मी काय करु…
मी काय करु सांग ना....घरंच काम करायचाही आता कंटाळा येतो...दोन माणसांचं जेवण...त्यातही त्यांना आठवड्यातून दोन-चार वेळा कुठल्याना कुठल्या पार्ट्या असतात...मग मी एकटीच...टीव्ही बघून, मोबाईल बघूनही वैतागलेय...माझ्यासोबत भाजी घेत असलेल्या काकूंनी एवढं बोलून जोरात हातातलं भाजीचं बास्केट आपटलं की, माझ्यासकट अन्य बायकाही त्यांच्याकडे बघायला लागल्या. एक क्षणात त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी पदर डोळ्याला लावला. काकूंची अवस्था बघून मी सुद्धा माझी भाजी तिथेच ठेवली. काकूंचा हात पकडला आणि आम्ही दोघी चालायला लागलो. त्यांना थेट घरी घेऊन आले. तोपर्यंत काकू काही बोलल्या नाहीत. अगदी कुठे जातोय, हा प्रश्नही विचारला नाही. आमची पंचवीस वर्षाची ओळख. लग्न होऊन रहायला आले, तेव्हा पहिल्यांदा याच काकूंनी मला खूप मदत केली होती. नावापुरत्या त्या शेजारी होत्या. बाकी अगदी सख्या काकूची माया त्यांनी मला दिली. गेल्या काही वर्षात आमच्या दोघींचीही घरं बदलली आणि भेटी कमी झाल्या. आत्ताशा चालण्याच्या बहाण्यानं, किंवा भाजीच्या बहाण्यानं भेट होते. तशीच ही भेट झाली, आणि त्यात काकूंचे रुप बघून मीच मला दोष देऊ लागले.
आम्ही दोघी घरी आलो आणि काकू मोकळ्या झाल्या. काय करु ग, काहीच कळत नाही. एकटी पडलेय मी...माझ्याबरोबर बोलायलायही कोण नाही, म्हणत त्या अक्षरशः हमसाहमशी रडू लागल्या. त्यांचे ते हुंदक्यांनी गदगदणारं शरीर बघितलं आणि मीच काही काळ सुन्न झाले. काकूंनी वयाची पासष्टी ओलांडली होती. त्यांची दोन्ही मुलं स्थिरस्थावर झालेली. एक मुलगा हैद्राबादला होता, तर दुसरा जर्मनीमध्ये. काका, सरकारी नोकरीत होते, त्यांना पेन्शनही चांगली होती. शिवाय त्यांची दोन्ही मुलं लांब रहात असली तरी, दोघंही आपल्या आईवडिलांची चांगली काळजी घेणारी होती. त्यामुळेच एरवी हसतमुख असलेल्या काकू अचानक एवढ्या अस्वस्थ का झाल्या हे मला कळलं नाही. थोड्यावेळानं काकूंचा आवेग आवरला. पहिल्यांदा त्यांना घरात कोणी आहे का, याची काळजी वाटली. नवरा नेमका मिटिंगला गेला आहे, हे ऐकून त्यांना हायसे वाटले. आपले असे खचून जाणंही कोणी बघायला नको, हिच भावना त्यामागे होती. काकू पुन्हा शांत झाल्या. ते बघून मी हळूच विचारलं, काका कुठे आहेत, त्यांना बोलवून घेऊ का. काकूंनी माझ्याकडे शांतपणे बघितलं, आणि म्हणाल्या, ते कुठे घरात रहातात, कुठल्याशा मित्रांबरोबर पिकनिकला गेलेत. संध्याकाळी येतील. आता काय बोलावे हेच मला समजत नव्हते. काका आणि काकू हे दोघंही आमच्यासाठी आदर्श होते. पण आता नेमकं काय बिनसलं आणि तेही या वयात, याचा अंदाज लावता येईना.
