजणाचे ताक होतं. त्यावर पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा येतो. मग त्या लोण्याचं पिवळं धम्मक तूप तयार होतं. शि-या पासून ते केकपर्यंत काहीही करायचं असेल तर ते या साजूक तूपातच तयार होतं. दरवेळी या पदार्थांवर ताव मारणारी सुनिता, तुझ्या तूपात जादू आहे, म्हणत सर्व श्रेय तूपाला देते. माझ्याकडून तिनं शंभरवेळा तूप कढवण्याची रेसिपी ऐकली आहे. वास्तविक तूप कढवण्याची रेसिपी अशी नसतेच. फक्त गॅस चालू करायचा, आणि योग्य वेळी बंद करायचा. बाकी सर्व आपोआप होतं. पण या बाईनी बहुतेक वेळा तूप करपून टाकलं आहे, किंवा कढण अर्धवट असतांना गॅस बंद केला आहे. त्यामुळे अवघं तूप लवकर खराब झालं. या सर्वात बाईंनी माझं नाव सहज पुढे केलं. तू बरोबर सांगितलं नाहीस. माझं लोणी खराब झालं आहे, म्हणून ती मोकळी झाली. हे फारवेळ व्हायला लागलं आणि मग मी तिला एकदा लाईव्ह बघ बाई, म्हणून आमंत्रण दिलं. सुनिता बहुतेक अशाच आमंत्रणाच्या प्रतीक्षेत होती. दहा मिनिटात पोहचते, सांगत ती चाळीस मिनिटांनी हजर झाली होती. आणि आता लोण्यापासून साजूक तूप करण्याची पद्धत प्रत्यक्षात बघायला तयार झाली होती.
आमच्याकडे बहुधा सोमवार हा ताक, लोणी आणि तूपाचा वार असतो. सायीच्या विरजणाचा डबा भरला की, त्याचे मिक्सरमध्ये सकाळी उठल्यावर ताक करायचे. मग या ताकावर सायीच्या विरझणापेक्षा जरा जास्तच मोठा तुपाचा गोळा तयार झाला, की अख्खा दिवस छान जाणार याची पावती मिळते. थोडावेळ हा गोळा फ्रिजमध्ये विराजमान होतो. पूजा झाल्यावर श्रीकृष्णाला वाहिलेली तुळस त्या लोण्यावर ठेऊन मोठ्या टोपात लोणी कढवायला ठेवायचं. फक्त गॅस चालू करायचा, त्या मंद आचेवर तूप कढायला सुरुवात होतो. थोडी काळजी घेतली तर कुठलिही ढवळाढवळ न करता तूप तयार होतं. पहिल्यांदाच तूप कढवायला जे भांडे घेणार ते चांगल्या जाड बुडाचे आणि थोडे मोठे घ्यायचे. सुरुवातीला तूप जेव्हा गॅसवर ठेवले जाते, तेव्हा सुरुवातीला त्यातून पांढ-या रंगाचा फेस आल्यासारखा दिसतो. भांडे छोटे असेल तर तूप ओतूही जाते. त्यासाठी मोठं भांडं घेतलं तर लोणी कढवायला ठेवून अन्य कामंही आरामात करता येतात. लोणी कढवण्याच्यी ही सगळी प्रक्रिया एखाद्या माणसाच्या आयुष्यासारखीच असते. सुरुवातीला लहान मूल, नंतर तारुण्यात प्रवेश करण्यापूर्वीची तडतड, मग तारुण्यातले तेज, त्यानंतर साठीत होणारी मनाची शांतता आणि उतार वयात पुन्हा लहानमुलासारखे होणारे हट्टी मन...अगदी तशीच या कढणा-या तूपाची अवस्था असते.
