अपघात होता होता

 

अपघात होता होता




मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या अपघाताची बातमी टिव्हीवर ऐकली आणि मन सुन्न झालं.  हातातली सर्व कामं बाजुला ठेऊन बातमी ऐकू लागलो, तर तिथं दिवाळच निघालं होतं.  अपघात नेमका कसा झाला, हे माहित नसतांनाही जमेल तेवढे अंदाज लावण्यात येत होते.  अगदी मालगाडी पासून एक्स्प्रेसमधून प्रवाशी पडल्याचे सांगण्यात येत होते.  एकदा तर घातपाताची शक्यता वर्तवली.  मृतांचा आकडा कधी वाढत होता, कधी कमी होत होता.  अर्थात त्यांच्या टीआरपीसाठी चाललेला हा सर्व घोळ होता.  मात्र बातम्या पहाणा-यांना यातून किती वेदना होतात, याची कल्पनाही करता येत नाही.  बातम्या बंद केल्या आणि मन शांत करण्याचा प्रयत्न करु लागले.  पण डोळ्यासमोर काही वर्षापूर्वीचा घटनाक्रम जसाच्या तसा उभा रहात होता.

 

पंचवीस वर्षापूर्वीची घटना.  लग्नाला सहा महिने झालेले.  तेव्हा पार्ल्यातील


वृत्तमानस वृत्तपत्राच्या कार्यालयात कामाला होते.  रोज सायंकाळी सहा-सव्वासहाच्या सुमारास दादरहून फास्ट लोकल पकडायचे.  अर्थात तेव्हाही चिक्कार गर्दी असायची.  दे मार परिस्थिती.  धक्के देत आणि धक्के सहन करत गाडीत चढायचा प्रयत्न करायचा.  हातातील बॅग, ओढणी आणि केस कसेतरी सांभाळत गाडीत चढलं, की एव्हरेस्ट चढल्याचा आनंद व्हायचा.  एकदा अशीच एक गाडी पकडतांना सर्वात शेवटी राहिले.  अगदी दारातच.  दरवाजा मध्ये असलेल्या दांड्याला घट्ट पकडून जवळपास लोंबकळत होते, आणि किंचाळत होते.  मी पडणार अशी माझी खात्रीच झाली होती, एवढी मी बाहेर लटकत होते.  दरवाजात असलेल्या बायकांना आत जा...म्हणून ओरडून झाले...रडून झाले...पण काहीही फरक पडत नव्हता...त्यांचीही चूक नव्हती...कारण गर्दीच तशी होती.  कुर्ला येईपर्यंतच्या सात-आठ मिनिटात नको नको ते विचार मनात आले.  शेवटी कुर्ला स्टेशन आलं आणि मला डब्यात शिरण्याची संधी मिळाली.  या सर्वात माझा ड्रेस फाटला गेला होता, केस विस्कटले गेले होते.  दांड्याला हात एवढा घट्ट पकडला होता की, पुढचे काही दिवस खांदे प्रचंड दुखायला लागले.  या सर्वात माझा आत्मविश्वास कुठल्याकुठे गायब झाला.  नंतर मी त्या फास्ट ट्रेनचा नाद सोडला आणि स्लो ट्रेन पकडू लागले. 