पण काकू थोड्यावेळानं बोलू लागल्या आणि सर्व कोडं उलगडलं. काका-काकू
आणि त्यांची दोन मुलं असं चौकोनी कुटुंब. काका सरकारी नोकरीमध्ये चांगल्या पदावर. काकू गृहिणी. दोन मुलांच्या मागे त्याचं अर्ध आयुष्य गेलं. मुलं शिकली आणि नोकरी निमित्तानं घराबाहेर पडली. त्या दरम्यान काका निवृत्त झाले. काका निवृत्त झाल्यावर त्यांचे खूप मोठे प्लॅन होते. दोघंही फारशे कुठे फिरायला गेले नव्हते. मुलांच्या शाळा, नंतर महाविद्यालयीन शिक्षण यात अडकून राहिले होते. पण मुलं स्थिरस्थावर झाल्यावर दोघांनाही वेळ मिळाला. निवृत्त झाल्यावर काकांनी काकूंना सर्व भारत दाखवण्याचं आश्वासन दिलं. एक-दोन ट्रीप झाल्याही. पण नेहमी सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत घराबाहेर रहाणारे काका घरात राहिले आणि कंटाळू लागले. काकूंना याची सवय होती. त्यांची कामं संपत नव्हती. त्यात काका घरी आहेत, म्हटल्यावर त्यांचा उत्साह अधिक वाढला. स्वयंपाकघरात वेळ अधिक जाऊ लागला. यात काका घराबाहेर पडू लागले. घराजवळ असलेल्या एका नेत्याच्या कार्यालयात सहज पेपर वाचायला गेले आणि त्यांना त्यांच्यासारखेच मित्र भेटले. हळूहळू काका रोज सकाळी पेपर वाचायच्या निमित्तानं तिथे जाऊ लागले. मग संध्याकाळी पाय मोकळे करुन येतो, म्हणून बाहेर पडू लागले. सुरुवातीला काकूंना यात काही वावगं वाटलं नाही, आणि घरी एकटंही वाटलं नाही. कारण या सर्वात त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न ठरलं. त्या गडबडीत होत्या. मोठा मुलगा आणि सून लग्न झाल्यावर जर्मनीला गेले. त्यानंतर धाकटा मुलगा हैद्राबादला रहायला गेला. त्याच्यासोबत काका-काकूही चार महिन्यासाठी तिथे राहिले. मुलाचं घर लावून दिल्यावर दोघंही परत आले. आता घर ख-या अर्थानं खाली झालं. मुलं एकाच वर्षाच्या आत घराबाहेर पडल्यानं काकूंना जास्त एकाकीपणा जाणवायला लागला. काका पुन्हा आपल्या मित्र परिवारात रमले. त्यांना काकूंचा हा एकटेपणा समजलाच नाही. घरात मन लागत नाही, आणि काहीतरी करायला मिळतं, म्हणून त्यांनी नवीन मित्रमंडळ तयार केलं. या मित्रांसोबत काका कधी कुठे
पिकनीकला तर कधी कुठल्याशा मित्राच्या पार्टीला जाऊ लागले. या सर्वात घरी एकट्या रहाणा-या काकू मात्र मनानं खचून गेल्या हे कोणालाही कळलंच नाही. त्यांच्या मते त्यांचं जीवन एका यंत्रासारखं झालं होतं. सकाळी उठायचं, घर आवरायचं, नाष्टा करायचा. मग जेवणाची तयारी. नाष्टा करुन घराबाहेर पडलेले काका जेवायला घरी आले की जेवणं व्हायची. मग आवराआवर होईपर्यंत काका एक वामकुक्षी काढायचे. संध्याकाळी चहा झाला की काका पुन्हा बाहेर...नाही म्हणायला काकू घराबाहेर पडायच्या. भाजी, सोसायटीमधल्या मैत्रिणींसोबत चालायला...पण या सर्वात त्यांचे मन रमत नव्हते. माझ्यासाठी माझ्या कुटुंबात कोणालाही वेळ नाही, ही खंत त्यांना लागून राहिली होती. या सर्वात रिकाम्या वेळात मी काय करु, हा त्यांचा प्रश्न होता.