लोण्याच्या गोळा असलेला टोप एकदा गॅसवर चढवला की, लोणी वितळायला सुरुवात होते. नवख्याला दूध उकळायला ठेवले आहे, असेच वाटेल, ही बालपणातील उल्लड अवस्था असते. मग हळूहळू त्याला स्थिरता यायला लागते, हळूच एखादा बुडबुडा निघतो, ही तारुण्यापूर्वीची तडतड. मग तूप
तरुण्याकडे झुकू लागतं. वितळलेल्या लोण्यामुळे तयार झालेले पांढ-या रंगाचे अर्धकच्च तूप स्थिरायला सुरुवात होते. त्याच्यावर आगळे तेज येऊ लागते. ही तारुण्याची चाहूल अवघ्या घराला त्याच्या सुवासानं कळू लागते. मग या नवतारुण्याला कवेत घेत तूपाचे कढण स्थिर व्हायला सुरुवात होते, अगदी साठीतल्या माणसासारखे. टोपाच्या तळाशी बेरी तयार व्हायला लागते. या बेरीनं चॉकलेटी रंग घेतला की तूप तयार झाल्याची पहिली बेल वाजते. कढणा-या तूपाच्या सुवासानं अवघं घर भरुन जातं. मग कुठूनसा पांढ-या रंगाचा फेस येतो, आणि पुन्हा तूप ओतू जाते की काय अशी परिस्थिती तयार होते, ही वृद्धापकाळातील लहान मुलांसारखी हट्टी अवस्था. हे एक जीवनचक्र पूर्ण झाल्याची खूण असते. बरोबर तेव्हाच गॅस बंद केला, की तूप तयार. त्यात टाकलेली तुळशीची पानं त्या बेरीमध्ये कुठे लपून पार सुकी झालेली असतात. गॅस बंद केल्यावर दहा-पंधरा मिनीट या तूपाची कढण्याची प्रक्रिया चालूच असते. ती चालू द्यावी. तूप अगदी थंड झाल्यावर तूपाच्या बरणीमध्ये मग हे पिवळं धम्मक तूप भरुन ठेवायचं. तूप करण्याची ही पद्धत माझ्या आईची. रेवदंड्याला आमच्या घरात जवळपास दोन दिवसांनी तरी असं तूप तयार व्हायचं. आता माझ्याकडे आठवड्यानं साजूक तूप तयार होतं. मला आठवतं, पहिल्यांदा मी तूप तयार केलं, तेव्हा नवरा काय हरखून गेला होता. घरी तूप होतं, हेच त्याच्यासाठी नवीन होतं. ब-याचदा तूपाच्या बेरीच्या रेसिपी शेअर होतात, पण खरं सांगू, ती तूपाची बेरी माझ्याकडे कधी एक साधा पेढा होईल, एवढीही झाली नाही. अगदी थोडीशी बेरी त्या भांड्यात रहाते, मग तूप बरणीत ओतल्यावर त्या भांडंयात भात लावते. मऊसर तूपाच्या सुगंधातला भात आणि ताकाची कढी हा बेत झकास
होतो...
असो...हे सर्व होता होता, इकडे तूप तयार झालं होतं. पंधरा-वीस मिनीटं, सुनिता फक्त त्या तुपाच्या
भांड्याकडे बघत राहिली होती. एवढंच करायचं
असतं. फक्त तुळशीचं पान टाकायचं आणि गॅस
चालू करायचा, मंद आचेवर तूप तयार, केवढं सोप्प...मी हसत मान हलवली. तूप निवेपर्यंत एका कढईमध्ये रवा भाजायला
घेतला. ते नुकतच तयार झालेलं तूप त्यात
टाकलं. रवा भाजल्यावर साखर, दूध आणि
केशराच्या चार काड्या टाकल्या. छान साजूक
तूपातला शिरा तयार झाला. बाकी राहिलेलं
तूप एका काचेच्या बाटलीमध्ये भरलं, आणि ती सुनिताच्या हातात दिली. पिवळ्या धम्मक तूपाची ती बाटली पाहून बाई अजून
हरखून गेल्या. तिनं दीर्घ श्वास घेत त्या
तूपाचा सुगंध घेतला. शि-याच्या डिश तयार
होत्या. त्यावर ताव मारणारी सुनिता अगदी
शांत होती, मी विचारलं तर म्हणाली, काही नाही, तो तूपाचा सुगंध साठवून
ठेवलाय....त्याला जपतेय...एकूण काय साजूक तूपाची ही साजूक आणि नाजूक गाथा एका
घरातून हळूच दुस-या घरात पसरली होती.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
साजुक तुपासारखी घरगुती रेसिपीचा साध्या व सोप्या मस्त भाषेत गृहिणींना दिलेला गृहपाठ.
ReplyDeleteसाजूक लेख ☺️
ReplyDeleteकाही जणांना अवघड वाटणारी प्रक्रिया सोपी करून सांगितलं.
ReplyDeleteMasta
ReplyDeleteसई विषय किती साधा पण तू त्याला इतक्या सुंदर रीतीने वर्णन केलंस की वाचताना सगळं डोळ्यासमोर उभं केलंस! ललिता छेडा
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDeleteखूप छान.
ReplyDelete