आता या घटनेला पंचवीस वर्ष होऊन गेली तरी, ट्रेनमध्ये लटकत असतांना


कोणी पडलं तरी ती घटना अक्षरशः डोळ्यासमोर उभी रहाते.  अंगावर काटा येतो.  त्या दिवशी आपणही अशाप्रकारे गेलो असतो तर...हा विचार मनात येतो.  एवढ्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत ट्रेन प्रवासातले कितीतरी अनुभव सोबत आले आहेत.  मुंबईची ट्रेन म्हणजे, मुंबईची रक्तवाहिनी वगैरे म्हटली जाते.  पण सध्या जी व्यवस्था आहे, त्यावरुन ती रक्तवाहिनी नाही, तर रक्त शोषणारी व्यवस्थाच असल्याचे अधिक वाटते.  एवढ्या वर्षात अनेक अपघात या ट्रॅकवर पाहिले आहेत.  गर्दीमुळे दारात लटकणारे ट्रॅकवर पडले जातात, रेल्वेच्या चाकाखाली येत रक्ताच्या थारोळ्यामधून मृत्यूच्या वाटेवर जातात.  हे सर्व भयाण आहे.  जो जातो, तो माणूस असतो.  त्याला एवढ्या गर्दीमध्ये दारात लटकण्याची हौस नसते.  बरं, तो हा सर्व प्रवास करतांना पैसे मोजतो.  पण त्या पास किंवा तिकीटावर लिहिलेही एकही सुविधा त्याला उभ्या प्रवासात मिळत नाही.  एखादी कालपरवासारखी मोठी घटना झाली की, एक वाक्य मात्र कामय ऐकवलं जातं,  आता ऑफीसच्या वेळा बदलणार.  ट्रेनची गर्दी कमी करणार.  गेली वीस-पंचवीस वर्ष हे वाक्य आपण कायम ऐकत आलोय, एवढ्या वर्षात कुठल्या ऑफीसच्या वेळा बदलल्या हे बदलण्याचे आश्वासन देणारेच जाणो.  दोन-चार दिवसात जे गेले आहेत, त्यांचा शोक संपतो.  तो पुढचा कोणी मरेपर्यंत सगळं अलबेल चालू रहातं.  मग पुन्हा तीच सत्यात न येणारी आश्वासनं आणि सांत्वनाची वाक्य.  यामध्ये मरतात ती त्या व्यक्तीची कुटुंब.  काही वर्षापूर्वी अशीच एक मुलगी माझ्यासमोर पडली.  तेव्हा हाती फोन नव्हता.  त्यामुळे डोंबिवलीला उतरल्यावर रेल्वे पोलीस चौकी गाठली.  तेव्हा हालचाल झाली.  दिव्यामधील रेल्वे पोलीसांनी त्या मुलीला शोधून काढले.  जिवंत होती.  पण पोटाला जबरदस्त मार लागला होता.  चार दिवस ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झगडत होती.  तिच्या आईला भेटले, तर तिनं हंबरडा फोडला होता.  लेक नुकतीच नोकरीला लागली होती.  एकुलती एक लेक,  याच नोकरीच्या नादानं गेली.  ट्रेननं गेलीच कशाला, म्हणून ती आई हंबरडा देत प्रश्न विचारत होती.  अशा कितीतरी घरातील एकुलते एक...या ट्रेनच्या प्रवासात कायमचे हरवले आहेत. 

बरं, या सर्वात तो मुंबई स्पिरीट नावाचा शब्द कोणी तयार केला आहे काय माहित....कारण या शब्दाच्याखाली किती यातना दडल्या आहेत, हे जो रोज प्रवास करतो, त्यालाच माहित आहे.  घरची जबाबदारी, कार्यालयातील वेळा,  मुलांचे भविष्य, रोजचा खर्च...आदी अनेक गरजा या मुंबई स्पिरीटच्या खाली दाबल्या गेल्या आहेत.  यातून प्रत्येक प्रवासी गेली कित्तेक वर्ष जात आहे.  रेल्वेमध्ये सुविधा झाल्या नाहीत का, हा प्रश्न विचारला जातो.  सुविधांच्या नावावर एसी लोकल सुरु झाली आहे.  पण सकाळच्या वेळी ही लोकल कधी वेळेवर येते, आणि त्यात किती जणांना बसायला मिळतं, हा संशोधनाचा विषय आहे.  मध्यंतरी नव-याला एक अत्यंत भीतीदायक अनुभव आला.  रोजच्या गर्दीचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यानं एसी लोकलचा पास काढलेला.  फक्त सुखानं चढण्याची संधी मिळावी हिच त्यामागची अपेक्षा.  एकदा सकाळच्यावेळी या एसी लोकलमधला एसीच बंद पडला.  दरवाजे, खिडक्या बंद...व्हेंटिलेशन नाही.  गुदमरायला झालं.  चक्कर येऊ लागली.  ठाण्याला उतरल्यावर अगदी थोडक्यात वाचलो, म्हणून धापा टाकत त्यानं फोन केला, आणि माझ्या  माझ्या छातीत धडधड सुरु झाली. 

