रीठा, शिकेकाई आणि उन्हाळा

 

रीठा, शिकेकाई आणि उन्हाळा

वीस रुपयाचा एक...तीन घे,  पन्नासला देते...पानात रीठ्याचे वाटे होते.  एका वाट्यात दहा-बारा तरी रीठा होते.  मी त्या वाट्याकडे आणि ते घेऊन बसलेल्या त्या आदिवासी महिलेकडे पाहिले.  नुसते रीठा घेऊन काय करु, शिकेकाई नाही का, म्हणून तिला परत प्रश्न विचारला.  हाय ना...म्हणत, तिनं तिच्या टोपलीवरील पानं बाजुला केली.  त्यात अगदी मोजक्या शिकेकाईच्या शेंगा उरल्या होत्या.  कमी हायेत, म्हणून वाट्याला नाय लावल्यात...दहा रुपये दे त्याचे...म्हणून त्या बाईनं त्या सर्व शेंगा रीठ्याच्या वाट्यावर ठेवल्या.  मी तिला सर्व वाटे द्यायला सांगितले, आणि तिला शंभर रुपये दिले.  बाकीचे पैसे ती परत देऊ लागली, तेव्हा ठेऊन घे म्हणून रीठा आणि शिकेकाई मी बॅगेत भरुन घेतले.  या बायका अगदी साध्या, भोळ्या स्वभावाच्या असतात.  शंभरची नोट पाहून ती खूष झाली, पण जास्तीचे पैसै आहेत, याची जाणीव ठेऊन लगेच म्हणाली, दोन दिवसांनी ये...बाकीची शिकेकाई देईन तुला....अर्थातच ते मला शक्य नव्हते.  तिला नमस्कार करत, मी निघाले, तेव्हा हातात दोन्ही खांद्यावर टम्म फुगलेल्या पिशव्या होत्या.  पण त्यांचे वजन काहीच लागत नव्हते.  उन्हाळी रानमेवा घेण्यासाठी ठाण्याच्या बाजारात हमखास माझ्या दोन-तीन तरी फे-या होतात.  सकाळी अगदी सात, साडेसातच्या सुमारास बाजार गाठावा लागतो. मग त्यात चोखायचे आंबे म्हणजे, बिट्या, जांभळं, ओले काजू, आमसूलं, मऊसूत ताडगोळे असं बरंच काही मिळतं.  ज्या दिवशी गेले होते, तेव्हा माझी लॉटरी


लागली.  कारण एका विक्रेत्याकडे एकच सुरंगीचा गजरा होता, तो माझ्या पिशवीत आला.  बाकी भाजी, फुलं घेऊन बाजारातून बाहेर पडतांना हे रीठ्याचे वाटे दिसले.  मग आधीच फुगलेल्या पिशवीत हे रीठा आणि शिकेकाई, समावून गेले.


तासाभरानं घरी आल्यावर पहिल्यांदा त्या रीठा आणि शिकेकाईला गरम पाण्यात भिजवून ठेवलं.  ताडगोळे थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये गेले,  बिट्यांना टोपलीत ठेवलं, तर तो अमूल्य सुरंगीचा गजरा हॉलमध्ये एका डिशमध्ये ठेऊन दिला.  रीठा आणि शिकेकाईचा एक भाग घेतला आणि चांगली उकळी काढली.  थंड झाल्यावर पाणी गाळून केस धुवायला घेतले.  हे सर्व करतांना लहानपणीची आठवण होत होती.  तेव्हा दर रविवार हा रीठा आणि या शिकेकाईचा असायचा.  आई शनिवारी चार रीठे आणि शिकेकाईच्या दोन शेंगा भिजायला टाकायची.  मग सकाळी उठून त्यांना उकळायला ठेवायची.  गार झाल्यावर चांगलं चिवडून मग गाळनीनं गाळून आई तयार व्हायची.  रविवारचा हा केस धुवायचा कार्यक्रम म्हणजे, केसांबरोबरच डोळ्यांच्याही स्वच्छतेचा कार्यक्रम असायचा.  कारण कितीही जपलं तरी ते रीठ्याचं पाणी डोळ्यात जायचंच.  मग लालेलाल झालेल्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं, की आईला रडवेल्या आवाजात सांगायचे, आता पुन्हा हे रीठ्याचे पाणी नको...आई तेवढ्यापुरती हो म्हणायची. पण पुढचा रविवार असाच असणार होता, याची खात्रीच असायची.  कधीतरी या रीठा आणि शिकेकाई सोबत आई, कोरफडीच्या पानात भिजलेली मेथी केसांना लावत असे.  हे अजून किचकट प्रकरण.  केस चिपचिपे होऊन जात.  मग अशावेळी रीठ्याच्या पाण्यांनी आई केस धुवायची.  फक्त रीठ्याच्या पाण्यांनी केस धुतले की ते इतके, फुलायचे की विचारायला नको.  जरा केस भुरभुरीत होऊन वा-यावर उडू लागले की आई हातात मावेल तेवढं तेल घेऊन डोक्यावर चोपून ठेवत असे.  मग काय, पुन्हा




आरडाओरडा आणि आईच्या हट्टापुढे माझी माघार.  केसांच्या दोन वेण्या,
त्याही रिबिनीनं वर बांधून आईचं समाधान व्हायचं. 