मला काही सुचेना...त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हा विचार करत असतांनाच काकूंनी विचारलं, तू काही पेन्टीग बिन्टींग करतेस की नाही. या त्यांच्या प्रश्नातच मला उत्तर सापडलं. काकू या खूप चांगल्या विणकाम करत असत. मी त्यांना त्याबद्दल विचारलं, तर म्हणाल्या, या वयात कोण करतंय विणकाम. डोळ्यांचा त्रास होईल. मी लगेच माझ्या खजान्याचे दरवाजे उघडले. थोडी शोधाशोध केल्यावर एक मोठी सुई मिळाली. लोकरीचे चार गुंडे हातात घेतले आणि ते काकूंसमोर धरले. एक क्षणभर त्यांचे डोळे चमकले. पण पुन्हा त्या हताश झाल्या. आता काय करु यांचं. मुलांची स्वेटर, शाली, रुमाल, तोरणं सगळं करुन झालंय. आता नको वाटतं ते...म्हणून परत त्या मान खाली घालून बसल्या. मग मी युट्यूबबाबाची मदत घेतली. नेमकं काय बघायचं आणि किती बघायचं हे माहित असले तर सोशल मिडिया हे माध्यमही वाईट नाही. या विकणकामातून काही नवीन वस्तू कशा तयार होतात, याचे व्हिडिओ काढले आणि काकूंना दाखवायला सुरुवात केली. की-चेन पासून पेन-पेन्सीलची टोपी आणि अगदी मोबाईलचे पाकीटही तयार करण्याच्या पद्धती होत्या. काकू हे सगळं हरखून बघत
होत्या. लोकरीचे अनेक प्रकार होते, काकू म्हणाल्या, किती ग बदल झालाय, एवढं सगळं मिळतं, हे मला माहितच नव्हतं. ऑनलाईनच मग काकूंना आवडलेली लोकर आणि त्यांनी सांगितलेले रंग पसंत केले, ऑर्डर केली. काकू आत्ताशा जरा हसल्या. हे मी करु शकते. घरी बसून करता येईल, आणि लेकाला सांगून घरी लोकर मागवता येईल.
मग नेहमीच्या मूडला आलेल्या काकूंना मी जेऊनच घरी पाठवलं. नव्हे, त्यांना लोकर, सुईसह घरी सोडून
आले. आठ दिवसांनी याच काकू पुन्हा माझ्या
दारात हजर, त्याही पूर्वीसारख्याच आनंदी चेह-यानं. माझ्या हातात एक सुंदर फुलाच्या आकाराची
लोकरीची की-चेन दिली. रोज एक-दोन होतात
बरं का...यांच्या सर्व मित्रांना पहिल्या दिल्या.
आता मोठ्या सुनेनं हे जॅकेट बनवायला सांगितले आहे, म्हणून काकूंनी
मोबाईलमधला फोटो दाखवला. ती लोकरही
पाठवणार होती. त्यांची ती लगबग आणि उत्साह
बघून मला मात्र हायसं वाटलं. मी काय
करु...या प्रश्नाचं उत्तर व्यापक असतं...कधी ना कधी हा प्रश्न बायकांच्या वाटेला
येतोच...निदान त्यासाठी तरी एक छंद जपावाच...मग त्यातून या प्रश्नाची वाट सुकर
होते...तशीच काकूंची झाली होती...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
आदरणीय सई जी आपण अतिशय उत्कृष्ट लिखाण केलेले आहे आयुष्याच्या संध्याकाळी जवळपास सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की आता काय करायचं त्या प्रश्ना मागची पार्श्वभूमी आपण अतिशय उत्कृष्टपणे मांडली
ReplyDeleteधन्यवाद
एक प्रकारे बायका ना काउन्सलिंग लेख द्वारा होतो.
ReplyDeleteभावनांचे सुंदर वर्णन आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग.
चित्रे कथेशी कशी मिसळतात हे आवडले.
जेष्ठांची खूप मोठी समस्या आहे. गोतावळा हवा. संवाद हवा ही खरी गरज असते. मग बऱ्याचदा नसलेले आजारपण ओढवून घेऊन सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करतात. तुमचा लेख छान आहे. आवडीच्या छंदात मन रमवण हा एक पर्याय आहेच
ReplyDeleteमी काय करु या प्रश्नाचे उत्तर मिळाले.जेष्ठ भगिनींना हा प्रश्न पडतो.छान लिहिलेस स ई
ReplyDeleteवास्तवाला सामोरे जातांना समाजात अनेक महिलांना आपल्या स्वत्वाची ओळख पारखून आनंदाच्या झूल्यावर डोलायला लावणारा लेख. .
ReplyDeleteनेहमीच सुंदर लिहिता तुम्ही. विचार करायला लावता.
ReplyDeleteसई , तुला भेटणारी माणसं, त्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं तू इतक्या सहजतेने सोडवतेस..तो विषय घेऊन तू लिहीलेले लेख!! सगळंच अतिशय उत्तम. ह्यावेळी सुध्दा आपले छंद जोपासावेत हा संदेश छान मांडलास...
ReplyDeleteललिता छेडा
Khup chhan lekh
ReplyDeleteखूप छान प्रेरणादायक लेख आहे.
ReplyDelete