लेकाच्या क्लासनिमित्तानं चार वर्ष सायंकाळी प्रवास करायचे, तेव्हाही आलेले अनुभव वेगळे.  लेकासोबत प्रवास करायचा म्हणून फर्स्ट क्लासचा पास काढलेला.  पण एवढे पैसे खर्च करुनही एखादी सीट काय, साधं निट उभं रहायलाही जागा मिळाली तरी आभाळ गाठल्याचा आनंद मिळायचा.  बरं यातही बिना तिकीट प्रवास करणारे असायचेच.  आम्ही या गावातले नाहीच


अशा थाटत कितीतरी मंडळी आरामात प्रवास करतांना भेटली आहेत.  एकदा रेल्वेमध्ये काम करणारे एक गृहस्थ कसला तरी पास घेऊन गाडीत बसले होते.  ते, त्यांची बायको आणि दोन मुले.  सोबत शेजारची दोन मुलं.  कोणाचंही तिकीट नाही.  फर्स्टक्लासमध्ये आपल्या घरचीच ट्रेन असल्याच्या थाटात आरामात ही मंडळी बसलेली.  एकानं आक्षेप घेतल्यावर त्यांनी तो पास काढून दाखवला.  गुर्मीमध्ये रेल्वेत कामाला असल्याचे सांगितले.  त्यांना बाकीच्यांचे तिकीट कुठे आहे, म्हणून विचारले तर आमचे कुटुंब आहे, म्हणून थाटात सांगू लागले.  ठाणे स्टेशन येईपर्यंत वाद सुरु होता.  शेवटी ठाण्याला त्या कुटुंबाला उतरवण्यात आले.  अर्थात आपली चूक मानण्यास त्यांनी नकारच दिला होता.  उलट त्या महिलेनं जाब विचारणा-यांना शिव्यांची लाखोली वाहिली होती.  असे अनुभव सोबत घेत लोकलनं प्रवास करतांना आता पंचवीस वर्ष होऊन गेली आहेत.  एवढ्या अनुभवानं जे शहाणपण येतं, ते आमच्याकडे आलं आहे.  आता कधीही गर्दीच्या वेळी लोकलनं जाण्याचं धाडस करत नाही.  अगदी गरज असेल तर लवकरची ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतो.  आपण चारपट पैसे देऊन फर्स्ट क्लास किंवा एसीचे तिकीट काढले असले तरी आपल्याला बसायला जागा मिळेलच ही अपेक्षा ठेवत नाही.  फक्त निट चढता यावे, आणि आपल्या ज्या स्टेशनला जायचे आहे, तिथे   निट उतरता यावे, एवढीच अपेक्षा आहे.  अर्थात माझ्यासारखीच अपेक्षा सर्वांचीच असावी.  गाडी आल्यावर त्यात चढणा-या महिलांच्या आवेशावर अनेक जोक, मीम्स येतात.  केसांना वर घट्ट बांधून, हातातील पर्स पुढे घेऊन, ओढणी किंवा साडीचा पदर गुंडाळून तयार असलेल्या या भगिनी एखादया युद्धावर जात आहेत, अशी टर उडवली जाते.  पण त्यामागची वेदना त्या बाईलाच माहित.  या धक्काबुक्कीमध्ये कितीजणींचे खांदे कायमचे अधू झाले आहेत.  अनेकींना पायाचा त्रास चालू झाला आहे.  पण ही सगळी दुखणी बाजुला ठेऊन त्या त्यांच्या कुटुंबासाठी या लढाईला तयार होतात.  हो...ही लढाईच आहे.  या लढाईत आपल्या जीवाला धोका आहे,  याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे.  आपण गेल्यावर एक-दोन दिवसांचा शोक होईल, पुन्हा मुंबई स्पिरीट हा शब्द चिटकवून सर्व सुरळीत चालू होईल, याचीही त्यांना जाणीव आहे.  पण गरजवंताला अक्कल नसते...कालपरवा झालेल्या दुर्घटनेनंतरही आता असेच अनेक उपाय सुचविले जात आहेत.  अजून एक आठवडा हा सगळा तमाशा चालेल.  नतंर सर्व चिडीचूप....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments

  1. सई ताई लेख खूप च छान ,चित्र डोळ्यासमोर उभे रहाते .सेम आपला अनुभव माझ्या लेकीने पण घेतलेला ठाणे office ला जाताना

    ReplyDelete
  2. Kare aahe khup mast

    ReplyDelete
  3. khup chhan

    ReplyDelete
  4. khup chhan

    ReplyDelete
  5. सई खूप छान लिहिलं आहे. डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. माझा नंबर 9423157510. तुझा नंबर कळव.
    सुधीर कावळे

    ReplyDelete
  6. अगदी खरं आहे.सत्य परीस्थिती आहे.

    ReplyDelete
  7. एका अस्थिर आयुष्यावरचं भाष्य करणारा लेख...आता आमच्या सारख्या वयस्क मंडळीना ट्रेनच्या प्रवासाचा विचार सुध्दा करणं शक्य नाही.

    ReplyDelete

Post a Comment