आत्ताही केस धुतांना आईचा तो अट्टाहास आठवत होता.  आता जे काही केस शाबूत आहेत, ते आईच्या अट्टाहासामुळे.  लहानपणी लांबसडक असलेल्या या केसांना ती रीठा, शिकेकाई शिवाय अन्य कुठलाही शांपू लावत नसे.  जास्वंद, मेथी, आवळा, कोरफड यांचा महिन्यातून एकदा तरी लेप लावायची.  मग त्याचा चिकटपणा जाण्यासाठी पुन्हा रीठा पाण्याची आंघोळ.  आता एवढं करायला कधी वेळच मिळत नाही.  पण अनायसे मिळालेल्या या रीठ्यांमुळे पुन्हा बालपणीत हरवल्यासारखे झाले.  अगदी तेव्हा जसे रीठ्याच्या पाण्यामुळे डोळे सुजायचे, तसेच आत्ताही झाले.  डोळ्यातून सतत पाणी वाहत होते, अगदी थोडा जरी डोळा बंद कऱण्याचा प्रयत्न केला, तरी हलक्या वेदना होऊ लागल्या.  डोळ्यातून सतत पाणी येऊ लागले.  चेहरा आरशात बघितला तर दोन्ही डोळे आणखी टपोरे झालेले.  उगाचच त्या रीठ्याच्या नादाला लागले, असा उगाच एक विचार मनात डोकवला.  पण तेवढ्यात त्या सुरंगीच्या गज-याचा सुवास आला.  हॉलमध्ये ठेवलेल्या सुरंगीच्या गज-यानं आपलं काम सुरु केलं होतं.  घर त्या सुगंधानं भरुन गेलं होतं.  त्या सुगंधात डोळ्यांमध्ये होणारी जळजळ कमी वाटू लागली.  मग तो ताडगोळे भरुन ठेवलेला डबा बाहेर काढला.  ब-याच दिवसांनी खिडकी पकडली आणि ताडगोळ्यांचा स्वाद घ्यायला सुरुवात केली.  काही वेळातच रीठ्याच्या आणि शिकेकाईच्या


पाण्याचा परिणाम दिसून आला.  केस भुरुभुरु उडायला लागले होते.  लाल झालेला डोळाही पूर्वपदावर आलेला.  त्या ताडगोळ्यांनीही कमाल करायला सुरुवात केली होती.  एरवी, किती गरम...किती गरम हे माझं घोषवाक्य असतं.  पण तोंडातील ताडगोळ्यांचा स्वाद आणि तो सुरंगीच्या फुलांचा सुगंध यामुळे तो दिवस गारेगार झाला होता. 

मग बाकीच्या रिठ्याच्या पाण्यात देवाची सर्व भांडी लख्ख करुन झाली.  नेहमीच्या पाण्याच्या तांबेच्या भांड्यांनाही तकाकी आली.  रोजची स्वयंपाक घरातील तांब्या-पितळेची भांडीही लख्ख झाली.  एवढं करुनही चार रीठे आणि


एक शिकेकाईची शेंग बाकी होती.  त्यांना तसचं लोखंडाच्या कढईमध्ये भिजत घालून ठेवलं.  रात्री त्यामध्येच मेहंदी टाकली, की दुस-या दिवशी घरचा  केसांचा एनर्जी पॅक तयार होणार होता.  एवढं सगळं झाल्यावर आता काय, हा प्रश्न होता.  मग हळूच केसांवरुन हात फिरवला.  आता त्या जांभळांचा नंबर लागला.  एकूण काय, उन्हाळ्याला सुसह्य करणा-या अनेक गोष्टी आपल्या आसपास असतात,  फक्त त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा मुहूर्त काढायचा असतो...बाकी सगळं ही मंडळी बघून घेतात....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. साई छान लेख सर्व बालपण डोळ्यासमोर आले.तुझे कौतुक वाटते .

    ReplyDelete
  2. महेश टिल्लू25 April 2025 at 17:52

    हे सर्व काही २५/३० वर्षा पूर्वी अनुभवलेले आहे,आता ह्या गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.नवीन पिढीला तर सांगूनही कळणार नाही पण काय करणार? कालाय तस्माय नमः

    ReplyDelete
  3. Khooopach sundar lekhmazyahi lahanpanichya aathvani jagya zalya

    ReplyDelete

Post a Comment